jata jataa books and stories free download online pdf in Marathi

जाता जाता

कथा - जाता जाता
---------------------------------
काही केल्या रीनाला झोप येत नव्हती,रात्र तशीच सरत होती, आणि तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता.आपली अशी अवस्था होण्यास आपण स्वतःच कारणीभूत आहोत, स्पष्ट बोलता येत नाही, ऐनवेळी
मन माघार घेते, नको त्या वेळी अशी कच खाण्याच्या स्वभावापायी, स्वतःहून अवघड परिस्थती निर्माण करून ठेवलीय, हे मानसिक ओझे आता सहन होत नाहीये,
पुरे झाले आता स्वतःचा कोंडमारा करून घेणे.


गेले वर्षभर रीना आणि विराज या जोडीची लव्हस्टोरी",
तिच्या परिवारात, फ्रेंड सर्कल मध्ये चर्चेचा विषय होती.
प्रेम ठरवून होत नसते हे जितके खरे असते, तितकेच
कुणावर जीव जडेल , प्रेम जुळेल याचा तरी कुणाला अंदाज करता येत असतो का ?, नाही ना ?


म्हणूनच "प्रेम, प्यार, इशक, मोहब्बत, लव्ह " या शब्दांतील भावना आपण अनुभवल्या पाहिजेत ",
असे प्रत्येकाला वाटत असते. जो तो आपल्या आवडत्या जीवलगाच्या शोधात असतो, ज्यांचा शोध सफळ होतो,
ते स्वतः नशीबवान समजतात, ज्यांना "असे प्रेम शोधूनही मिळत नाही ", ते स्वतःला कमनशिबी म्हणवतात.


रीनाला विराज आणि विराजला रीना , योगायोगाने सापडले, भल्यामोठ्या कॉर्पोरेट कॉम्प्लेक्स मध्ये
दोघांचे वेगवेगळे ऑफिस होते, कॉमन कँटीनमध्ये
त्यांनी एकमेकांना पाहिले, नंतरच्या पाहण्यात ओळख वाढत गेली, लवकरच जाणवले, आपण एकमेकांना आवडू शकतो, त्यासाठी जाणून घेता आले तर खूप छान होईल, भेटी वाढत गेल्या, वेळ कमी पडतो असे जाणवले म्हणून मग सुट्टीच्या दिवशी वेळ काढायचा, आणि मनोसक्त भटकंती करायची, अशा सहवासात प्रेम तर फुलणारच की, आणि हा प्रेम-सुगंध सगळीकडे दरवळू लागला होता.
दोघांच्या घरून विरोध वगैरे काही होण्याचे कारण नव्हते,
सगळीकडून ग्रीन-सिग्नल ' ,साहजिकच आता लग्नाचे लाडू कधी ? असा प्रश्न दोन्ही घरांना विचारला जाऊ लागला होता.
वीराज आणि रीना दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते हे खरे, पण सहवासात आल्यावर स्वभावातील बारीक खाचाखोचा कळायला लागतात, कधी कधी असेही क्षण येतात की वाटायला लागते, " आपले प्रेम चुकीचे तर ठरणार नाही ना ?
रीनाला या अवस्थेचा अनुभव गेल्या काही महिन्यांपासून
येऊ लागला होता.
रिनाचा स्वभाव आक्रमक नव्हता, आपल्या मनाप्रमाणेच झाले पाहिजे, अशी आग्रही पण ती नव्हती, गोडीने ,समजुतीने सगळं व्हावं अशा साध्या अपेक्षा होत्या तिच्या, रिनाच्या आई-बाबांच्या समजूतदार पारिवारिक सहजीवनाचा असा संस्कार रीनावर झालेला होता.


दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर रीना भिडस्त स्वभावाची होती, एक घाव -दोन तुकडे ", करणे तिच्या स्वभावात नव्हते, समोरचा जे बोलेल त्याप्रमाणे वागणे,
यात काही गैर नाही असे तिचे मत असे. आपले काही नुकसान नाही ना होत, मग ऐकून घेतले तर बिघडले कुठे ?
पण गेल्या काही दिवसांपासून मात्र आपल्या अशा वागण्याने, स्वभावाने बरेच काही बिघडत जाते आहे,
असे रिनाला जाणवत होते, त्यापेक्षा ते तिच्या मित्र-मैत्रिणी यांना जाणवले होते, रिनाच्या क्लोज फ्रेंड्सनी
तर स्पष्टपणे सुचवले-
हे बघ रीना-तुझे आणि विराजचे प्रेम असणे, यात आम्ही मोडता घालण्याचे काहीच कारण नाही, सगळ्या दृष्टीने तुम्ही अनुरुप आहात.


तरी आम्हाला वाटायला लागलय की - रीना ,तू विराजला बायको म्हणून अगदी योग्य आहेस, त्याचा संसार, घर-परिवार सांभाळणारी तू नक्कीच आहे, जबाबदारी निभावून नेणारी आहेस तू, ती टाळणारी तू नाहीस.
याची आम्हाला खात्री आहे, आणि या दृष्टीने वीराजने
तुझी अचूक निवड केली आहे, पण,


तुझ्यासाठी तो नवरा, साथीदार म्हणून योग्य ठरणार नाही,असे आम्ही म्हणू, कारण विराजने तुझ्याशी त्याच्या सोयीसाठी प्रेम केलय, तो भावनिक वगैरे अजिबात नाही,पक्का व्यावहारिक आहे.


लग्न करून त्याचा परिवार तुझ्या गळ्यात टाकून तो मोकळा होणार, कंपनी आणि करिअर ही कारणे देत
तो स्वतःपुरते स्वतःसाठी जगणार.
तुला तर तुझी नौकरी, आणि त्यासोबत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात आयुष्य घालवायचे आहे,
रीना, विराजवर प्रेम करण्याचे हे फळ की शिक्षा ?
हे तू ठरवायचे आहे.


प्रेम आंधळे असते, प्रेमवेडे मन डोळसपणे विचार नाही करीत कधी.
रीनाचे डोके भणाणून गेले, आपले खूप प्रेम आहे
विराजवर, आपल्याला हवा तसाच आहे विराज,
सुंदर, बुद्धिमान, करियर जागरूक, नांव ठेवायला जागा नाहीये या माणसाला.


आणि आपले मित्र हे काय सांगत आहेत विनाकारण,
माझ्या विराजचे ब्राईट फ्युचर पाहून जळतात हे सारे ?
नक्कीच असे असेल,
माझे विराजवर असलेले हे गाढ प्रेम "त्यामुळेच यांना देखवत नाहीये.
रिनाच्या मते विराजवर त्याच्या कंपनीने दाखवलेला विश्वास ,दिलेल्या वाढत्या जबाबदारीचे काम , यामुळे
लग्ना विषयी काही ठरविण्यास वेळच मिळत नव्हता,
त्याला तो तरी काय करू शकणार ?
त्याला अशावेळी माझ्याशिवाय कोण समजून घेणार ?


रीना पुन्हा पुन्हा स्वतःला समजावीत होती, गेल्या काही दिवसांपूर्वी विराज आणि रिनाचा साखरपुडा " ,मोठ्या थाटामाटात पार पडला, 2 महिन्यात लग्न तारीख काढू असे ठरले, आणि रिनाचा जीव मोहरून गेला.
नंतर 2 महिने झाले, 4 महिने झाले, तरी लग्नाची तारीख काढण्याचे वीराज मनावर घेईना, त्यांच्या भेटीत आता प्रेमाचे विषय कमी आणि विराजच्या ऑफिसचे विषय, घरच्या प्रश्नात रिनाने आता पासून लक्ष दिले पाहिजे,
अशा अपेक्षा अधिकाराने विराज बोलून दाखवू लागला होता, एंगेजमेंट " नंतर विराजचे वागणे बदलत होते,


रीना म्हणाली सुद्धा, विराज , फक्त साखरपुडा झालाय आपला, लग्न होऊन तुझ्या घरात तर येऊ दे मला,
त्या अगोदरच तुझ्यातील माझ्यावर प्रेम करणारा विराज मला कमी कमी होतोय असे जाणवून देतो आहेस.
त्यावर विराज म्हणे-
प्रेम प्रेम ,चोवीस घंटे तेच सांगत बसू का तुला ? तुला माहिती आहे ना ? माझे प्रेम आहे तुझ्यावर, मग, पुरे ना,
लग्न झाल्यावर सगळं तर तुझ्याच हातात असणार आहे, यु विल बिग बॉस, आहेस कुठे ?


या नंतर विराजने जणू रिनाला पक्के गृहीत धरले, ती आपल्याला सोडून कुठेच जाणार नाहीये, ती तशी नाहीये,याची खात्री झाली आणि तो त्याच्या करियर स्वप्नात बुडून गेला,
एक दिवस ,तिची एक मैत्रीण घरी येऊन म्हणाली,
रीना, विराजच्या कंपनीत काम करणाऱ्या माझ्या एका मित्राने, एक खात्रीशीर, पक्की बातमी दिली आहे,
6 महिन्यांनी, विराज कंपनीच्या परदेशात होणाऱ्या नव्या ऑफिसचा हेड म्हणून जॉईन होणार आहे, कमीत कमी
5 वर्ष तो बाहेर असणार आहे.
रीना, त्या अगोदर तो तुझ्याशी लग्न करणार हे नक्की,
आणि मग अलगदपणे तुझ्या गळ्यात सगळं अडकवून
करियरच्या नावाखाली परदेशी मजेत राहणार.


तू एकटी इकडे, आणि तो तिकडे एकटाच राहील ?
मला तर सॉलिड डाऊट आहे, ग्यारंटी नाही मला तरी.
रीना, बघ बाई, साखरपुडा झाला, म्हणजे लग्न नाही झाले तुमचे.


हे सगळं ऐकून रीना हादरून गेली, विश्वास पक्का होता तिचा पण तो डळमळीत व्हावा असेच विराजचे बदलते वागणे ती अनुभवत होती.
रात्रभर ती तळमळत जागी राहिली, ही वेळ तिच्या प्रेमाच्या परीक्षेची होती, स्वभावाची परीक्षा होती.


सकाळ झाली, रीना रोजच्या प्रमाणे ऑफिसला गेली,
दुपारी नेहमीच्या कॉमन कँटीन मध्ये विराजची तिची भेट झाली, जेवण झाले, तो काही बोलत नाहीये , हे जाणवले,
ती त्याच्याकडे पाहत राहिली, तिच्या मैत्रीणीने जे सांगितले, त्यातील एक अक्षर ही स्वतः हुन या माणसाने
आपल्याला अजून सांगितलेले नाही, असे लपवून ठेवण्याची गरज काय, प्रेमाने नाही का सांगता येत,
हक्क आणि अधिकार बरोबर कळतो, माझ्या मनाला, मला किती पक्क गृहीत धरलाय विराजने ?


लंच टाईम संपला, विराज उठत म्हणाला, खूप काम पडली आहेत, संपवतो अगोदर, तूला पण काम असेलच की,
थांब विराज, जाता जाता , मी काय सांगते आहे ते नीट ऐकून घे, आणि मग जा,
मी खुप विचार केला ,माझ्या बद्दल सुद्धा, खरेच मी तुझ्या साठी योग्य असले तरी, तू नवरा म्हणून माझ्यासाठी योग्य नाहीस.
आपले लग्न होऊ शकत नाही, हा माझा निर्णय ठाम आहे.
------------------------------------------------------------- ------
कथा- जाता जाता
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
--------------------------------------------------------- ----- ------