दुःखी.. - 12

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

१२. लिलीचे लग्न

क्रांतीचे प्रकरण संपले. सरकारने कोणासही शिक्षा केल्या नाहीत. कारण गोळीबाराने अनेक लोक आधीच मेले होते. कामगारांना पगारवाढ मिळाली. शेतकर्‍यांवरचे सावकारी अन्याय कमी झाले. कर्जाची चौकशी करण्याचे ठरले.  जे न्याय्य कर्ज ठरेल त्यातील निम्मे बाद करायचे ठरले. सावकारांनी कांगावा केला, परंतु सरकारने लक्ष दिले नाही. कामगारांच्या संघटनेस मान्यता दिली गेली. शहाणपणाने सरकारने सूडबुध्दी स्वीकारली नाही. नाही तर सारे राष्ट्र पेटले असते.

दिलीपची जखम बरी होत आली होती. वालजी व लिली रोज जात असत. लिली दिलीपची जखम बांधी. सारे करी. तिचा हात हलका होता.

'पोरीला सारं येतं. किती मनापासून करते!' दिलीपचे आजोबा म्हणाले.

'ती आहेच गुणी.' वालजी म्हणाला.

लिली व दिलीप एकमेकांवर प्रेम करीत होती. कधी गाडीतून दोघे फिरायला जात. वालजीला वाटले की, यांचे लग्न होणे बरे. एके दिवशी तो दिलीपच्या आजोबांकडे गेला. दिलीप व लिली बाहेर गेली होती.

'काय लिलीचे आजोबा?'

'काय दिलीपचे आजोबा?'

दोघांना हसू आले. शेवटी हिय्या करून वालजीने प्रश्न काढला.

'दिलीपचं आता लग्न केलं पाहिजे.'

'माझ्याही मनात तेच येतं.'

'लिलीवर त्याचं प्रेम आहे.'

'मी प्रेम वगैरे ओळखत नाही.'

'मग काय ओळखता?'

'पैसा!'

'किती पाहिजेत पैसे?'

'तुम्हाला सांगण्यात काय अर्थ?'

'परंतु कळू दे तर खरा आकडा!'

'मी माझी सारी इस्टेट दिलीपला देणार आहे. माझ्या इस्टेटीची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत जो हुंडा म्हणून देईल त्याची मुलगी मी करीन. मी दिलीपला देईन तेवढीच भर मुलीच्या पालकानंही घातली पाहिजे. मी असा मनाशी संकल्प केला आहे आणि माझा स्वभाव असा आहे की, जे एकदा मनात धरलं ते कधी सोडायचं नाही!'

'तुमच्या इस्टेटीची किती किंमत होईल?'

'होईल एक लाख रुपये.'

'एक लाख रुपये दिले तर लिलीला सून म्हणून पत्कराल ना?'

'हो, पत्करीन.'

'आता आणून देतो पैसे!' असे म्हणून वालजी घरी गेला. त्याने एक जुना अंगरखा काढला. त्यात जिकडे तिकडे नोटाच आत शिवलेल्या होत्या. वालजीने एक लाख रुपयांच्या नोटांची पुडकी बांधली. तो ती पुडकी घेऊन आला. 'घ्या मोजून!' तो म्हणाला.

'कुठून आणलेत हे पैसे?'

'लिलीचा बाप कारखानदार होता. त्यानं ठेवले होते पैसे.'

म्हातार्‍याचा आनंद गगनात मावेना. खरेच एक लाख रुपयांच्या नोटा! इतक्यात लिली व दिलीप तेथे आली. दिलीप आपल्या आजोबांजवळ बसला. लिली वालजीजवळ बसली.\

'लिलीचा हात मी पुढं करतो,' वालजी म्हणाला.

'मी दिलीपचा करतो,' आजोबा म्हणाले.

'काय करता हे?' दिलीप व लिली म्हणाली.

'तुमचं लग्न लावीत आहोत,' दोघे म्हातारे म्हणाले.

***

Rate & Review

Verified icon

Shashi 4 months ago

Verified icon

harihar gothwad 7 months ago

Verified icon

Ganesh Dungahu 7 months ago

Verified icon

Bhavika 7 months ago