Gotya - 8 books and stories free download online pdf in Marathi

गोट्या - भाग 8

डी. एड. चे दोन वर्षे अगदी मजेत सरले. प्रथम श्रेणीत गोट्या पास झाला. त्याला आता नोकरीची प्रतीक्षा होती. त्यासाठी त्याला निवड मंडळाची परीक्षा पास होणे गरजेचे होते. त्यातल्या त्यात त्याच्या संवर्गासाठी खूपच जागा कमी राहत असत. त्यामुळे त्याला जास्त अभ्यास करणे आवश्यक होते. त्याच्या अनेक मित्रांनी जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रात जाऊन अभ्यास करू लागले तर गोट्या आपल्या गावी राहून अभ्यास करू लागला. अभ्यास म्हणजे काय ? गावातील मुलांना तो सर्व विषय शिकवू लागला. यात त्याचा दुहेरी फायदा होत होता एक तर त्याला शिकविण्यासाठी अभ्यास करावे लागायचे आणि शिकविताना तीच माहिती परत एकदा सांगितल्याने त्याचे दृढीकरण होत गेले. त्यामुळे त्याचे प्राथमिक वर्गातील सारेच विषय परिपूर्ण होत होते. तसेच तो नियमित वर्तमानपत्र वाचत होता आणि रेडियोवरील बातम्या ऐकत होता. रोज काही ना काही लिहिण्याची त्याची उर्मी त्याला गप्प बसू देत नव्हती. साध्या पंधरा पैश्याच्या पोस्ट कार्डावर सुंदर अक्षरात लिहून तो पेपरला पाठवायचा. त्याचे सुंदर अक्षर आणि विचारांची मांडणी पाहून संपादक त्याच्या विचाराला नेहमी प्रसिद्धी देत होता. त्यास्तव तो कुटुंबाच्या नातलगात, मित्र परिवारात, तालुक्यात आणि जिल्ह्यात प्रसिद्ध झाला. अखेर निवड मंडळाची परीक्षा देखील झाली. गोट्याचा पेपर चांगला गेला होता. आपली निवड होईल याची त्याला खात्री होती. निकाल येईपर्यंत तो गावातील शाळेत शिकविण्यासाठी जात होता. एका पेपरात शिक्षक पाहिजेत म्हणून जाहिरात पाहून तो मुलाखती गेला. सर्वांच्या प्रश्नांची त्याने समाधानकारक उत्तरे दिली त्यामुळे या शाळेत आपली निवड झाली तर बरं राहील असे त्याला वाटले. अपेक्षेप्रमाणे त्या परीक्षेत तोच टॉपर होता. त्याची निवड झाली असती जर पैसा आडवा आला नसता. त्याला त्या जागेसाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अर्धे आता द्यायचे आणि अर्धे पगारातून द्यायचे. पण गोत्याजवळ एक ही पैसा नव्हता आणि जिल्हा परिषदेची नोकरी हमखास लागते म्हणून गोट्याने ती नोकरी नाकारली. दुसऱ्याच दिवशी निवड मंडळाचा निकाल लागला. गोट्या पहिल्या पन्नासमधून उत्तीर्ण झाला. गोट्याला जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी लागली. घरात सर्वाना आनंद झाला, गोट्याशिवाय. कारण पाच वर्षे आदिवासी भागात नोकरी करणे क्रमप्राप्त होते. आलेली संधी सोडू नये म्हणून तो आदिवासी भागात नोकरी करण्यासाठी निघाला. गेल्या दोन वर्षात आलेल्या अनुभवामुळे त्याचे मन परिपक्व झाले होते. आदिवासी भागात नोकरी करणे खूप कठीण असते असे प्रत्येकाने म्हटले पण गोट्या अगदी सहजपणे ते पाच वर्षे आदिवासी भागात नोकरी करून दाखविला. पुस्तकाची संगत आणि वृत्तपत्रात लिहिण्याची रंगत येथे आणखीन वाढू लागली. पाच वर्षे नोकरी करून स्वतःच्या भागात बदली झाल्यावर गोट्याचे लग्न झाले. सुंदर आणि सुशील शिकलेली मुलगी त्याच्या जीवनात आली. या दरम्यानच्या काळात गोट्याचे चार पुस्तके प्रकाशित झाले. त्या चार ही पुस्तकाची साहित्य क्षेत्रात खूप वाहवा झाली होती. त्याला अनेक सन्मान आणि पुरस्कार देखील मिळाले. समाजात एक वेगळे अस्तित्व त्याने निर्माण केलं. समाजात आज गोट्याची ओळ्ख एक प्राथमिक शिक्षक म्हणून तर आहेच शिवाय एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून देखील आहे. गोट्याच्या जीवनात काही ठिकाणी टर्निंग पॉईंट आले होते. त्याठिकाणी गोट्याने चुका केल्या असत्या तर तो जीवनात एक यशस्वी मुलगा, भाऊ, नवरा आणि पालक म्हणून जगला नसता. आज कित्येक ठिकाणी गोट्या भाषण करण्यासाठी जातो तेथे तो एकच गोष्ट सांगत असतो की, ' जीवनात यशस्वी व्हायचे असेल, इतिहास घडवायचे असेल तर भरपूर वाचन करा, चिंतन करा आणि लेखन करा. वाचन तुमची भूक मिटवेल, चिंतन तुमची तहान मिटवेल तर लेखन तुमचे झोप मिटवेल. समाधानाची झोप घ्यायची असेल तर वाचन आणि लेखन करा' असे तो नेहमी आपल्या भाषणातून वाचकांना सांगत असतो.

समाप्त