**दगडाच्या देवाला सजवण्यापेक्षा विचारांना सजवा...**
दगडाच्या देवाला, मूर्तीला, फोटोंना सजवण्यापेक्षा विचारांना सजवा. आपण जेव्हा मूर्ती सजवतो, देवाला हार-फुले अर्पण करतो, तेव्हा नेमकं काय शोधत असतो? आपल्या कर्मांची भीती? की जे होणार आहे त्याला सामोरं जाण्याची हिंमत आपल्यात नाही?
जर देव आहेच, तर त्याचं अस्तित्व फक्त त्या फोटोपुरतं आहे का? त्या मंदिरापुरतं आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.
आपण सतत नामस्मरण करतो, देव-देव करतो; पण जेव्हा एखाद्या गरजू माणसाला मदतीची गरज असते, जेव्हा सत्याची बाजू घ्यायची वेळ येते, तेव्हा पुन्हा जप-जप सुरू होतो. ही श्रद्धा नसून अनेकदा हुशार माणसाची लाचारी असते.
वाईट घटना घडली की प्रश्न त्या दगडाला विचारतो — "असं का झालं?" पण जिवंत माणसाच्या वेदना दिसत नाहीत. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, माणसांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करतो.
आपण म्हणतो काळ बदलला आहे, आपण प्रॅक्टिकल झालो आहोत. मग हा जप कुठून येतो? देव आणि मंदिरं का येतात? जर खरंच आपण इतके प्रॅक्टिकल असू, तर घराघरात मंदिरं का आहेत? चौका-चौकात मंदिरं कशाला?
खरं तर आपण स्वतःलाच फसवत असतो.
"देव असेल तर तो मूर्तीत असण्याआधी माणसाच्या चांगुलपणात असला पाहिजे."
खरं प्रॅक्टिकल जीवन ते असेल जिथे घरात मूर्ती नसली तरी चालेल, पण देव माणसांच्या कृतीत दिसेल. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, व्यवहारात दिसेल. योग्य-अयोग्य ओळखून योग्य गोष्ट निवडण्यात दिसेल.
प्रत्येक गरजूला खूप काही नाही, पण जे आहे त्यातून थोडं देता आलं पाहिजे. आणि दिल्यावर "मी मोठा, तो लहान" असा भाव नसावा.
नोकर, मालक, श्रीमंत, गरीब — हे भेद नसावेत. सर्वांना समान वागणूक देता आली पाहिजे.
रोज घंटानाद कशाला? रोज दिवा कशाला?
दिव्याचं काम अंधार दूर करणं आहे. घरात अंधार नसेल तर मनातला अंधार दूर झाला पाहिजे. पण मनात भीती असल्यामुळेच आपण १०१ दिवे लावतो.
मनाचा अंधार दिव्याने जात नाही; तो विचारांनी, चांगल्या वागणुकीने आणि प्रामाणिक व्यवहाराने दूर होतो.
जर आपण एक चांगला माणूस म्हणून जगू लागलो, तर जप, दिवा, उदबत्ती यांची गरज उरणार नाही. कारण तेव्हा देव बाहेर शोधावा लागणार नाही; तो आपल्या कर्मातच दिसेल.
जेव्हा आपलं कर्म चुकतं, जेव्हा स्वतःवरचं लक्ष ढळतं, तेव्हाच आपण मूर्ती सजवण्यात रमतो. पण त्याच वेळी जिवंत माणूस, प्राणी, पक्षी यांच्या गरजा पूर्ण करताना मागेपुढे पाहतो.
मागणाऱ्याला हातपाय आहेत म्हणून दूर लोटतो; पण काहीतरी मागायलाही माणसाला किती हिंमत लागते, हे विसरतो.
खुश राहण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण स्वतःला फसवण्याचा अधिकार कोणालाच नाही.
मनाची शांतता ही आपल्या रोजच्या कर्मात असते. जे मिळतं ते आपल्या विचारांचा आणि कृतींचाच परिणाम असतो.
कोणाला प्रभावित करण्यासाठी मी हे लिहित नाही. समाजात राहून जे अनुभवते, जे खटकतं, जे प्रश्न पडतात, तेच मी लिहिते... आणि सांगतेही.
खरं तर मला मंदिरात जायला आवडतं. कारण तिथे देव भेटतो म्हणून नाही, तर तिथे कधी कधी माणसातला माणूस भेटतो म्हणून. तिथे लोकांच्या श्रद्धेवर श्रद्धा ठेवायला आवडतं म्हणून.
पण अजूनही माणसाची अंधश्रद्धेत जगण्याची वृत्ती पूर्णपणे गेलेली नाही. आजही काही लोक दुसऱ्यांच्या घरचं पाणीसुद्धा पित नाहीत. ही भक्ती नसते; ही विचारांची लाचारी असते.
"मी वेगळा आहे, मी श्रेष्ठ आहे, मी पवित्र आहे" — हा अहंकार असतो. पण खरंतर कोणीच श्रेष्ठ नसतं, कोणीच महान नसतं. परिस्थिती, संधी आणि कर्म एवढाच फरक असतो.
जे समोर येतं ते प्रसाद म्हणून स्वीकारता आलं पाहिजे. तिथे समोरचा माणूस काय खातो, कसा राहतो, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे महत्त्वाचं नसतं.
हो, एखादा व्यक्ती व्यसनी असेल, त्याचं चुकीचं वर्तन असेल, तर त्याच्या चुकीच्या कृतींपासून दूर राहणं योग्य आहे. पण अन्न, पाणी किंवा माणुसकी नाकारण्याइतकं आपण स्वतःला मोठं समजू लागलो, तर एकदा थांबून विचार करण्याची गरज आहे.
कारण हे अन्न, हे पाणी, हे जीवन आपल्याला इतक्या सहजतेने मिळत नाही. आणि कधी कधी अशी वेळ येऊ शकते की ज्या व्यक्तीकडे आपण आज तुच्छतेने पाहतो, त्याच्याच हातचं पाणी आपल्या जगण्याचं कारण ठरू शकतं.
म्हणून प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे — आपण जे वागतो ते श्रद्धा आहे की अंधश्रद्धा?
मला कोणाच्याही श्रद्धेला नाव ठेवायचं नाही. प्रत्येकाला त्याच्या श्रद्धेचा अधिकार आहे. पण कर्म, वागणं, व्यवहार, योग्य-अयोग्य यांचा न्याय करता आला पाहिजे.
देव जर कुठे असेल, तर तो माणसाच्या चांगुलपणात असेल. तो आपल्या कृतीत असेल. तो आपल्या न्यायबुद्धीत असेल.
जिथे आपलं ध्यान जातं, तिथे आपली ऊर्जा वाहते. हीच ऊर्जा पुढे आपलं आयुष्य घडवते.
जर विचार चांगले असतील, हेतू स्वच्छ असेल आणि त्यामागे प्रामाणिक मेहनत असेल, तर चांगलं घडण्याची शक्यता वाढते. म्हणून "देव पावला" असं म्हणण्यापेक्षा, त्या मागची इच्छा, विचार आणि परिश्रम ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे.
हा विचार मी आधीही लिहिला आहे, पुढेही लिहीत राहीन. कारण हा कोणाच्या श्रद्धेविरोधात नसून, माणसाने स्वतःच्या विचारांकडे आणि कर्मांकडे प्रामाणिकपणे पाहावं यासाठी आहे.देव मंदिरात, मूर्तीत शोधणं बंद करून आपल्यातच आहे का एकदा बघावं...आपल्याच आयुष्याचा प्रवास बघावा,कुठे अहंकार धरून आपल्याच व्यक्तीला अंतर तर नाही ना दिलं...किंवा माणुसकीला लांब केलं का कधी चुकून, तरी माफी,क्षमा, धन्यवाद हेच पुढे नेत राहते माणसाला.
कोणाचीही मन दुखावण्याचा हेतू मुळीच नाही. हे कोण्यात्याही एका व्यक्तीचं वागणंही नाही...हे प्रत्येक माणसात लपलेलं आहेच. हा लेख कोणाच्याही श्रद्धेविरोधात नाही. श्रद्धेला अधिक सजग, अधिक मानवी आणि अधिक प्रामाणिक बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
प्रश्न इतरांना विचारण्यापूर्वी स्वतःला विचारूया...
आपण देवाला सजवत आहोत की विचारांना?
"माणूस बदलला तर त्याचं जग बदलू शकतं."
खरा प्रॅक्टिकल माणूस बनून राहण्याचा आपला प्रवास चालू ठेवूया....
"दगडाच्या देवाला सजवण्यापेक्षा माणसातल्या देवत्वाला जागं करण्याचा हा प्रयत्न आहे."
"श्रद्धेला विरोध नाही; श्रद्धेला माणुसकीची दिशा देण्याचा प्रयत्न आहे."