Tijori - 13 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | तिजोरी - प्रकरण 13

Featured Books
Categories
Share

तिजोरी - प्रकरण 13








प्रकरण १३
"सुलतान...?"
पांढरी टाय घातलेल्या माणसाचा, म्हणजे डॅडचा आवाज वज्रला ऐकू आला.  पाठोपाठ एक फळी कुरकुरल्याचा आवाज आला.
"तू तिथे आहेस का, सुलतान?"
वज्रने दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि हळूच दरवाजा उघडला.
त्याने मागच्या बाजूला सरकत असताना, पिस्तूल ताठपणे धरून, स्वयंपाकघराच्या दाराकडे
लक्ष्य साधलं होतं, बंदुकीचा चाप ओढला गेला.
वज्रच्या केसांवरून जवळून गेलेल्या गोळीच्या जीवघेण्या सळसळण्याने त्याच्या हृदयाची धडधड वाढली आणि चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या.
वज्रने तीन पायऱ्यांवरून खाली उडी मारली आणि अंधारात गुडघे टेकून बसला.  सांझी आणि अथांग येई पर्यंत स्वत:ला वाचवण्यासाठी वज्रला पराकाष्ठेची धडपड करावी लागणार होती.पंपांवर चांदण्याचा उजेड  पसरला होता. जेवणाची खोली आणि दुरुस्तीच्या शेडभोवती दाट अंधार होता. बंगलाही अंधारात होता, पण तिथे पोहोचण्यासाठी, वज्रला
चांदण्याच्या त्या उजेडातून जावे लागणार होतं.म्हणजे त्या दोन गुंडांना तो दिसायची शक्यता होती.
एक-एक पाऊल टाकत, जेवणाच्या खोलीच्या भिंतीला लागून, वज्र मागच्या बाजूला सरकत
गेला.
अंधारातून एक हळू आवाज आला:
"अरे, पोरा, बंदूक खाली टाक आणि हात वर करून इथे परत ये. चल! बंदूक खाली टाक!" तो सूचक, आत्मविश्वासपूर्ण आवाज ऐकून वज्रला त्याच्या दिशेने गोळी झाडण्याचा मोह झाला, पण तो ऐनवेळी थांबला कारण  बंदूक चमकली असती तर वज्र कुठे आहे हे त्यांना दिसलं असतं.त्याना तेच हवं होतं.
आवाजाच्या दिशेने वज्र डोळे ताणून पाहत होता, पण तो गुंड दिसला नाही.
 तो आवाज पुढे म्हणाला, "बंदूक खाली ठेव. जर तू हात वर करून आलास तर तुला काही इजा होणार नाही. मला फक्त तुझे पैसे हवं आहेत. चल."
तो आवाज जवळ आला होता का? वज्रला तसं वाटलं.
तेवढ्यात वज्रच्या हाताला एक दगड लागला. त्यांची दिशाभूल करण्यासाठी  त्याने तो अंधारात फेकला. तो पायऱ्यांच्या पलीकडील जेवणाच्या खोलीच्या भिंतीवर आदळला.
बंदुकीचा आवाज प्रचंड मोठा आला आणि त्याचा प्रकाश डोळे दिपवणारा होता. एक गोळी वज्रच्या डोक्यावरून गेली. जर तो जमिनीवर आडवा पडला नसता, तर ती त्याला नक्की लागली असती.आवाजाच्या अचानक झालेल्या गडबडीवरून,वज्रला कळलं की तो पायऱ्यांवरून खाली उडी मारून त्यांच्या मागे,वज्रच्या दिशेने तोंड करून बसला होता.
वज्र हळू हळू मागे सरकू लागला, कोणत्याही क्षणी गोळी आपल्या शरीरात घुसून जाईल अशी अपेक्षा करत होता.
वज्रपासून सुमारे पंधरा फुटावर काहीतरी पांढरे हललं.’ टाय’
अगदी सावधपणे, वज्रने बंदूक उचलली आणि त्या पांढऱ्या अस्पष्ट आकृतीवर नेम धरला.नेमका  तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला,
समजा आपण त्याला मारले तर? मग काय? अशा आणीबाणीच्या क्षणी, मन किती वेगाने काम करू शकतं हे पाहून  वज्रला त्याही स्थितीत आश्चर्य वाटलं.
जर आपण त्या दोघांना मारलं,तर त्यांच्या मृत-देहाचं काय करायचं?
पोलिसांना फोन करून दरोड्याच्या प्रयत्नाची तक्रार करता येणार नव्हती., किंवा आपण या दोघांना गोळ्या घातल्या आहेत हेही सांगता येणार नव्हतं. अथांग पुन्हा त्याच्या जागी येऊ शकणार नव्हता. गुन्हे करण्याची पद्धत कदाचित जुनाट असेल, पण अथांग आणि सांझी हल्दियाहून परत येत असताना या दोन माणसांचा मृत्यू झाला होता हे कळण्याइतकी ती जुनाट नव्हती. पोलिसांनी त्यांना कोणी मारले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. जर त्यांना कळलं असते की वज्रने त्यांना मारले आहे, तर त्याच्या साठी नागपूर जेल वाट पाहत होतंच.
संकोच करत, त्याने बंदूक खाली केली. ती एक चूक होती.
त्या लहानशा हालचालीने नक्कीच डॅडचे लक्ष वेधलं असावं.
त्याच क्षणी, वज्रला त्याच्या बंदुकीचा आवाज ऐकू आला, त्याच्या छातीत एक बधिर करणारा धक्का बसला.
त्याला कोणतीही वेदना झाली नाही.
जणू काही आत कोणीतरी एक स्विच बंद केला होता, आणि विजेचा दिवा बंद केल्याप्रमाणे  शक्ती काढून टाकली होती.
त्याने बंदुकीवर पकड ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी ती अचानक असह्य जड झाली. एका कडक, टोकदार बुटाने त्याच्या बरगड्यांवर लाथ मारताच बंदूक  हातातून निसटून गेल्याचं वज्रला जाणवलं.
त्या लाथेमुळे छातीत तीव्र, भाजून काढणारी वेदना झाली. वज्र अचानक खाली कोसळला. त्याने मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण  घशातून कोणताही आवाज बाहेर आला नाही, फक्त गरम रक्ताचा एक जोरदार प्रवाह आला.त्याची शुद्ध हरपली......
 
घड्याळ उलट्या दिशेने फिरत होतं.........
 
तो हितेंद्र कपूरच्या आलिशान पेंटहाऊस पासून दूर जाणाऱ्या जिन्यावरून आंधळेपणाने धावत होता....
 नंतर तो रस्त्यावर होता....
आणि पोलीस पाठलाग करत असताना त्यांच्या पावलांचा आवाज ऐकत होता.......
त्याला पुन्हा एकदा त्याच्या बंदुकीचा आवाज आणि छातीत होणारी तीव्र, डोळे दिपवणारी वेदना जाणवली.....
घड्याळ पुन्हा स्थिरावलं.
 
अथांगने नंतर वज्रला सांगितलं की ते दोघे आले तेव्हा त्यांच्या गाडीचा हॉर्न ऐकल्यावर त्यांनी पांढरा टाय वाला आणि आणखी एका माणसाला घाई घाईने रेस्टॉरंट मधून बाहेर येताना  आणि गाडीत बसून निघून जाताना पाहिलं.पण ते जेवायला आलेले असावेत असं त्यांना वाटलं. त्याला आणि सांझी दोघांनाही काहीतरी गडबड झाल्याचं जाणवलं होतं, कारण कुठेही दिवे लागले नव्हते. अथांग  ओरडत इकडे-तिकडे फिरत होता. त्याला वज्रला शोधायला काही मिनिटे लागली, त्याने वज्रला स्वयंपाकघराच्या दाराजवळ पडलेलं पाहिलं होतं.
आणि जेव्हा त्याला तो  दिसला होता, तेव्हा त्याला वाटलं की तो मेला आहे.....
त्या दोघांनी मिळून वज्रला रूममध्ये नेलं होतं आणि पलंगावर झोपवलं होतं.. अथांग वज्रचा  रक्ताळलेला शर्ट कापून काढत असतानाच त्याला शुद्ध आली होती......
वज्रला खूपच अशक्त वाटत होतं.
"काय झाले?" सांझीने विचारलं."हे कोणी केल?"
वज्रने बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द बाहेर आले नाहीत.
अथांग म्हणाला, "त्याला एकटे सोडा. मला त्याला ठीक करू द्या."
वज्र पुन्हा एकदा अंधारात हरवला.पुन्हा बेशुद्ध झाला, तेव्हा वेदना नाहीशी झाली, आणि त्यामुळे जरा दिलासा मिळाला.
जेव्हा पुन्हा शुद्ध आली, तेव्हा खिडकीतून सूर्यप्रकाश येत होता.
अथांग अजूनही तिथेच होता, पलंगाजवळ बसून वज्रकडे पाहत होता, पण सांझी गेली होती.
"आता कसं वाटतंय?" अथांगने पुढे झुकत विचारलं.
"ठीक आहे."
तो शब्द उच्चारण्यासाठी वज्रला  खूप प्रयत्न करावा लागला.
"बघ, वज्र," अथांग हळू आवाजात बोलला, प्रत्येक शब्द स्पष्टपणे उच्चारत होता, जणू काही तो एखाद्या परदेशी व्यक्तीशी बोलत असावा, "तुझी तब्येत खूप खराब आहे. मला तुला डॉक्टरांना दाखवायचं आहे, पण सांझी मला परवानगी देत नाहीये. ती म्हणाली की तुला डॉक्टर नको आहेत."
"मला नकोच आहेत."
"तुला डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे, वज्र." त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. "तुझी तब्येत खूपच खराब आहे. मी तुझ्यासाठी जे काही करू शकलो ते केलं आहे, पण ते पुरेसं नाही."
वज्रची तब्येत कितीही खराब असली तरी, त्याचा मेंदू बधिर झाला नव्हता. जेव्हा डॉक्टरांना कळेल की गोळी लागली आहे, तेव्हा त्यांना पोलिसांना कळवावं लागेल: आणि मग ......?.
खुल्या खिडकीतून हॉर्नचा आवाज आला.
गुणगुणत अथांग उठून उभा राहिला.
"हे ट्रकवाले माझा जीव मेटाकुटीला आणत आहेत. मी परत येतो." असं म्हणत अथांग बाहेर गेला.
वज्रने डोळे मिटले आणि त्याला डुलकी लागली.
जेव्हा दुपारच्या जेवणाच्या खोलीच्या मागच्या बाजूला आला , तेव्हा जवळ झालेल्या एका हालचालीमुळे वज्रला जाग आली.
सांझी त्याच्यावर वाकली होती.
"तुला गोळी कोणी मारली?" तिनं विचारलं.
"दोन गुंड, बंदूकधारी," वज्र म्हणाला.त्याचा आवाज ऐकण्यासाठी तिला जवळ वाकावं लागलं. "मी त्यांना यापूर्वी कधीही पाहिलं नाही."
"त्यांनी तिजोरी उघडली का?"
वज्रने तिच्याकडे पाहिलं. ती  ओळखूही येत नव्हती. ती अचानक दहा वर्षांनी मोठी दिसत होती. तिच्या वरच्या ओठावर घामाचे छोटे थेंब  दिसत होते. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.
"मला माहीत नाही."
"त्यांनी तिजोरीचा उल्लेख केला का?" तिचा आवाज थरथरत होता.
"नाही."
"ती बंद आहे. असं वाटत नाही की त्यांनी तिच्याशी छेडछाड केली आहे."  वज्र म्हणाला.
"मला हे जाणून घेतलंच पाहिजे! समजा त्यांनी पैसे घेतले असतील तर! पैसे गेले आहेत की नाही हे मला कळायलाच हवं!" सांझी म्हणाली.
वज्रने डॅडचा विचार केला. तो एक व्यावसायिक होता. जर त्याला तिजोरी सापडली असती, तर त्याने ती उघडली असती. तिजोरीबद्दल थोडीशीही माहिती असलेला कोणीही ती डब्यासारखी तिजोरी उघडू शकला असता.
"त्यांनी ते घेतले असतील," वज्र म्हणाला.
बोलण्याच्या या प्रयत्नामुळे त्याला खूप थकवा जाणवत होता. तो पुन्हा अंधारात तरंगत दूर जाऊ लागला.
"मला हे जाणून घ्यायचंच आहे! मला सांग, तिजोरी कशी उघडायची!"—सांझी
तिचा पांढराफटक, तणावपूर्ण चेहरा वज्रवर झुकला होता. अंधार दाटून आला.
खूप दूरवरून, आल्याप्रमाणे तिचा आवाज वज्रला ऐकू आला. "मला हे जाणून घ्यायचंच आहे! स्वतःला सावर! मला सांग ते कसं उघडायचे!"
तो आवाज, ती खोली आणि खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश अचानक तिथून गायब झाल्यासारखं वज्रला वाटलं.
###
पुढचा आठवडा अथांगने वज्रची खूप सेवा केली.
सातव्या दिवसापर्यंत वज्र डॅड आणि सुलतान बद्दल बोलू शकलो नव्हता.
"त्यांनी गल्ल्यातील पैसे साफ केले," अथांगने वज्रला सांगितलं, "आणि त्यांनी पेट्रोलचे पैसे आणि बहुतेक सर्व अन्न घेतलं."
वज्रला तिजोरीबद्दल आश्चर्य वाटले. डॅडला ती सापडली असेल आणि त्याने ती उघडली असेल का, असा विचार त्याच्या मनात आला, पण त्याने अथांगला त्याबद्दल काही सांगितले नाही.
"मला वाटतं की आता तू यातून बाहेर पडणार आहेस," तो पुढे म्हणाला. तो बारीक आणि थकलेला दिसत होता, आणि त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती, ती झोप न झाल्याची लक्षणं होती.
"तू थोडक्यात बचावलास. गोळी तुझ्या छातीत मध्यभागी नव्हती गेली, मी काढली ती, पण त्या प्रयत्नात तू बरेच तास बेशुद्ध होतास. पण  तू भाग्यवान आहेस."
"तू माझा जीव वाचवलास, अथांग," वज्र म्हणाला.. "ठीक आहे, आता हिशोब बरोबर झाला. "
"मी काय करावं अशी तुझी अपेक्षा होती—तुला मरू द्यावं?" तो हसला. "हे ठिकाण सांभाळणे आणि तुझी सेवा करणे खूपच कठीण गेले, पण आता मला वाटते की मी थोडी झोप काढू शकेन."
"तुझं आणि सांझीचं कसं चाललंय?" वज्रने विचारलं.
त्याने खांदे उडवले.
"मी तिला क्वचितच भेटलो या काळात. मी तुझी काळजी घेण्यात खूप व्यग्र होतो." त्याचं बोलणे खूपच सहज होते, त्याने वज्रकडे पाहिले नाही.पण वज्रला माहित होतं की तो खोटं बोलत आहे.
"मी तुला आधीच चेतावणी दिली आहे, अथांग. ती धोकादायक आहे."
"तिचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, आणि कधी होणार नाही," तो म्हणाला. दोघं एकमेकांकडे पाहत असताना बराच वेळ शांतता पसरली. मग अचानक त्याने विचारले, "पलाशला नक्की काय झालं होतं?"
"तिने त्याची हत्या केली, आणि मी इतका मूर्ख होतो की मी त्याला पुरलं. तिने तिच्या पहिल्या पतीचीही हत्या केली होती,ती एक खुनी आहे, अथांग, म्हणून सावध रहा." वज्र म्हणाला.
"तू काय बोलत आहेस याची तुला जाणीव आहे का?" तो पुढे झुकून म्हणाला.
"मी जे बोलतोय ते मला समजतंय. मी तुला सावध करतोय.."-वज्र
तो उभा राहिला.
" मी आता कामावर जातो.मी पुन्हा येईन. तू आराम कर."
वज्रकडे न पाहता तो निघून गेला.
ठीक आहे, आता त्याला कळलं होतं. तो सावध राहील. तिने पलाश आणि वज्रला जसं सहज मूर्ख बनवले होतं, तसं ती त्याला सहज मूर्ख बनवू शकणार नाही.
पण वज्रला माहीत नव्हतं की  इशारा देण्यासाठी  खूप उशीर झाला होता. हे त्याला दुसऱ्या रात्री कळलं.
वज्रला जास्त जागा मिळावी म्हणून अथांगने त्याचा पलंग दिवाणखान्यात हलवला होता.
त्याने  वज्रला सांगितलं की जर त्याला काही लागलं तर  हाक मारावी, पण जर काही तातडीचं नसेल तर त्याला झोपायचय. तो आणि वज्र एकमेकापासून दुरावले होते हे अजूनच पक्क झालं. सांझी अधूनमधून खिडकीतून  वज्रकडे पाहत असे, पण दूरच राहत असे..
मध्यरात्रीच्या सुमारास, अथांगने जेवणाची खोली बंद केली आणि दिवा मालवला. वज्रने सांझीला अकरा वाजल्यानंतर काही मिनिटांनी बंगल्यात जाताना पाहिलं होतं. अथांग रूममध्ये येईपर्यंत बंगल्यातील दिवे बंद झाले होते.
त्याने वज्रच्या बेडरूमचा दरवाजा हळूच उघडला आणि विचारलं,
"तू जागा आहेस का?"
 वज्र काहीही न बोलता झोपेचं सोंग घेऊन पडून राहिला.. मग त्याला दरवाजा हळूच बंद झाल्याचा आवाज आला.
मग अथांग सावल्यांमधून बाहेर जाताना दिसला. तो वेगाने बंगल्याकडे चालत गेला, रूमकडे मागे पाहण्यासाठी थांबला, मग त्याने पुढचे दार उघडलं आणि तो बंगल्यात गेला.
वज्रला तिची पद्धत माहीत होती. तो इतके दिवस स्वतःचीच फसवणूक करत होतो की अथांगला स्त्रियांबद्दल काही वाटत नाही, आणि अथांगसुद्धा स्वतःचीच फसवणूक करत होता.
वज्रला असहाय्य आणि खूप वाईट वाटले: त्यात मत्सर नव्हता, पण भीती होती.
एकदा तिने अथांगवर आपला ताबा मिळवला की, ती त्याला तिजोरी उघडायला लावेल. मग ती त्याची हत्या करेल. वज्रने त्याला चेतावणी दिली होती की एकदा पैसे हातात ती त्याची हत्या करेल, आणि मग वज्रची ही हत्या करेल. त्यानंतर ती पैसे लपवून ठेवेल आणि पोलिसांना बोलावेल.
वज्रने अथांगला डॅड आणि सुलतान वर्णन दिले होते. त्याने निश्चितपणे ते वर्णन सांझीला सांगितले असेल.
ती तर असा दावाही करू शकते की, जेव्हा ती हल्दियामध्ये होती, तेव्हा त्या दोघांनी अथांग आणि वज्रची हत्या केली
विचार करून डोक्याचा भुगा झाला वज्रच्या. बरोबरीने छातीत दुखत होतंच. रात्री अथांग दोन वाजता परत आला तेव्हा वज्रने त्याची हजेरी घेतली.
 "तिने तुला तिजोरी उघडायला सांगितली का?"
त्याने डोळे बारीक केले.
"तिजोरी? कोणती तिजोरी?"
"पलाशची तिजोरी."
"पलाशच्या तिजोरीबद्दल काय?"
"तिने तुला ती उघडायला सांगितली का?"
त्याच्या चेहऱ्यावरील गोंधळलेल्या हावभावांवरून वज्रला दिसलं की तिने सांगितले नव्हतं. तो जरा  स्थिरावला.
 "तिने कधीच तिजोरीचा उल्लेख केला नाही." अथांग म्हणाला.
"ती करेल, आणि ती तुला ती उघडायला सांगेल."
"हे काय प्रकरण आहे? तुला काय म्हणायचंय?"
"त्या तिजोरीत अशी काहीतरी वस्तू आहे जी तिला हवी आहे," वज्र म्हणाला., "आणि जेव्हा तिला एखादी वस्तू इतकी तीव्रतेने हवी असते, तेव्हा ती, ती मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाईल, आणि अगदी कोणत्याही थराला. ती वस्तू मिळवण्यासाठी तिने तिच्या नवऱ्याला गोळ्या घातल्या. ती मिळवण्यासाठी तिने मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, आणि आता तू आला आहेस. आणखी एक माणूस जो तिजोरी उघडू शकतो, आणि ती तुला आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात करत आहे, जेणेकरून तू ती उघडल्यावर ती तुला गाफील ठेवून तुझी हत्या करू शकेल. हे ऐकायला अविश्वसनीय वाटतं, नाही का? पण तसं नाही! ती तुझी हत्या करेल, जशी तिने तिच्या पहिल्या नवऱ्याची हत्या केली, जशी तिने पलाशची हत्या केली आणि माझी जवळजवळ हत्या केली होती. मी तुला सांगतोय—ती तिजोरी उघडू नकोस!" वज्र म्हणाला.
आतापर्यंत बोलण्याच्या श्रमाने तो इतका थकून गेला होता की त्याला घाम फुटला होता, आणि छातीतल्या वेदनांमुळे  श्वास कोंडत होता.
"तू वेड्यासारखा बोलतो आहेस," तो म्हणाला. "अशी कोणती वस्तू आहे जी तिला इतकी तीव्रतेने आणि तातडीने हवी आहे?"
त्यात पन्नास लाख पेक्षा जास्त रोकड आहे हे वज्र त्याला सांगणार नव्हता.
"मी तुला सांगितले होते की पोलिसांना संशय होता की तिने तिच्या पहिल्या नवऱ्याची हत्या केली आहे तिने पलाशची पण हत्या केली आहे. तिच्याशी लग्न करण्यापूर्वी, पलाशने तिच्याकडून एक कबुलीजबाब लिहून घेतला होता आणि तो तिजोरीमध्ये आहे. मी तो पाहिला आहे.जोपर्यंत तिजोरी उघडली जात नाही आणि ती तो कबुलीजबाब नष्ट करत नाही, तोपर्यंत तिला तुरुंगात जाण्याचा धोका आहे, आणि हे तिला माहीत आहे.”-वज्र
त्याने कपाळावर आठ्या घालत आपल्या मानेचा मागचा भाग चोळला.
" हे खरं आहे?"—अथांग
"तिने पलाशवर गोळी झाडली आणि तिने माझ्यावरही गोळी झाडली असती, पण तिने ट्रिगर ओढण्यापूर्वीच मी तिजोरीचा दरवाजा बंद केला. तिला माहीत होतं की तिजोरी उघडणारा मीच इथे एकमेव आहे आणि त्यामुळेच माझा जीव वाचला. आता तिची नजर तुझ्यावर आहे. ती तिजोरी उघडू नकोस, अथांग."—वज्र
"हे पटत नाही," तो म्हणाला. "जर ती तुझी हत्या करणार होती, तर तू तिच्यासोबत का झोपलास?"
वज्र त्या प्रश्नासाठी तयार होता. तो हा प्रश्न विचारणारच होता हे उघड होतं.
"जोपर्यंत ती तिजोरी बंद होती, तोपर्यंत ती माझं काहीही करू शकत नव्हती. आम्ही इथे पाच आठवडे एकत्र आणि एकटेच राहिलो, त्यानंतरच मी तिला स्पर्श केला.पण तिच्याशी रोमान्स करताना प्रत्येक वेळी मी मनाला बजावत  होतो कि काहीही झालं तरी तिजोरी उघडायची नाही.आणि मी ते पाळलं."—वज्र
आता वज्रच्या चेहऱ्यावर घाम आला होता आणि श्वास घ्यायला त्रास होत होता.
अथांग त्याची अवस्था पाहून जवळ आला.
"अरे! तुला शांत व्हावं लागेल. तू किती आजारी आहेस हे तुझ्या लक्षात येत नाही का?  चिडचिड  करणं थांबव—शांत हो!"
वज्रने त्याचं मनगट पकडलं.
"जर तू ती तिजोरी उघडलीस, अथांग, तर ती आपल्या दोघांनाही मारून टाकेल! मी तुला सावध करतोय ! जर तू ती तिजोरी उघडलीस तर आपण दोघेही संपलो!"
"शांत हो मित्रा. तिने मला अजून तिजोरी उघडायला सांगितलेली नाही." एवढ्या बोलण्याने वज्रला ग्लानी आली.
तो गाढ झोपेपर्यंत अथांग तिथे थांबला.
दुसऱ्या दिवशी सकाळी अथांग आत आला. आणि त्याने वज्रची दाढी केली. तो शांत होता, दोघांनीही त्या तिजोरीबद्दल काहीच उल्लेख केला नाही.दिवस हळूहळू सरकत होता. वज्र खिडकीजवळ पडून बाहेर चाललेली धावपळ पहात होता. सांझी आणि अथांग दोघेही खूप कष्ट करत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी आणि पुन्हा रात्री जेवणाच्या खोलीत खूप गर्दी होती.
अखेरीस, सुमारे दहा वाजता, रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आणि अथांगला वज्रसाठी सूप आणायला वेळ मिळाला.
"आजचा दिवस खूपच धावपळीचा होता," तो भिंतीला टेकून म्हणाला. "तू पुन्हा उठून फिरायला लागल्यावर मला आनंद होईल."
"मी लवकरच फिरायला लागेन," –वज्र
"हो." " वज्र,आम्ही रात्रीचे जेवण करत असताना, आज प्रथमच तिने मला विचारलं की मी तिजोरी उघडू शकेन का."
 दचकल्यामुळे वज्रच्या हातातून थोडे सूप सांडले.
 "तिने विचारलं?"—वज्र
"हो. मी म्हणालो की ती पाहिल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही."
आता वज्रच्या हृदयाची धडधड वाढली होती.
 "ती काय म्हणाली?"
" तेवढ्यात एक ट्रक आला आणि आमचे ते बोलणे थांबले. त्यानंतर आम्हाला त्याबद्दल पुन्हा बोलायला वेळच मिळाला नाही."-अथांग
"जोपर्यंत ती तिजोरी बंद आहे, तोपर्यंत तू ठीक आहेस आणि मी सुद्धा. मी मस्करी करत नाहीये, अथांग."—वज्र
"ठीक आहे, तर तू मस्करी करत नाहीयेस. जर परिस्थिती इतकी गंभीर असेल, तर मला पलाशची बंदूक दे ना—ज्याने तो नेमबाजीचा सराव  करायचा."—अथांग.
"ती तिच्याकडे आहे. ती म्हणत्ये की त्या बंदुकीची कुठेतरी विल्हेवाट लावल्ये म्हणून, पण मला नाही वाटत तसं"—वज्र
त्या धक्क्याने तो हादरला. त्याचे डोळे बारीक झाले आणि त्याचे ओठ घट्ट मिटले.पुढे चार दिवस काही घडलं नाही.पाचव्या दिवशी वज्रला पहाटे जाग आली कशाने तरी, आणि अथांग खोलीत येताना दिसला. वज्रने काही विचारण्यापूर्वीच तो म्हणाला,
 "तिने मला तिजोरी दाखवली, आणि ती उघडायला सांगितली," तो म्हणाला. "मी तिला सांगितले की ती जुन्या प्रकारची आहे आणि मी ती उघडू शकत नाही."
वज्रने सुटकेचा एक मोठा श्वास घेतला.
"मग काय झालं?"
"ती म्हणाली की ती उघडण्याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे. तिला ती स्फोट करून उघडायची होती. मी म्हणालो की ते खूप धोकादायक आहे. मी तिला सांगितले की डायनामाइटचे काम माझ्या आवाक्याबाहेरचे आहे."
"तिचा तुझ्यावर विश्वास बसला का?"-वज्र
"का नाही? मी ते खूप खात्रीशीर वाटेल अशा प्रकारे सांगितलं."
"तिने सांगितलं का की तिला ती का उघडायची होती?"—वज्र
"हो." थोडा वेळ थांबून तो पुढे म्हणाला, "ती म्हणाली की तिजोरीत पैसे आहेत. जर मी ती उघडली, तर आम्ही ते वाटून घेऊ." आणखी एक मोठा विराम, मग त्याने विचारले, "तिजोरीत काही पैसे आहेत का, वज्र?"
त्याला सत्य सांगणे घातक ठरलं असतं.
"तीन हजार रुपये," --वज्र. "पलाश घोषने ते अडी-अडचणीसाठी तिथे ठेवले होते. तिला ते पैसे नको आहेत; तिला कबुलीजबाब हवा आहे."
"ती म्हणाली की तिथे खूप पैसे आहेत."—अथांग
"ती खोटं बोलत्ये.आहे. तिजोरी उघडायला लावण्यासाठी ते एक आमिष होतं."
"हो... ठीक आहे, तिचा भ्रमनिरास होईल."
दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक सांझी वज्रसमोर आली.
"मला सांग, तिजोरी कशी उघडायची," ती म्हणाली. तिचा आवाज कर्कश आणि अस्थिर होता. "जर तू मला सांगितले नाहीस, तर मी पोलिसांना फोन करेन आणि तू पुन्हा नागपूर जेलला जाशील."
पण आता ती त्याला ब्लॅकमेल करू शकत नव्हती. सर्व पत्ते त्याच्या हातात होते.
"जा, त्यांना फोन कर," वज्र म्हणाला. “तुला पैसे मिळणार नाहीत, आणि मी त्यांना सांगेन की तुझ्या नवऱ्याला कुठे शोधायचं. स्वतःची फसवणूक करून घेऊ नकोस, ते तुझ्या शब्दांपेक्षा माझ्या शब्दांवरच विश्वास ठेवतील.. जेव्हा मी त्यांना फणींद्र फड बद्दल सांगेन, तेव्हा तू खूप मोठ्या अडचणीत सापडशील”
पोटात गुद्दा मारल्यासारखा तिला धक्का बसला..
ती मागे सरकली. तिच्या आवळलेल्या दातांमधून श्वास बाहेर पडण्याचा आवाज  ऐकू आला. तिचा चेहरा उतरला. तिच्या डोळ्यात आलेली भीती पाहण्यासारखी नव्हती.
"तुला फणींद्रबद्दल काय माहीत आहे?" तिने विचारले.
"मला माहीत आहे की तू त्याची हत्या केली आहेस. तू एका जाळ्यात अडकली आहेस, आणि मी सुद्धा. आपल्याला आवडेल किंवा न आवडेल, आपले उर्वरित आयुष्य इथेच घालवावे लागणार आहे. यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. कोणीही  तिजोरी उघडणार नाही. मी अथांगला तुझ्याबद्दल सावध केले आहे. जरी त्याला उघडायचे असले तरी, तो ते उघडू शकत नाही. त्याला ते कसे उघडायचे हे माहीत नाही. तू तुझा वेळ वाया घालवत आहेस."
बराच वेळ ती वज्रकडे पाहत राहिली, मग ती दरवाजा उघडाच सोडून बाहेर गेली.
ही फेरी वज्रची होती, पण ती इतक्या सहज हार मानणार नव्हती. पुढची फेरी, जर वज्र सावध राहिला नाही, तर तिची असू शकत होती..
दोन दिवस काहीही घडले नाही, तणावपूर्ण आणि अस्वस्थतेचे दिवस होते, मग तिसऱ्या दिवशी, ती वज्रला भेटून गेल्यानंतर, अथांगने त्याला सांगितले की ती सिनेमा पाहायला जाणार आहे.
वज्रच्या मनात धोक्याची घंटा वाजली.
"ती तुला इथे एकटे सोडून जाणार आहे?" –वज्र
"ती चित्रपटांची वेडी आहे," तो खांदे उडवत म्हणाला. "तिला माझ्यासोबत यायचे होते, पण मी तिला सांगितले की मी तुला एकटे सोडून जाणार नाही—शिवाय, कोणीतरी हे ठिकाण सांभाळायला हवे."
"तू स्वतःची फसवणूक करत नाहीयेस ना?" वज्र म्हणाला. "ती चित्रपट पाहायला जात नाहीये. ती तुझ्यासाठी जाळे टाकत आहे."
त्याने अधीरतेने एक हालचाल केली.
“ मला कधीकधी आश्चर्य वाटते की तू वेडा तर नाहीस ना. आता तुझ्या मनात काय चाललंय?”—अथांग
"तिने तुला सांगितले आहे की तिजोरीमध्ये पैसे आहेत. आतापर्यंत तिला हे कळले आहे की पैसे तुझ्यासाठी सर्वस्व आहेत. ती तुझ्या कमकुवतपणावर डाव खेळत आहे. ती या आशेवर डाव खेळत आहे की, ती इथे नसतांना तू तिजोरी उघडशील, पण ती फार दूर गेलेली नसेल. तू तिजोरी उघडत असताना तुला पकडण्यासाठी ती वेळेवर परत येईल. तुला फसवून तिजोरी उघडायला लावण्याची ही तिची एकमेव संधी आहे."-वज्र
"मी तुला सांगितले ना, मी ती उघडणार नाही!"—अथांग म्हणाला.
"ठीक आहे, फक्त जेव्हा ती गाडी घेऊन निघून जाईल, तेव्हा हे लक्षात ठेव."
दहा वाजून काही मिनिटे झाली होती, तेव्हा वज्रने तिला गाडीत बसताना पाहिले. अथांग तिला सोडायला गेला होता. तो बराच वेळ तिथे उभा राहून पाहत होता, मग तो लंच रूमकडे चालत गेला आणि वज्रच्या दृष्टीआड झाला.
काहीतरी घडणारच आहे हे वज्रला माहित होतं, आणि ही आयुष्याच्या प्रवासाची अखेर आहे असे त्याला  वाटत होते.
एक तास काहीच घडले नाही. तो वज्रच्या आयुष्यातील सर्वात मोठा तास होता, मग त्याने रस्त्यावरून एका ट्रकचे हेडलाइट्स खाली येताना पाहिले. तो ट्रक गॅस पंपाजवळ थांबला.
अथांग लंच रूममधून बाहेर आला आणि त्याने ट्रकची सर्व्हिस केली. त्याने आणि ट्रकचालकाने काही मिनिटे गप्पा मारल्या, मग ट्रक निघून गेला.
हाच तो क्षण होता......
अथांग पंपाजवळ उभा होता, आणि तो हल्दियाकडे जाणाऱ्या डोंगरावरील उंच टेकडीकडे पाहत होता. 
तो तिथे उभा राहिला
मग तो वेगाने बंगल्याकडे चालत गेला.
त्याच्यातील पैशांची ही अनियंत्रित लालसा त्याच्यासाठी खूपच जास्त झाली होती. तो तिजोरी उघडायला निघाला होता!
तो तयारी करूनच आला होता हे स्पष्ट होते, कारण काही सेकंदातच त्याने दरवाजा ढकलून उघडला आणि तो आत गेला.
पण तो खूप सावधगिरी बाळगत होता.
तो जवळजवळ लगेचच पुन्हा बाहेर आला. ती परत येत नाहीये याची खात्री करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा लांब, डोंगराळ रस्त्याकडे पाहिले, आणि खात्री झाल्यावर तो पुन्हा बंगल्यात गेला.
तिजोरी उघडायला आणि पैसे शोधायला त्याला फक्त काही मिनिटे लागती असती.
 
अचानक वज्रला ती दिसली !
अथांग जेवणाच्या खोलीत गेल्यानंतर काही वेळाने तिने दिवे न लावता गाडी उतारावरून खाली आणली असावी. तिने ते अत्यंत कुशलतेने केले होते. जरी वज्र सतत पाहत होता, तरी त्याने तिला येताना पाहिलं नव्हतं, पण ती तिथे होती, वेगाने आणि शांतपणे बंगल्याच्या दिशेने जात होती.
तिने जाळं पसरले होते आणि अथांग त्यात अडकला होता.
तो तिजोरीसमोर बसला असणार. ती उघडायला त्याला जास्त वेळ लागणार नाही. त्या सर्व पैशांचे दृश्य पाहून तो थक्क होईल. तो इतका थक्क होईल की त्याला दरवाजा उघडल्याचा आवाजही ऐकू येणार नाही. येताना तिने वाटेत लपवलेली रिव्हॉल्व्हर आणली असणार. ती त्याला ठार मारेल. वज्रला याची खात्री होती, आणि ती तिथे होती, त्याच्यापासून काही फुटाच्या अंतरावर.
वज्रने अंगावरची चादर आणि ब्लँकेट फेकून दिले.  पाय जमिनीवर ठेवले. धडपडत दरवाजापर्यंत पोहोचला आणि स्वतःला सावरण्यासाठी हँडल पकडलं.
त्याच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता की आपण बंगल्यात जाऊन त्याला वाचवायचे आहे.
कसाबसा वज्रने दरवाजा उघडला. हॉल ओलांडला आणि पुढचा दरवाजा उघडला.
छातीतून रक्तस्त्राव  होतं होता.त्याने पुढचे दार उघडले आणि डगमगत अंधारात पुढे सरकला.
आता सांझीचा कुठेही मागमूस नव्हता.
अडखळत आणि हळू हळू वाळूतून  तो बंगल्याच्या दिशेने चालू लागला.
बंगल्याच्या पुढच्या दाराजवळ पोहोला होता, तेव्हाच त्याला बंदुकीच्या गोळीचा जोरदार, दबलेला आवाज ऐकू आला.
त्या आवाजाने त्याचं हृदय धडधडलं. एका जड वस्तूच्या पडण्याचा आवाज ऐकून तो थांबला.
मग कशाचीही पर्वा न करता, हा आपल्या आयुष्याचा शेवट आहे हे जाणून, त्याने दार ढकलून उघडलं आणि दिवाणखान्यात गेला.
अथांग भिंतीला टेकून उभा होता, त्याच्या हातात .४५ कॅलिबरची बंदूक होती. तिजोरीचं दार सताड उघडं होतं, आणि त्यातील सामान दोन कपाटांमध्ये व्यवस्थित रचलेले दिसत होतं. अथांगच्या पायाशी सांझी पडली होती. तिच्या कपाळावर एक निळसर-काळं भोक होते.
वज्र आणि अथांग एकमेकांकडे पाहत राहिले. त्याच्या हातात रिव्हॉल्व्हर होतं. त्याचा चेहरा पिवळसर-पांढरा पडला होता आणि भीतीमुळे घामाच्या थेंबांनी चमकत होता.वज्र आत येताच घाबरून त्याने वज्रचे हात आपल्या हातात घेतले.त्याच्या हातातील रिव्हॉल्व्हर वज्रने घेतलं, त्याला  सांभाळून घेण्यासाठी त्याचा खांदा डाव्या हाताने थोपटत  तो म्हणाला,
“ घाबरू नको,काय झालं नेमकं?”
"तू बरोबर बोलला होतास," अथांग म्हणाला, त्याचा आवाज थरथरत होता. "जर तू मला सावध केलं नसतंस, तर तिने मला संपवलं असतं. मला तिला मारायचं नव्हतं वज्र,खरंच. पण मी तिची रिव्हॉल्व्हर मी खेचून घेतली नसती आणि तिला गोळी घातली नसती तर मी मेलो असतो."
"आपल्याला इथून बाहेर पडायला हवं,गाडी काढ!  . मला डॉक्टरांची गरज आहे.आपण बोलत बसून वेळ वाया घालवायला नको. पैसे घे तिजोरीतले! आपण अजूनही पळून जाऊ शकतो! मी पुन्हा जेल मध्ये गेलो तरी बेहेत्तर, पण आधी बाहेर पडू. जगायचंआहे मला." वज्र म्हणाला.
अथांगने मान वळवली आणि पैशांच्या व्यवस्थित रचलेल्या ढिगाऱ्यांकडे पाहिले.
"हो."  अथांग म्हणाला. तो तिजोरीकडे गेला आणि पैसे बाहेर काढले. त्याने टेबलावरून टेबलक्लॉथ ओढून काढला आणि त्यात पैसे गुंडाळले.
त्याच्या चेहऱ्यावर असा भाव होता जो वज्रने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.
त्यामुळे तो एकदम अनोळखी वाटू लागला.
"तू किती जगशील  असं तुला वाटतं? तू संपलायस !" त्याच्या लोभामुळे त्याचा आवाज कठोर झाला होता.मगाशी दिसलेली भीती. अगतिकता  आता तिथे नव्हती. खरंच, या माणसाच्या मनाचा थांग लागत नाही.
" एवढ्या पैशांनी मी एक नवीन आयुष्य सुरू करू शकेन,ज्या प्रकारचं आयुष्य मला नेहमी जगायचं होतं. मी तुला इथे बंगाली निर्वासितांना आणून पैसे कमावण्याचा मार्ग तुला सुचवला होता पण तू नकार दिलास.स्वत:लाही पैसे घेतले नाहीस आणि मलाही घेऊन दिले नाहीस. गाडीत तुझ्यासाठी जागा नाही! माझ्याकडे असं पाहू नकोस! तुला वाटतं का की तुझी किंमत  तिजोरीतल्या पन्नास  लाख पेक्षा जास्त आहे? कोणत्याही माणसाची नसते!"  अथांग म्हणाला.त्याने पैशांचे बंडल वज्र समोर हलवलं.
 "तू मला कपूरच्या घरात चोरी करताना येऊ घातलेल्या आरोपातून  वाचवलंस, त्या बदल्यात तुला गोळी लागली तेव्हा तुझी सेवा करून मी तुला वाचवलं.  तूच म्हणाला  होतास ना की हिशोब बरोबर झाला आहे ! मी चाललो. तू तुझ्या मरणाने इथेच मर.”
अथांग म्हणाला आणि पैशाचं गाठोडं घेऊन उडी मारून वज्रला ओलांडून पलीकडे गेला.
वज्रला कशाचीही पर्वा राहिली नाही. त्याने अचानक  निर्णय घेतला. त्याला  गाडी पर्यंत जाऊ दिलं आणि अथांगने  मगाशी  त्याच्या हातात हात मिळवले तेव्हा अनावधानाने त्याच्या हातात दिलेली रिव्हॉल्व्हर उचलून अथांगवर नेम धरला.  पण नेम चुकला आणि  गोळी त्याचा डाव्या पंजात शिरली. दुसरी उजव्या पंजात आणि हातातलं गाठोडं खाली पडलं. तिसरी मात्र गोळी त्याच्या डोक्याला भोक पाडून पलीकडे निघून गेली आणि अथांग खाली पडला.
वज्रने त्याच्या पायाशी पडलेल्या सांझीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर रक्त होते आणि भीतीमुळे तिचे तोंड वाकडे झाले होते. ती भयानक दिसत होती.  आज ना उद्या, कोणीतरी ' जरा विसावा ला येईल आणि त्यांना बंगल्यातील दिवा लागलेला दिसेल. ते कोणीही असोत, ते खिडकीतून आत डोकावतील आणि त्यांना आतलं दृश्य दिसेल.
जर तोपर्यंत वज्र मेला असता, तर काही फरक पडला नसता, पण जर जिवंत  राहिला असता, आणि जर आत येणारा माणूस जीव वाचवू शकला असता, तर त्याच्यासाठी काही भविष्य नव्हतं. वज्रने तिला मारलं नाही यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. जेव्हा पलाश घोषचा मृतदेह सापडेल, तेव्हा वज्रने त्यालाही मारले नाही यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही. मृत्यूची वाट बघणे म्हणजे वेदनेचा डोंब सहन करणे, नकोच ते ! या विचाराने वज्र ने शांतपणे रिव्हॉल्व्हर ची नळी आपल्या डोक्याला लावली.
तिजोरी सताड उघडी होती...
तिच्या जवळ सांझी थारोळ्यात पडली होती...
बाहेर कार जवळ अथांग पसरला होता....
आणि...
तिजोरीतल्या पन्नास लाखांच्या नोटा गाठोड्यातून सुटून जमिनीवर पसरल्या होत्या...
 बेवारस !
(समाप्त ?????????)