Trushna ajunahi atrupt - 8 books and stories free download online pdf in Marathi

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग ८

चंद्रग्रहण मध्यावर होत.. करालने समोरच्या यज्ञकुंडाभोवती चरबीचे दिवे पेटवले. बाजूच्या पात्रातील सफेद राखेने एक आकृती रेखाटली. त्या आकृतीच्या रेखा हळदी कुंकवाने भरून टाकल्या. चारीही बाजूला चार सफेद कवट्या व हाडांची रास रचली गेली. आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर खंजिराने वार करत त्याने स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला व मोठ्या आवाजात यक्षिणीला आवाहन करणं चालू केलं. त्याच्या तळव्यातून अखंड रक्ताची धार लागली होती पण मुखातून गगनभेदी मंत्रोच्चार चालू होते. चंद्रग्रहणाचा महत्त्वाचा प्रहर चालू झाला. इतक्या वर्षांची त्याची मनोकामना काहीच वेळात पूर्णत्वास जाणार होती. आणि अचानक कोंदट वाटणारा वारा जोरजोरात वाहू लागला. गढूळलेल्या वातावरणात अजुनच काळोख दाटला. वाऱ्याच्या फुंकरीने भडभडत जळणारे दिवे फरफर करत विझून गेले. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजासोबत आकाशात एक वीज लखाकली. हवेत छोट्या पांढऱ्या ढगांसारखे पुंजके गोळा होऊ लागले. एक एक करत त्याचे थर रचले गेले. भोवताली पसरलेल्या मिट्ट काळोखात केवळ त्या पुंजक्यातून निघणार प्रकाश एकमेव समोर काय घडतंय ते दाखवत होता. त्या सफेद पायघडयांवर उतरत कोणीतरी येत होत. मानवी आकारात कमरेत वाकलेली एक क्रूर जख्ख म्हातारी आपले लालभडक डोळे गरगर फिरवत वाऱ्याच्या वेगाने उतरत होती. तिचे पांढरे कुरतडलेले केस सुकल्या गवतासारखे वाऱ्यावर उडत होते. सर्वांगावरुन ओघळलेल्या कातडीने तिचा चेहरा अत्यंत किळसवाणा व विद्रूप दिसत होता. ढगांमधून बाहेर पडून ती पापणी लावण्याच्या आत थेट करालसमोरच्या यज्ञासमोर बसली. यज्ञात जेमतेम चार निखारे जळत होते. तिने खाली वाकत त्यावर फुंकर घातली आणि त्यासोबत भयानक आगीचा भडका उडाला. तिचा इशारा समजुन करालने तिच्यासमोर झुकत लगेच एक नरबळी कापला. मानवाचं गरम रक्त उडताच ती बेभान झाली. कित्येक दिवस उपाशी असल्यासारखी ती त्या बळीवर तुटून पडली. आपली लांब नख त्याच्या सर्वांगात रुतवत कातडी सोलून रक्त पिऊ लागली. आपली तहान भागताच तिने आपला रक्ताने माखलेला बीभत्स चेहरा करालकडे वळवला. कराल तिच्या आज्ञेच्या प्रतीक्षेत होता.

" अजुन बळी पाहिजे..." आपल्या घरघरणाऱ्या घशातून खरखरीत आवाजात ती म्हातारी चित्कारली.

" जशी आज्ञा.." करालने तिला वंदन करत मागे वळून अजुन माणस घेऊन येण्याची आज्ञा दिली.

" मला इथलाच बळी पाहिजे.." म्हातारी पुन्हा त्याच कर्णकर्कश्य आवाजात ओरडली. तिच्या ओरडण्यामुळे तिची लोंबती कातडी अजुनच थरथरू लागली.

" अवश्य... कोण पाहिजे..." करालने तितक्याच शांत शब्दात विचारले.

" तो.." म्हातारीचे गरगरणारे बटबटीत डोळे विश्वनाथ शास्त्रींवर रोखले होते. अचानक झालेल्या प्रकाराने विश्वनाथ शास्त्री दचकून गेले. त्यांच्या अनुमानाप्रमाणे शशिकलेचा बळी मागणं अपेक्षित होत पण फासे उलटे पडले होते. दैवही जणू आज त्यांच्या सहाय्यावर नव्हते. आता काहीही केलं तरी ह्या क्षणाला अघोरी शक्तींचा प्रभाव सर्वत्र जोरावर होता. " लपतोस काय..? बोलावं तुझ्या देवाला... तुला वाचवायला... आला तर आधी त्याच्याशी लढते मग तुझ्याकडे वळते पण आज तुझ्याच रक्ताने खरी तहान भागवेन माझी... मज्जा येईल खायला... ही ही ही..." स्वतःशीच हसत म्हातारी घोड्यासारखी खींखाळली.

" पकडा रे..." करालच्या धारदार आवाजातील आज्ञेने सर्वच त्यांना पकडायला धावले. विश्वनाथ शास्त्री काही प्रयत्न करायच्या आतच मजबूत दोऱ्यानी बांधले गेले होते. परंतु इतक्या धावपळीत त्यांनी आपली मुठ खोलली नव्हती.

म्हातारीला पाहिजे असलेलं भक्ष्य तिच्या समोर होत. आता फक्त तिला त्याला खेळवून मारायचं होत. त्यांच्या जवळ येत म्हातारी त्यांचं अंग हुंगू लागली. तिला कसलासा वास आला म्हणून आपल वाकड नाक तिने अजुनच फेंदारल. वासाची तीव्रता जाणवत होती परंतु कसला वास ते समजत नव्हतं. तिने आपल एक बोट उचलून शास्त्रींच्या अंगरख्यावर ठेवलं. बोटापेक्षा तिची नखच जास्त लांब होती. आताच खाल्लेल्या बळीच्या रक्ताचे थेंब अजूनही तिच्या नखातून ठिबकत होते. नखांवर मांसाचा थर जमा साचला होता. इथे एव्हाना शास्त्रींच्या हातातील दगड जळते निखारे बनले होते. वेदना असह्य होऊन त्यांची मुठ सुटली आणि सारे चमकणारे खडे जमिनीवर पडले. तिथल्या दाट काळोखात सारे खडे अत्यंत तीव्रतेने चमकू लागले. त्या प्रकाशाने करालचे डोळेदेखील विस्फारले. प्रकाशाची तिरीप डोळ्यावर पडताच म्हातारी जोराने किंचाळली. त्या किरणांनी तिची कातडी जळू लागली. त्या जाळाने ती तळमळत होती. आक्रंदत होती. त्यांचा डाव फसत होता. करालची कित्येक वर्षांची परीक्षा विफल होऊ पाहत होती. काही क्षणात सर्वशक्तिमान बनण्याची आशा बाळगणारा तो सर्व काही हातातून जाताना पाहु शकत नव्हता. त्याचे आधीच ताठरलेले डोळे अजुनच त्वेषाने भरले. त्याने एक जोराचा फटका शास्त्रींच्या मुखावर लगावला. त्याच्या हल्ल्याने शास्त्री रक्तबंबाळ झाले. यक्षिणी प्रसन्न नसली तरीही बाकीच्या सर्व ताकदवान शक्ती त्याच्याच अखत्यारीत होत्या. त्याने गडगडाटी आवाजात अघोरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याच्या ताकदीची प्रचिती पुन्हा एकदा शास्त्रींना झाली. आतापर्यंत तेजाने तळपणारे सारे खडे आपलं तेज हरवून आपल्या मूळ दगडी स्वरूपात परावर्तित होऊ लागले. जर सर्व खड्यांचं तेज लोप पावल तर हे सगळं रोखणं असंभव होत. तो तेजस्वी प्रकाशच अंधाराचा मारक होता. शास्त्रींनी सावकाश झोळीतील चिमुटभर राख आपल्या जिभेवर घेतली व आपले मंत्रोच्चार चालू केले. मंत्रोच्चाराच्या साहाय्याने पुन्हा त्या खड्यांतील ऊर्जा जागृत व्हावी म्हणून डोळ्यांसमोर अंधारी येत असतानाही शास्त्री शकत तितक्या मोठ्या आवाजात मंत्र उच्चारू लागले.
Share

NEW REALESED