Premaachi vedana books and stories free download online pdf in Marathi

Premaachi vedana

कथा –प्रेमाची वेदना ..!

ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.

---------------------------------------------

संध्याकाळची वेळ झालेली -दिवसभर ऑफिसमध्ये कामाला जुंपलेली माणसे ,कामाच्या ओझ्याखाली दाबून गेलेली ,आणि कामाची वेळ संपल्या बरोबर ,कधी एकदा या वातावरणातून बाहेर पडतो असे झाल्यामुळे .शाळेतून घरी पाळणार्या मुलासारखे आपापल्या घराकडे मोठ्या ओढीने निघाले होते .आपापल्या वाहनाने हरेकजण आपल्याच नादात,कसल्यातरी धुंदीत निघाला आहे असे पाहणार्याला वाटत होते. या अशा गर्दीकडे शांतपणे पाहणे विशाल ला नेहमीच आवडत असे.

आजही नेहमीप्रमाणे बाल्कनीत बसून समोरच्या रस्त्यावरील गर्दीकडे पाहत बसला होता.

त्याच्या सुदैवाने त्याची नोकरी फिरतीची ,रोज एका गावाला जाणे, दौरा करणे ,आणि गर्दीभरल्या एसटीतून थकून घरी येणे "हा ठरीव स्वरूपाचा दिनक्रम विशालच्या आणि त्याच्या घरच्या लोकांच्याही चांगलाच अंगवळणी पडलेला होता.

दौरा आटोपून आले की ..बाल्कनीत खुर्ची टाकून बसने ,हातात चहाचा कप असला की ..समोरचा उसळत्या जनसागराकडे पाहण्यात वेळ निघून जात असे.

रटाळ आणि निरस असा हा दिनक्रम पाहून त्याला कधी कधी वाटायचे ..आपल्या आयुष्यात मनाला सुखद वाटावे असे काही घडणार ? यांची शक्यता अशा परिस्थितीत फार कमी .! दौरे करणे , ऑफिसने दिलीले टार्गेट पूर्ण करीत रहाणे “ असेच महिनो-न-महिने काम करीत राहिल्यावर काय होणार दुसरे ?

आजकालच्या वर्क -कल्चर मध्ये काम करण्यात जीव अर्धमेला होऊ गेल्यावर .उत्साह कसा येणार.मनास उभारी ती कशी येणार ? असे विचार येऊन.विशाल ला वाटायचे आपण अकाली -म्हातारे होणार बहुतेक.

घरातील लोकांनी केव्न्हापासून भुंगा लावला होता- अरे विशाल -असा किती दिवस सडाफटिंग " मिरवणार रे तू ? ,पुरे कर ,आणि लग्नाचे घे मनावर ," आम्हला लोक भंडावून सोडताहेत .केव्न्हा करणार विशालचे ? तूच सांग .काय उत्तर द्यावे आम्ही ?

हे मात्र खरे होते ..आई-बाबांनी खूप दिवसापासून त्याच्या मागे एकच लकडा लावला होता..अरे विशाल , ही बघ स्थळांची यादी , अगदी अनुरूप आहेत रे , तू पहा तरी ...!

पण छे..! विशाल त्या लिस्टकडे पहातही नसे. जाउदे ना आई, मला जोपर्यंत कुणी मनापासून आवडणार नाही",तोपर्यंत काही घाई करायची नाही .मी सांगेनच ना !

हे सर्व आठवून विशाल स्वतःशीच हसला.काय गंमत आहे -त्याच्या अनेक मित्रांचे लव्ह-म्यारेज झाले होते .बेटे नशीबवान आहेत" हेच खरे ,प्रेम झाले ,जमले की लग्न करून मोकळे झाले . नाहीतर आमचे नशीब ..नुसता अंधार.

जाउदे ..आयेगी एक दिन .मेरे सपनो की राणी.

विचार झटकून टाकीत विशालने डायरीत उद्याचा दौरा कुठे आहे ते पाहिले , आणि त्याप्रमाणे.,सकाळी निघण्याची तयारी करून ठेवली .

सकाळी लवकरच्या गाडीने /बसने निघाले म्हणजे .संपूर्ण दिवस हाताशी असतो आणि ठरवलेले काम नीटपणे पूर्ण होते " हा कार्यानुभव विशालने आपल्या गुरूंच्या सहवासातून शिकला होता.याप्रमाणे वागणे ही त्याची आता सवय झाली होती.

आजही नेहमीप्रमाणे एसटी साठी वाटपहात होता.फारशी गर्दी नव्हती ,गाडी लागली की आरामात जाऊन बसायचे

,इतक्यात .त्याच्या मागच्या सीटवर येऊन बसलेल्या दोन तरुण प्रवाशात एकाएकी जोरात भांडणे सुरु झाल्याचे त्याला दिसले , त्याच्याच वयाचा तरुण . सोबतच्या तरुणीला ..मोठ्या आवाजात सुनावत होता .आणि .ती तरुणी फक्त गप्प बसून त्याच्याकडे नुसती एकद्क पहात होती ...तिने स्वतःचे ओठ जणू शिवून टाकले असावेत , आपल्या ओठातून आता .एकही शब्द येऊ नये याची ती काळजी घेते आहे हे पाहणाऱ्यालाजाणवत होते ,आणि तिची नजर घाबरलेली होती .आणि त्या सोबत एक भीती मात्र तरळत होती तिच्या टपोर्या डोळ्यात .

त्या दोघांच्या संवादातून एक जाणवत होते की - इतके दिवसापासून चाल असणारे त्यांचे प्रेम-प्रकरण आता यापुढे संपुष्टात येणार .कारण दोघांच्या प्रेमाला कुणाचीच संमती नव्हती " हे स्वीकारणे त्याला कठीण जात होते तरी तो तिला म्हणत होता ..मी तुला सांगितले होते ..हे सोपे नाहीये .मागे सारायचे नाही आता , तुला साथ द्यावी लागेल माझी . असे मध्येच सोडणे नाही जमणार आता .

पण,ती घाबरली होती ..आयुष्यभर विरोधाच्या झळा सहन करण्याचे धैर्य तिच्यातनव्हते , या मर्यादेची जाणीव तिला झाली होती ,त्यामुळे असे एकत्र येण्यात कशाचा आलाय आनंद ? आणि काय सुख मिळणार आपल्याला या प्रेमातून ? त्यापेक्षा आपण इथेच थांबू या .असे ती त्याला विनवीत होती .आणि तो तो त्याला तिला दूषण देण्यास जास्तच जोर येत होता.

समोर अशा गोष्टी घडत असतांना पब्लिकला प्रेक्षक होण्यात जास्त इंटरेस्ट असतो ,शिवाय काही सांगायला गेलं तर ,आमच्या खाजगी गोष्टीत बोलू नका "असे सुनावले तर काय घ्या ? त्यापेक्षा ,तमाशा पाहणे ठीक ! असा विचार पब्लिक नक्कीच करीत असणार .

विशालने याच दृष्टीने समोरच्या प्रकाराकडे पाहण्याचे ठरवले . यांचे काय सांगावे..आता भांडतील .थोड्यावेळाने लगेच गळ्यात -गळे घालतील ".या प्रेमाचे रंग खरेच कधी न कळणारे असतात.

त्या दोघांचे भांडण अधिकच तीव्र होणार अशी चिन्ह दिसू लागली.. एव्हाना ड्रायव्हर आणि कंडक्टर ने दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ,नंतर दोघांन खाली उतरण्यास सांगितले ,तो लगेच उतरला ,पण,ती उतरेना ,

म्हणाली..मी खाली उतरले की तो मला काही तरी नक्कीच करीन .त्याला माझा खूप राग आलाय .त्या भरात तो काहीही करू शकेन ..मला गाडीतच बसू द्या ,मी उतरेन माझ्या नातेवाईक असलेल्या पुढच्याच गावाला.पण आता इथून त्यांच्या तावडीतून सोडवा .

तिची ही अशी विनवणी ऐकून गाडीतले इतर प्रवासी आता तिच्या बाजूने बोलू लागले .कंडक्टरला काय वाटले कुणास ठाऊक..त्याने तिला हवे असलेल्या गावचे तिकीट दिले .

ती खिडकीतून बाहेर पहात होती ..खाली उभा असलेला तिचा “ तो “ तिच्याकडे रागानेच पाहत होता .ठीक आहे .जातेस तर जा .असेच तो म्हणत असावा.असे तिला आणि इतर पाहणार्यांना वाटत होते.

त्याला तसाच सोडून आणि तिच्यासाहित बस निघाली , नंतर थोड्याच वेळात सगळे वातावरण निवळून स्थिर झाले. जो तो आपल्यात गुरफटून गेला ..विशालच्या मनात दिवसभराच्या कामाचे विचार सुरु होतेच..थोड्यावेळापूर्वी बसमध्ये घडलेल्या दोन प्रेमी जीवांच्या भांडणाचा त्याला सहजपणे विसर पडला होता.

हातावर काम असले की वेळ सुद्धा हातातून कसा वाळूसारखा निसटून जात असतो "-कितीही पकडून ठेवू "म्हटले तरी हे जमत नसते . विशालचे ही नेहमीच असे होई .आजचा दिवस तसा हेक्टिक होता. क्लायंट व्हिजीट , -मिटिंग, चर्चा , त्यातून निष्पन्न झालेले यश-अपयश “ या सगळ्या ..सगळ्याच गोष्टी मनाला थकवणाऱ्या. तरी बर .जमेल तितका वेळ विशाल आपल्या आवडीच्या संगीतात रमून जायचा प्रयत्न करीत असे.

आता त्याच्या घरी येण्याची वाट पहात असलेलेले आई-बाबा,विशाल घरात आल्याबरोबर चहाच्या कपासोबत लगेच स्थळांचे डिटेल -आणि मुलींचे फोटो समोर ठेवून म्हणणार- अरे विशाल .बघ नारे , तुला नक्कीच यातली एखादी पसंत पडेल.

या विचाराने त्याला सकाळचा प्रसंग आठवला ..बापरे , प्रेम असे असते ? जीवापाड प्रेम करायचे ,त्याच्याशी असे भांडायचे ? त्याचा राग राग करायचा ? का तर ..आता ती त्याची होणार नाही" .म्हणून का सूड घेणार तिचा ?

असे कसे असेल मनापासून केलेले प्रेम? आपण पाहिलेले प्रेम तर खुनशी प्रेम ?

या विचारातच विशाल गावाकडे जाणाऱ्या बस मध्ये चढला ..अरेच्या .काय योगायोग .तीच बस, तोच कंडक्टर -ड्रायव्हर ही तोच ..त्यांनी विशालला ओळखले असावे ..गाडीतले इतर प्रवासी मात्र सकाळपेक्षा वेगळे दिसत होते.

तिकीट देता देता .कंडक्टर त्याला म्हणाला ..साहेब .ती सकाळची पोरगी ..!

का ,काय झाल ? विशालने उत्सुकतेने विचारले ..

साहेब- तिची स्टोरी सिरीयस झाली की राव..सब खेल खतम ..!

खतम ..? नेमक काय झालय सांगता का ? विशालने न राहवून विचारले .

सकाळी ती पोरगी तिच्या नातेवाईकाच्या गावाला उतरली ,घरी नीटपणे पोंचली म्हणे ,पण, तो तिचा भांडणारा हिरो ,तिच्या अगोदर तिथे पोंचला होता मोटरसायकलवरून . तिला घरी जाऊन भेटला .सर्वादेखात भांडभांड भांडला .आणि अचानकपणे त्याने तिच्यावर हल्ला केला .तीक्ष्ण हत्याराने भोसकले तिला .आरपार जखमाझाल्या , जागेवरच गेली बिचारी ,नंतर त्या पोराने तिथल्या तिथेच स्वतःला संपवून टाकले .

प्रेम होते म्हणे तिच्यावर ..असे कसे हो हे जीवघेणे प्रेम ? .आजकाल सर्रास झाले आहे अशा प्रेमाचा जणू..सुकाळच झालाय जणू.रक्ताच्या लाल भडक रंगातले हे प्रेम !

साहेब, आजचा दिवस लई बेकार म्हणयचा .दुसर काय म्हणणार आपण.

विशालने कंडक्टरच्या उदासलेल्या आव्वाजाकडे पाहिले ,काही बोलावे अशी त्याची इछाच संपून गेली.

सकाळची ती तरुणी ..तिची नजर .टपोरे डोळे ..ती वेदना ..आता कायमची विझून गेली होती. सारे आठवून आता विशालचे मन अधिकच उदासले ..प्रेमाचे गोडवे गाणार्या जगाला .आजच्या असहाय प्रेमाची वेदना कधीच ऐकू जाणार नव्हती .

माथेफिरू प्रेमाचे हे भडक रंग...! त्याच्या मनाला अस्वथ करून टाकणारे होते.

बसच्या खिडकीतून त्याला दिसत होती एक ..उदासलेली एक संध्याकाळ .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा -

प्रेमाची वेदना ..!

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो- ९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------