Mitranche Anathashram - 6 books and stories free download online pdf in Marathi

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ६


संजय ने पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
हो, तो विवेक होता. मी विवेकला घेऊन कॉलेज आलो. विवेक पार्किंगच्या बाहेरूनच थँक्यू म्हणून निघून गेला. मी गाडी लावली आणि नोटीसबोर्ड जवळ आम्याला शोधायला जाणार होतो पण लेक्चरला जायला उशीर होत होता म्हणून सरळ वर्गात जाऊन बसलो.
लेक्चर झाल्यावर आम्या भेटला, मी त्याला विचारले, "बंटीची तब्येत आता कशी आहे."
माझ्या मागून आवाज आला, "कशी आहे तब्येत आता"
मी मागे वळून पाहिले तो विवेक होता. आम्याने उत्तर दिले, "ठीक आहे आता"
मी विचार करायला लागलो, हा विवेक कसा काय ओळखतो आम्याला. मी प्रश्न विचारणार तितक्यात विवेक बोलला, "ठीक आहे काळजी घे, मी जातो उशीर होतो आहे मला, बाय"
मी काही बोलायच्या आतच तो गेला. तो गेल्यावर आम्या बोलला, "चल आश्रमात तिथे बोलू, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे."
आम्ही बाहेर आलो, मी आम्याला बाहेर उभा करून पार्किंगला गाडी घ्यायला गेलो. तिथे संध्या स्कार्फ बांधत होती. किती सुंदर दिसत होती ती, तिचा मोहक चेहरा पाहून मी माझ्याच विश्वात हरवलो. संध्याने स्कार्फ बांधला आणि ती निघून पण गेली तरी मी माझ्याच विचारात होतो. हॉर्नचा आवाज एकून मी भानावर आलो. तेव्हा मला समजले माझ्या मागे चार ते पाच गाड्या बाहेर जाण्याची वाट बघत होते. मी बाहेर निघालो, आश्रामाच्या दिशेने जात असताना माझ्या मनात विचार आला, मी प्रेमात तर नाही ना पडलो की फक्त आकर्षण आहे. याबद्दल मी आम्याला सांगायला पाहिजे. आश्रमात पोहचल्यावर आम्ही बसलो आणि मी, "मित्रा मी प्रेमात पडलो असं वाटत आहे मला"
आम्या, "अरे ये मित्रा तु मोठा झाला आता, कौन है वो खुशनसिब"
मी, "संध्या"
आम्या, "अरे फक्त तुलाच येऊन धडकते ती, खुप चांगली मुलगी आहे"
मी, "आता तु तिला कसा ओळखतो"
आम्या, "जेव्हा बंटी ने नाणे गिळले होते तेव्हा दवाखान्यात भेटली होती. खुप गर्दी होती त्या दिवशी आणि आम्हाला खुप वेळ लागणार होता. पण बंटी ला खुप त्रास होत होता. ते पाहून ती आमच्याकडे आली आणि काय झालं असं हाताने इशारा केला. मी सांगायला सुरुवात केली तर बाजूला बसलेली नर्स शांत बसा बोलली. संध्या ने नंतर इशाऱ्यानेच तिच्या नंबरवर आम्हाला पाठवले."
मला तिच्याबद्दल अजून जास्त आदर वाटायला लागला कारण ती आम्या ने केलेली मदत विसरली नव्हती आणि केलेल्या मदतीची परतफेड म्हणून तिने मदत केली. थोडा वेळ आश्रमात घालवल्यावर मी घरी जायला निघालो.
आम्या, "सांभाळून जा रे, नाहीतर पुन्हा ती येऊन धडकायची आणि गाडी मला दुरुस्त करायला सांगणार"
मी निघालो घरच्या दिशेने, पण मला काय माहिती घरी माझ्यासाठी काय वाढून ठेवले आहे. दरवाज्यात एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हातात संध्याची चिठ्ठी घेउन रजनी उभी होती. जसे न्यूज रिपोर्टर असतात छोट्या बातमीचा परिणाम मोठा करायचा तशीच रजनी होती. आत्तापर्यंत घरात सर्वांना माझ्याकडच्या चिठ्ठी ची माहिती पोहचली होती. मी तिला बाजूला करून आत शिरलो तर सर्व माझ्याकडे बघत होते. मला आता सर्व घटना सांगणे भाग होते म्हणून मी पुढच्या काही क्षणात पुर्ण कथा सांगितली नाहीतर ही रजनी सारखी आगाऊ मुलगी नाही. पण तिच्यापेक्षा जास्त विश्वास माझ्यावर होता. माझी सुटका झाली मी माझ्या रूममध्ये जाण्याआधी रजनी कडे पाहून हसलो ती पाय आपटत गेली छोट्या आईकडे.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर मी पार्किंग च्या बाहेर पडताच मला आम्या भेटला. आम्ही दोघंही कॉलेज मध्ये गेल्यावर समोरच विवेक येताना दिसला. लवकर आल्यामुळे आज तिघेही निवांत गप्पा मारत उभे होतो. विवेक ने विचारले की तुमची मैत्री कशी झाली. मग आम्या आणि मी दोघांनी त्याला आमच्या मैत्रीचा इतिहास सांगितला. मी आणि विवेक कसे भेटलो ते आम्याला सांगितले. आम्ही बोलतच होतो तर संध्या येताना दिसली. तिने लांबूनच हात दाखवला मी आणि आम्या ने तिला उत्तर म्हणून हात दिला पण आमच्याबरोबर विवेक ने पण हात दिला. माझ्या डोक्यात पुन्हा विचार आला, हा कसा हिला ओळखतो. मी विचारणार त्याआधी तो संध्या कडे जाऊन बोलला, "अरे मी सांगायचं विसरलो, आज शिक्षकांचा संप आहे. कॉलेज बंद आहे."
मी, "मग चला आश्रमात"
आम्या, "हो मग का नाही"
विवेक, "मी पण येऊ का ?"
मी, "का नाही ?"
आम्ही तिघेही संध्याकडे पाहून, "आणि ही"
त्याआधीच तिने तिच्या गाडीची चावी बाहेर काढली होती, आम्ही पार्किंग ला जाणार तोच आम्याच्या डोक्यात काय आले काय माहिती तो संध्याकडे पाहून बोलला,
"तुझी गाडी मी घेऊ का? तु संजय बरोबर बस गाडीवर"
मित्र असावा तर असा, तिने गाडीची चावी दिली. आम्याने विवेकला पटकन गाडीवर बसवले आणि संध्याला पर्याय म्हणून माझी गाडी होती. ती माझ्या गाडीवर बसली. निघाली आमची स्वारी सरपोतदार अनाथाश्रमाकडे. रस्त्यात आम्ही खुप सारी खरेदी केली. खाण्याचे पदार्थ, खेळणी घेऊन आम्ही एकदाचे आश्रमात पोहचलो, बाकी कुणाचं माहिती नाही पण माझ्यासाठी सर्वात सुंदर प्रवास होता तो.
आश्रमात गेल्यावर सर्व आणलेला खाऊ आणि खेळणी मुलांना वाटून दिली आणि त्यांच्याबरोबर खेळायला लागलो. कधी वेळ गेला काही समजले नाही. त्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहून खुप आनंद झाला आणि ती आनंद द्विगुणित करण्याचं काम संध्या तिच्या हसण्याने करत होती. खुप मजा मस्ती केल्यानंतर आम्ही सुरेश काकांसमोर येऊन बसलो. आल्यापासून आम्ही काकांना ओळख करून दिली नव्हती त्यामुळे आम्याने ओळख करून द्यायला सुरुवात केली. माझ्याकडे बोट दाखवून आम्या, "याला तुम्ही ओळखतात"
विवेक कडे हात दाखवत, "हा विवेक, आमच्याच कॉलेजला आहे, सायन्सला"
संध्या कडे हात करून, "ही संध्या, आपल्याला हॉस्पिटल मध्ये भेटली होती त्या दिवशी, मागे बघा एकदा गाडी होती माझ्याकडे, ती हीची होती."
काका संध्याकडे पाहून, "हो, धन्यवाद बाळा, तुझ्यामुळे लवकर नंबर लागला आमचा"
संध्या काहीच बोलली नाही, म्हणून काका बोलले, "जास्त बोलत नाही वाटत, वडील काय करतात बाळा तुझे ?"
आता आमच्या सर्वांच्या नजरा संध्याकडे वळल्या, पण क्षणार्धात तिचे डोळे पाण्याने भरून आले. उठून ती गाड्या लावल्या त्या दिशेला जाऊन रडत बसली. आश्रमातील सर्व मुलं आता तिला शांत करण्यासाठी तिच्या भोवती जमले होते. तिला शांत करून ते बागेत घेऊन गेले.
मी, "अचानक काय झाले रडायला"
काका, "मी काही चुकीचं बोललो का ?"
विवेक, "म्हणजे तुम्हाला आतापर्यंत काहीच कळालं नाही"
मी, "कशाबद्दल ?"
विवेक, "अरे संध्याला बोलता येत नाही, ती मुकी आहे."

हॉस्पिटलमध्ये,
"काय ?" असे बोलून मी उभाच राहिलो.

क्रमशः