Being a girl is not easy - 2 books and stories free download online pdf in Marathi

मुलगी होणं सोपं नाही - 2

भाग दोन - आनंदाचा क्षण

दवाखान्यातुन आजी आम्हांला तिघींना घेऊन तिच्याच घरी आली. मोठी बहिण म्हणजेच ताई आता जवळ जवळ सात वर्षांची होत आली होती आणि दोन नंबर बहीण म्हणजेच माई ती देखिल पाच वर्षाची होत आली होती. मी मात्र नुकतीच जन्मलेली होती आणि माझ्याच जन्मामुळे ..माझी आई आम्हांला तिघींना सोडुन गेली आहे, हे देखिल मला कळणार नव्हते. ताईला मात्र सर्व समजत होते, माईला ही समोर घडणा-या घटनांची थोडी थोडी जाणिव होत असावी. त्या वयात त्यांना स्वतःची नावे देखिल व्यवस्थित सांगता येत नव्हती, त्यावेळी त्या तरी काय करणार होत्या??? आजीच्या घरी आम्ही तिघी आणि मामा राहत होतो. मामा गावाबाहेर एका कारखान्यात नोकरीला जात होता. पण आमची ही जबाबदारी आता मामावरच होती. आजीने या सर्व परिस्थितीचा विचार करून घरकाम करण्याचा निर्णय घेतला.
दोन तिन दिवस गेल्यानंतर आजी खुप विचार करुन सकाळी सकाळीच मामाला बोलली, "प्रशांत तुझ्या एकट्यावर संपुर्ण घराची जबाबदारी आहे, तु तरी एकटा आमच्यासाठी किती करशिल., म्हणुन तु माझ्यासाठी कुठे काम असेल तर बघ, मी पण काही घरांमध्ये घरकाम शोधते."
"आई तु गप्प गं, हे काय तुझे घरकाम करायचे वय आहेत का?" मामा आजीवर ओरडत म्हणाला..
"आई तु कुठे ही जायचं नाही ..." असं म्हणुन मामा कामावर जाण्यासाठी तयारी करु लागला..
आजी मामाच्या जवळ जाऊन पाठीवर हात फिरवत "प्रशांत अरे तुझे वय पण कमीच आहेत, तुझे अजुन लग्न सुद्धा झाले नाही, आणि आम्ही तुझ्यामागे साडेसाती लावले, तुला मदत व्हावी म्हणुन मी काम शोधते..
"हो चालेल बघ मग दोन, तीन घरांमध्ये आणि आपल्या वस्तीपासुन जवळ असेल असं काम बघ" असे बोलुन मामा कामावर निघुन गेला.
आजीला परवानगी मिळाली खरी पण आता प्रश्न होता.. आजीच्या तीन नातींचा, म्हणजेच आमच्या तिघींचा. आजीसाठी आम्ही लहानच होतो. ताई सात वर्षांची असली तरीही ती घर सांभाळण्याइतकी मोठी झाली नव्हती. आजी डोक्याला हात लावुन विचार करत बसली होती.. ताईचे वय सात वर्ष असले तरीही तिने सात वर्षांमध्ये एखाद्याला संपुर्ण आयुष्यात येणार नाहीत इतक्या अडचणी बघितल्या होत्या. शेवटी ताई धिट मन करुन आजीच्या बाजुला बसली आणि म्हणाली, "आजी का रडतेस तु? तु जात जा कामाला.. आमची नको काळजी करू.. आम्ही तिघी छान राहु... "
ताई आमच्याकडे बघुन म्हणाली, "मी मोठी आहे ना, मी सांभाळेल माई आणि चिऊला.. "(माझे नाव आजीनेच चिऊ ठेवले होते.)
ताईने तयारी दाखवली पण आजीला ताईचे बोलणे ऐकुन रडु येत होते. तरीही डोळे पुसत, आजी ताईला म्हणाली, "पण बाळा तु कसं घर सांभाळणार?? तुला या वयात घरकाम ही नाही करता येणार.?"
ताई आजीला हातात झाडु घेत म्हणाली, "बघ आता मी लगेचच शिकेल सर्व, तु ऊद्या पासुनच जा कामाला.. "
आजीने ताईला कोणते धान्य कोणत्या डब्ब्यात आहे ते दाखवुन दिले. ऊद्या घरात तिन्ही नातींनाच ठेऊन जाणार हे बरोबर नव्हतं वाटत म्हणुन शेजारच्या काकुंना आवाज देत म्हणाली ..
" अगं ये, कमले.. माझ्या नातींकडे लक्ष देत जा गं, त्यांचा आवाज घेत जा"..
शेजारच्या कमला काकु घरातुन बाहेर येत, "हो आजी देईल मी लक्ष, तुम्ही नका चिंता करु..."
आजी घरात येऊन मला मांडीवर घेऊन बसली मला खेळवता खेळवता माझ्यासोबत गप्पा मारत होती.
"माई इकडे ये...
"काय आजी, बोल ना???"
"माझ्या चिऊला वेळेवर दुध गरम करुन देत जा, ताई काम करत असेल ना, तु चिऊची काळजी घ्यायची, चिऊला रडु द्यायचं नाही..."
"हो गं आजी.. तु मामाला जेवायला दे आणि तु पण जेवुन घे,... जेवल्यानंतर तु आराम कर, ऊद्या जायचं आहेना तुला पण...", ताई जेवण ताटात वाढता वाढता आतल्या खोलीतुन बोलत होती..

"माझी नात लगेच, मोठी झाली, शिकली की काय सर्व?? आजीला पण ओरडायला लागली ..ये चल जेवण इकडे घेऊन सर्व एकत्रच जेवु.." आजी चिऊला खाली चटईवर झोपवत म्हणाली...

सर्वांनी एकत्रच जेवण केले, आजीला जेवल्यानंतर ताईने लगेचच आराम करायला पाठवली. मामाही दमल्यामुळे झोपला. ताई आणि माई दोघी जाग्या होत्या, ताई आजीला त्रास नको म्हणुन, भांडी घासत होती. ताई भांडी घासेपर्यंत माई माझ्याशेजारीच बसली होती. थोड्यावेळाने ताईची भांडी घासुन झाली.. मग ताई आणि माई माझ्याशेजारी येऊन झोपल्या. पहाटे पाच वाजताच आजी ऊठली.. ताई अजुन स्वयंपाक शिकली नव्हती म्हणुन आजीला लवकर उठावे लागले. आजी उठल्यानंतर मामाला डब्ब्याला नेण्यासाठी आणि ताई, माईला दिवसभर काहीतरी खाण्यासाठी पोळी भाजी बनवत होती. आजीचा आवाज येताच ताई जागी झाली..
ती उठुन आजीच्या बाजुला जाउन.. "काय गं आजी एकटीच उठलीस, मला उठवायचं ना?"
"माझी राणी गं तु, किती काम सांगु तुला..?" आजी ताईच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली...
"आजी गप्प गं मी मोठी झाले आता मला काम सांगायचं हा तु,"असं म्हणत ताई आजीला भाजी हलवण्यासाठी मदत करत होती..
ताई ने आजीला आवरायला मदत केली, मामा आणि आजी दोघेही कामासाठी घरातुन बाहेर गेले...आजी कामाला जातावेळीच ताईला सांगुन गेली होती, कोणी अनोळखी आले तर त्यांच्यासोबत बोलु नका आणि कोणाला घरामध्ये घेऊ नका.. माईलाही बाहेर नको गं जाऊ म्हणुन सांगुन गेली होती. आजी कामासाठी बाहेर गेल्यानंतर, घरात ताईलाच सर्व कराव लागत होते, माई माझ्यासोबतच असायची... माईपण लहानच होती. तीला काही करायला जमत पण नव्हते. ताई ने मामा, आजी,ताई माई आणि कपडे धुवायला घेतले.. अवघ्या सात वर्षांतच ताई सर्व शिकत होती. कपड्यांवर डाग कसा लागतो? हे देखिल तीला कळत नव्हते पण त्या वयात ती त्याच कपड्यांवरचे डाग ब्रशने घासुन घासुन काढत होती. तेच कपडे जोर जोरात मळ किंवा डाग जाईपर्यंत धुवत होती. इतके कपडे धुवल्यानंतर ताईला उभे ही राहता येत नव्हते पण बोलतात ना, "परिस्थिती सर्व शिकवते". तसंच ताईची अवस्था बघुन माईने दरवाजात ऊभी राहुन
"ताई जा तु घरात.. चिऊच्या बाजुला आराम कर थोडे, मी कपडे सुकायला टाकते.." असं म्हणत ताईला घरात पाठवली..
इकडे आम्ही तिघी एकमेकींना समजुन घेत होतो.. पण आजीला तिकडे काम भेटले की नाही, हे समजायला मार्ग नव्हते... आजी भर उन्हात काम शोधत होती, तेव्हा शेजारच्या कमला काकुंच्या ओळखीच्या एका महिलेने आजीला आवाज दिले..
"ओ... आजी.... तुम्ही इकडे का आला आहात ???"
"अगं बाय मी काम शोधतेय मला घरकाम मिळेल का कुठे?" आजी पदराने घाम पुसत म्हणाली...
आजीची अवस्था बघुन त्या काकु त्यांच्याच घरी आजीला घेऊन गेल्या आणि आजपासुन माझ्या घरातले काम तुम्ही करा असे म्हणाल्या.. आजीला काम मिळाला, याचा आनंद होताच, पण आजीने त्या काकुंना विचारले, "आणखी दोन तीन घरी मला काम मिळेल का बाय ..?"
"हो मिळेला ना.. मी देते ना शोधुन माझ्या शेजारच्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना मी फोन करुन विचारते, तुम्ही बसा.."
असं म्हणत.. काकुंनी आजीसाठी मैत्रिणींना फोन करून, आणखी दोन घरी भांडी घासण्यासाठी काम बघितले..
आजीला खुप बरं वाटले, तीने आजपासुनच काम करायला सुरुवात केले, आजी काकुंच्या ओळखीची होती म्हणुन सर्व आजीसोबत प्रेमाने वागत होते. आजीचा कामाचा पहिलाच दिवस होता, म्हणुन एका काकुंनी आजीच्या नातींसाठी मोग-याच्या फुलांचा गजरा दिला होता. आजी आज लवकर घरी आली आणि दारातुनच ओरडत आली...
"ताई...माई... चिऊ... कुठे आहात माझ्या पोरींनो... बघा मी काय आणलंय...ताई,माई तुमच्यासाठी.."
ताई, माई दोघीही धावत जाऊन आजीला घट्ट पकडून..
माई, "काय आणलंय दाखव ना लवकर आजी"
"अगं नंतर आधी घरामध्ये चल तु" ताईने आजीला हात पकडुन घरात नेली..
माई मागे फिरत होती, "आजी दाखव ना काय आणलं आहेस???"
आजीने ताई आणि माईला गज-याचे दोन भाग करुन लावायला दिले, दोघींनीही पहिल्यांदाच गजरा लावला होता म्हणुन आनंदाने नाचत होत्या... हा आमच्या आयुष्यातला पहिला आनंदाचा क्षण होता.

वृषाली अर्जुन गायकवाड