Ardhantar - 17 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - १७




सभी सिकंदर यहा पर,
कोई नही है फकीर।
साये मे भी दिखती,
है रोशनी की लकीर।

मला अभय सर नेहमी बोलायचे कोणी आपल्याला कमी समजलं म्हणून आपण कमी होत नाही, किंवा आपण काही मोठं काम केलं म्हणून महान होत नाही, खरं तर एक मनुष्य केवळ आपली कर्म करू शकतो, आपण महान आहे की लहान आहे हे फक्त एक 'टॅग' आहे ज्याची किंमत बदलत जाते...आणि आपण फक्त चांगले कर्म घमंड न करता करायचे, तेच आपल्याला अनमोल बनवतील ज्याची कुठेच किंमत लावता येणार नाही, ते अनमोल असतील....हेच शब्द होते जे माझा आत्मविश्वास वाढवत होते, पण विक्रम मला कमी लेखण्याची एकही संधी सोडत नव्हता...आणि याचं एकच कारण होतं, ते म्हणजे त्याचा अहंकार... अहंकाराची पट्टी जर डोळ्यांवर बांधलेली असेल मनुष्य डोळे असूनही आंधळा होतो आणि विक्रम तर असा आंधळा झाला होता की त्याला स्वतःच्या मोठेपणा समोर बाकी सगळे नगण्य वाटत होते.

एक दिवस विक्रम नेहमीप्रमाणे जरा जास्तच लवकर आला असावा घरी, मी अजून NGO मधून आली नव्हती..मी संध्याकाळी घरी येऊन पाहते तर विक्रम घरी होता, मी तर आधी घाईघाईत मोबाईल बघितला की याने लवकर येतो म्हणून मला कॉल केले असतील अन नेहमीप्रमाणे मी ते पाहिले नाही, आता मात्र याच्या रागाचा दाह मला सहन करावा लागेल..मी बॅगेतून मोबाईल काढून पाहतच होती आणि विक्रम बोलला,
"नैना, नको पाहुस मोबाईल, मी नाही कॉल केले तुला, त्यामुळे नसतील मिसकॉल माझे..."

"तसं नाही..तुम्ही आज लवकर घरी आले आणि सकाळीही काही सांगितलं नाही, सांगितलं असत तर मी गेलीच नसती ना बाहेर..."

"ठीक आहे ग, माझं वेळेवर ठरलं, त्यामुळे विचार केला तुला सरप्राईज द्यावं...बरं आज लवकर आलोच आहे मी तर चल बाहेर जाऊ जेवायला..."

कितीतरी दिवसांनी मला विक्रम इतक्या प्रेमाने बोलत होता, मला तर आनंदापेक्षा आश्चर्य जास्त वाटत होतं, पण विचार केला जर तो चांगला वागत आहे तर मी उगाच झालेल्या गोष्टींना आठवून का दुःख करत बसू...विक्रम मला बाहेर घेऊन गेला, छान जेवण वैगरे करून आम्ही घरी पोहोचलो..विक्रम आज आनंदी दिसत होता, त्याचा मूड चांगला आहे हा विचार करून मी विक्रम जवळ माझ्या स्पर्धा परीक्षांबद्दल बोलायचं ठरवलं..अभ्यास तर मी करतच होती पण विक्रमच्या मनाई मुळे त्याला कधी बोलू शकली नाही.. पण आज विचार केला त्याला बोलावंच...

"तुम्ही आज फार आनंदी दिसत आहे..काय झालं?? तुमची नवीन केस सुटली का??"
मी हळूच विषय काढला

"हम्म तसंच समज, एकदा हे झालं तर माझे अर्धे टेन्शन दुर होतील..."

"अम्म्म.. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं.."

"बोल ना, काय??"

"ते..घरी तुमचे पुस्तकं आहेत ना खूप तर मी रोज वाचत असते, मला असं वाटते मी एकदा स्पर्धा परीक्षा देऊन पाहू का???" मी भीतभितच विचारलं,
माझं बोलून झाल्यावर विक्रमने एक करारी नजर माझ्यावर टाकली, मला वाटलं आता हा खूप रागावणार मला, पण तो जोरजोरात हसायला लागला, मला काहीच कळत नव्हतं काय झालं, मी असं काय बोलली ज्यामुळे विक्रम माझ्यावर एवढा हसत आहे,

"काय झालं, मी काही चुकीचं बोलली का?"

"चुकीचं नाही, मोठा जोक केलायेस तू नैना..दोन पुस्तकं चार दिवसांत वाचून तुला काय वाटते कोणता मोठा तीर मारशील तू??? आणि ते करायला बुद्धी लागते गं, तुला भाजीत मीठ किती घालावं याचा अंदाज येत नाही आणि तुला ऑफिसर व्हायचंय, नाही का हा भयानक जोक??"

"अरे पण मी प्रयत्नही केला नाहीये अजून आणि तुम्ही आधीच का त्याचा परिणाम बोलून दाखवत आहे??"
मला खूप वाईट वाटलं विक्रम जे काही बोलला माझ्यासाठी ते ऐकून..

"हुश्श...नैना...,ठीक आहे करून घे प्रयत्न ही, आज मी आनंदी आहे त्यामुळे कमीतकमी आज तरी मला माझा मूड नाही खराब करून घ्यायचा, त्यामुळे कर तुही प्रयत्न...पण एक सांगतो, अशी प्रत्येक गोष्टींवर रडणारी, थोड्याश्या कापल्या, भाजल्याने ही बेशुद्ध होणारी, तुझ्यासारख्या नाजूक मुलीचं कामं नाही ते...,तू फक्त 'मला पहा फुले वहा' टाईपची आहे, मी आहे म्हणून घेतो तुला सांभाळून...करून घे तो ही प्रयत्न, होणार तर काही नाही.."
विक्रमचं बोलणं मला खूपच जड जात होतं पचवायला, त्याला सांगावं वाटत होतं की भाजीत मीठ तर त्याला ही घालता येत नाही आणि त्यावरून कोणाची लायकी आपण ठरवूही शकत नाही, आणि तो मला नाही, मी त्याला सांभाळून घेत आहे किंवा असं म्हणेल की सहन करत आहे..पण मी त्याला त्यावेळी हे सगळं नाही बोलू शकली, त्यावेळी तर मला एकच आनंद होता की मला काहीतरी करण्यासाठी त्याने रजामंदी दिली होती...
आपल्यासोबत आयुष्यात काय घडणार आहे यावर आपले नियंत्रण नसतात पण जे काही अघटीत अप्रिय होत आहे त्यामुळे आपण खचू नये हे प्रयत्न तर नक्कीच करू शकतो, मी पण तसंच काहीसं करण्याचा प्रयत्न करत होती....

त्यादिवसापासून मला विक्रमचा ताण कमी वाटत होता, असं काय होतं जे त्याला त्रास देत होत पण आता तो अचानक त्या त्रासातून मुक्त झाला हे काही कळत नव्हतं आणि विचारल्यावर तो काही सांगणार ही नव्हता...पण एक दिवस जेवण करत असताना त्याला फोन आला आणि त्याचं बोलणं ऐकून मी अचंबित झाली, माझे हावभाव पाहून तो बोलला,
"काय झालं ?? अशी का पाहतीयेस मला??"

"विक्रम, तुम्ही काही चुकीचं करताय का??"

"का? काय झालं??"

"तुम्ही, अँटी नक्षल ऑपरेशन मध्ये काम करताय हो ना?"

"हो, पण त्यात चुकीचं काय आहे, ड्युटी आहे करावी लागते.."

"ड्युटी आहे करावी लागते ते मला कळते विक्रम पण आता तुम्ही बोलत होते की सगळे रॅकेट तुम्हाला मिळून जातील फक्त बॅग रेडी ठेवा, हे बॅग म्हणजे त्याच ना..पैश्याच्या??"

"हे बघ नैना, मी काय करतो काय नाही, याची जासुसी तू नको करू, आणि तू काय एकाच फोन वरून ठरवलं की मी चुकीचं काही करत आहे, तुला काय कळतं त्यातलं?? तू तुझ्या घरात डोकं घाल जरा कामात, नको तिथे का तुझं टॅलेंट दाखवते..मी काही चुकीचं करत नाहीये..."

तेंव्हा विक्रमने मला गप्प बसवलं, पण तो नक्कीच काहीतरी मोठ्या जाळ्यात फसला आहे याची जाणीव त्याला नव्हती, त्याचा अहंकार त्याची लालसा त्याला कुठे नेवुम ठेवणार होती हे त्याला ही माहीत नव्हतं, आणि माझे मात्र अतोनात प्रयत्न होते त्याचे मन वळवण्याचे, पण माझे प्रयत्न कमी पडत होते, आणि आता मला यात एकाच मदतीची आवश्यकता होती आणि ती मदत म्हणजे 'अभय सर.....!!
---------------------------------------------------------
एकंदरीत विक्रमचं वागणं, त्याचे चुकीचे कामं मला हे सुचवत होते की त्याला अभय सरांचा एवढा राग का आहे?? आज खरं तर अभय सरांचा ही राग येत होता मला, मित्र म्हणतात स्वतःला ते माझे आणि जेंव्हा मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला विक्रम बद्दल तेंव्हा ते मला काही नाही बोलले सगळं स्पष्टपणे...मी त्यांना फोन केला त्यांनी माझा फोन उचलला नाही, मॅसेजलाही रिप्लाय केला नाही, त्यामुळे मला अजूनच राग आला...आणि त्याच रागात मी NGO मध्ये गेली, माझं मन तिथेही लागत नव्हतं, एकतर विक्रमची चिंता मला खात होती आणि त्यात अभय सर माझे फोन उचलत नव्हते...आतापर्यंत तर असं कधीच झालं नव्हतं की त्यांनी माझे उचलले नसतील किंवा मला दुर्लक्षित केलं असेल, मग आज काय झालं असावं??? जास्त मित्र मैत्रिणी नव्हतेच मला, एक अभय सर भेटले होते, पण आज त्यांचं ही वागणं असं होतं, खूप एकटं वाटत होतं, आधीच हळवा स्वभाव आणि त्यात हे सगळं होत असताना मनात खूप चलबिचल होती, एक मिनिट असं वाटलं विक्रमच्या घरी सांगू का?? पण त्यांना नको त्रास द्यायला असं वाटलं आणि सांगितलं असत तरी मला एका चांगल्या पत्नीचे काय कर्तव्य असतात याची बाराखडी शिकवल्या गेली असती...हताश होऊन मी माझ्या नेहमीच्या ठिकाणी बेंच वर जाऊन बसली, तेवढ्यात,
" चटके लागती जीवाला,
ज्याच्या एका अबोल्याने,
चांदण्यात आभाळ सुने,
त्या मित्राच्या रुसव्याने "

मला कळलं की अभय सर आहेत पण आज मी खरंच खूप नाराज होती त्यांच्यावर त्यामुळे मी तर काही बोलणार नव्हतीच...

"नैना तुला माहीत आहे, फुग्यात जास्त हवा भरली की तो फुटतोच..." आणि ते खो खो हसायला लागले, मला तर अजूनच चीड आली....

"हे दरवेळी, असं मागून येऊन आणि काहीतरी कविता करूनच बोलता येत का तुम्हाला?? कधीच कोणत्या गोष्टी सरळ सरळ बोलता येत नाहीत ना, कोणत्याच प्रश्नांचे सरळ उत्तरं नसतात ना?? प्रत्येक गोष्ट फक्त फिरवून, गोल गोल घुमवून बोलायची...अशी असते का मैत्री?? असं असेल तर नको मला अशी मैत्री...आणि तुम्ही बोलू ही नका मला, स्वतःच्या वेळेनुसार जर मैत्री निभवायची असेल तर... "

"सगळं स्वतःच ठरवून मोकळी झालीस??? मी वेळेनुसार मैत्री निभावतो किंवा तुला मूर्ख बनवतो, एवढंच ओळखलंस मला??? असं असेल तर ते खरं आहे..."

खूप गंभीरपणे अभय सर बोलले, पण आता मी मात्र रडायची बाकी होती तरीही,
"खरंच..." एवढेच शब्द मी बोलू शकली आणि माझा कंठ दाटून आला...

"हम्म..दुःख झालं??"
अभय सर बोलले आणि माझ्या पूढे येऊन उभे झाले, मी त्यांना काय बोलू हे मलाही कळत नव्हतं आणि तेवढ्यात माझ्या डोक्यावर एक टपली मारत ते बोलले,

"खरंच.. खरंच वेडी आहेस तू, काय म्हणतात ते नागपूर मध्ये.. अम्म्म.. हं, कोणीही उल्लू बनवू शकते तुला...तू मॅसेज केले ते मी उशिरा पाहिले अन तुझा कॉल आला तो रिसिव्ह करायला गेलो तर बॅटरी संपली फोन ची, मग एका मिटिंग मध्ये बिझी झालो, ते झाल्यावर तू इथे आलीयेस का हे विचारायला ऑफिसच्या नंबर वरून कॉल केला तर तू उचलला नाही, कारण बाईसाहेब तर 'मै और मेरी तन्हाई' मध्ये मशगुल असशील, फोनकडे लक्ष कुठे असेल आपलं...हो ना??? हुश्श...माझं बोलून झालं माय लॉर्ड, आता तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकता..." आणि पुन्हा हसायला लागले...

मी माझा फोन बघितला तर खरच त्यावर मिस कॉल होते, मला माझ्याच वेंधळेपणावर ओशाळाल्यागत झालं...

"सॉरी...मी नाही पाहिलं..." मी अतिशय रुक्षपणे बोलली

"रागवलीस?? अग, मी खरंच बो..."

"ठीक आहे, अभय सर, तुम्ही बोलले आणि मी मान्य केलं, तसही रागवण्याचा किंवा नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार मुलींना नसतो, फक्त कोणतीही परिस्थिती आली किंवा स्वतःला त्रास होत असला तरी चेहऱ्यावर बत्तीशी कायम ठेवावी याची ट्रेनिंग असते आम्हाला...तुम्हाला तर त्यातही मज्जा येते हो ना,??" त्यांचं काही ऐकून न घेता मी रागारागात बोलली,

"आज मॅटर जास्त सिरियस आहे, त्यामुळे नो मजाक... आता सांगशील काय झालं...?"

"मी तुम्हाला मागच्या वेळी विचारलं होतं विक्रम कोणत्या कामात बिझी आहे, तुम्ही सरळ सरळ उत्तर का नाही दिलं?? की तुम्ही वाट पाहत होते चुकीच्या कामात विक्रम कसा फसतो आणि कसा बरबाद होतो...बोला?"

"मी तुला सांगितलं असतं, तू त्याला जाऊन बोलली असती, आणि त्याला कळलं असतं तुला हे माझ्याकडून माहीत झालं, आणि तो अलर्ट झाला असता, मी जे त्याच्यावर नजर ठेवून आहे, त्यात मी फेल झालो असतो.."

"वा...किती स्वार्थी आहे तुम्ही?? तुमच्या कामासाठी तुम्ही विक्रमला निशाणा बनवत आहे?? मला बेस्ट फ्रेंड बोलता ना तुम्ही, माझा एकदा ही विचार नाही आला का तुम्हाला?"

"हे बघ नैना, तुझा विचार करूनच मी त्याच्यावर नजर ठेवून होतो, नाहीतर डिपार्टमेंट आज आताच्या क्षणी त्याच्यावर कारवाई करेल, आणि त्याचे ते नक्षली मित्र आजही त्याचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही..जर एकदा तो दोषी सिद्ध झाला तर मी त्याची मदत नाही करू शकणार, यासाठी तुला फक्त सूचित केलं होतं की त्याला संभाळण्याचा प्रयत्न कर...त्याचे काम बघितले तर माझं रक्त गरम होते, मला त्या नक्षली पर्यंत नक्कीच पोहचायचं आहे विक्रमच्या मदतीने पण त्याला त्यातून सुखरूप बाहेरही काढायचं आहे, कारण तुझ्यासाठी.. आता बोल आहे मी स्वार्थी??"

अभय सरांचे शब्द ऐकून मला त्यांना नजर मिळवायची हिम्मत झाली नाही, मी कस त्यांना चुकीचं समजली, विक्रमची इतकी मोठी चूक, खरं तर गुन्हा, पचवून ही ते फक्त माझा विचार करून एवढं सगळं करत आहेत आणि मी...कळत नव्हतं काय बोलू...

"सॉरी, मी तुम्हाला काही काही बोलली, पण आता मी काय करू, मलाच कळत नाहीये, त्यामुळे चिडचिड झाली.."

"मला वाईट नाही वाटलं नैना, पण एक सांगतो खूप उशीर व्हायच्या आधी तू जे हे झाशीच्या राणीचा अवतार मला दाखवते तसा विक्रमलाही दाखव, तुझ्यापेक्षा जास्त बर वाईट त्याच कोणीच विचार करू शकत नाही, कसं आहे ना नैना, जो चुकतो ना त्याला त्याची चूक तेंव्हाच लक्षात आणून दिली पाहिजे, मग ती चूक तो बाहेर करत असो किंवा घरात, मला माहिती आहे पती पत्नीच्या वैयक्तिक गोष्टींत हस्तक्षेप नाही केला पाहिजे पण मित्राच कर्तव्य म्हणून बोलतो सहनशीलतेचे ही मुस्के आवळले पाहिजे कधीतरी...,बरोबर ना..??"

"हम्म...करेन मी प्रयत्न.."

"नको काळजी करू, होईल सगळं ठीक, मै हूं ना...बरं चल ना मला भूक लागलीये, तुझ्याशीवाय या गरिबाला कोण खाऊ घालणार...ही ही ही..😆😆"

"गरिब🙄🙄 आणि तूम्ही.?? चला.. तूम्ही नाही सुधारायचे कधी..."

अभय सरांशी बोलून थोडं मन हलकं झालं, थोड्यावेळेसाठी का होईना पण खरंच सगळं नीट होईल या आशेने पुन्हा जन्म घेतला...शंभर दिखाऊ मित्र असल्यापेक्षा एक सच्चा दोस्त नक्कीच हवा आणि मला तो अभय सरांच्या रुपात मिळाला होता...मी त्यांना माझा स्पर्धा परीक्षा देण्याचा मानस बोलून दाखवला, त्यांना आनंद झाला, मला बोलतात,

"नैना, तू जर IAS झाली तर मला ओळख देशील ना, की विसरुन जाशील..."

"काही कसं बोलता तुम्ही, IAS वैगरे एवढा मोठा विचार मी केला नाही, ते तर घरात विक्रमचे पुस्तकं धूळ खात पडले होते, ते ही एकटे आणि मी पण एकटी त्यामुळे आमची मैत्री झाली, आणि तसही खूप मोठं माझं काही स्वप्न नाही फक्त एवढं आहे छोटी मोठी परीक्षा देऊन एखादी नोकरी मिळवावी, स्वतःच्या पायावर उभी राहिली तर स्वतःच्या नजरेत थोडी किंमत राहील माझी...."

"पण, जर मोठं काही करण्याची तुझी कुवत आहे तर तसे प्रयत्न करावे तू असं मला वाटते..."

"दोन दिवसांत चार पुस्तकं वाचुन काय मोठं करू शकते मी?? तस ही भूगोल आठवायला गेली की बुद्धीच्या जमीनीत 'टेकटोनीक प्लेटची' अशी आदळआपट होते की मी सरळ पानिपतच्या समरभूमीत जाऊन पोहोचते, आणि ते आठवण्याचा प्रयत्न केला तर घटनेचे मूलभूत हक्क डोके वर काढू लागतात, आणि मग तर सगळी अर्थव्यवस्था कोलमंडल्यासारखी होते...नाही रे बाबा, नाही व्हायचं माझ्याने..."

माझं ऐकून अभय सर पुन्हा हसायला लागले, मग बोलतात,
"तू ना..कमाल आहेस..माहीत तुला सगळं आहे, पण थोडासा आत्मविश्वास कमी आहे त्यामुळे सत्य पाहत नाही..तुला माहीत आहे, सत्य हे कल्पनेपेक्षा जास्त अनोळखी का वाटते कारण, कल्पना तर आपण कोणत्याही संभाव्य परिस्थितीची करू शकतो, तर मग चांगल्या गोष्टीचीच कल्पना करून त्याला सत्य बनवलं तर ते अनोळखी राहणार नाही..काय वाटत??"

"मला वाटतं तुमच्यात मार्क ट्वेन संचारले..😆😆 "

",😖😖काय तू पण, कमीतकमी कॉपी केलेले डायलॉग मारुन तुला मोटिव्हेट तरी करतो.. खरा मित्र आजकाल फुकटच्या सल्ल्यासारखा झालाय ज्याची काही किंमत नसते.." उगाच नाराजीच्या सुरात अभय सर बोलले,

"बरं, ठीक आहे करेल मोठे प्रयत्न ही मी, आता खुश,.."

"सुपर खुश...😀😀"

अभय सरांच्या प्रोत्साहाणाने मी अभ्यासाला लागली, काही महिन्यांनी माझी पूर्व परीक्षा होती त्यामुळे माझं लक्ष अभ्यासात होत...विक्रमला माझा सगळा टाइमपास वाटत होता त्यामुळे त्याने कधीच माझी तसदी घेतली नाही किंवा दोन शब्द प्रोत्साहनाचे तो बोलला नाही, परीक्षा आली कशी अन गेली कशी याबद्दलपण विचारपूस तर दूरची गोष्ट मग....पण मार्गदर्शन करायला अभय सर तर होतेच....आणि खरं बोलले होते ते कल्पना सत्यात उतरू शकते फक्त जिद्द आणि विश्वास असला तर...खरं तर त्यावेळी मला काही विशेष जिद्द वैगरे नव्हती, खूप स्वस्त होते माझे स्वप्नं, की छोटं मोठं का असेना पण स्वतःच्या हिम्मतीवर जगण्याची मुभा मिळावी, पण आधी घरच्यांनी आणि मग नवऱ्याने ते अधिकार स्वतःच्या मालकीत घेतले आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं तर दूर त्यांनी मला कुबड्या ही देऊ केल्या नाहीत.. मग असं काही झालं की मी उठली ही, लढली ही आणि त्याच जिद्दीने आकाशाला गवसणी ही घातली...पण असं काय झालं असावं???
--------------------------------------------------------
त्या दिवसांनंतर माझा अभ्यास तर सुरूच होता, सोबतच मला अभय सरांकडूनही मार्गदर्शन भेटत होतं.. अजून एक गोष्ट मी अतिशय काळजीपूर्वक करत होती ती म्हणजे विक्रम ला चुकीच्या मार्गावरून परावृत्त करण्याचे, माझं आणि अभय सरांचं ठरलं होतं की जर मला विक्रमला गुन्हेगारीच्या दलदलीतुन बाहेर काढायचं असेल तर मला त्यांची मदत करावीच लागेल...माझे तसे प्रयत्नही सुरू होतेच, मी घरात विक्रम सोबत शक्य असेल तेवढा वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होती, तो कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो किंवा त्याला कोणाचे फोन येतात, या सगळ्या गोष्टींवर मी लक्ष ठेवण्याचे माझे प्रयत्न असायचे...

मला शक्य होईल तेवढी माहिती मी अभय सरांना द्यायची, आधी तर मला थोडा विश्वास ठेवायला कठीण गेलं त्यांच्यावर कारण मला माहीत होतं अभय सरांसाठी चुकीचे कामं करणारा व्यक्ती काहीच किंमत ठेवत नाही, पण फक्त माझ्यामुळे ते विक्रम वर जास्त सक्तीचे नियम लावत नव्हते, एक काम मात्र ते करायचे, विक्रमचे जे काही प्लॅन असायचे किंवा त्या गुन्हेगारांचे जे काही डाव असायचे ते उधळून लावायचे, यात ते काळजी घ्यायचे की विक्रम कुठेही फसू नये, पण एक दिवस त्यांनी मला फोन केला आणि तातडीने भेटायला बोलावलं, तसं ते मला कधीही त्रास होईल असं वागत नव्हते पण जर आज त्यांनी मला काहीही कारण न सांगता एवढ्या तडकाफडकी बोलावलं होतं म्हणजे काहितरी तर नक्कीच होत, मी त्यांना भेटायला गेली, ते NGO मध्ये आमच्या नेहमीच्या जागी बसले होते, नेहमी हसण्या मस्करीच्या मूड मध्ये असणारे अभय सर आज इतके शांत कसे याचं मला विशेष वाटलं...मी त्यांच्या मागे जाऊन उभी राहिली तेरी त्यांना कळलं नाही, मग मी,

"अंधाराचे साम्राज्य जरी,
नसेल सूर्यास्त हा अनंत।
उगवेल सूर्य क्षितिजावरी,
तोडुनी सारे साखळदंड ।"

माझे शब्द ऐकून त्यांनी फक्त मागे वळून पाहिलं पण बोलले काहीच नाही, मला आश्चर्य झालं,
"अरे काय झालं?? तब्येत बरी नाही का तुमची??" मी विचारलं

"नैना, आधी इथे येऊन बस, बोलायचं आहे तुझ्या सोबत.."

मी बेंच वर जाऊन बसली, मला इतकं तर कळलं होतं की काहीतरी गंभीर गोष्ट असावी कारण अभय सर इतके शांत राहूच शकत नाही कधी...

"काय झालं?? तुम्ही आज खूप शांत दिसताय??"

"हे बघ नैना, मला खबर मिळाली आहे आणि मला विश्वास आहे की खबर खरी आहे...विक्रमने पैसे तर घेतले त्या लोकांकडुन रॅकेटचे पण मला तुझ्या मदतीने त्यांची माहिती मिळत गेली त्यामुळे त्यांचे सगळे प्लॅन फसत गेले, आता झालं असं आहे की डिपार्टमेंट ला विक्रम वर शंका आहे त्यामुळे माझ्याकडून रिपोर्ट मागितला आहे, आणि मला त्यात काहितरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे, आणि दुसरी गोष्ट ही की, त्या लोकांना त्यांना जे हवं ते मिळालं नाही त्यामुळे ते विक्रमला फितूर समजत असावे म्हणून विक्रमच्या जीवाला ही धोका होऊ शकतो...त्यामुळे मी त्याला सक्तीच्या रजेवर पाठवतो आहे...आणि तुला हे सांगावं असं मला मनातून वाटलं, हे बघ मी खरंच विक्रमला जितकं यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होऊ शकेल तेवढं करेल पण एक तर मान्य करावं लागेल की त्याने अपराध केलाय, आणि त्यामुळे त्याला त्याची शिक्षा ही मिळाली पाहीजे, आणि सोबतच त्याचा जीव ही सलामत राहिला पाहीजे त्यामुळे मला हे करावं लागलं....."

"ठीक आहे अभय सर, मला तुमच्या कामात काहीही बाधा आणायची नाही किंवा विक्रमची काही शिफारस करायची नाही, तुम्ही आधीच खूप नरमीने घेतलं आहे त्यांना, आणि माझा जीव त्यांच्यासाठी तुटणं हे पण स्वाभाविक आहे, तुम्हाला त्यांना काय शिक्षा द्यायची द्या पण त्यांचा जीव सुखरूप असला पाहिजे एवढीच विनंती आहे..."

"तू काळजी नको करू, त्याला काही होणार नाही, पण मला माझं मन खात होत, मागच्या वेळी तू बोलली होती की मी विक्रमला निशाणा बनवून माझं कामं करून घेईल आणि तुझी काही पर्वा नाही करणार त्यामुळे तुला सांगणं गरजेचं वाटलं...."

"अरे, तुम्ही ती गोष्ट अजून घेऊन बसलायेत, तेंव्हा मला सत्य परिस्थिती माहीत नव्हती त्यामुळे अस बोलली मी, आणि कोणावर विनाकारण अन्याय होईल असं तुम्ही काही करणार नाही हे माहीत आहे मला..."

"तसं नाही ग, तुझी मैत्री गमवायची नाहिये मला, त्यामुळे असं वाटलं की ड्युटी निभावता निभावता तुला दुखावलं तर नाही ना मी?? पण कर्तव्य ही पार पडावी लागणार मला...."

"कळतं मला सगळं, मी बोलली ना, तुमच्या कामाच्या मध्ये मी येणार नाही फक्त विक्रमचा जीव सुखरूप असला पाहिजे..."

"बरं माते.. इतकं सिरिअस कधी राहिलो नाही ना, आता नॉर्मल होतो नाहीतर तुझ्यासारखा निरुपा रॉय होईल मी😂😂.."

"हो, आणि मला कॉपी केलेलं आवडत नाही...😜"

"हो ते करायलाही नको..एक मिनिटं , ते कॉपी वरून आठवलं, आता तू ज्या कवितेच्या ओळी बोलली त्या कुठून वाचल्या तू...? म्हणजे...."

"म्हणजे..वाघाचे पंजे...😂😂, तुमचं ते तिकीट माझ्याकडे आलं चुकूनआणि मी ते वाचलं...तुम्हाला आठवते आपली पहिली भेट, आपल्या कॉलेजमध्ये.. पास समजून तुम्ही ते दिलं मला..."

"ओहहह असं झालं...आणि मी कुठे कुठे शोधलं ते काय माहीत, पण आता ते व्यवस्थित असेल तर मला परत देशील प्लिज...मग सांगेल तुला त्यामागची कहाणी...."

मला तर तेंव्हा अभय सरांची बाजू पटली होती आणि मान्य ही होती, रक्षकच भक्षक व्हायला लागले तर कस व्हायचं, म्हणुन विक्रमला शिक्षा भेटणं ही गरजेचं होतं.... पण हा विचार फक्त मी करत होती...विक्रमला जेंव्हा हे माहीत होणार तेंव्हा तो काय करेल याचा अंदाज नव्हता मला, पण मी त्याच्या भल्यासाठीच विचार करते हेही कुठे पटणार होतं विक्रमला....
----------------------------------------------------
मी अभय सरांना भेटून आल्यापासुन माझं सगळं लक्ष विक्रमवर होतं, त्याच्या चेहऱ्यावरून तो नक्कीच चिंतेत दिसायचा, त्याला पाहून वाईट ही वाटायचं, पण कर्माची फळं बोलतो ना आपण?? ती इथेच भोगावी लागतात आणि आपण काय करतो, कसं वागतो त्याचा मोबदला आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळतोच..मी विक्रमला शक्य तेवढा मानसिक आधार द्यायक तयार होती पण त्यातही त्याला वाटलं की मला काय कळतं किंवा माझ्याकडे तेवढी अक्कल नाही...तरी एक दिवस मी स्वतःच त्याला बोलायला सुरुवात केली..

"तुम्हाला काय झालंय विक्रम??? काही अडचण आहे का?? गेले काही दिवस तुम्ही चिंतेत दिसताय, मला सांगावं वाटलं तर सांगा..."

"हम्मम..जाऊदे तुला त्यातलं काही कळणार नाही, तुझ्या बुद्धीच्या पलीकडली गोष्ट आहे ती..."

"तुम्ही सांगून तर पहा..."

"काय सांगू??? या दुनियेत कोणता व्यक्ती धुतल्या तंदुळासारखा शुभ्र आहे, आणि तरीपण सक्तीची रजा फक्त मलाच का?? चांगला ओळखतो त्या अभयला, मोठा हात मारायचा असेल त्याला त्यामुळे या केसवरुन मला हटवण्यात आलंय..."

"पण विक्रम, काही चूक तुमच्या कडूनही झालीच असेल ना, आणि डिपार्टमेंट म्हणजे फक्त अभय सर होत नाहीत ना?? बाकीचे सनीअर्स पण असतील त्यात...मी तुम्हाला आधीही बोलली होती नका करू चुकीचे काम काही..पण तुम्ही..."

"झालं तुझं सुरू...तू मला मानसिक आधार द्यायला बोलते की मानसिक त्रास द्यायला ग?? तू ना गप्पच राहत जा बरं... नको तिथे हुशाऱ्या शिकवायच्या नाही मला..."

विक्रम असं बोलल्यावर मला त्याला काही बोलायची किंवा समजवण्याची इच्छाच व्हायची नाही..पण तो ज्याप्रमाणे माझा अपमान करायचा आणि मी ते सहन करायची त्याचा उद्रेक ही कधी ना कधी होणारच होता...पण मी ते सगळं विसरून फक्त माझ्या पूर्वपरीक्षेचा निकालाची वाट पाहत होती..आणि एक दिवस माझ्या मोबाईल वर अभय सरांचा मॅसेज होता की मी पूर्वपरीक्षा पास झाली आहे..माझा आनंद गगणेत मावत नव्हता..मला अभय सरांना खूप धन्यवाद द्यायचे होते जे त्यांनी मला इतकी मदत केली, प्रोत्साहन दिलं...आणि मला बातमी विक्रमला ही द्यायची होती, ज्याने मला परीक्षा द्यायला मंजुरी दिली होती...खूप आनंद वाटत होता, तशी तर फक्त पूर्व परीक्षाच पास झाली होती मी, पण काही आत्मविश्वास नसताना पहिल्याच प्रयत्नात झाली त्यामुळे आनंद वाहत होता...

हा आनंद मला विक्रम सोबत वाटावा वाटत होता त्यामुळे मी लगेच त्याच्याजवळ गेली आणि त्याला सांगून दिलं मी, आज वाटत होतं की विक्रम माझ्यासाठी मनातून आनंदी होईल... मी त्याला सांगितल्यावर त्याने एक छान हास्य देऊन मला विचारलं,

"आज तू खुप खुश असशील नैना ?? मला तुला काहितरी द्यावं वाटत आहे तुझ्या ह्या यशाबद्दल.."

मला ही खूप छान वाटलं जेंव्हा विक्रम असा बोलला, आणि मी खूप उत्साहाने त्याला विचारलं,
"काय??..."

आणि मी असं विचारल्यावर काही क्षणांसाठी माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली, काही समजलंच नाही काय झालं??? कारण विक्रमने एक झोरदार तमाचा माझ्या गालावर ठेवून दिला होता...मला काही कळत नव्हतं का केलं विक्रमने असं, माझ्या माझा एक हात गालावर होता आणि निरंतर अश्रु वाटत होते...मला त्याचे फक्त शेवटचे काही शब्द ऐकू आले..

"अजून हवंय नैना..."

मला काहीच कळत नव्हतं का विक्रमने असं केलं असेल, एवढी मोठी काय चूक केली होती मी, आता मात्र याचं उत्तर विक्रमचं देणार होता...
---------/-----------------------------------------------–------
क्रमशः