Shodh Chandrashekharcha - 16 books and stories free download online pdf in Marathi

शोध चंद्रशेखरचा! - 16

शोध चंद्रशेखरचा!

१६---

"हू, बोल!" इन्स्पेक्टर इरावतीने मोबाईल कानाला लावला.तो कॉल तिच्या एका इंफॉर्मरचा होता.आज सकाळी लवकरच इरावती ऑफिसला आली होती. काही पेपरवर्क बाकी होते.

"मॅडम, गायत्रीदेवी आणि चंद्रशेखरचे लव्ह मॅरेज होते. मुळात गायत्रीच्या वडिलांच्या कंपनीत, चंद्रशेखर नौकर होता. गायत्रीनेच त्याला कंपनीत घेतले होते. गायत्रीच्या लग्नानंतर त्यांचे वडील वारले. कंपनी गायत्रीकडे आली. गायत्रीचा अपघात झाला. त्यात तिचे पाय गेले. यात चंद्रशेखरचा हात असल्याची वंदता होती. तिच्या गैरहजेरीत कंपनी दुबळी झाली. पावर ऑफ अटॉर्नीच्या जोरावर चंद्रशेखरने कंपनी विकून टाकली! ज्या कंपनीनीने गायत्रीची कंपनी टेकओव्हर केली, आज तिचा मालक चंद्रशेखर आहे! गायत्रीशी घटस्फोट घेऊन, चंद्रशेखरने कस्तुरीशी लग्न केले. चंद्रशेखरच्या विश्वासघाताचे दुःख विसरण्यासाठी, गायत्रीने एक मुलगा दत्तक घेतल्याचे, उडत उडत ऐकलंय. पण मनाने खचलेल्या गायत्री सावरू शकली नाही. तिने गेल्या वर्षी आत्महत्या केली!" तिने फोन कट केला.

या चंद्रशेखरला भयानक म्हणावे कि नालायक? हा प्रश्न इरावती साठी गौण होता. सस्पेक्ट नंबर एक ला कस्तुरी होती! दोन नंबरला आत्तापर्यंत विकी होता, आता तो रहस्यमय माणूस होता, ज्याने विकीनंतर चंद्रशेखरला उचलले होते. विकीचा पैश्यासाठी खेळलेला, 'रँडम' प्लॅन होता. पण रहस्यमय माणसाचा उद्देश अजून उघड झाला नव्हता. इरावतीने शिंदे काकांना बोलावले.

"शिंदेकाका, तुम्ही स्केचिंगचा आर्टिस्ट घेऊन, विकीने चंद्रशेखरला, ज्या घराच्या गेटजवळ ठेवले होते, त्या घरी जा. आणि त्या म्हाताऱ्या मालकांकडून, त्या रात्रीच्या पाहुण्याच्या वर्णनावरून स्केच करून घ्या. स्केचच्या फोटो लगेच मला फॉरवर्ड करा."

शिंदेकाका निघून गेले.

"मॅडम, विकी काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणतोय!" आशा म्हणाली.

"ठीक, आलेच एक फोन करून."

इरावतीने फोन उचलला.

"हॅलो, इशा, त्या चैत्रालीची हिस्ट्री ट्रेस होतीयय का?"

"मी प्रयत्नात आहे. शी इज फ्राम मैसूर! माझ्या मैसूर करस्पॉडन्टला सांगितलंय. काही हाती लागल तर कळवीन."

"बाय, मी वाट पाहातीयय!"

इरावती विकीच्या सेल कडे निघाली.

"बोल विकी."

"मॅडम, एक रिक्वेस्ट होती."

"काय?"

"मला ती अपघातातली गाडी पहायची होती!"

या वाक्या सरशी इरावती सावध झाली. खरेतर हि शंका तिला खूप लवकर यायला हवी होती! फक्त या गाडीत काहीतरी दडलंय एव्हढच तिच्या मेंदूने सुचवलं होत.

"विकी, तू मेकॅनिक आहेस ना?"

"हो, आणि म्हणूनच ---"

"ते तुझं नंतर, आधी माझ्या प्रश्नच उत्तर दे!"

"विचारा मॅडम."

"BMW सारख्या हाय एन्ड गाडीत एअर बॅग नसते का? आणि जर ती असती तर चंद्रशेखर अपघातात इतका जखमी झालाच नसता!"

"हल्ली बऱ्याच गाड्यात एअर बॅग असतातच. याही गाडीला असली पाहिजे!"

"मग उघडली का नाही?"

"काही गाड्यात, सीट बेल्ट शी या एअर बॅग कनेक्टेड असतात. ड्रायव्हरने सीट बेल्ट लावला नाही, तर अपघाताच्या वेळेस नाही उघडत एअर बॅग."

"मग, चंद्रशेखरने सीट बेल्ट लावला नव्हता का?"

"लावला होता! मी त्याला त्यातून सोडवल्याचं मला पक्के आठवतंय! आणि मला हेच चेक करायचं होत, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय कि, मला ती गाडी पाहायची आहे."

"त्यात तुझा काय फायदा? आणि मी तुला का परवानगी द्यावी?"

"एक अपघात का झाला, या साठी हे चेकिंग गरजेचे आहे. अपघाताच्या वेळेस जी चंद्रशेखरची परस्थिती होती, तेथपर्यंत माझी काही जवाबदारी असणार नाही! दुसरे तुमच्या शंकेसाठी, तुम्ही ती गाडी कोणाकडून तरी तपासणारच आहेत. ते काम मी केलेतर तुमच्या शंका फाटतीलच. आणि मलाही एक संधी मिळेल."

हा अपघात आहे कि घातपात, म्हणजे घडवून आणलेला अपघात, हे हि इरावतील जाणून घ्यायचे होते.

"विकी, मी तुला त्या गाडी पर्यंत घेऊन जाते! परिस्थितीचा फायदा-- घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तर? माझ्या रिव्हॉल्व्हर मध्ये सहा जिवंत काडतूस आहेत! आणि मी आमच्या डिपार्टमेंटमधली शूटिंग मधली गोल्ड मेड्यालिस्ट आहे! हे लक्षात ठेव!"

"चाचाला फोन करून, माझी इन्स्ट्रुमेंट किट मागवून घ्या. मग कधीही आणि कितीही गोळ्या घाला!"

तेव्हड्यात इरावतीचा फोन वाजला.

"काय?" इतकंच म्हणून इरावती धावत सेल बाहेर पळाली.

"मॅडम, सेलला लोक तर करा कि!" विकी मागून ओरडला. आशाने धावत येऊन लॉक लावले.

इरावती विकीच्या फ्लॅट जवळ पोहंचली तेव्हा, विकी ज्या मजल्यावर रहात होता, तेथून धूर निघत होता. तुफान गर्दी झाली होती! फायर ब्रिगेडची गाडी नुकतीच कार्यरत झाली होती. पाण्याचा सडा पडला होता.

"काय झालं?" तिने शेजारी उभ्या असलेल्या माणसाला विचारले.

" बी १२ मध्ये गॅसचा सिलेंडर लीक झाला आसन. विक्या भूलक्कड हाय, कॉक बंद करायचा इसरल! दुसरं काय?" आपण ज्या बाईला बोलत आहोत, तिच्या अंगावर खाकीवर्दी आहे, हे लक्षात येतच तो माणूस गर्दीत सटकला.

इरावती विकीच्या फ्लॅट मध्ये आली तेव्हा सर्व निवळे होते. आग किरकोळ होती. घरभर पाणीच पाणी होते.

दोन गोष्टी इरावतीच्या नजरेने टिपल्या. एक कोपऱ्यातले लोखंडी कपाट उघडे होते, आतील कपडे जमिनीवर पसरली होती. दुसरी गोष्ट समोरच्या दाराचा कोंडा तोंडात कुलूप धरून लोंबत होता!

" हे दार तुम्ही तोडून घरात आलात का?" इरावतीने, आपले काम आटोपून बाहेर पडणाऱ्या फायर फायटरला थांबवून विचाले.

"नाही मॅडम, हे उघडेच होते!"

विकीच्या घराची कोणीतरी दार तोडून आले होते आणि कसून घराची तपासणी केली होती! कोण? आणि का? आणि आग का लावली? ती हि किरकोळ! फक्त लक्ष वेधण्यासाठी?

मोबाईल वाजला.

"मॅडम, बक्षी आणि सुलेमान, तुम्ही आत्ता आहेत, त्या फ्लॅट मधून बाहेर पडताना दिसले!" फोन कट झाला.

आता मात्र बक्षी या केस मध्ये आहे याची इरावतील खात्री पटली! पण त्याला विकी कडून काय अपेक्षित होते?

म्हणजे-म्हणजे बक्षी कडून विकीला धोका होता!!

पिसाट वेगाने इरावती पोलीस स्टेशनकडे निघाली!

०००

चंद्रशेखरचा, गोठलेला मुडदा पाहून माणिक प्रसन्न हसला. दोन्ही हातानी आपले डोके कराकरा खाजवले. मग तो स्टोरेज बाहेर आला. दोन्ही हात चांगले एकमेकांवर घासून गरम केले. उणे दोन डिग्री म्हणजे गारढोण काम साल. मस्त झोपेल चंदुभाऊ. झोप झोप. अजून चार सा घंटे. मग देतु तुझ्या बायकुला गिफ्ट! तुझंच! या धूनकित त्याने चुना मळून तंबाखूची गोळी गालफडात सारली. कस्तुरीचा नंबर घुमवला.

"मी माणिक! रोकडे हैती नव्ह?"

"आहेत. कुठं येऊ पैसे घेऊन?"

"आता अश्या उतावळ्या नका हू. सांच्या सात वाजता या, आपलं डुलत डुलत भिवंडी कड. फूडला रस्ता मग सांगन! पोलिसवाल लांब ठिवा! पर हे तुमासनी येगळं सांगावं लागत नाही!" माणिकने फोन कट केला.

माणिकने फोन कट केला, तेव्हा दारा आड लपलेला पीटर ऐकत होता.माणिक दूर गेल्यावर त्याने कोणाला तरी फोन लावला. हर जान कि और जानकारी कि इक किंमत होती है! बॉस!

०००

विटकरी सारख्या जड पिस्तूलच्या दस्त्याने, सुलेमानने तोंडातली सिगारेट न काढता, विकीच्या घराच्या कुलपावर दणका मारला. कुलुप दणकट होते, निघाले नाही, पण कोंडा मात्र प्ल्यायवुडच्या दाराच्या फळकुटातून निखळला!

"साला, सुलेमान काम के वख्त सिग्रेट नै पिनेका!" बक्षीने आपली नाराजी व्यक्त केली. सुलेमान कडवट हसला.

बक्षीने दोन तासात विकीच्या घराचा इंच ना इंच तपासला.

"बक्षी, साला मूझेभी तो बता, हम क्या धुंड रहे है?"

"हम नाही, मै! तू चुपचाप उधार कॉट पे बैठं! और तरी सिग्रेट बुझा!" बक्षीला हि अपराधाची दलदल माहित होती. कोण कधी हरामखोरी करील, सांगणे कठीण होते. त्यामुळे तो आपले टार्गेट या लोकां पासून लपवून होता.

बक्षीकडे दुर्लक्ष करून सुलेमान धूर काढतच पलंगावर बसला. संपलेली सिगारेट पायाखाली विझवून त्याने नवीन सिगारेट पेटवली. हवी ती वस्तू न मिळाल्याने बक्षी पिसाळा होता. त्यात नको म्हणून हि, हा सुलेमान सिग्रेटी फुंकतोय? जेमतेम दोनचार झुरके सुलेमानने मारले असतील, बक्षीने फाड़कन त्याच्या थोबाडात मारली! तोंडातली सिगारेट पलंगावर पडली. बक्षी तडक घराबाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ गाल चोळत सुलेमान बाहेर आला. साला या बक्षीचा गेम करायचा! काय समजतो स्वतःला? अपोझिट गॅंगला, याच्या लोकेशनची टीप दिली कि, काम फते होणार होते! 'बक्षीको मदत कर!' म्हणून दुबईहून 'भाईचा' निरोप होता, म्हणून सुलेमानचे हात बांधले होते!

ती जळती सिगारेट स्वःता बरोबर पलंगावरल्या गादिचा पण धूर काढत होती!

******