varas - 1 books and stories free download online pdf in Marathi

वारस - भाग 1

"अय गण्या,आर इथं कुठं आणलंस र?तुझ्या चपटी पिण्याच्या नादात आपल्या दोघांच मढ बसण बघ"
" भिऊ नको रे तू,काय नाय होणार,मी एकदा आधी पण आलोय इथं,काय भूत बीत नाहीये"
"पर गावकरी तर म्हणत्यात कि जांगलातल्या वाड्यात जायचं नाही ते,तिथं कुणाला बी जायची परवानगी नाहीये ना"
"गावातल्या लोकांकड कुठं ध्यान देतू,, कोण बुवा कधी बोलून गेलाय आणि समदे जण त्याच्या बोलण्यावर भरोसा ठेऊन इकडं येत नाही.आणि तस आपण कुठं वाड्यात जाणार हावोत,आपण दूर थांबायचं त्या वाड्यापासून"
"दूरच थांबायचं हाय तर मग जातूच कशाला?"
"मग पिणार कुठं र?आपली जुनी जागा त्या त्या नदी काठची तर आता पावसाळा लागल्यानं पाण्यात गेलीये,,अन नवीन सरपंचान तर गावात चार वर्षांपासून दारूबंदी केली.अशात जर का कुणी बघितलं आपल्याला पितांनी तर नागडा करून धिंड काढायला कमी नाही करायचे.म्हणून म्हणतो इथं बसू ,कुणी इकडं फिरकत बी नाय"
"च्या मारी,,एकतर दारू पितुया अन वरून या जंगलात आलोय,,मायेला कळलं तर सालच सोलतेय माझी बघ".
"काय लेका जब्या!!नुसतं घाबरट राहून जमलं का!तू एक काम कर माझा हात धर अन चुपचाप चल मागमाग,,दोन घोट घेऊ,एकदा का चपटी डोक्यात घुसली ना कि समदी भूत अन माणसातील भूत गायब होतात बघ"
"अस म्हणतुस,ठीक हाय येतो,पण तुझ्या भरवश्यावर"
"हा,,आता कस!!तू चाल मी बघतो कुणी भेटल्यावर"
"गण्या ,तू इथं आधीपन आला हाय ना रं,, मग मला एक सांग हे बोल्होबा म्हणजे नेमकं हाय काय?"
"दोन वेळा आलोय,,पण त्या वाड्यात काही गेलो नाही लेका,, हे रान तस लै मोठं,,इथून आपण एक कोस गेलो ना कि तिथं एक टेकडी लागती बघ,अन त्याच टेकडीवर तो वाडा हाय अस म्हणतात,म्या फकस्त दुरूनच बघितलं हाय ते,,जवळ जायची काय आपल्याला हौस नही,,आपलं प्यायचं ठिकाण वेगळं
अस म्हणतात दर अमौशेला गावातला एक माणूस जाऊन वाड्यात बोकुड देऊन येतो"

"आणि बोकुड खाऊन ते भूत शांत बसतो?"
"बसत असणं,, बघ ना तेव्हापासून गावात काहीच येरबाड नाही झालंय"
"मग मला येक सांग,आपल्याला या रानात यायला बंदी का हाये मग?आपण तर त्या भुताला बोकुड देतूच ना?"
"काय माहित बुवा,,त्या भुताला त्याच्या घरात कुणी आलेले चालत नसणार,,आणि अस पण म्हणत्यात कि या रानात अमौशेला कुणी आलं तर जिंदा परत जात नाही त्ये,,अमौशेला भूत या रानात फिरत असतो म्हणे"
"काय बोलतुस जब्या,,!!!! यायला पंचायत झाली म्हणायची"
"काय झालं,?"
"आर हा श्रावण महिना चालू हाय,अन आज अमौशा पण हाय"
"काय!!!आर आधी तर सांगायचं,च्या मारी आता त्यो भूत आपल्याला जिता सोडायचा नाही बघ,त्यात आपण दारू घेऊन अलुया,, त्यांनी जर हे अस काही बघितलं तर आपलं मढ पण गावणार नाही बघ कुणाला,,गण्या त्यानी आपल्याला बघायच्या आत पळ"
"आर थाम्ब,,आपण बोलता बोलता एक कोस पार पण केलाय,हि बघ हि समोर टेकडी हाय ना इथंच तो वाडा"
आता तर जब्या ला चक्कर यायची वेळ आली होती,जवळ जवळ संध्याकाळ झालीच होती आणि वरून घनदाट वन म्हणून कि काय अंधार आधीच पडला होता.त्यात अचानक कुणाचा तरी किंकाळण्याचा आवाज आला.
"गण्या भूत आला बघ,आता आपण मेलो"गण्या तसा धीट होता.त्याने हळुवार आजूबाजूला बघितलं, आवाज कुठून येतोय याचा कानोसा घेतला.
"जब्या,हा भूत नाहीये,कोणत्या तरी माणसाचाच आवाज हाय बघ,अन ती बराबर त्या टेकडीवरून येतूया बघ"

"माणूस,…??पण आपल्याला काय त्याच,कुनिबी का असना आपण निघू ना इथून"

"बराबर बोललास जब्या,चल निघायला पाहिजेल"
आणि ते दोघे निघणार तेव्हढ्यात अजून एक किंकाळी ऐकू आली.आता मात्र त्या किंकाळीतला आक्रोश जाणवत होता
"जब्या,मला वाटत कुणाला तरी मदतीची गरज हाय,चल जाऊन बघूया."

"आर यडा झालास का"

"तू चल रे"आणि गण्या ने त्याचा हात पकडला आणि भरभर पाऊल टाकत ती आखूड टेकडी झापक्यात सर केली.सोबत असणारा जब्या जरी घाबरट असला तरी गण्या मुळे त्यालाही जण भाग पडलं.वर पोहोचताच तो वाडा त्यांना दिसलं.पूर्णपणे दगडाने बनलेला,जागीजागी वेली, झुडपं,गवत,आणि कोळ्याची जाळी होती,अचानक त्यांना कण्हण्याचा आवाज आला,
"वाचवा,वाचवा",
एक मध्यम वयीन माणूस कण्हत होता.

"गण्या ते बघ काय "दोघही जिथून आवाज येत होता तिथं गेले,आणि समोरच दृश्य पाहून दोघांचाही काळजात धस्स झालं.
"सरपंच तुम्ही!!!",जब्या ओरडला.दोघेही त्या देहाकडे बघतच राहिले.चेहरा तर सरपंचाचा होता,पण शरीर जस काय एखाद्या लांडग्यान कुर्तडली अस झालं होतं.काय करावं कुणालाच सुचत नव्हतं,आणि तेव्हढ्यात……तेव्हढ्यात टणकण डोक्यात काहीतरी बसलं.शेजारचा गण्या तर जागीच बेशुद्ध झाला,जब्या ला पण जोरात लागलं होतं,सगळं अंधुक अंधुक दिसत होतं.त्याने मागे वळून बघितलं,तिथे तर कुणीच नव्हतं,डोक्यातन रक्त भळाभळा वाहू लागलं.त्यान गण्याला उचलायचा प्रयत्न केला,काहीही करून इथून निघायचं अस ठरवल आणि पुन्हा एकदा डोक्यात जबरी घाव झाला,आणि त्याचे पण डोळे अलगद बंद झाले.