Fulacha Prayog.. - 3 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग.. - 3

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

३. फुलाला फाशीची शिक्षा

एके दिवशी फुला नित्याप्रमाणे आपल्या प्रयोगालयात काम करीत होता. इतक्यात गावात टापटाप असे घेडयांचे आवाज घुमू लागले. एक, दोन, तीन-किती हे घोडेस्वार! खंद्या घोडयावर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. घरांच्या दारांतून ते डोकावून बघत होते. का आले हे घोडेस्वार? काय पाहिजे त्यांना?घोडेस्वारांनी फुलाच्या घराला गराडा दिला. काही बाहेर उभे राहिले. काही घोडयांवरून उतरून घरात घुसले. घरात आत्याबाई काम करीत होती. ते शिपाई धाडधाड जिना चढून वर जाऊ लागले.‘अरे, काय पाहिजे तुम्हाला? मला सांगा. त्याच्या प्रयोगात नका त्रास देऊ. तो रागावेल हो. अरे, वर कोठे चाललेत? असे ताडताड काय जाता?’ ती म्हातारी आत्या बोलू लागली.‘ए बुढ्ढये, गप्प बस त्या कोपर्‍यात. त्या कोपर्‍यातून हाललीस तर बघ. वटवट बंद कर.’ एक घोडेस्वार म्हणाला.ते घोडेस्वार वर गेले. ते काचेच्या घरात गेले. त्यांच्या बुटांच्या जोरदार पावलांनी त्या काचा हादरल्या, थरथरल्या. फुला प्रयोगात तन्मय झाला होता. एकदम सभोवती त्याला छाया दिसल्या. त्याने वर पाहिले, तो क्रूर शिपाई उभे.‘काय पाहिजे तुम्हाला?’ त्याने शांतपणे विचारले.‘मोठा साळसूद. त्या देशद्रोही प्रधानांचे कागदपत्र तुझ्याजवळ आहेत की नाहीत? बर्‍या बोलाने सांग. ते कागदपत्र दे. ऊठ, तो मुख्य म्हणाला. ‘कोण देशद्रोही प्रधान?’ फुलाने प्रश्न केला.‘ज्यांच्यावर विश्वास टाकून राजा प्रवासास गेला ते. ते प्रधानही दुनियेतून नष्ट झाले. जनतेने न्याय दिला. आता त्या प्रधानांच्या साथीदारांची वेळ आली आहे. तू फुले फुलवणारा असलास तरी काटा आहेस. काटे नष्ट केले पाहिजेत नाही तर केव्हा बोचतील हयाचा नेम नाही. ऊठ, ते कागद आधी दे.’ फुलाचा हात ओढून तो मुख्य म्हणाला.‘कागदपत्र?’‘हो. कागदपत्र.’‘माझ्याजवळ कसले आहेत कागदपत्र? माझ्या घरात फुलांची पुस्तके आहेत. फुलांची मासिके आहेत. तपासा सारे घर. फुलांचे राजकारण मला माहीत. दुसरे राजकारण मला माहीत नाही.’‘खाली चल. सारे उघडून दाखव.’सारी मंडळी खाली गेली फुलाने त्यांच्यासमोर किल्ल्या टाकल्या. शिपाई सारे धुंडाळू लागले. टेबलाचे खण तपासून लागले. टेबलाच्या खणांत निरनिराळया प्रकारची बिले होती; परंतु एक खण जोराने ओढला गेला. तो सारा बाहेर आला. त्या खणात पुढे बियांच्या पुडया होत्या; परंतु पाठीमागे एक पुडके होते. कागदपत्रांचे पुडके!

‘हे बघ कागदपत्र! पुढे बियांच्या पुडया ठेवून पाठीमागे दडवून ठेवले होतेस; परंतु सत्य बाहेर येते. पकडा हया हरामखोराला. बांधा मुसक्या, बांधा घोडयावर व घेऊन चला.’ तो प्रमुख गर्जला.‘हे कागद मी विसरूनच गेलो होतो. त्या माझ्या मित्रांनी हे दिले होते. हे कागद जाळून टाक म्हणून त्यांनी सांगितले होते; परंतु मी विसरलो. फुलांच्या नादात राहिलो-’ फुला म्हणाला.‘आपल्याच तोंडाने सांगतो आहे सारं. मूर्ख आहे बेटा. बघता काय, बांधा त्याला-’ तो शिपायांना म्हणाला.‘जरा थांबा. मी वरून येतो. मग पकडा. माझे मित्र दुनियेतून गेले असतील तर मी तरी कशाला जगू? फुला म्हणाला.‘जा, वरून ये.’ प्रमुख म्हणाला.फुला वर गेला. त्या नवीन प्रयोगाची तीन कलमे त्याने आपल्या लांब कोटाच्या खिशात घातली. एका कुंडीतील थोडे अंकुरलेले रोपटे त्याने कागदात गुंडाळून घेतले. तो आपला ठेवा, तो प्रयोग घेऊन फुला खाली आला. शिपयांनी त्याच्या दंडाला दोर्‍या बांधल्या. ते सारे घोडेस्वार खाली आले.‘अरे, त्याला कोठे नेता? मारू नका त्याला. फुलांसारखा गोड आहे तो. म्हातारीचा आधार आहे तो. अरे, नका नेऊ-’ म्हातारी आत्याबाई ओरडत रडत बाहेर आली.‘गप्प बस थेरडये, का जीभ छाटू?’ एक उग्र घोडेस्वार म्हणाला. ‘आत्याबाई, घरात जा. देव सारे चांगले करील. माझी फुले फुलव. बागेतील फुलांना सांभाळ. त्या फुलांत मी आहे. त्या फुलांमध्ये मला बघ-’ फुला आत्याला म्हणाला.फुलाला घोडयावर बांधण्यात आले. ते घोडेस्वार टापटाप आवाज करीत निघून गेले. भ्यालेला गाव आता बाहेर आला. त्या म्हातारीकडे गावातील सारे लोक आले. बायका तिचे सांत्वन करीत होत्या. सर्वांना हळहळ वाटली. फक्त एकालाच आनंद झाला होता. गब्रूला बरे वाटले. आता त्या काचेच्या घरात जाईन व ते प्रयोग चोरिन असे त्याने मनात म्हटले.त्या दिवशी रात्र झाली. गब्रू उठला. त्या झाडावर चढला. त्या फांदीवरुन तो फुलाच्या घराच्या गच्चीवर उतरला. ते काचेचे घर उघडे होते. त्याने मेणबत्ती पेटवली; परंतु तेथे ते नवीन प्रयोग त्याला आढळले नाहीत, कोठे गेले ते प्रयोग? त्याने का बरोबर नेले? मरताना का ते प्रयोग जवळ ठेवणार?गब्रूचा तडफडाट झाला. त्याने संतापाने दात-ओठ खाल्ले. निराशेने त्याने हात चोळले. तो पुन्हा घरी आला, परंतु त्याला झोप येईना. उजाडले नाही. तो गब्रू राजधानीचा रस्ता चालु लागला. फुलाच्या पाठोपाठ तो निघाला.

फुलाचा खटला सुरू झाला. न्यायमंदिरासमोर तुफान गर्दी झाली होती. ‘देशद्रोहयाला फाशीची शिक्षा द्या!’ अशा आरोळया लोक मारीत होते. स्वत: न्यायाधीश थरथरत होता. फाशीची शिक्षा तो न देता, तर लोक त्याच्याही जिवावर उठले असते. ते फुलाला सौम्य शिक्षा देता तर लोक रुद्रावतार धारण करते. न्यायाधिशाने शेवटी फाशीची शिक्षा फर्माविली. फुला शांत होता. लोकांनी टाळया पिटल्या.संगिनीच्या पाहार्‍यात फुलाला तुरुंगात नेण्यात आले. फाशी- कोठयात त्याला ठेवण्यात आले. तेथे निजण्यासाठी पेंढा होता. पाणी पिण्याला मडके होते. फुला शांतपणे त्या पेंढयावर पडला व झोपी गेला. जवळ सर्प आला तरी फुले भीत नाहीत. जवळ मरण आले तरी फुला शांत होता.फाशीची तारीख प्रसिध्द झाली. उद्याचा तो दिवस, फुले फुलवणार्‍या दिलदार फुलाचे प्राण उद्या जाणार होते. सृष्टीतील सारी फुले दु:खी दिसत होती. आत्याबाई बगीच्यात होती; परंतु सारी फुले सुकली असे तिला वाटले.‘का रे फुलांनो? माना का खाली घालता? फुलाच्या जिवाला का धोका आहे? परंतु देव सारे बरे करील असे नाही का तो म्हणाला?’ असे ती म्हातारी फुलांना म्हणत होती.फुलाच्या खोलीच्या खिडकीसमोर वधस्तंभ उभारण्यात येत होता. ज्या खांबावर फाशी देणार तो खांब उभारण्यात येत होता. सुताराची ठोकाठोक ऐकू येत होती. त्या खांबाकडे फुला शांतपणे बघत होता. फुलाला समोर सारखे मरण दिसावे म्हणून दुष्टांचा तो प्रयत्न होता; परंतु पवित्र आत्म्याला मरणाची का भीती असते?त्या तुरुंगाच्या अधिकार्‍याचे नाव ढब्बूसाहेब असे होते. त्याचा स्वभाव तामसी होता. त्याच्या शरीराचा तोल जसा त्याला सांभाळता येत नसे, त्याप्रमाणे मनाचाही तोल त्याला सांभाळता येत नसे. मोठी करडी असे त्याची शिस्त. कैद्यांकडे तो नेहमी साशंकतेने बघत असे. कैद्यांशी गोड बोलणे म्हणजे गुन्हा असे त्याचे मत होते.ढब्बूसाहेबांना एका मुलगी होती. त्या मुलीचे नाव कळी. कळीची आई लहानपणीच वारली. आईवेगळया मुलीवर पित्याचे फार प्रेम. ढब्बूसाहेब रागीट होते; परंतु मुलीसमोर त्यांचा राग पळे. त्यांचा निश्चय कळीसमोर राहत नसे. कळी त्यांना हसवी.कळी आता मोठी झाली होती. चौदा - पंधरा वर्षाची ती असेल. ती सुंदर होती. तिचे केस फारच सुंदर होते. तुरुंगातील बगीच्यामधील फुले ती केसांत घाली. आकाशात तारे शोभावे तशी ती फुले तिच्या काळयाभोर केसांत शोभत आणि कळीचे हसणे किती गोड होते! त्या गोड हसण्याने तिन सार्‍या जगाला जिंकून घेतले असते.

‘कळये, तू अजून कळी आहेस. तरी तुझे हसणे इतके गोड. मग फुललीस म्हणजे तुझे हसणे किती गोड असेल?’ पिता म्हणाला.‘बाबा, मला कळीच राहू दे!’ ती म्हणाली.‘कळीचे रंग फुलल्यावर दिसतात. कळीचा गंध फुलल्यावर दरवळतो. तुझे रंग, तुझा गंध नकोत का प्रगट व्हायला?’ पित्याने प्रेमाने विचारले. ‘कळीचे रंग खुलले, गंध दरवळला म्हणजे लोक ती खुडून नेतात. कळीचे फुलणे म्हणजे मरणे. जे फुलते ते सुकते, गळते. कळी असणे म्हणजे अमर असणे. फुलणे म्हणजे नष्ट होणे. बाबा, मला कळीच राहू दे-’ ती म्हणाली.‘तुला फुलवणारा भेटला म्हणजे एकदम फुलशील. आपण कळीच राहावे हयाची तुला मग आठवणही राहाणार नाही. तुझे रंग पसरतील, तुझा गंध घमघमाट करील,’ तो म्हणाला.त्या दिवशी रात्री ढब्बूसाहेब जरा बाहेर गेले होते. कळी एकटीच घरी होती. फाशी जाणारा एक मनुष्य तुरुंगात आहे ही गोष्ट तिला कळली होती. फाशी जाणार्‍याला ती पाहू इच्छित होती. मरणार्‍याजवळ दोन गोड शब्द बोलावे असे तिच्या मनात आले. त्याला दोन फुले नेऊन द्यावी असे तिला वाटले. ती उठली. दोन सुंदर फुले घेऊन निघाली. तिल कोण अडवणार? तुरुंगाच्या अधिकार्‍याची ती मुलगी, एकुलती एक लाडकी मुलगी.शिपायाबरोबर त्या फाशीकोठयाजवळ ती आली. आतील कैदी आनंदी होता. ‘हयांची खोली उघडा जरा-’ कळी शिपायाला म्हणाली.‘साहेब रागावतील.’ तो म्हणाला.‘त्यांचा राग मग मी शांत करीन -’ ती म्हणाली.शिपायाने ते दार उघडले. ती फाशी जाणार्‍याकडे पाहात राहिली. तिला काही बोलवेना. तिचे डोळे भरून आले. तिचे हदय भरून आले. ‘कशासाठी तुम्ही आल्यात?’ फुलाने विचारले.‘तुम्हाला पाहाण्यासाठी.’‘माणसाला काय पाहायचे?’‘तुम्ही उद्या जग सोडून जाणार. तुमच्याजवळ दोन गोड शब्द बोलावे म्हणून मी आल्ये आहे.’‘जे जगतात त्यांच्याजवळ गोड बोला. मरणार्‍याजवळ गोड बोलण्यात काय अर्थ? तो तर मरणार आहे. जगणार्‍यांना आनंद द्या.’‘तुम्हाला मरणाचं भय नाही वाटत? तुमच्या खिडकीसमोर मुद्दाम तो वधस्तंभ उभारला आहे, तुम्हाला सारखा दिसावा म्हणून, तुम्हाला वाईट नाही वाटत? तुम्ही तर त्या खिडकीतून हसत पाहात होतेत!’

‘वाईट करणार्‍याला मरणाचे भय. मी कधीही वाईट गोष्ट केली नाही. मी फुले फुलविली, काळया फुलविल्या. त्यांचे रंग वाढवले, गंध वाढवले. मला कसले भय? आता देवाच्या नंदनवनात काम करीन. पृथ्वीवरचा हा फुलमाळी देवाला आवडला असेल म्हणून तो नेत असेल.’‘माझं नाव तुम्हाला माहीत आहे?’‘नाही.’‘माझे नाव कळी.’‘किती गोड नाव।’‘परंतु कोण मला फुलवणार?’‘भेटेल योग्य असा माळी.’‘योग्य माळी भेटला; परंतु तो तर चालला!’‘देवाची दुनिया ओस नाही.’‘मरणाला मिठी मारण्याचे धैर्य तुम्हाला कोणी दिले? कोणी शिकविले?’‘हया लहानशा पुस्तकाने.’‘काय त्याचे नाव?’‘श्रीमद्भगवद्गीता.’‘हे पुस्तक मरायला शिकविते?’‘जगायलाही शिकविते. कर्तव्यकर्म करीत सुखाने कसे मरावे तेही हयात सांगितलेले आहे. जगणे मरणे म्हणजे झोका. गंमत आहे ती. तुम्ही मोठया झालात म्हणजे हे पुस्तक वाचा.’‘परंतु कोण शिकवील वाचायला?’’ ‘तुम्हाला वाचायला येत नाही?’‘नाही.’‘का बरे?’‘बाबा म्हणतात, शिकल्याने मुली बिघडतात.’‘खोटी कल्पना. ज्ञान म्हणजे परमेश्वर. ज्ञानाने मनुष्य खरा मनुष्य होतो. ज्ञानाने नम्रता येते, निर्भयताही येते. ज्ञानाने अनेक प्रश्न सुटतात, अनेक गोष्टी कळतात, वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे, ते तुम्ही मिळवा.’

‘मला देता हे पुस्तक? मरणालाही आनंदाने मिठी मारावयास शिकविणारे पुस्तक देता मला?’‘घ्या हे पुस्तक. मरणार्‍याची जगणार्‍याला भेट.’‘ही घ्या दोन फुले. हसत मरणार्‍याची मला पूजा करू दे.’

इतक्यात ढब्बूसाहेब तेथे आले. ते क्रोधाने लाल झाले होते. ते थरथरत होते. फाशी जाणार्‍या माणसाची खोली उघडी होती. भयंकर अपराध. तो कैदी पळून गेला तर? नोकरी जावयाची. जन्माचे वाटोळे व्हावयाचे. कदाचित् शिक्षाही व्हावयाची. आपणाच कैद्याला फरारी होण्यास साहाय्य केले असा आरोप यावयाचा. स्वत:च फाशी जावयाची पाळी यावयाची.‘कळये, तू येथे कशाला आलीस? कैदी पळाला तर?’‘बाबा. हा पळून जाणारा कैदी नाही. मरणाला न डरणारा हा महात्मा आहे.’‘काय रे, मरण समोर आहे तरी मुलीजवळ गप्पा मारतोस? तुला लाज नाही वाटत? देवाचे नाव घेण्याऐवजी मुलीजवळ बोलत बसतोस? हरामखोर, निर्लज्ज आहे. पक्का बेरड आहे. मरता-मरता फुलपाखरासारखा हसतो खेळतो आहे. बदमाष।’ असे म्हणून फाशी जाणार्‍या त्या फुलाला मारण्यासाठी हात उगारुन ढब्बुसाहेब धावले; परंतु तेथे भिंतीत एक लांब खिळा होता. तो खिळा ढब्बूसाहेबांच्या डोक्याला एकदम लागला. ते खाली पडले. भयंकर जखम झाली. भळाभळा रक्त वाहात होते. शिपाई धावला. कळी घाबरली. फाशी जाणार्‍या कैद्याने आपला रूमाल फाडला व पट्टी बांधली आपल्या मडक्यातील पाणी त्यांच्या डोक्यावर तो ओतीत होता. साहेबांनी डोळे उघडले.‘फाशी जाणार्‍याचा मला स्पर्श? दूर हो!’ पुन्हा साहेब ओरडले.

‘बाबा, त्यांनी तुमची जखम बांधली. डोक्यावर थंड पाण्याची धार धरली. तुम्ही त्यांना मारायला धावलेत, परंतु त्यांनी तुम्हाला प्रेम दिले. अशांना आणखी शिव्या का द्यायच्या? चला बाबा, मी हात धरून तुम्हाला नेते, उठा-’ कळी म्हणाली.कैद्याकडे बघत व पित्याला धरून काळी निघून गेली. फुला तिच्याकडे बघत होता. ती दिसेनाशी झाली. फुलाने आजपर्यंत लाखो काळया फुलविल्या होत्या. त्यांच्यावर त्याने प्रेमाने प्रयोग केले होते. त्या कळयांचे रंग त्याने अधिक खुलविले होते. त्यांच्या गंधात भर घातली होती. कळयांचे आकार त्याने बदलले. त्यांच्या पाकळया मोठया केल्या; परंतु अशी काळी त्याला कधी भेटली नव्हती. अशी कळी त्याने कधी फुलविली नव्हती.ही कळी अजून फुलली नव्हती. हया कळीच्या जीवनात किती तरी रंग ओतता आले असते. गंध भरता आले असते. हया कळीला जर शिक्षण दिले तर? हया कळीने सुंदर विचार ऐकले तर? हया कळीला निर्मळ व प्रेमळ सहवास घडला तर? मी जगलो असतो, तर हया मानवी कळीवर प्रयोग केले असते. तुरूंगात राहून प्रयोग केले असते.