Alvani - 1 books and stories free download online pdf in Marathi

अलवणी - १

ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग…..
ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग……..
ट्रींग ट्रींग…

पुर्वाश्रमीचा अभियंता आणि आता एक उभरता लेखक ’आकाश जोशी’ अर्थात ’अक्की’ चा फोन वाजत होता.

आकाश आपल्या संगणकावर कथेची पान प्रुफ-रीड करत होता. कामात असताना आणि विशेषतः कामात लिंक लागलेली असताना मध्ये अध्ये कुणाची लुडबुड त्याला सहसा खपत नसे, पण भ्रमणध्वनीवर त्याचा जिवश्च-कंठश्च, बालपणापासुनचा मित्र ’जयंत पेठकरचा’ नंबर बघुन आकाशला रहावले नाही.

आकाश आणि जयंत लहानपणापासुनचे एकमेकांचे मित्र, एकाच शाळेत, एकाच कॉलेजातुन त्यांनी शिक्षण पुर्ण केले. दोघेही अभियंते झाले पण दोघांचाही कलाक्षेत्राकडे विशेष ओढा होता आणि त्यामुळेच दोघांचेही कामात लक्ष लागेना. मग प्रथम आकाश आणि पाठोपाठ जयंत नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडले.

आकाश लेखनात उतरला तर जयंत शॉर्ट फिल्म मेकींग मध्ये.


“बोला राजे.. कशी काय आठवण काढलीत??”, आकाश म्हणाला…

“तुझ्या त्या खुरट्या दाढीवरुन हात फिरवणं बंद कर आधी..”, जयंत म्हणाला.

आकाश समोर नसला तरी फोनवर बोलताना आपल्या खुरट्या दाढीवरुन हात फिरवत बोलण्याची त्याची लकब जयंताला चांगलीच ठाऊक होती. फक्त हेच काय दोघांच्याही सवयी एकमेकांना चांगल्याच ठाऊक होत्या. दोघांमध्ये फरक एकच होता तो म्हणजे आकाशचे लग्न होऊन सात एक वर्ष होऊन गेली होती, त्याला एक ६ वर्षाचा गोंडस मुलगा होता, तर जयंत मात्र अजुनही एकटाच होता.


“बरं, केलं बंद.. बोल, कशी आठवण काढलीस?”, आकाश म्हणाला

“आम्ही कश्याला तुमची वेगळी आठवण काढू? तुम्ही तर नेहमी आमच्या मनातच असता, तुम्हाला आमची आठवण रहावी म्हणुन फोन केला..”, जयंत आकाशची खिल्ली उडवत म्हणाला.

“का थट्टा करता राजे.. अहो तुम्हाला कोण विसरेल? आणि तुमचं तर आता फिल्ममध्ये करीयर सुरु होते आहे. तुमच्याशी ओळख ठेवावीच लागणार..”, आकाश

“हम्म.. तुम्ही पडलात संसारी लोकं, संसारात गुरफटलेले, आम्ही काय मोकाट सोडलेले वळु. म्हणलं स्वारी कुठे आहे पहावी, मोहीतला सुट्टी लागली ना आता, मग म्हणलं.. कुठं गेलास की काय गावाला???”, जयंत

“छे रे.. कुठंच नाही गेलो बघ. एक तर हे कादंबरीचं काम रखडलं आहे, प्रकाशकांचे फोन वर फोन यायला लागले आहेत आणि ते सोडुन कुठं जाणार?”, आकाश

“अरे.. अरे.. पोराला सुट्टी लागली आहे, त्याच्या शाळा सुरु झाल्या की आहेच मग रुटीन त्याच, शाल्मली वहीनी पण कंटाळल्या असतील, जाऊन ये दोन-चार दिवस…”, जयंत

“तिचं काय जातंय कंटाळायला? आणि पिकनीकला जाऊन करायचं काय? ही आपली सदा-न-कदा मोहीतच्या मागे. आणि रात्री पाठ टेकली की हीचे डोळे बंद होतात. आता तुझ्यापासुन काय लपलं आहे का?.. आय मीन.. यु नो अबाऊट आवर सेक्स लाईफ राईट.. शेवटंच कधी आम्ही….”, आकाश..

“अरे हो.. पण तिची बाजु पण समजावुन घे ना. तुझं ते कार्ट.. तुझ्यावरच गेलेलं. तु काय लहानपणी वेगळा होतास का? दिवसभर सारखा दंगा, मस्ती चालुच. परत तुला तुझ्या कामात व्यत्यय आणलेला चालत नाही. घरातलं करायचं, त्याची शाळा, ग्राऊंड, क्लासेस, जेवण, दमुन जात असतील त्या बिचार्‍या…

ऐक माझं चार दिवस जाऊन ये कुठे तरी, नक्की फरक पडेल बघ…”, जयंत आकाशचं म्हणण अर्ध्यावर तोडत म्हणाला.

“आणि हे कादंबरीचं?? त्याचं काय करु?”, आकाश..

“बरं हे बघ एक काम कर, अश्या ठिकाणी जा जिथे तुला एकांत मिळेल, तुम्ही दोघं एकमेकांसाठी वेळ देऊ शकाल, त्याचबरोबर फावल्या वेळात तुला तुझ्या कादंबरीवर सुध्दा काम करता येईल..”, जयंत

“पण अशी जागा मिळायला हवी ना?”, आकाश

“अरे आपले गुगल काका आहेत ना.. शोध तिथं एखादा बंगला चांगला महीन्याभरासाठी घे भाड्याने.. आणि हो.. आपल्या रामुकाकांनापण घेउन जा बरोबर. मी फिल्मसाठी कोकणात चाललो आहे १५-२० दिवस, तसंही त्यांना काही काम नाही, घेऊन जा त्यांना, म्हणजे वहीनींना घरातलं बघायला नको… काय?”, जयंत

“बरं बाबा.. बघतो असं काही मिळतं आहे का ठिकाण ते… आणि हो.. भेटू एकदा निवांत बर्‍याच दिवसांत भेट नाही झाली…”, आकाश

“ओके, भेटू नक्की.. चल ठेवतो मग.. एन्जॉय..” असं म्हणुन जयंतने फोन बंद केला.


फोन संपल्यावर आकाशने लॅपटॉप पुढे ओढला पण त्याचे कथेमध्ये लक्ष लागेना.

“जयंत म्हणाला ते पण बरोबर आहे. एकदा मोहीतची शाळा सुरु झाली की मग शाल्मलीला पुन्हा सवड मिळणे अवघड. आणि काय सांगावं एखाद्या नविन ठिकाणी पुन्हा एकदा दोघांमधील संपलेले पॅशन पुन्हा एकदा नव्याने निर्माण होऊ शकते.”, संगणकाच्या स्क्रिनकडे बघत आकाश विचार करत होता.

शेवटी त्याने आपली विंडो बंद केली आणि गुगलमध्ये जवळपासच्या ठिकाणी एखादा बंगला आहे का ते शोधु लागला.

बर्‍याच वेळ शोधाशोध केल्यानंतर पुण्यापासुन ६०-७० कि.मी. वर वसलेल्या भोर ह्या निसर्गरम्य गावातील बंगल्याची त्याला एक जाहीरात सापडली. जाहीरातीत दाखवलेले फोटो सुध्दा त्याला आवडले. आजुबाजुचा परीसर गर्द झाडीचा होता, बंगला तसा एकांतात, त्याला हवा अगदी तस्साच होता.

जाहीरात तशी बर्‍याच जुन्या तारखेची म्हणजे अगदी तिन-चार वर्षापुर्वीची होती, ’परंतु सहसा भाड्याने देणार्‍या जाहीराती सारख्या कुठे बदलत असतात. प्रयत्न तर करुन बघु!’ असा विचार करुन आकाशने जाहीरातीत दिलेला नंबर आपल्या भ्रमणध्वनीवरुन लावला.

“आपण फिरवलेला नंबर अस्तीत्वात नाही..”, एक रेकॉर्डेड मेसेज आकाशच्या कानावर पडला.

“आयला.. चुकीचा नंबर फिरवला का काय?”, असं स्वतःशीच म्हणून आकाशने पुन्हा एकदा बारकाईने आकडे दाबत आकाशने तोच नंबर दाबला.

“आपण फिरवलेला नंबर अस्तीत्वात नाही..”, एक रेकॉर्डेड मेसेज आकाशच्या कानावर पडला.

“च्यायला… जाहीराती करता कश्याला मग?”, कपाळावर आठ्या आणत आकाश पुटपुटला आणि त्याने आपला मोबाईल संच दणकन टेबलावर आपटला. मग त्याने आपला लॅपटॉप पुन्हा समोर ओढला आणि दुसर्‍या जाहीराती पहायला सुरुवात केली.


तोच.. आकाशचा मोबाईल किणकिणला.. मोबाईलच्या स्क्रीनवर मगाचचाच नंबर झळकत होता.

“हॅलो..”, आकाश..

“तुम्ही मगाशी फोन केला होतात का?”, पलीकडून एका स्त्रीचा अत्यंत हळु आवाज ऐकु आला.

“अं..हो.. हो.. मीच केला होता मगाशी फोन. मला तुमची जाहीरात सापडली.. भोर गावातील बंगल्याबद्दल…”, आकाश

“किती दिवस पाहीजे?”, पलीकडुन पुन्हा तोच आवाज. आकाशला मोबाईल कानाला घट्ट लावुन सुध्दा आवाज निट ऐकु येत नव्हता.

“निदान ३ आठवडे तरी.. किती भाडं आहे?”, आकाश

“भाड्याचं काही नाही, तुम्ही द्याल ते मंजुर आहे. तुम्ही जा रहायला. मध्ये कुणालातरी पाठवीन पैसे घ्यायला..”, ती स्त्री म्हणाली.

“अहो असं कसं.. काही तरी सांगा ना नक्की…”, आकाश म्हणाला.

“मी सांगीतलं ना, तुम्ही जे काही द्याल ते मंजुर आहे..”, ती स्त्री..

“बरं ठिक आहे, बाकी सोयी काय आहेत? बंगल्याची स्थिती काय आहे?”, आकाश

“बंगला उत्तम स्थीतीत आहे, पण सध्या तिथे कोणी नोकर-चाकर नाहीत तेंव्हा तुम्ही तुमचाच कोणी असेल तर घेउन जा. दिवाणखाना, बैठकीची खोली, माजघर वगैरे थोडे फार साफ करुन घ्यायला लागेल… जेंव्हा कोणी तिकडे येणार असेल तेंव्हा मी तुम्हाला फोन करेन. बंगल्याची किल्ली दाराच्या वरच्या कोनाड्यात कोपर्‍यातच आहे…”, असं म्हणुन त्या स्त्री ने फोन बंद केला सुध्दा..


“काय अजब प्रकार आहे हा? पैश्याची काही अट नाही, किल्ली बाहेरच ठेवलेली..”, आकाश स्वतःशीच विचार करत होता.

“आकाश! जेवायला काय करु रात्री?”, शाल्मलीने आकाशचा फोन संपल्याचे पाहून विचारले.

आकाशने दोन क्षण विचार केला आणि म्हणाला, “ते जेवणाचे राहु देत, आज आपण बाहेरच जाऊ जेवायला… तु बाहेर ये जरा, बोलायचे आहे”

शाल्मली बाहेर येऊन आकाशच्या समोर बसली.. “बोलं..”

“आपण दोन-तिन आठवडे बाहेर गावी चाललो आहोत सुट्टीसाठी, उद्या गरजेपुरतं सामान घे बरोबर…”, आकाश म्हणाला..

“अय्या! खरंच???”, आनंदाने शाल्मली म्हणाली.. “कुठे??”

“भोर ला.. म्हणजे.. तिकडे एक बंगला घेतला आहे भाड्याने.. मस्त आहे एकदम, निवांत, एकांत…”, आकाश म्हणाला..

“बंगला?? आणि मग जेवायचं खायचं काय??? कोणी आहे का तिथे?”, शाल्मली, “का बरोबर स्वयंपाकाचं सामान घेऊन जायचे आहे?”

“ते बघ!.. कुठं जायचं म्हणलं ना, की हिला फक्त स्वयंपाकचं आठवतो…”,वैतागत आकाश म्हणाला..

“अरे म्हणजे काय? उपाशी रहाणार का? आणि मोहीतचं नको बघायला?”, शाल्मली

“जयंताकडचे रामुकाका येतील बरोबर.. ते करतील सगळं..”, आकाश..


“बाबा.. बाबा.. आपण भुर्र चाललो??”, आकाशचे बोलण ऐकुन त्याचा ६ वर्षाचा मुलगा मोहीत बागडत येऊन त्याला बिलगला…

“हो रे छोनु.. तुला सुट्टी लागली नं.. म्हणुन चाल्लो आपण.. मस्त मज्जा करायची, तुझे खेळं घे सगळे बरोबर हं? आपण क्रिकेट खेळु, लपाछपी खेळु, तिकडच्या नदीत मस्त पोहु…”, आकाश

“हम्म.. मज्जा…” खुश होत मोहीत म्हणाला.


“बाबा.. तुझ्या मोबाईलची बॅटरी…”, असं म्हणुन मोहीतने खाली पडलेली मोबाईलची बॅटरी आकाशला दिली..

“अरेच्या… कधी पडली बॅटरी???”, आकाश..

“मगाशी नैका तु मोबाईल आपटलास, तेंव्हा…”, मोहीत..

“अरे तेंव्हा कशी पडेल.. त्यानंतर मी बोललो की मोबाईलवर, बॅटरी पडली असती तर फोन कसा आला असता? नंतर पडली असेल..”, आकाश..

“नाही, खोट्ट… बोलतो आहेस तु.. आधीच पडली.. मी बघीतली…”, मोहीत गाल फुगुन म्हणाला..

“बिनडोकासारखं बोलु नको काही तरी.. मी सांगतोय नंतर बोललो फोनवर मी तर… बॅटरी मी मोबाईल आपटल्याने लुज झाली असेल जी नंतर मोबाईल ठेवताना पडली असणार..”, मोहीत फोनला बॅटरी बसवत म्हणाला..

“खोट्ट.. आध्धीच पडली..”, मोहीत अजुनही आपल्या म्हणण्यावर ठाम होता.

“बरं बाबा.. आधीच पडली. काय तु पण आकाश त्याच्याशी वाद घालतो आहेस.. चला आवरा आता, आपल्याला जेवायला बाहेर जायचेय ना??”, शाल्मली म्हणाली…

“जेवायला… भुर्र… ये….ssssss”, असं म्हणत मोहीत शाल्मलीला येऊन बिलगला.. “आई मी आईसक्रीमपण खाणार हं…”

“तु पटकन आवरल्स गुड बॉय सारखं तर…” असं म्हणुन शाल्मली आकाशला आतल्या खोलीत आवरायला घेऊन गेली.

आकाश मात्र अजुनही त्या मोबाईलकडे कपाळावर आठ्या घालुन बघत होता.
———————————————————————————————————————


“स..स्स्स्स. काय थंडी आहे रे इथे?”, शाल्मली हातावर हात चोळत आकाशला म्हणाली..

“हो.. अगं झाडी बघ ना किती आहे आजुबाजुला..”, आकाश

“अरे हो.. पण मगाशी घाटात पण होतीच की झाडी, इथे अंमळ जास्तीच आहे नाही का?”, शाल्मली

“हो, पण मगाशी गाडीच्या काचा बंद होत्या त्यामुळे नाही जाणवली. इथे आपण खाली उतरलो आहोत.. वाटणारच जास्ती गार…”, आकाश आपलाच मुद्दा दामटवत म्हणाला.

“आणि गम्मत बघ ना, वाराच नाहीये काही, तरीही इतकं गार…”, शाल्मली.

“मग काय झालं? वारा असला तरचं थंडी वाजती असं कुठे लिहीलं आहे का?”, आकाश.

“बरं रे..! तु म्हणतोस तसं. अर्थात जास्ती गार असण्यात वाईट काहीच नाहीये, उलट मला तर इथं खुप्पच मस्त वाटतं आहे, उन्हाळ्यात थंडी.. मस्तच…”, शाल्मली गाडीच्या डीक्कीतुन बॅगा काढत म्हणाली.

रामुकाका दोघांच्या गप्पा-कम-भांडणं गालातल्या गालात हसत ऐकत होते तर मोहीत गाडीतुन उतरुन अंगात वार भरल्यासारखा मोकाट धावत होता.

हसत खिदळत चौघे जण बंगल्याच्या दारापाशी येऊन थांबले. आकाशने दाराच्यावरच्या कोनाड्यातुन हात फिरवला. अपेक्षेप्रमाणे तेथे त्याला किल्ली सापडली. त्याने कुलुप काढले आणि दाराची कडी काढुन दरवाजा उघडला त्याचबरोबर एक उग्र, नाकाला झोंबणारा दर्प बाहेर आला. आपसुकच चौघांचेही हात नाकावर गेले.

“ई…कसला घाण वास आहे हा…”, शाल्मली म्हणाली
“शी..!!! बाबा..! कुठे आलो आहे आपण??”, मोहीतनेही आपलं मत व्यक्त केलं..

आकाशने पटापट सर्व खिडक्या उघडल्या. थोडा वेळ गेल्यानंतर त्या वासाची तिव्रता कमी झाली.

“गार्लीक… गार्लीकचा वास आहे हा…”, शाल्मली म्हणाली.
“आता इथे गार्लीक कुठुन येणार?? काहीतरी बोलु नकोस. बहुतेक बरेच दिवस बंगला बंद असावा त्यामुळे थोडासा कुबट वास असेल..”, आकाश म्हणाला..
“नाही.. हा गार्लीकचाच वास आहे.. हो कीनई ओ रामु काका??”, शाल्मली रामुकाकांकडे बघत म्हणाली.

रामुकाकांनीही मान डोलावली.. आणि म्हणाले, “हो लसणाचा वाटतो आहे खरा हा वास….”

एव्हाना सर्वजण दिवाणखान्यात पोहोचले होते. बंगला तसा नुकताच स्वच्छ केलेला वाटत होता. साधारणपणे सातशे-आठशे स्क्वेअर फुटांचा तो ऐसपैस दिवाणखाना पाहुन सर्वच जण स्तंभीत झाले. अगदी पुरातन काळातली म्हणजे साधारण ५०-६० वर्षांपुर्वीच्या रहाणीमानाची आठवण करुन देणारे फर्नीचर त्या दिवाणखान्यात होते. मोठ्ठाल्ली पितळी भांडी, फिक्कट झालेले तैलरंगातील पिढ्यांपिढ्यांतील कर्त्या पुरुषांची चित्र, दिवाणखान्याच्या मध्यभागी एक दणकट झोपाळा, दिवाणखान्याच्या चोहीबाजुने भिंतींना लागुन असलेली भारतीय बैठक, काळपट रंगाचे लाकडी खांब, छताला लोंबकळणारी दोन काचेची मोठ्ठी झुंबरं, दुधाळ रंगाच्या काचेच्या दिव्याच्या हंड्या आणि लाकडाची जमीन.

“बरं का पोरांनो…”, रामुकाका म्हणाले.. “हा बंगला नक्कीच कुठल्यातरी मालदार व्यक्तीने बांधलेला असणार. हे सर्व सामान त्याकाळची त्या घराण्याची आर्थीक सुबत्ता स्पष्ट करते आहे…” रामुकाका एक एक करत त्या दिवाणखान्यातील वस्तु, त्याचा उपयोग, त्याची माहीती सांगत होते तोच त्यांना मोहीतचा आवाज ऐकु आला..

“आई-बाबा.. इकडे या ना.. फनी डेकोरेशन.. पटकन या…”, मोहीत शक्य तितक्या जोरात ओरडत होता.

लगोलग आकाश, शाल्मली आणि रामुकाका आवाजाच्या दिशेने धावले. मोहीत एका बेडरुममध्ये होता त्या खोलीत तिघेही जण गेले.

आकाश आणि शाल्मली बेडरुममधील मोहीत दाखवत असलेले डेकोरेशन पाहुन आश्चर्यचकीत झाले होते तर रामुकाकांच्या चेहर्‍यावर मात्र चिंतेचे जाळे पसरले होते.

बेडरुममधील छताला लसणाच्या माळा करुन बांधलेल्या होत्या आणि त्यावर आता जळमट चढली होती. खिडक्यांच्या गजालासुध्दा काही ठिकाणी लसणाच्या पाकळ्या चिकटवलेल्या दिसत होत्या.

“हा काय मुर्खपणा आहे??”, आकाश हसत हसत म्हणाला… “रामुकाका तुम्ही मगाशी म्हणालात मालदार माणुस… मला वाटतं ही लोकं लसणाचे व्यापारी असावेत, काय म्हणता???”

परंतु रामुकाका अजुनही भिंतीला चिकटुन थिजुन उभे होते.

“रामुकाका?? काय झालं?”, शाल्मली म्हणाली.

“अं?? नाही काही नाही.. चला.. चला बाहेर चला… इथं नका थांबु…”, घाई घाईने रामुकाका म्हणाले.

“रामुकाका काय झालं?”, त्यांना हाताला धरुन थांबवत आकाश म्हणाला..

“हे.. हे काही ठिक दिसत नाही…”, रामुकाका

“काय ठिक दिसत नाही रामुकाका?”, आकाशच्या चेहर्‍यावर सुध्दा आता चिंता पसरु लागली होती.

“ही.. एवढी लसणं,,. बांधुन ठेवलेली.. तुम्हाला माहीती आहे.. लसुण असे कधी बांधुन ठेवतात?”, रामुकाकांनी विचारले..

“नाही..”, आकाश शाल्मलीकडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाला..

शाल्मलीनेसुध्दा नकारार्थी मान डोलावली..

“जेंव्हा घरातल्या लोकांवर भूतबाधा झालेली असते तेंव्हा लसूण मोठ्या प्रमाणात वापरतात… असं म्हणतात प्रेतात्म्याला लसणाचा उग्र वास सहन होत नाही आणि त्यामुळेच त्याच्यापासुन बचाव होण्यासाठी…”, रामुकाका बोलत होते..

“काय तुम्ही रामुकाका…”, आकाशच्या चेहर्‍यावरची चिंता आता पार गेली होती… “अहो आजच्या युगात कोण विश्वास ठेवतो असल्या गोष्टींवर?”

“बरोबर आहे… आजच्या युगात जे दिसले ते खरं आणि जे नाही दिसले, जे अदृष्य आहे ते खोटं असाच सारासार विचार तुम्ही लोकं करता. पण जसा देवाच्या रुपाने एक न दिसणारी पवित्र शक्ती अस्तीत्वात आहे असं आपण मानतो तशीच एक अपवित्र शक्ती सुध्दा ह्या जगात आहे. ज्याने पाहीली, ज्याने अनुभवली तो ह्या गोष्टींवर कधीच अविश्वास दर्शवणार नाही आणि ह्या लसणाच्या माळा त्याचेच द्योतक आहे.”, रामुकाका म्हणाले.

“ए आकाश.. चल जाऊ यात आपण इथुन.. उगाच कश्याला विषाची परीक्षा पहायची. तसेही आपण पैसे दिलेले नाहीत. त्यांना फोन करुन काहीतरी कारणं सांगु.. आपण दुसरीकडे जाऊ..”, शाल्मली घाबरुन म्हणाली.

“गपे वेडाबाई. इतके छान, निवांत घर कुठं मिळणार? आणि ते पण इतक्या कमी पैश्यात?”, आकाश..

“पण आकाश.. रामुकाका…”, शाल्मली..

“शाल्मली.. अगं जुनी लोकं, त्यांचे विचार आणि आपले विचार कधीच मिळत नाहीत, मिळणार नाहीत. त्या काळच्या त्यांच्या भावना, त्यांची मतं, त्यांचा जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन त्या काळीच ठिक होता. आजच्या काळात तेंव्हा बोलल्या गेलेल्या, मानलेल्या किती गोष्टी सिध्द झाल्या आहेत? सत्यात उतरल्या आहेत? काळ बदलला, लोकं बदलले, त्यांचे विचार बदलले. आणि काळानुरुप ह्या असल्या गोष्टी सुध्दा काळाच्या पडद्यआडच गेल्या आहेत. आपण एका कानाने ऐकायचे आणि दुसर्‍या कानाने सोडुन द्यायचे.

रामुकाका, तुम्ही स्वयंपाकाचे बघा, भुक लागायला लागली आहे, मोहीतने पण काही खाल्ल नाहीये. तो पर्यंत आम्ही जरा आराम करतो.”, असं म्हणुन आकाश खोलीच्या बाहेर पडला, त्यापाठोपाठ मोहीत आणि शाल्मलीसुध्दा बाहेर आले.

रामुकाका बर्‍याचवेळ त्या खोलीत कसलातरी अंदाज घेत थांबले होते, शेवटी ते पण बाहेर आले, त्यांनी खोलीचे दार लावुन घेतले आणि त्याला बाहेरुन कडी घालुन टाकली.


रामुकाका स्वयंपाकघरात गेले तर आकाश, शाल्मली आणि मोहीत दिवाणखान्यात विसावले.

“हुश्श.. दमलोबुवा ड्राईव्ह करुन…”, आकाश म्हणाला.. “पण काहीही म्हणा, वर्थ आहे इथं येणं…”

“हो ना.. आणि शांतता पण कित्ती आहे नै?”, शाल्मली आकाशच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाली..”असं वाटतं इथं येऊन सारं कसं थांबुन गेलं आहे. इथं येईपर्यंत सारं कसं सजीव वाटत होते. वारा, हलणारी झाडं, पक्षी, रस्त्याने धावणारी कुत्री.. पण इथं… इथं तसं काहीच नाही….नै…”

“हम्म..”, आकाशने नुसती मान डोलावली..

थोडावेळ शांततेत गेला. आकाशला सुध्दा ही शांतता खायला उठली. शाल्मली म्हणते तशी ही शांतता काहीतरी विचीत्रच होती.. अंगावर आल्यासारखी.. इथं छान वाटत होते ते गार होतं म्हणुन, शांत होतं म्हणुन.. पण तरीही मनाला एकप्रकारची घुसमट जाणवत होती, दडपण आणत होती..

काहीतरी.. काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते खरे….

“कदाचीत बर्‍याच दिवसांनंतर एखाद्या वेगळ्या जागी गेल्याने वाटतं असेल..”, आकाशने मनोमन विचार केला…

शेवटी शांतता असह्य झाली तसे तो शाल्मलीला म्हणाला, “जा रामुकाकांना काही मदत हवी का बघ, सॉल्लीड भुक लागली आहे, लवकर करा जेवायचं…”

शाल्मली लगेच उठली आणि रामुकाकांना मदत करायला स्वयंपाकघरात गेली.


स्वयंपाक घरात जाणारा व्हरांडा खुप्पच मोठ्ठा होता. थोड्याथोड्या अंतराने अश्या व्हरांड्यात दोन्ही बाजुला तिन-चार खोल्या होत्या.

शाल्मलीला त्या व्हरांड्यातुन जाताना फार बैचैन वाटत होतं, कारण नसताना इरीटेशन होतं होत. सारखं कोणीतरी आपल्याकडे बघतंय, आपल्यावर नजर ठेवतय असंच वाटत होतं. भराभर पावलं टाकत ती व्हरांडा ओलांडुन स्वयंपाकघरात आली आणि तीची पावलं जागच्या जागीच खिळली..

समोर रामुकाका…………………………………………………….

[क्रमशः]