Fulacha Prayog.. - 7 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग - 7

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

७. फुलाला दोन बक्षिसे

तो पाहुणा फुलाची कुंडी घेऊन प्रदर्शनाच्या गावी गेला. तेथे नाना देशांतून फुले आली होती, शास्त्रज्ञ आले होते, परंतु संपूर्णपणे कोणाचाच प्रयोग यशस्वी झाला नव्हता. कोणाच्या एकाच पाकळीवर सोनेरी छटा उठली होती. कोणाची पुसट होती, परंतु या पाहुण्याने जे फूल आणले ते संपूर्णपणे कसोटीला उतरत होते. सारे शास्त्रज्ञ पाहात राहिले.‘आपले नाव काय?’ त्या पाहुण्यास विचारण्यास आले.‘गब्रू’ पाहुणा म्हणाला.‘आपले नाव आजपर्यत ऐकले नव्हते. आपले संशोधनात्मक लेख कधी प्रसिध्द नाही वाटते झाले? कोठे राहाता आपण? कोठे आहे प्रयोगशाळा? अनेक प्रश्न गब्रूला विचारण्यात आले.‘गाजावाजा मला आवडत नाही. मी लहानसा माळी. माझी प्रयोगशाळा वगैरे नाही. मी नाना गोष्टी करीत असतो. मला प्रयोगांची हौस आहे. वाटले की आपणही करावा प्रयोग. करीत होतो, यश आले, तसे शास्त्रीय ज्ञान मजजवळ नाही. उपपत्ती सांगता येणार नाही. कसे कसे फूल वाढले ते टिपलेले नाही. आम्ही साधी माणसे. गब्रू म्हणाला.प्रदर्शनासाठी राजा आला होता. उद्या बक्षीससमारंभ होता. भव्य मंडप घालण्यात आला होता. ध्वजा-पताकांनी, लता-पल्लवांनी, फुलांच्या रंगी-बेरंगी सुगंधी अशा हारांनी, तोरणांनी तो मंडप सुशोभित करण्यात आला होता. अनेक शास्त्रज्ञ राजाच्या भेटी-गाठी घेत होते. गब्रूची राजाशी भेट करण्यात आली.‘आपण कोठे असता? राजाने विचारले.‘एका खेडेगावात.’‘तुम्ही प्रयोगात यश मिळविलेत, आश्चर्य आहे.’‘देवाची कृपा.’‘तुम्ही नीट शास्त्रीय ज्ञान मिळविलेत तर आणखी चमत्कार कराल. आपल्या देशाचे नाव वाढवाल. तुम्ही शास्त्रज्ञ म्हणजे देशाची भूषणे. आपले अभिनंदन करतो. आपल्या हया देशाला तुम्ही मान मिळवून दिलात. धन्य आहात तुम्ही!’गब्रू निघून गेला; परंतू आता कळीची गाडी आली. ती शास्त्रज्ञांना भेटली.’ हे फूल मी फुलविले आहे. हया लफंग्याने ते पळवून आणले आहे.’ असे तिने सांगितले; परंतु तिच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना. ‘मला राजाची भेट घ्यायची आहे, राजाची माझी गाठ घाला.’ असे ज्याला त्याला ती विनवू लागली.शेवटी राजाच्या कानावर वार्ता गेली. एक मुलगी आपणास भेटू इच्छिते, असे त्याला कळले. त्याने त्या मुलीला बोलाविले. ती मुलगी आली. नम्रपणे ती उभी राहिली. नंतर राजाला तिने प्रणाम केला.‘मुली, काय आहे तुझे म्हणणे?’ राजाने प्रश्न केला.‘महाराज, ते फूल मी फूलविले आहे,’ ती म्हणाली.‘मोठ-मोठे शास्त्रज्ञ थकले, तू कसे फुलवणार ते फूल?’’‘ही पाहा माझी रोजनिशी. हिच्यात झाड कधी लावले, कोणते खत घातले, कोणत्या रंगाचे किरण दिले ते सारे मी लिहून ठेविले आहे.’

राजाने रोजनिशी वाचली. त्याने त्या मुलीकडे पाहिले.‘तुझे नाव काय?’‘कळी’‘तुझा बाप काय करतो?’‘ते तुरूंगाचे अधिकारी आहेत.’‘कोणत्या तुरूंगावर?’’‘समुद्रकाठच्या.’‘ज्यांची मुलगी आजारी होती व ज्यांनी समुद्रकाठी बदली मागितली होती, त्यांचीच का तू मुलगी?’‘होय महाराज.’‘त्या तुरुंगात कोण आहे?’‘ते एक राजकीय कैदी आहेत. त्यांना फुलांचे वेड. ते शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या सांगण्यावरुन हा प्रयोग मी केला. ते सारे श्रेय त्यांचे आहे. मी निमित्तामात्र.’‘राजधानीच्या तुरुंगातून तो कैदी अन्यत्र पाठवताच तू आजारी पडलीस. होय ना?’’‘होय’‘काय होत होते तुला, बेटा?’‘तसे काही नाही. मी काय सांगू महाराज?’‘प्रेमाच्या पिशाच्चाची बाधा तर नव्हती?’‘आपण सर्वज्ञ आहात.’‘बरे, ज्या. उद्या प्रदर्शन-मंडपात माझ्या शेजारी बैस आणि हे कपडे उद्या काढ. नवीन सुंदर पोषाख तुला देण्यात येईल तो घाल आणि दोन सुंदर दागिने देईन ते अंगावर घाल. समजलीस ना? जा बेटा. काळजी नको करू.’कळीची कळी फुलली. ती निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. हजारो लोक येत होते. खेडयापाडयांतून, शहरा & शहरांतून स्त्री & पुरूषांच्या झुंडी येत होत्या. तिसरे प्रहरी बक्षीस समारंभ होणार होता. मंडप कधीच भरुन गेला. सुंदर व्यासपीठ केलेले होते. तेथे छताखाली ती कुंडी ठेवण्यात आली होती. अनुपम सौदंर्याने युक्त असे ते फूल तेथे डोलत होते. राजासाठी चांदी-सोन्याचे सिंहासन होते. त्याच्या दोन बाजूंस अनेक सुंदर आसने मांडण्यात आली होती.

राजाने काही शिपायांस बोलावले. ‘जा, ताबडतोब त्या समुद्रकाठच्या तुरूंगातील त्या राजकीय कैद्यास घेऊन या. चांगले घोडे गाडीला जुंपा. सायंकाळपर्यत येथे आले पाहिजे.’ शिपाई ‘आज्ञा’ असे म्हणून गेले. वेगवान घोडयांची गाडी घेऊन ते गेले. तुरूंगासमोर गाडी थांबली. राजाचा निरोप ढब्बूसाहेबांस सांगण्यात आला. शृंखला घातलेला फुला कैदी घोडयांच्या गाडीत बसविण्यात आला. त्याच्या बाजूस सशस्त्र शिपाई बसले आणि गाडी वेगाने निघाली. आपल्याला तोफेच्या तोंडी देण्यासाठी नेण्यात येत असावे असे फुलाला वाटले.‘कोठे नेता मला?’’ त्याने विचारले.‘चूप. बोलना नहीं, पूछना नही.’ शिपाई म्हणाला.तिकडे समारंभ सुरू झाला. प्रार्थनागीत झाले. राजा बोलायला उभा राहिला. टाळयांचा कडकडाट झाला. जणू आकाश पडते की काय असे वाटले. राजाने हात वर करताच सारे शांत झाले.‘जमलेल्या नाना देशांतील थोर शास्त्रज्ञांना व सर्व स्त्री-पुरुषांना आजचा दिवस आनंदाचा आहे. शास्त्रांचा गौरव करण्याचा आजचा दिवस आहे. शास्त्राने संहारही करता येतो व जीवनात आनंद व सौदर्य हयांचीही निर्मिती करता येते. शास्त्रांचा उपयोग संसार आनंदमय करण्यासाठी करणे ही खरी शास्त्रपूजा. शास्त्राने मारक शस्त्रे निर्मू नयेत. शास्त्राने मनुष्याला माकड बनवू नये. मनुष्याला वृक-व्याघ्राहून क्रूर करु नये. शास्त्राने माणुसकी वाढो. आनंद वाढो. आज आपण बक्षीस देणार आहो; परंतु कोणाला? बाँबचा शोध लावणार्‍याला नाही. तोफेचा गोळा शंभर मैल जाण्याचा प्रयोग करण्यार्‍याला नाही, तर सृष्टीतील सौदंर्य व आनंद वाढविणार्‍याला. शास्त्राने सुबत्तता निर्मिता येईल. फुले - फळे वाढविता येतील. फुलांचा प्रयोग करणार्‍यांला आज बक्षीस द्यावयाचे आहे. कृष्णकमळावर, निळया-सावळया कृष्णकमळावर सोनेरी छटा उमटविणार्‍याला हे बक्षीस द्यावयाचे होते. अनेक देशांतील फुलवेडया शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आपल्या प्रयोगांची फुले त्यांनी येथे आणली आहेत. सर्वानाच सारख्या प्रमाणात सिध्दी मिळाली नाही, परंतू एक प्रयोग यशस्वी झाला. तो प्रयोग येथे ठेवण्यात आला आहे. पाहा हे फूल. किती सुंदर दिसते आहे! पाहा हया सोनेरी छटा कृष्णरंगावर सोनेरी वेलबुट्टी. अभिनव प्रयोग.....’

राजाचे भाषण असे चालू होते इतक्यात ती गाडी आली. सर्व लोकांचे लक्ष तिकडे गेले. राजाने दूतांना तिकडे पाठविले. ‘शृंखला काढून कैद्याला येथे आणा.’ अशी त्याने सूचना दिली. दूत वेगाने गेले. फुलाच्या पायांतील शृंखला काढण्यात आल्या. त्याला पाय हलके वाटू लागले. नीट चालवेना. शिपाई हात धरुन त्याला नेत होते. किती तरी दिवसांनी बाहेरची मोकळी हवा अंगाला लागली. विशाल क्षितिज दिसले. अनंत आकाश दिसले. हजारो स्त्रि-पुरूषांची सृष्टी दिसली.त्या कैद्याला राजाजवळ नेण्यात आले. कैदी फिका पडला होता, परंतु त्याच्या डोळयांत ध्येयनिष्ठेचे पाणी होते. राजाने त्याला सन्मानपूर्वक जवळच्या आसनावर बसविले. त्या कैद्याला पाहाताच तो पाहुणा काळवंडला. गब्रू घाबरला. त्याची मान खाली झाली. त्याला आपण पडणार असे वाटले. राजा बोलू लागला. लोक ऐकू लागले.

‘हा जो यशस्वी प्रयोग येथे आहे, तो कोणी केला? हे येथे एक गृहस्थ आहेत. त्यांचे नाव गब्रू. त्यांनी आपली मान विनयाने खाली घातली आहे. हे गब्रू म्हणतात की, ‘हा प्रयोग मी केला त्यांना जर शास्त्रीय माहिती विचारली तर ते म्हणतात, ‘मी प्रयोग केला आहे; माहिती मागून देईन.’ ही माझ्या डाव्या बाजूस सुंदर मुलगी बसली आहे. ती म्हणते, ‘हा प्रयोग मी केला.’ प्रयोग कसा-कसा केला त्याची माहिती तिने टिपून ठेवली आहे. ही पाहा तिची रोजनिशी. हिच्यात सारे आहे; परंतु हया मुलीला कोठून आले हे ज्ञान? ते ज्ञान तिला आता आणलेल्या हया थोर पुरूषाने दिले. हा पुरुष तुम्ही ओळखलात का ज्याला तुम्ही फाशी देणार होतेत, तोच हा महात्मा. तुरूंगातही ध्येयपूजा त्याने सोडली नाही. हयाच्यासंबधाने सारे कागदपत्र मी वाचले. हा थोर पुरुष निर्दोष आहेत. जे कागदपत्र हया कैद्याच्या घरी सापडले त्यात काय होते? देशासाठी त्या प्रधानांनी काय-काय केले, किती त्याग केला, किती आपत्ती सोसल्या, त्यांचा पुरावा होता; परंतू ‘ते कागद जाळून टाक. आमचा त्याग जगाला कळायला कशाला हवा? अज्ञात असू दे आमचा त्याग.’ अशी चिठ्ठी त्या प्रधानांनी आपल्या मित्राला पाठवली होती, परंतू हया मित्राने ते कागद जाळले नाहीत. असो. ते थोर प्रधान तर गेले; परंतु हा पुष्पसृष्टीत चमत्कार करणारा मित्र सुदैवाने वाचला. त्याने हे फूल फुलविले. त्याने हया मुलीकडून हा प्रयोग करविला. ही मुलगी तुरूंगाच्या अधिकार्‍याची. हया थोर पुरूषाने तिला लिहा-वाचायला शिकविले. फुले फुलवणार्‍या हया माळयाने हया मुलीची जीवनकळीही फुलविली. हया एक लाख रुपयांच्या बक्षिसांच्या लोभाने पलीकडे ते काळवंडलेले गृहस्थ आहेत त्यांनी पाप केले. त्यांनी ही कुंडी लांबविली. ह्या मुलीच्या बापाचा त्याने विश्वासघात केला. ज्या शृंखला ह्या थोर पुरूषाच्या पायांत होत्या, त्याच हया लफंग्याच्या पायांत घालून त्याला योग्य ती शिक्षा केली जाईल. परंतु आधी हा गोड समारंभ संपवू या. एक लाख रुपयाचें बक्षीस, या शास्त्रज्ञाला मी देतो. असेच देशाचे नाव ते वाढवोत. ध्येयाची ते अशीच पूजा करोत. कष्ट पडोत, आपत्ती येवोत, मरण समोर असो, तरी ध्येयाला कसे कवटाळावे ते त्यांनी दाखविले आहे. ते शास्त्रज्ञ आहेत. ते महात्मा आहेत. अशी माणसे म्हणजे पृथ्वीचे वैभव! एक लाख रुपयांच्या बक्षिसाबरोबर दुसरेही एक बक्षीस मी हयांना देत आहे. ही मुलगी हयांना मी देत आहे. तुम्हा सर्वासमक्ष हयांचे लग्न मी लावतो. तुमचे आशीर्वाद हयांना द्या.राजाने कळीचे हात फुलाच्या हातात दिले. दोघांनी राजाला वंदन केले. दोघांनी त्या विराट् जनतेला प्रणाम केला. सर्वांनी जयजयकार केला. टाळयांचा गजर झाला. वाद्ये वाजू लागली. बँड सुरू झाला. बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. फुलांची वृष्टी झाली. आनंदीआनंद झाला. समारंभ संपला. कळी व फुला राजाबरोबर गेली. राजाने त्यांना मेजवानी दिली. सारे शास्त्रज्ञ हजर होते. राजाने वधूवरांस मूल्यवान वस्त्रे व अलंकार हयांची भेट दिली. शास्त्रज्ञांचा निरोप घेऊन, राजाचा निरोप घेऊन कळी व फुला निघून गेली. त्या दोघांचा आनंद अवर्णनीय होता. त्या आनंदाचे कोण वर्णन करील?