Shree Datt Avtar - 2 books and stories free download online pdf in Marathi

श्री दत्त अवतार भाग २


श्री दत्त अवतार भाग २

श्री दत्तात्रय एक सर्वसमावेशक दैवत आहे.
आकाश,भूतलावरील व्यवहार आणि वैराग्यदेही वर्तन अशा तीन्ही पातळ्यांवर दत्ताची श्रेष्ठता गाजते आहे.
त्यांनी चोवीस गुरू केले म्हणतात.
थोडक्यात, सृष्टीमध्ये जिथं चांगलं मिळालं, त्याचा दत्तांनी आदर केला. इतरांच्यातले चांगले गुण गुरूपदी मानल्यामुळे, दत्त स्वत:च परमगुरू झाले.

स्वत:च्या अंगावर लोकांच्या लाजेपुरती लंगोटी, आणि समोरच्या लायक मागणार्‍याला, लंगोटीपासून थेट लक्षाधीश, कोट्याधीश यापर्यंत हवं ते मिळणार. स्वत:ला काहीच नको, याचं अक्षरश: मूर्तीमंत प्रतीक म्हणजे दत्त! अंगावर लंगोटीशिवाय चिरगुटही नाही. अशा निरिच्छपणानं इतरांची न्याय्य इच्छापूर्ती करता न येईल, तरच आश्चर्य. म्हणजेच त्रिमुखी दत्ताच्या पहिल्या दोन महामुखाएवढं, वर्तनाचं हे तिसरं महामुख महत्वाचं आहे, दत्ताजवळ मागणार्‍यानं एकच विवेक ठेवावा, की दत्त म्हणजे देणारा. त्याचा भक्त अनुचर, म्हणजे त्याच्यासारखा चालणारा म्हणजे देणारा, हाच खरा दत्तभक्त होऊ शकतो. देण्याचे पथ्य हा दत्तकृपेचा महामंत्र आहे. कोणीही अनुभव घेऊन पाहाण्याजोगा आहे.

दत्तात्रेय उपनिषदाची सुरुवात दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे, असे सांगून होते, तर शेवट ‘ॐ नम: शिवाय:’ या शिवाच्या प्रार्थनेने होते. नाथपंथीय दत्तात्रेयाला शिवाचा अवतार मानतात.

मध्ययुगीन काळातील हरिहर भक्तीचा हा पंथ आहे. विष्णू आणि शिव या दोन देवतांचा व वैष्णव आणि शैव पंथांचा समन्वय करण्याचे काम या पंथाने केले.

भक्ती आणि योग यांचाही समन्वय या पंथाने केला. हा पंथ भारतभर कधीच पसरला नाही. तो नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरात या राज्यांतच प्रामुख्याने आहे, पण वैदिक धर्म, तंत्र, योग आणि भक्ती यांचा समन्वय असलेल्या या संप्रदायाला मध्ययुगीन धर्मसंकल्पनांच्या विकासप्रक्रियेत किंवा उत्क्रांतप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे.

दत्तात्रेय हा आद्य देवतांपैकी एक आहे. त्याचा उल्लेख वेदात पण आहे.

रामायण-महाभारत या दोन महाकाव्यांतही त्याचा उल्लेख येतो . ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण करून दत्तात्रेयाचे दैवत झाले असल्याचे समजले जाते. त्रिमूर्ती कल्पनेचे ते आद्य प्रतीक आहे. दत्तात्रेय हा विष्णूचा सहावा (कदाचित चौथा किंवा सातवा) अवतार समजला जातो.

दत्तात्रेय हा अत्री ऋषी आणि अनसूया यांचा पुत्र असून, त्यांनी आदीनाथांकडून दीक्षा घेतल्याचे नाथपंथ सांगतो, तर भागवत पुराणात त्याला २४ गुरू असल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या शिष्यात सहस्रार्जुन कार्तवीर्य, भगवान परशुराम, यदु, आलार्क, आयु आणि प्रल्हाद असल्याची नोंद भागवत पुराणात आहे, तर दत्तात्रेयाने मत्स्येंद्रनाथांना व इतर नाथांना दीक्षा दिल्याचे सांगितले आहे.

श्रीगुरू दत्तात्रेय आणि भगवान शंकर यांच्या कृपाप्रसादाने व प्रेरणेने मच्छिंद्रापासून नाथ संप्रदायाचा प्रारंभ झाला. ऋषभदेव हा विष्णूचा कृष्णासमान अंश होता (जैनांचे ऋषभदेव) त्याच्या शंभर पुत्रांपैकी नऊ जण हे वैराग्यसंपन्न, तेजस्वी, ज्ञानी व परमहंस स्थितीला पोहोचलेले होते.

या आर्षभांची (ऋषभपुत्रांची) नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहरेत्र, द्रुमिल, चमक व करभाजन अशी होती.

कलियुगात भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्यांनी पुन्हा अवतार घेतले.

या वेळी ते अनुक्रमे मच्छिंद्र, गोरख, जालंदर, कानीफ, चर्पटी, वटसिद्ध नागनाथ, भर्तरी, रेवण व गहिनी असे नवनाथ झाले.

वैष्णव नवनारायणाचे रूपांतर शैव नवनाथात झाले.

भागवतात नवनारायणाची कल्पना आहे. नारायणाचा अंश असलेले व नारायणाप्रमाणे कार्य करणारे म्हणून त्यांना नवनारायण म्हणतात.

वेद-पुराणानंतर मध्ययुगीन काळात तंत्रानेही हे दैवत स्वीकारल्याचे दिसते.

दत्तात्रेय हा औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, दाढी वाढलेल्या नग्न अवस्थेत ध्यानस्थ बसलेला दिसतो.

चार कुत्री हे वेद मानले जातात.

रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो तंत्रातील स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.

त्याची जटाजूट आणि नग्न अवस्था ही त्याने जगाशी संबंध तोडल्याचे द्योतक आहे.

त्याच्या समोरील अग्निकुंड हे तंत्रातील अग्नीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

त्याच्याबरोबर असलेली गाय हे संप्रदायावरील वैदिक परिणाम दर्शवते.

एकंदर हे चित्र समाजात निषिद्ध मानलेल्या कृती करणाऱ्या तंत्रातील योग्याचे आहे.

तंत्रात दत्तात्रेयांना गुरूचा गुरू मानले आहे.

सातव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात तांत्रिक दत्त याचा उल्लेख येतो .

नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले व त्यांचा मृत्यू इ.स. १४५८ साली झाला.स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना करण्याचे कार्य दत्त संप्रदायाने केले.

दत्त संप्रदाय हा सगुणोपासक राहिला. एकमुखी दत्त आणि त्रिमुखी दत्त अशा दोन रूपांत त्याची पूजा केली जाते. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती या दोघांनी दत्तपंथाची पुनस्र्थापना केली असे म्हणावयास हरकत नाही.

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ

दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा.

प्रत्येकात आत्मा आहे, म्हणून प्रत्येकजण चालतो, बोलतो आणि हसतो.

यावरून ‘माणसात देव आहे’, हेच सत्य आहे.

त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.

अवधूत म्हणजे जो अहं धुतो, तो अवधूत !

जसे अभ्यास करतांना आपल्या मनावर ताण येतो पण खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण ‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो.

दिगंबर म्हणजे दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा !

जो सर्वव्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर !

जर ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य जीवांनी त्याला शरणच जायला हवे.

तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल.

श्री दत्तजन्म कथा

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती.

ती आश्रमात पतीच्या सान्निध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करित असे.

तसेच आश्रमांत येण्याऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदरानें स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्तानें गेला नाहीं. तिचे हे आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला भिऊन वागे,अग्नी तिच्यापुढें शीतल होई, वारा तिच्यापुढे नम्र होई.
तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्यापुढे थरथर कापत.
एवढा तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव होता !

पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ति व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नांव 'साध्वी व पतिव्रता स्त्री' म्हणून सर्वतोमुखी झाले.

ही वार्ता अर्थात् नारदुमुनींच्या सुद्धा कानांवर गेली.

नारदांचे नांवच मुळी' कळीचा नारद ' तेव्हां ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला (विष्णूची पत्नी) सांगितली, पार्वतीपुढे (शंकराची पत्नी) अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गायले.

सावित्रीपुढे (ब्रह्मदेवाची पत्नी) तिच्या आदरातिथ्याविषयी कौतुक केले .

साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला.

ही अनुसूया एक मानव आहे आणि आपण देवी आहोत .

तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपल्यावर असणे उपयोगी नाही.

तेव्हा हीचे “स्वत्व” हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला.

क्रमशः