black night.... - 1 books and stories free download online pdf in Marathi

मंतरलेली काळरात्र (भाग-१)

मंतरलेली काळरात्र भाग-१.

अचानक लाईट गेली....! सगळीकडे अंधार पसरला कोणालाच कोणी दिसत नव्हते इतका भयाण अंधार जणू डोळण्यांची दृष्टी नाहीशी व्हावी..

काही क्षणासाठी इतका अंधार आम्ही घरातील सर्व जण जेवत होतो आई, मी माझा मोठा भाऊ(दादा) आणि आमची आजी..
माझे वडील मिलिटरी मध्ये होते,
ते आताच काही महिन्यांपूर्वी येऊन गेले होते,
आता घरात अंधार पसरला होता आणि तेव्हा आई म्हटली घाबरू नका मी मेणबत्ती लावते.
जाग्यावर बसून रहा..!आई ने कशी तरी चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात मार्ग काढत काडेपेटी सापडत मेणबत्तीचा घरात शोध घेऊ लागली.

इकडे आम्ही दोघे भाऊ जाग्यावरती बसून होतो बाहेर सोसाट्याचा वाऱ्याचा आवाज आता माझ्या कानावर स्पष्ट येऊ लागला मनात भीती निर्माण झाली होती असा आवाज मी प्रथमच ऐकत होतो घराची लाकडी खिडकी वाऱ्यामुळे आदळत होती.
बाहेर आकाशात चमकणाऱ्या विजांमुळे घरात स्पष्ट प्रकाश पडत होता तेव्हा काही क्षणासाठी आम्ही सर्व जण एकमेकांना दिसत होतो आता आईच्या हाताला एक अर्धवट जळलेली मेणबत्ती सापडली ती मेणबत्ती आज जरी अर्धवट जळलेली असली तरी तिची किंमत आज आमच्यासाठी खूप होती.

आता ही मेणबत्ती जास्त काळ जाणार नाही कारण रात्र खूप मोठी आजून बाकी होती. आणि त्यात बाहेर पावसाचा तांडव चालू होता अश्या वातावरणात घरात प्रकाश असणे खूप महत्वाचे होते.
आईने सहज आजीकडे पहात विचारले..!
घरातले जुने कंदील कुठे ठेवले माहीत आहे का..? आजी म्हटली..! मागच्या घरात पहावे लागेल, आजी असे म्हणताच घराच्या पत्र्यावर रप-रप आवाज येत मोठा पाऊस सुरू झाला. तसे घरातील वातावरणात गारवा वाढला, आणि आम्हाला थंडी वाजू लागली. आईने आमची अवस्था ओळखली आणि आम्हाला दोघांनाही घरामध्ये गोधडी अंथरून दिली.

पांघरून घेण्यासाठी वर्ती आजून दोन दोन गोधड्या दिल्या तरी सुद्धा अजूनही थोडी थंडी वाजत होती, आई आणि आजीने बजावून सांगत ले की, इथून उठू नका आम्ही मागच्या जुन्या खोलीतून कंदील आणत आहोत तेव्हा आम्ही दोघेही आता गप गुमान त्या घरातील काळोख्यात पडून राहिलो.

आई आणि आजी मेणबत्तीच्या उजेडात घरातील जुनाट खोलीमध्ये कंदील सापडत होते, आणि मला ह्या काळ्याकुट्ट अंधारात भीती वाटू नये म्हणून आमचा दादा माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता.

जेणेकरून माझ्या मनात कसले विचार येऊ नये, आणि मी घाबरू नये म्हणून, पण माझ्या मनात अनेक विचार येत होते जणू माझ्या मनात आता माझ्या इच्छेविरुद्ध विचारांनी थैमान घातले होते , आई आणि आजी मागे गेलेल्या आता खूप वेळ झाला होता.
अजून काही मागच्या खोलीतून आल्या नव्हत्या, दादा ला मी म्हटले दादा...! बघना आईला आणि आजीला आवाज देऊन मला खूप भीती वाटते रे, त्याने माझ्या आवाजातील आतुरता कळली असावी, आणि त्याने एक आवाज दिला आई म्हणून, पण मागच्या खोलीतून काही आवाज आला नाही कारण पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज इतका मोठा होता. की ,आपला आवाज त्या आवाजपुढे काहीच नव्हता दादा मला म्हटला आपल्याला आता थोडं उठून मागच्या खोलीकडे जायला हवे,

हे माझ्यासाठी खूप कठीण होते. मला काहीच दिसत नव्हते जसे की आपण डोळे बंद करावीत आणि आपल्या डोळ्या समोर जसा अंधार यावा अगदी तसेच मला सध्या दिसत होते .

दादा माझ्या पेक्षा मोठा होता, तो मला म्हटला घाबरू नको तू माझा शर्ट मागील बाजून धरून मागे ये, असे दादा म्हणताच मी त्याच्या मागे मागे अंदाज घेत निघालो तो ही भिंतीला हात लावत अंदाजाने चालला होता.

अचानक पुन्हा खूप मोठी वीज चमकली आणि घरात खूप प्रकाश पडला अगदी तो प्रकाश शेवटच्या खोलीपर्यंत पोहचला तरी पण आई आणि आजी एका क्षणासाठी पण दिसल्या नाहीत,
आता मात्र माझे हातपाय पूर्ण पणे थंड पडले होते, घामही फुटला होता. असे मला प्रथमच झाले होते , दादा नि पुन्हा आवाज दिला पण ह्या पावसाच्या आवाजामुळे दादा चा आवाज काही मागे जात नव्हता,
एकदम माझ्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला..!!
मी आता पूर्ण भयभीत झालो होतो. हातपाय लट-लट कापायला लागली, तेव्हा आईचा कानावर आवाज आला तुम्हला म्हटले होतें ना एका जागी थांम्बा म्हणून ,जसा आईचा आवाज ऐकला तसा "माझा जीव भांड्यात पडला",आणि आता मात्र माझी पूर्ण भीती नाहीशी झाली होती, मी आईला विचारले आई तू मागणं कशी आलीस तू तर मागच्या खोलीत गेली होतीस ना तेव्हा आई म्हटली तिकडं कंदील सापडायला गेलते पण ते पण गळके होते ,म्हणून आम्ही दोघी पुन्हा देवघरात जुन्या वस्तू होत्या ना तुझ्या पंजी आजी आजोबांच्या त्या जुन्या वस्तूमधून एक चिमणी आणली हे बघ...!

आईने मला ती चिमणी(दिवा) दाखवली तेव्हा त्या फक्त मेणबत्तीच्या प्रकाशातही खूप चमकून दिसत होती जणू आताच दुकानातून आणली आहे.
आणि ती खुप जुन्या प्रकारची आणि रेखीव होती, अश्या प्रकारची चिमणी मी कधी पाहिली नव्हती तिच्या वर्ती आलेली वातही खूप सुरेख आणि नवीन वाटत होती, आईने ती चिमणी खाली ठेवली आणि आजीला म्हटली पण आता रॉकेल..?
नाही घरात आता कसं पेटवता येईल..!

आजी म्हटली आहे घरात ,आम्ही जुनी लोकं अश्या गोष्टी ठेवतो आडी-नडी साठी ,आजीने घरातील एका कोपऱ्यात हाताने दाखवून खून केली तशी आई त्या बाजूला जाऊन एका काचेच्या छोट्या बाटलीत रॉकेल दिसले आई ती लगबगीने घेऊन आली तेव्हा आईच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले आणि मला जाणीव झाली की जुने माणसे खरंच भारी असतात.
कारण कुठल्याही संकटात वाट ते सहज पणे काढतात.

ते आजही खूप काही वस्तू सध्या लागत नसतील तरी त्या वस्तू ते जपून ठेवतात. ते पण खूप दिवस आपण विचारही करू शकत नाही आणि आपण फक्त सध्या पुरताच विचार करत असतो, आजीबद्दल मला खूप अभिमान वाटला आजीला मी मिठी मारली...!! आजीला म्हटलो आजी तू खूप ग्रेट आहेस, आजी म्हटली ग्रेट म्हणजे तेव्हा दादा ही आजीला मिठी मारत म्हटला म्हणजे तू ना.... खूप भारी...!आहेस,
आजीने आम्हाला जवळ घेतले आणि म्हटली आता चांगलं बिलगून झोपा नाहीतर आजारी पडतांन तुम्ही,

आम्ही पण होकार देत झोपणार तितक्यात आईने एक काडेपेटीची काडी ओढली, आणि चिमणीची वाट दोन बोटांनी सरळ केली .

त्या वातीला पेटती काडी लावणार त्या आधीच वाट पेटली जणू त्या वातीला खूप आतुरता होती असे मला दिसून आले , पण हा माझा भास असावा..! म्हणून मी थोडे दुर्लक्ष केले. घरभर मंद प्रकाश पडला आता सगळीकडे घरात बऱ्यापैकी दिसत होते ,आणि आता मेणबत्ती विजण्याच्या मार्गावर आली होती .पण आज मला तिची भाषा कळत होती, मेणबत्ती अगदी शेवटच्या घटकेला येऊन पोहचली होती आणि चिमणीला म्हणत होती ह्या काळोख्या रात्री आज रात्रभर ह्या घराला प्रकाश दे माझा प्रवास आता इथेच संपत आहे असे म्हणून मेणबत्ती विझली....!!

तिच्या वातीमधून धूर निघाला आणि सरळ वर गेला काही क्षणापुरते वाटले मेणबत्तीचा आत्मा आता अनंतात विलीन झाला, मला प्रथमच एखाद्या निर्जीव वस्तू विषयी इतकी कृतज्ञता निर्माण झाली होती, त्या चिमणिकडे पाहून मला वाटत नव्हती की ती चिमणी माझ्या पणजोबाच्या काळातील असेल कारण आजही ती चिमणी अगदी नवीन वाटत होती.

तितक्यात आकाशात वीज चमकली तिचा प्रकाश खिडकीच्या फटीतून स्पष्ट दिसत होता, आता पुन्हा ढगांच्या कडकड्या सह पावसाचा जोर वाढला होता बाहेर काळ्याकुट्ट अंधारात जोरदार पाऊस आणि आम्ही सर्वजण एका चिमणीच्या प्रकाशात जिवंत आहोत आज असेच मनाला वाटत होते,
मला राहवले नाही म्हणून मी आजीला विचारले आजी ही चिमणी खरच इतकी जुनी आहे का..?
त्यावर आजी म्हटली ही चिमणी मी आजपर्यंत नव्हती लावली ही चिमणी तुमच्या आजोबांच्या जन्मा वेळेची आहे आणि हिची खूप मोठी कहाणी आहे जी की, मला माझ्या सासूने लग्न झाल्यावर सांगितले होते .
म्हणजे तुमच्या "पंजी आजीने", मी उतावळेपणाने म्हटलो सांगना आजी खरंच सांग असे म्हणताच पाऊस थांम्बला आणि पुन्हा जोराने सुरू झाला जणू आता पाऊसालाही ही कहाणी ऐकायची होती.

आजीने आम्हाला जवळ घेतले आणि सांगायला सुरुवात केली. आता आम्ही तिघेही ही कहाणी ऐकत होतो आई दादा आणि मी , आजीने सांगितले ही कहाणी तुमच्या आजोबांच्या जन्मा नंतर साधारण एक महिन्यानि घडलेली होती, तेव्हा या पेक्षाही भयंकर जोरात पाऊस चालू होता.
रात्रीची वेळ होती घरात तुमचे पंजी आजी आजोबा आणि तुमचे आजोबा एका महिन्याचे होते, तेव्हा त्यांचे घर हे छपराचे होते आणि भिंती मातीच्या असे घर मळ्यात म्हणजे आताच्याच जागी होते, घरामध्ये कंदील चालू होता.
त्याचा प्रकाश कमी होत चालला होता. तुमचे आजोबा पंजी आजीच्या मांडीवर होते पंजो आजोबा कंदील विझू नये म्हणून घरात रॉकेल सापडत होते पण पत्र्याच्या डब्यातील रॉकेल संपले होते हे त्याच्या लक्षात आले पण तो पर्यंत कंदील विझलाही सगळीकडे भयाण अंधार पसरला त्यामुळे बाळ रडायला लागले तेव्हा ते म्हटले तू त्याला अंगाई म्हणत रहा तो पर्यंत मी गावात जाऊन रॉकेल घेऊन येतो पंजी आजी म्हटली आहो पण खूप उशीर होईल ते म्हटले या शिवाय काही पर्याय पण नाही ,कारण घरात आणि बाहेर नजर पोहचेल तितक्या पर्यंत काळोख पसरलेला होता आणि रॉकेल आणल्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी विजेच्या प्रकाशात मला आणि बाळाला पाहिले आमची नजरानजर झाली तेव्हा त्याच्या डोळ्यात आमच्या बद्दल खूप प्रेम दिसून येत होते त्यांना जाऊ वाटत नव्हते पण ते गेले.....!!!
पुढील भागात..... भाग-२........