Te.. aani.. te books and stories free download online pdf in Marathi

ते...आणि...ते

‘ते “आणि ..”ते “


ते एक ज्येष्ठ पेक्षाही जेष्ठ नागरिक आहेत
त्यांचे वय वर्ष 100 आहे .त्या गावात त्यांच्या इतक्या वयाचे कोणीच नाही
पण त्याना पाहिलेत तर तुम्हाला त्यांच्या वयाचा अजिबात अंदाज येणार नाही
सहा फुट इतकी उंची तितकाच दणकट बांधा ..
गोरापान रंग त्वचा अगदी तुकतुकीत ,घारे मोठे भेदक डोळे ,चष्मा अजिबात नाही
चेहेरा थोडा थकलेला पण तरीही तरतरीत !!!

पोशाख ठरलेला ..दुटांगी शुभ्र धोतर त्यावर फुल शर्ट वर क्रीम कलर चा कोट
हलक्या भगव्या रंगाचा पटका , हातात काठी ..
मिशा पिळदार आवाज एकदम खणखणीत ..
आणि बांधा एकदम ताठ ..कुठेही वयाचा लवलेश नाही
तोंडात कायम पांडुरंग ..पांडुरंग हे नामस्मरण ..
याच गावात ते शाळेत गणिताचे शिक्षक होते

त्यामुळे गावातली प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे शिकली आहेच
महिन्यातून साधारण दोन वेळ त्यांची चक्कर बँकेत असतेच
ते आलेले त्यांच्या आवाजा वरून बँकेच्या दारात असतानाच समजते ..
तसे पूर्वी ते फक्त एक वेळ पेन्शन काढायला येत असत
पण माझी ओळख झाल्या पासून ते सहज म्हणुन पण बँकेत चक्कर मरतातच
माझ्या विषयी का कोण जाणे त्याना एक आपुलकी वाटलेली त्यांच्या चेहर्या वर दिसत असते
ते येतात तेव्हा कधीच मोकळ्या हाताने येत नाहीत .
हातात एखादा पेढा किंवा खडीसाखर ,एखादे चोकलेट किंवा गोळ्या नक्की असतात ज्या ते मला देत असतात .
माझ्या केबिन मध्ये येताच “मी बसू ना”? असे नेहेमीचा विचारतात
त्यात काय विचारायचं ?या हो बसा म्हणले की ते आरामशीर बसतात
फक्त प्रोब्लेम एकच आहे त्याना ऐकायला मात्र अगदी कमी येते किंबहुना येतच नाही
त्यामुळे मला त्यांच्याशी बोलताना खाणाखुणा हातवारे यांची कसरत करावी लागते !
गेले काही महिने माझ्याशी ओळख झाल्या पासून ते नेहेमी येऊन माझी चौकशी करतात
मी काय करते कुठे राहते ,माझा नवरा काय करतो मुले काय करतात
ही सारी बारीक सारीक माहिती त्यांनी हळू हळू जमा केली आहे ..
अर्थात या सार्या त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देताना मला बर्यापैकी ख्नाणाखुणा कराव्या लागल्यात
ते आले की मी त्याना चहा घेणार का हे विचारते ते आधी नाही म्हणतात
पण नंतर मात्र त्याना चहा विचारल्याबद्दल खुप आनंद होतो
मग ते चहा येईपर्यंत माझी नेहेमीची चौकशी सुरु करतात
ऐकू येत नसल्याने ते फक्त एकटेच बोलत असतात माझ्या कडून कोणतेच उत्तर त्याना नको असते
“काय डब्यात दोन तीन पोळ्या आणता ना ? पोटभर जेवत जा ..
मी खुणा करून सांगते फक्त एक पोळी आणि थोडा भात आणते ..असे
पण उत्तरा कडे त्यांचे लक्ष नसते ..
शरीरं आद्यं खलु धर्म् साधनं !! तब्येत छान तर सर्व छान ..असे ते म्हणतात ..
मला तुमचे हे वागण मात्र आवडते बर का ..ही कमेंट करतातच ..!!
त्याना नक्की काय आवडते हे विचारण्यात अर्थ नसतो कारण ते फक्त बोलत असतात ऐकत नसतात
मात्र ते कायम समाधानी असतात ..!
स्वतचे कुटुंब स्वतच्या अडचणी या विषयी ते कधीही भाष्य करीत नाहीत
किंबहुना त्यांच्या वैयक्तिक आयुष्या विषयी मला काहीच माहिती नसते
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते कायम भुतकाळात वावरतात ..
त्याना वर्तमान अथवा भविष्यकाळ नसतो ..!
आता काय घडते आहे त्या कडे त्यांचे लक्ष नसतेच
आणि भविष्यात काय घडेल याची पण त्याना कधीच काळजी नसते
आपल्या नोकरीत आपण कसे स्वच्छ होतो ..
अत्यंत कमी कमाईत आपण आपला संसार कसा केला
कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही हे ते अतीव समाधानाने सांगत असतात !
ते कीतीही वेळा आले तरी साधारण हेच संभाषण आमचे होत असते !
ते केबिन मध्ये असताना काहीही कामाने आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते ओळखत असतात
पण ती व्यक्ती त्यांच्याशी किंवा माझ्याशी काय बोलते इकडे त्यांचे लक्ष नसते
ते स्वतच्या जगातून शक्यतो बाहेर येत नाहीत
कॉम्प्युटर वर मला काम करताना पाहून आपण पाच पाच आकडी अंकाच्या बेरजा कशा सहज करीत होतो
हे ते आवर्जून सांगतात !!
आणि आता काम किती सोपे झालेय हे ही निर्वीकार पणे बोलतात
मला त्यांचा समाधानी स्वभाव आणि ईश्वरी देणगी असलेली त्यांची तब्येत खुप आवडते
चहा पिऊन झाल्यावर काही वेळात ते जायला उठतात
जाताना मी दिलेली खडीसाखर अथवा गोळी नक्की खा हे मला आवर्जून सांगतात
मी हो नक्की खाईन असे आश्वासन देते ..
तरी ही ते ..तुमच्या कामाच्या गर्दीत तुम्ही खायला विसरून जाल हे ही नेहेमीच सांगतात
आणि ते पुन्हा येईन असे सांगून पांडुरंग पांडुरंग म्हणत माझा निरोप घेतात ..
“ ते “ही एक जेष्ठ नागरिक आहेत
बँकेत येतात तेव्हा मोठ्या मोठ्याने आरडा ओरडा करीत येतात
त्यांचे वय साठ पासष्ठ असावे .ते एक शेतकरी आहेत
थोडीफार शेती आहे त्यांची त्यात थोडे भात व इतर पीक होते
मला ते प्रथम भेटले तेव्हा मोठा आवाज ऐकून बाहेर नक्की काय चालले आहे याचा कानोसा मी घेत होते
ते अचानक आत आले आणि माझ्या समोर बसले
अत्यंत रागीट मुद्रा किरकोळ शरीरयष्टी
अंगावर थोडे मळके कपडे .एका हातात धोतराचा सोगा
डोळ्याला चष्मा ,डोक्यावर पांढरी मळकी टोपी
कपाळावर भरपुर आठ्या ...
काय झाले असे मी विचारायचा अवकाश त्यांचा बांध फुटला ..
“बघा हो बाई माझा हाता तोंडाशी आलेला मुलगा अचानक देवाघरी गेला
घरी बायकोने तर अंथरूण धरले आहे ..!
तरुण सुन सोबत छोटी नात घेवून मी कसातरी हा प्रपंच करतो आहे बघा
आता मुलाच्या नावा वरचे पैसे आलेत ते नातीच्या नावावर करायचे आहेत
पण ही तुमची लोक जरा पण सहकार्य करीत नाहीत या म्हातार्याला .”
ते तडातडा हातवारे करून बोलत होते .
मी शिपायाला बोलावून माहिती घेते नक्की काय झाले याची ..
तेव्हा समजते कोणताही प्रुफ न आणता अथवा फॉर्म न भरता त्याना खाते उघडायचे असते
जे शक्य नसते ..
मग मी चहा मागवते आणि त्याना बोलते करते
तेव्हा समजते मुलाच्या अचानक जाण्याने ते सारे घरच सैरभैर झाले आहे .
मला वाईट वाटते ..मग मी त्याना चार गोष्टी गोड बोलून सांगते
आणि दुसर्या दिवशी फॉर्म आणि आय डी प्रुफ घेवून सुनेला आणायला सांगते
ते मग शांत होतात आणि असे मला आधी सांगायला काय होत होते असेही बोलतात .
दुसर्या दिवशी सुनबाई आणि नात येते
आम्ही रीतसर फॉर्म आणि प्रुफ तपासून घेतो
सुने कडे पाहताना मला गलबलून येते ..अगदी निरागस चेहेरा लहान वय ..
आणि पदरात इतकी छोटी मुलगी ..
लहान गावात अशा बायकांचे जगणे खरेच खुप खडतर असते
खाते उघडताना पाचशे रुपये मागताच ते पुन्हा दंगा सुरु करतात
त्यांचे म्हणणे इतका भयंकर प्रसंग असताना पाचशे रुपये काय मागता ??
सून एकदम कावरी बावरी होऊन जाते ..पुन्हा मी त्यात भाग घेवून समजावते
अखेर ते ते पैसे भरतात आणि एकदा खाते उघडते ..
आता ते मुद्दाम आता येवून मला सांगून जातात पाच लाख रुपये फिक्स ठेवणार असे ..
दोन दिवसांनी बस स्टोप वर उभे असताना ..
अचानक तोच परिचित आवाज ऐकू येतो
ते शेजारच्या दुकानातील लोकांना सांगत असतात ..
मुलाचे पैसे मी नातीच्या नावावर ठेवणार आहे
नातीचे भले करणार आहे असे ..
मध्येच माझ्याकडे लक्ष गेल्यावर ते हसतात आणि म्हणतात
या म्यानेजर साहेबाना मी सर्व सांगितले आहे ..
मी मनातल्या मनात अस्वस्थ होते ..
आणि ते गेल्यावर सोबतच्या गावातल्या लोकांना म्हणते खरेच किती वाईट प्रसंग आहे ना ..
सोबतची गावातली लोक हसतात..
काय म्याडम तुम्ही पण त्याच्यावर विश्वास ठेवता ?
म्हणजे ?...मी विचारते
अहो एक नंबर दारुडा आहे तो आत्ता पण भरपूर पिलाय ..
मुलाचे आलेले पैसे नातीच्या नावावर कुठले ठेवतो ?
सगळे दारूत उडवून टाकेल बघा ..
याच्या या दारूच्या नादात बायकोला आजारपण आलेय
आता मात्र मी सुन्न होते ..त्यांच्या विषयी मनात तिरस्कार वाटू लागतो ..
दुसर्या दिवशी ते बँकेत येतात ..
काही पैसे काढ घाल चालु असते त्यांची ..
बँकेतील क्लार्क त्याना पैसे फिक्स करण्या साठी फॉर्म देतात ..
तो ते घेतात आणि माझ्या केबिन मध्ये येतात
आत येताच भस्सकन दारूचा वास सुटतो
ते पुन्हा तेच तेच मला सांगत बसतात ..
आणि फॉर्म माझ्या टेबल वर ठेवून परत जायला निघतात
मी आठवण करते फॉर्म ची तेव्हा ते म्हणतात अजून पैसे आले नाहीत
मग फॉर्म नको मला
मला माहित असते त्यांच्या खात्याला मुलाचे पैसे आले आहेत ..
पण आता त्यांचा हा खोटे पणा पाहून ते माझ्या मनातून कायमचे उतरतात..
स्वतच्या वर्तमानकाळाच्या नशेत ते सुनेचा आणि नातीचा भविष्य काळ बुडवून टाकत असतात
आणि याची त्याना बिलकुल कदर नसते !!!
मनातल्या मनात मी त्या अश्राप नातीची आणि निरागस सुनेची कीव करते ..

वृषाली