Fulacha Prayog.. - 18 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग - 18

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

१८. पुन्हा घरी

माधवाच्या घरी म्हातारा भय्या होता. तो आपल्या धन्याची रोज वाट बघत असे. तो दिवाणखाना झाडून ठेवी, अंगण झाडून ठेवी. रोजच्याप्रमाणे भय्या उठला व अंगण झाडायला गेला. तो अंगणात कोण निजले होते? तो तर धनी. माधव तेथे पडला होता. त्याला झोप लागली होती. भय्याला वाईट वाटले. धनीसाहेब का रात्री आले? त्यांनी हाका मारल्या असतील? मला जाग नाही आली. अशी कशी झोप लागली मला. ते खाली जमिनीवर निजले. पांघरायला नाही, अंथरायला नाही, अरेरे. त्या भय्याला फार वाईट वाटले. त्याने धन्याला हलके हलके हाका मारल्या माधवने डोळे उघडले.‘धनीसाहेब!’‘कोठे आहे मी?’‘आपल्या घरी. तुम्ही रात्री आलेत वाटत? मला हाका नाही मारल्यात? उठा. गारठला असाल. दिवाणखाना स्वच्छ झालेला आहे. पलंगावर स्वच्छ गादी आहे. उठा!’भय्याने हात धरून मालकाला वर नेले. गादीवर निजविले. माधव झोपी गेला. जणू कित्येक वर्षे तो झोपला नव्हता. बर्‍याच वेळाने तो उठला. त्याने स्नान वगैरे केले. तो जेवला. नंतर पुन्हा झोपला. तिसरे प्रहरी तो उठला. गच्चीत अरामखुर्चीत तो पडला होता. समोर समुद्र उचंबळत होता. तो पाहु लागला. तो विचार करू लागला. आपल्या गावाला समुद्र आहे; परंतु दलदलीही आहेत. कोण बुजवणार हया दलदली? मी बुजवीन. माझी सारी संपत्ती त्यांत खर्च करीन. आता नकोत पुस्तके, नकोत नाना विद्या. आजपर्यत त्यांत पैसा खर्च केला. आता दलदली दूर करण्यात खर्चू. दलदली गेल्या तर डास मरतील. हिवताप हटेल. रोग जातील. दलदली आहेत तेथे बागा फुलतील. तेथे लोक फिरायला जातील. मुले बाळे खेळतील. गावात आरोग्य वाढेल, आनंद वाढेल, सौंदर्य वाढेल. सर्वाना सुखी करणे, हयात किती सुख आहे ! सर्वांच्या तोंडावर तेज, प्रसन्नता, आनंद समाधान फुलवण्याची खटपट करणे, किती थोर आहे ते काम? इतक्या वर्षात असा सुंदर विचार माझ्या मनात का बरे आला नाही?अशा विचारांत माधव रंगला होता. इतक्यात दिवाणखान्याच्या दारावर कोणी टकटक केले.‘कोण आहे?’‘आम्ही तिघी बहिणी,’‘एकेक आत या.’एक बहीण आत आली. तिचे तोंड दु:खी होते. डोळे भरलेले होते.‘काय आपले नाव?’ माधवने प्रश्न केला.‘दु:खदेवता.’ ती म्हणाली.‘का आलात?‘एक प्रश्न विचारायचा आहे.’‘विचारा.’

‘माझी सत्ता तुम्ही मान्य करता की नाही?’

‘दु:खाची सत्ता? छट् दु:खाची सत्ता मी कधीच मान्य केली नाही. दु:खे आली, गेली. आकाशात ढग येतात, जातात. आकाश पाठीमागे निळे निळे हसते. तसे माझे, दुखा:ची मी टर करायचो. दु:खे माझ्यावर कोसळली तर खदखदा हसायचो.’दु:खदेवता निघून गेली. दुसरी बहीण आली. ती खिन्न व उदास होती. सुस्कारे सोडीत येत होती. शून्य दृष्टीने बघत होती.‘आपले नाव काय?’ माधवाने विचारले.‘निराशा.’‘काय काम?’‘एक विचारायचे आहे.’‘विचारा.’‘माझी सत्ता तुम्ही मान्य करता की नाही?’‘निराशेची सत्ता? छट्, बिलकूल नाही. एकदा जीवनात निराशा जरा डोकावली होती; परंतु दिली तिला खोल दरीत लोटून. निराशेच्या झिंज्या धरून तिला मी हाकलून दिले आहे. निराशा मला ठाऊक नाही.’ निराशा गेली. तिसरी बहीण आली. तिचे डोळे खोल गेले होते. नाकाचा गोंडा दिसत होता.‘काय आपले नाव?’ माधवाने विचारले.‘चिंता.’‘काम काय!’‘एक विचारायचे आहे.’‘विचारा’‘माझी सत्ता मान्य करता की नाही?’

‘चिंतेची सत्ता? चिंता, काळजी, हयांनी कधी मी त्रासला गेलो होतो?मला नाही आठवत. मी जीवनात निश्चिंतपणे वावरत आलो. ना चिंता, ना हुरहूर. छट्, तुमचीही सत्ता मी कबूल करीत नाही.’‘काय? माझी सत्ता मान्य करीत नाहीस? अपमान करतोस माझा? असे चिंतादेवीने रागाने म्हटले. तिने ‘फू फू फू फू’ करीत माधवाच्या डोळयांत फुंकर घातली. ती निघून गेली. परंतु माधव आंधळा झाला!माधवची बाहेरची दृष्टी गेली; परंतु अंतदृष्टी कोण नेणार? ज्ञानचक्षू कोण नष्ट करणार? तो तसाच शांतपणे खुर्चीत होता. आता समोरचा समुद्र दिसत नव्हता. त्याची घो घो गर्जना कानी येत होती. ती स्वकर्तव्याचे त्याला स्मरण करून देत होती.‘कोणते बरे विचार माझ्या मनात मघा खेळत होते? हो, ही दलदल दूर करावी. आरोग्य निर्मावे. लोक सुखी करावे. त्यांच्या संसारात आनंद आणावा. गावातील रोग जातील. लहान मुलांची तोंडे फुलतील. त्यांचे गाल गुबगुबीत होतील. त्यांवर गुलाबी रंग चढेल. दलदली जाऊन बागा फुलतील. बागेत गुलाब व मानवी जीवनात गुलाब. बाहेर गुलाब फुलतील, घरात गुलाबी गालांची निरोगी मुले हसतील. आनंद, सर्वत्र आनंद पसरणे, केवढे थोर काम. हेच काम करू दे. हे काम करीत मरू दे. किती उदार व सुंदर विचार मनात आला. किती पवित्र व धन्यतम हा क्षण. हे क्षणा. किती तू सुंदर. किती पुण्यवान. जाऊ नकोस. तुला पकडू दे. तुला माझ्या जीवनात अमर करू दे. थांब.परंतु असे शब्द माधवाच्या तोंडून बाहेर पडताच तो मरून पडला. माधवाचा आत्मा निघून गेला. कोठे गेला? सैतानाकडे का परमेश्वराकडे?