Old age love - 6 books and stories free download online pdf in Marathi

वृद्धाश्रमातलं प्रेम - 6

भाग – ६

“चला, आपण लायब्ररीत जाऊ. मी सांगते तुम्हाला सर्व.” असं म्हणून ती उठली आणि निघाली. मला लायब्ररी माहिती नसल्यामुळे मी तिच्या मागे जाणं भाग होतं. चालता चालता तिच्यासोबत केव्हा चालायला लागलो हे कळलं देखील नाही. तिच्यासोबत असं शांतपणे चालताना कसंतरीच वाटत होतं आणि पहिल्या दिवसापासून ती मला मदत करत होती. आतसुद्धा तिचं काम नसताना माझी मदत म्हणून ती येत होती. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने काहीतरी बोलणं भाग होतं. म्हणून मी विचारलं, “तुमचे बाबा कुठं असतात? काल तुम्ही डबा द्यायला गेला होतात म्हणून विचारलं.”

“बाबा पोलिसांत आहेत. दगडूशेठ गणपतीच्या बाजूला जिथं पोलिस चौकी आहे ना, तिथं इन्स्पेक्टर आहेत ते.” तिच्या बोलण्यात एक अभिमानाची झलक होती.

तिचं हे बोलणं ऐकून मला दरारून घाम फुटला. तिच्या न पाहिलेल्या बाबांची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. कमरेला लावलेलं पिस्तूल दाखवून ते माला घाबरवताहेत असं माला वाटू लागलं. मला घाबरलेला पाहून ते जोरात हसत आहेत असा मला भास झाला. मी भानावर आलो तेव्हा आम्ही लायब्ररीत होतो. सर्व सोपस्कार पार पडून सुधाने मला नियम, अटी वगैरे उत्साहात समजावून सांगितल्या. मला माझीच लाज वाटू लागली. इतकी पुस्तकं बघून मला चक्कर येणं बाकी होतं. या मुलीचे आभार कसे मानावे हे मला समजत नव्हते, काही ओळख नसताना ती मला इतकी मदत करत होती. शेवटी न राहवून मी म्हणालो, “मला तुम्हाला काही सांगायचं आहे.”

“बोला ना.”

“तुम्ही माझी इतकी मदत का करत आहात? आपली काही जास्त ओळख नाही. तरीही तुम्ही अगदी उत्साहात मदत करताय. त्यासाठी मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. तुम्हाला काही त्रास नसेल तर तुम्ही माझ्यासोबत कॉफी घ्यायला याल का?” मी एका दमात बोलून टाकलं.

“छे हो, धन्यवाद कशासाठी? आणि मला आवडतं मदत करायला. त्यामुळे मी काही उपकार वगैरे करत नाहीये तुमच्यावर. चला कॉफीला.”

अर्जुनाच्या गांडीवातून धडाधड बाण सुटवेत तसे तिच्या तोंडातून वाक्य निघू लागले. मला फक्त ‘चला कॉफीला’ एवढंच ऐकू आलं.

“पण लेक्चर?”

“आता उशीर झालायं. असंही आपल्याला वर्गात घेणार नाही. त्यापेक्षा चला कॅन्टिनला.” असं म्हणत ती निघाली. आम्ही कॅन्टिनला पोहोचलो, जवळपास सर्व कॅन्टिन रिकामं होतं. मी दोन कॉफी घेऊन आलो. काय बोलावं? हा प्रश्न नेहमीप्रमाणे माझ्यासमोर होताच.

“तुम्ही नेहमी कॉफी घेतात का?” तिने वाफाळलेल्या कॉफीचा कप हातात घेत विचारलं.

“नाही, मी घरी असताना दूध घ्यायचो. घरचंच होतं ना. मी अजून चहाची चव घेतली नाही आणि आता इथं दूध वगैरे घेणं म्हणजे कसं वाटलं असतं ते. म्हणून कॉफी.” मी संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं.

“छोट्याश्या गोष्टीसाठी खूप विचार करतात तुम्ही.” तिने टिप्पणी दिली.

या वाक्याला काय बोलावं ते माला सुचत नव्हतं. मग उगाच काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो, “तुमच्यापासून सांभाळून राहायला लागेल बुवा. तुमचे बाबा पोलिसात आहेत.”

माझ्या या वाक्यावर ती खळखळून हसायला लागली आणि म्हणाली, “असं काही नाही. तुम्ही फार मजेशीर बोलतात.”

मला माझाच अभिमान वगैरे वाटला. कॉफी संपली. आम्ही निघालो.

महाजन काकांनी मनटातील घड्याळाकडे बघितलं. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. त्यांनी हातानेच जेवायला चला अशी खूण केली तेव्हा मंडळी भानावर आली. एकेक जण महाजन काकांच्या खोलीतून बाहेर पडू लागला. मग ते चौघं किचनकडे वळले. चलता चालता परत त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. जोशीकाका म्हणले, “आज दुपारची झोप नाही. महाजन चरित्र ऐकिन म्हणतो.”

“अरे दुपारची काय, रात्रीची झोपसुद्धा रद्द. चांगली मैफिल जमवू रात्री.” बर्वे काकांनी जोरदार समर्थन दिले. मग हास्यविनोद करत जेवण वगैरे झाले. परत स्वारी महाजन काकांच्या खोलीत आली. खोलीत आल्यावर जोशींनी महाजन काकांना थेट प्रश्न केला, “महाजन, मला वाटतं काळाच्या ओघात ती तुला विसरून गेली बहुतेक. मग तू स्वतःहून ओळख का देत नाहीस. आता ती तुझ्या नजरेसमोरच असते. प्रार्थनेच्या वेळी किंवा इतर कोणत्याही वेळी तू बोलू शकतोस. तेवढंच बरं वाटेल रे तुला.”

महाजन काकांनी शांतपणे जोशींचं बोलणं ऐकून घेतलं आणि काही न बोलतच पुढे सुरुवात केली,

असेच दिवस उलटत होते. सुधाशी नंतर काही बोलण्याचा योग आला नाही. पण दररोज नजारानजर झाल्यावर स्मितहास्य व्हायचं. तेवढंचं बरं वाटायचं. ज्या दिवशी ती नसायची त्या दिवशी थोडं चुकल्यासारखं वाटायचं. मग परीक्षा आली, मनासारखा अभ्यास झाला नव्हता. माझ्या खोलीत भुताटकी होती बहुतेक. इतकी प्रचंड झोप यायची की काय सांगू. म्हणजे दिवसभर झोपलं तरी रात्री झोप मी म्हणायची. हे जर असंच सुरू राहिलं तर काही खरं नाही हे माझ्या लक्षात आलं. अभ्यासला लायब्ररी हा एकच चांगला पर्याय आहे हे मी ताडलं. मग दुसर्‍या दिवसापासूनच लायब्ररीत अभ्यासाला जायचं हे नक्की केलं. काही दिवस लायब्ररीत अभ्यास केला. ठरवलं त्यापेक्षा जास्त अभ्यास होत होता. मला माझीच शाबासकी द्यावीशी वाटली. एके दिवशी सुधा पुस्तकं घ्यायला आली होती आणि मीसुद्धा रॅकमध्ये पुस्तक शोधत होतो. माझ्याकडे नजर जाताच ती हसली आणि म्हणाली, “जोरात अभ्यास चाललाय वाटत?”

आम्ही लायब्ररीत होतो याचं भान तिला नव्हतं. मी तिला खुणेनेच म्हटलो. आपण बाहेर बोलूयात. आम्ही बाहेर आलो. यावेळी मीच सुरुवात केली, “तुमचा भरपूर झाला असेल अभ्यास.”

“कशाचं काय. सुरुवातसुद्धा नाही केली अजून. तुमचं मस्त आहे बुवा. खोलीत एकटे असतात. डिस्टर्ब करायला कुणीच नसतं.” तिने तिचे विचार मांडले.

“नाही, रूमवर असताना प्राचंड झोप येते. काहीतरी भुताटकी आहे बहुतेक. त्यामुळे इथं लायब्ररीत येतो अभ्यासाला.” मी सांगितलं.

माझ्या बोलण्यावर ती हसू लागली. माझ्या बोलण्यावरचं तिचं हसणं म्हणजे अगदी मनापासून असायचं. खिल्ली उडवणारं किंवा खेचणारं नव्हे. ती विनंतीच्या स्वरुपात म्हणाली, “माझा घरी काहीच अभ्यास होत नाही हो. मीसुद्धा लायब्ररीत अभ्यास करण्याचा विचार करते आहे. आपण सोबत अभ्यास केला तर चालेल का तुम्हाला? माझ्या काही अडचणी आहेत, त्यासुद्धा सोडवायला तुमची मदत होईल.”

तीचं हे अखंड बोलणं ऐकून मी म्हणालो, “तुम्ही ही वाक्यं पाठ करून आला होतात का? म्हणजे एकदम न अडखळता बोललात म्हणून विचारलं.”

माझ्या ह्या बोलण्यावर ती खळखळून हसू लागली आणि हसतच म्हणाली, “काय मजा घेताय आज गरिबाची.”

“मी कुठं मजा घेतोय. मला जे वाटलं ते बोललो. तुम्हाला सोबत अभ्यासाची इच्छा असेल तर मला काही हरकत नाही.” मी म्हणालो.

“ठीक आहे तर मग, उद्यापासूनच सुरू करुयात.” तिनेच ठरवलं.

“चालेल,” मी अनुमती दिली.

“एक सांगू का? संगतेच, तुमच्याशी बोललं की छान वाटतं. म्हणजे मस्त वाटतं.” असं बोलून माझ्या प्रत्युत्तराची वाट न बघता ती निघालीसुद्धा. तिच्या बोलण्याचं मला गालातल्या गालात हसू आलं. त्या दिवशी अभ्यास झाला नाही. दुसर्‍या दिवसाची वाट बघण्यात तो दिवस वाया गेला.

दुसर्‍या दिवशी मी खूप उत्साहात लायब्ररीला गेलो. त्या दिवशी थोडी नीट तयारी केली होती. तशी रोज करायचो, पण घाईत. लायब्ररीत माझ्या नेहमीच्या जागेवर बसलो. बाजूच्या जागेवर रुमाल टाकला आणि सुधाची जागा रिझर्व्ह करून ठेवली. पुस्तक उघडून बसलो पण अभ्यासाची इच्छा होत नव्हती. अर्ध्या तासाने सुधा आली तेव्हा थोडं बरं वाटलं. येताच तिने सुरुवात केली, “सॉरी, मला उशीर झाला.”

“नाही, तसं काही नाही. मीसुद्धा आताच आलो. पण तुमच्याशिवाय अभ्यासला सुरुवात कशी करणार?” मी म्हणालो. तिने स्मितहास्य केलं. मग परत मी म्हणालो, “तुम्ही माझ्या रुमालावर बसलात. तो द्याल का प्लीज?”

क्षणभर तिला समजलंच नाही. मग खुर्चीवरून उठत माझा रुमाल मला दिला आणि हसू लागली. भरपूर हसल्यावर ती म्हणाली, “तो रुमाल तिथं का ठेवला होता?”

†††