Tu Hi re majha Mitwa - 26 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 26

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_२६

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

“बाळा,तुला सवय नाहीये मुंबईच्या fast लाईफची,पुन्हा विचार कर,सोडून दे हा प्रोजेक्ट,आहे ते काम ठीक आहे ”

प्रोजेक्टसाठी तिचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यासाठी सहा महिने मुंबईला राहणं भाग होतं.
आईच्या बोलण्यातली काळजी तिला जाणवत होती, कळून येत होती.

“नको काळजी करू राहील ती व्यवस्थित,she is strong girl,हो ना बेटा?” बाबादेखील स्वतःलाच दिलासा देत असल्यासारखे बोलले.

“आई बाबा तुम्ही दोघंही काळजी करू नका,I am ok.असं कितीसं दूर आहे मुंबई पुण्यापासून? I will take care.कंपनीचं हॉस्टेल आहे,मेस आहे आणि आई मला travel करायचंच नाहीये,वीस मिनिटांवर तर ऑफिस आहे don’t worry.असे निघून जातील बघ हे सहा महिने.” तिने त्यांना दिलासा दिला.

“आई बाबा निघायचं? उशीर होईल घरी जायला आणि मी दर महिन्याला भेटायला येईल तिला, काळजी करू नका,लहान आहे का ती.” रीमा हसत म्हणाली.

तिला त्याच त्याच सूचना पुन्हा पुन्हा देत जड मनाने तिचे आईबाबा गाडीत बसले.

“ऋतू,मी म्हणणार नाही की जे झालं ते विसरून जा वैगरे,माहितीय मला इतकं सोप्प नसतं ते पण आपण प्रयत्न तर करूच शकतो ना?आणि हे इतकं निरुत्साही मनाने नवीन कामाला सुरुवात करणार आहे का? यासाठी आईबाबांना किती मनवावं लागलंय माझं मला माहिती.मन लावून काम कर, अभय आणि मी येईल नेक्स्ट विकेंडला भेटायला, ओके?”

“हो” कसबसं स्वतःला सांभाळून तिने ताईला मिठी मारली.

ऋतूला सोडून ते निघाले.ते निघून गेल्यावर मात्र एकटेपणा अंगावर यायला लागला.आई आणि रीमाताईच्या मदतीने रुममध्ये सामान व्यवस्थित लावलं गेलं होतं.तिच्या समोरच्या बाजूला अजून एकीचं सामान होतं,तिच्या कॅबिनेटला बुराक डेनिजचं एक मोठ्ठ् पोस्टर,टेबलावर तिचा,बुराकचा आणि तिचे आईवडील असावे असा चार जणांची एक कम्बाईन फोटोफ्रेम होती.
तिला खुदकन हसू आलं.
कितीतरी वेळा पूर्ण रूमवर नजर टाकून ती पुन्हा रिकाम्या नजरेने आजूबाजूला बघत होती.
तनुप्रियाची प्रकर्षाने आठवण येत होती.त्यांच्या आठवणीने तिचे डोळे भरून आले,मग त्यांच्याशी फोन वर बोलून ही झालं तरी बेचैनी पाठ सोडत नव्हती.
तिच्या बेडला लागून ग्रील असलेली मोठी खिडकी होती,ती कठड्यावर डोकं टेकून दूरवर नजर लावत शांत बसली. मागच्या काही दिवसांमधल्या घडामोडी डोळ्यांसमोर तरळत होत्या...नकोसे काही प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होते,विशेषतः इथे येण्यापूर्वी वेद बोलला ते--
प्रपोझल सबमिट केल्यानंतर दोन दिवसांनी तिला सिलेक्शनचा मेल आला होता, दीड तासाच्या टेलिफोनिक इंटरव्ह्यूनंतर पुन्हा दोन दिवस लागले होते प्रोजेक्ट कन्फर्म व्हायला. त्या पूर्ण आठवड्यात वेदसमोर आल्यावर होणारी घालमेल,awkward सिच्युएशन,दोघांचं बिनसलं असल्याची,ब्रेकअपची मित्रांमध्ये होणारी चर्चा सगळं नकोसं झालं होतं.
प्रोजेक्ट कन्फर्म झाल्यावर आठवड्याच्या आत तिला मुंबईब्रांचला रिपोर्ट करायचं होतं.वेद फोन उचलत नव्हता की मेसेजेस वाचत नव्हता. रेवाकडून ऋतू मुंबईला जाणार असल्याची माहिती मात्र त्याला मिळाली होती.

त्यादिवशी त्याने तिला पार्किंगमध्ये थांबवलं-

“हे असं अचानक प्रोजेक्ट शिफ्ट करायचं काही विशेष कारण की मला फेस करायची हिम्मत होत नाहीये?"

त्याने तिचा हात करकचून पकडला,ती दुखावली गेली.

"वेद प्लिज "

"गिल्ट येत असेल नाही का? who is that guy ? What’s his name ..aammmm Kabir ,yes Mr. Kabir,तो ही शिफ्ट होतोय का मुंबईला? तिथे बऱ्यापैकी प्रायव्हसी मिळेल आणि गिल्टदेखील येणार नाही.sorry just out of curiosity विचारतोय.”
तिचा हात झटकून तो उपहासाने म्हणाला.

“वेद प्लीज.जरावेळ शांततेत बोलूया का?” ती रडवेली झाली.

“सॉरी..त्याचं काय आहे वेळ नाहीये माझ्याकडे,आमच्यासारख्या एम्प्लॉयीला सतत prove करावं लागतं स्वतःला.कुणाच्या मेहेरबानीवर,शिफारसीवर असे एलिट प्रोजेक्ट मिळवायचं कसब नसतं सगळ्यांकडे,हो की नाही.Never mind,काळजी घे,बेस्ट लक,वर्क हार्ड.तशी अगदीच हार्डवर्कची गरज नाहीये तिथेही एखादा आरुष नाहीतर कबीर असेलच की, आरुषमुळे मिळाला न हा प्रोजेक्ट? कॉफी ऑर स्वीटकॉफी विथ आरुष हा? ”
तो रागाने अगदी लाल झाला होता, त्याचं एक एक वाक्य तिच्या काळजाला छेद करत होते.

"वेद काय बोलतोय? जरा ऐकून घे ना "

ती परोपरीने विनवत होती पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच ,तो निघून गेला पण बराचवेळ ती त्याचं हे टोकाचं बोलणं आठवून डोळे पुसत उभी होती.

ती तीच जागा होती जिथे त्याने पहिल्यांदा तिला गाडीसकट सावरलं होतं आणि आज तोच तिला असं विस्कटून निघून गेला होता.त्याचं चिडणं न ती स्वीकारू शकत होती न नाकारू शकत होती. हे सगळं आठवून भरून आलेले डोळे तिने टिपले.

जरावेळाने रूमचा दरवाजा धाडकन उघडला गेला. ऋतू विचारांमधून एकदम बाहेर आली.तिने गोंधळून समोर बघितलं-उंच,गोरटेली,शिडशिडीत,गाल जरा बसलेले,घारे डोळे,दाट कुरळ्या केसांची उंच पोनी बांधलेली तरीही मागे पिसार्यासारखे फुललेले केस,डीपनेक टॉप आणि जीन्स.
तिने आत आल्या आल्या शूज तिच्या कपाटाकडे भिरकावले आणि ऋतूकडे बघून मोठ्ठ स्माईल दिलं.

“हाय...” खूप दिवसांपासून ओळख असल्यासारखं तिने ऋतूला ग्रीट केलं.

“हाय” ऋतूने पटकन डोळे पुसले आणि तिला हसून ग्रीट केलं.

“मी मोनाली साठे फ्रॉम नासिक And if I am correct you are ऋतुजा मोहिते from Pune…?”

“Yes, correct.”

“ऑफिसमध्येच कळलं होतं.मी इथेच मेन ऑफिसला ग्राफिक्स डिझाईनर ट्रेनी आहे.By the way ,we are in same team. Support staff for this project.”

“ओह्ह ,thank god ,मला टेन्शन आलं होतं की मी कसं मॅनेज करणार पण एका टीममध्ये आहोत म्हणजे इतर बरीच हेल्प होईल.” ऋतूला जरा हायसं वाटलं.

“Yes of course, तुला सांगते ह्या प्रोजेक्टची कोअर टीम किलर आहे..बेक्कार एकदम... म्हणजे ज-ब-राय. खूप काम असणार आहे, सो वेळ मिळेल न मिळेल म्हणून आता फ्रेंड्ससोबत चिल मारलं,शॉपिंग केली & Now i am ready to get ****off. So are you all set n ready to get f **off? …sorry I mean are you just ready?” खुर्ची ओढून तिच्यासमोर बसत ती म्हणाली.

“Yes but ..little bit nervous too. Monali listen…”

“ohh ohh hold on ..Monali ? नो वे call me Mona ?

“ओके.. मोना.. I was too tensed but तुझ्याशी बोलून छान वाटलं.”

मोनाचा मोकळा स्वभाव बघून ती जरा सैलावली,मघाशी आलेली बैचेनी जरा दूर झाली होती.

“मलाही खूप आनंद झालाय,खूप बोर झालेलं रुममध्ये एकटं राहून,डेनिझशी तरी किती बोलणार?” डोळा मारत ती म्हणाली.

“तू बुराक डेनिझची जबरा वैगरे fan आहेस वाटतं?” ऋतूने हसून विचारलं.

“फॅन? He is my Darling…सो तुला आमच्या दोघांमध्ये इथे लिव्ह इनमध्ये रहावं लागणार आहे.”

दोघीही खळखळून हसल्या.मोनाने ऋतूला उत्सुकतेने फिरून पूर्ण हॉस्टेल दाखवलं.जेवतांनाही गप्पा रंगल्या होत्या नंतर रात्र देखील गप्पांमध्ये कशी निघून गेली दोघींना कळलं नाही.

येणारे दिवस, नवी उमेद, नवीन काम , नवीन लोकं जोडणार होते.अंधार सरत चालला होता.

*************

आज मोनाने खूप आग्रह केला पण ऋतुने तिच्या मुव्ही-डिनर प्लॅनला नाही म्हटलं.
एकवेळ तिच्या आवडीचं असणारं हॅपनिंग लाईफ तिला आता नकोसं झालं होतं.उद्या तिचा ऑफिसचा पहिला दिवस असल्याने जरा दडपण आलेलं होतं. स्वतःसोबत राहावं असं तिला वाटत होतं.मोना निघून गेली.ती खिडकीला टेकून बाहेर बघत बसली.

ती आता एकटी होती-

दूरवर नजर जाईल तिथपर्यंत असंख्य काजवे चमकत असल्यासारखं शहर दिसत होतं.बाहेरचा आणि मनातला कोलाहल केव्हांच मिसळून एक झालेला. ती कोरडेपणाने सगळं न्याहाळत होती,जरा गरगरायला झालं तसं तिने खिडकीची काच ओढून घेतली.
बाहेरचा कोलाहल विरल्यासारखा झाला.तिने दीर्घ श्वास घेतला, कुठलातरी ओळखीचा सुगंध श्वासात भरून उरला.आजूबाजूला कुणीही नसतांना गच्च शांततेतही कानांवर ओळखीचा आवाज येत होता.

मन अगदी शांत झाल्यासारखं वाटलं,तिने डोळे मिटले
"-- पण ही शांतता खरंच हवी आहे का? ही शांतता आरसा दाखवते आणि मग सगळं स्पष्ट दिसतं काय हवं काय नको ते....आणि आता कुठलंच सत्य स्वीकारायची ताकद नाहीये.कबीर आयुष्यात आल्यापासून ह्या शांततेची भीती वाटायला लागलीय,मन काहीतरी अतर्क्य,असबंध बोलेल आणि आणि? नकोच ही शांतता . मनाच्याजवळ ही जायला नको....आणि असंही वेदच्या आठवणीने पहिल्यांदा हीच तगमग अनुभवली होती..हो ही बेचैनी त्याच्या दुराव्यामुळेच येतेय ..हो असंच आहे.”

तिने स्वतःची समजूत काढली.ती घाबरली होती. मन दाखवत असलेलं सत्य मान्य करायचं नसतं तेव्हा आपण आपलंच खरं करण्यासाठी कारणं शोधतो आणि आणि स्वतःची समजूत काढतो.

तिने स्वतःची समजूत काढली.

तिची चलबिचल वाढली..दूरवरून हाक ऐकू येतेय...कोण?
माहीत नाही! अगदी दूरवरून कुणीतरी आर्त पण अस्पष्ट हाक देतंय,आठवण काढतंय..---‘सहेला रे....!!’ की अजून कुठली बंदिश जिच्यामुळे हे दुःखसुद्धा नक्षीदार झालंय.

एक व्हॉईड ,अर्थपूर्ण शून्य,जीवाची तगमग, ऐक ना ,शांततेचा आवाज ,नाद , वास सगळं नकोसं झालंय ...दूरवर कोण साद घालतंय?

**********************

नीलाद्री नगर,बेंगलोर, Concorde manhattans apartment च्या १६व्या मजल्यावरचा त्याचा flat आणि ह्या flat ची बाल्कनी म्हणजे कबीरचा विकपॉइंट.

पहाटे पहाटे सैलसर धुक्याच्या अमलाखाली असलेलं आणि रात्री आकाशातल्या चांदण्या विखरून पडल्यासारखं चमचमणारं संपूर्ण नीलाद्री नगर ह्या बाल्कनीतून बघायचा आनंदच वेगळा होता.
बंगलोर ऑफिस त्याच्यासाठी नवीन नव्हतच,करियरचा सुरवातीचा काळ त्याने इथेच घालवला होता आणि दोनवर्षांपूर्वीही एका short span assignment साठी यावं लागलं होतं.
ऑफिस जॉईन करून काही दिवस झाले होते तरी चित्त थाऱ्यावर नव्हतं. मग उगाच उशिरापर्यंत तो काम करत असायचा,स्मोकिंग झोनकडच्या फेऱ्या वाढल्या होत्या,मिटींग्स,कॉल्स संपू नये एवढंच त्याला वाटत होतं. रात्रीचं जेवण तिथेच कॅन्टीनमध्ये करून तो उशिरा घरी परतायचा.
पहिल्यासारखं बाल्कनीत तासंतास बसायला आताश्या त्याला भीती वाटत होती,त्याला माहित होतं,जरा मनाला एकांत मिळायचा अवकाश की तिच्या भेटीची ओढ लागणार.

आज मात्र ऑफिसही नव्हतं.पूर्ण दिवस उगाच काहीतरी काम काढत त्याने मन गुंतवलं होतं पण आतश्या मन असंच कुठेतरी अर्धवट जाणिवांच्या तुकड्यात विखुरल्यासारखं झालेलं, दिवसागणिक वाढत जाणारा तिच्या प्रेमाचा कैफ तो नाकारू शकत नव्हताच. जगाच्या लेखी कुठेच नसणारं त्याचं प्रेम ,स्वतःचं काहीतरी स्वतः हरवून विकत घेतलेली जीवघेणी वेदना कुणाला कळणार ही नाही असं काहीतरी, अस्वस्थ करणारी काळीजकळ!
आजची ही शांत संध्याकाळ मात्र तो जाणीवपूर्वक त्या बाल्कनीतून अनुभवत होता.तिच्यासारख्याच अवखळ असलेल्या तिच्या आठवणीत त्याला विरघळून जावसं वाटत होतं. हळूहळू वेढणारी कातरवेळ त्याला थेट त्यादिवशीच्या सांजवेळेला जोडून गेली अगदी त्याच्याही नकळत आणि तो त्याचाच राहिला नाही.

पूर्ण घरात अंधार,टेबलवर सौम्यपणे जळत असलेली मेणबत्ती बाहेर दूरपर्यंत पसरलेली दिव्यांची चादर ..आणि उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कुणालातरी आठवायला भाग पाडणारा,व्याकूळ करणारा आणि हृदयापासून हृदयाला साद घालणारा आवाज.
हा जो मंद वारा वाहतोय त्यावरदेखील त्यांच्या आवाजाची भूल पडलीय,

“पिया बिन नाही आवत चैन...”

आर्त बंदिश त्याचं मन हळूहळू काबीज करत होती.

“खाँसाहेब ही कुठली जीवघेणी बंदिश गाताय तुम्ही? तुम्ही कसा पकडला हा जगायला मजबूर करणारा पॉइझनस क्षण शब्दांत आणि मिसळून टाकला ह्या स्वरांमध्ये? एकतर्फी प्रेमाच्या एकतर्फी विरहात जहर असतं.कातिल जहर!
परतीचा एक ही निरोप येणार नाहीये हे पक्क माहित असलेला मी तिच्या पावलांची चाहूल मागतोय विनाकारण! एक क्षण देखील नजरेआड होत नाहीये ती आणि अश्या ह्या एकाकी,काळीजवेळा तर जास्त बैचेन करतात खाँसाहेब ....!!
ज्या प्रेमाने आयुष्यात फक्त दुःखच मिळतं अश्या प्रेमाची इतकी का ओढ असते? का जगतात लोकं ह्या सावल्यांच्या दंतकथा? का यावं असं अचानक कुणीतरी आणि आपण ही हसत हसत विस्कटायला तयार व्हावं? का श्वासांइतकं कुणी गरजेच व्हावं आणि त्याला ते माहीत ही नसावं ...?

प्रेमात पडल्यावर ‘का?’ हा प्रश्न विचारायचा नसतो ना खाँसाहेब....?”

रात्र उशाशी घेऊन हळूहळू शहर शांत होत होतं....ग्लासातली रम घसा जाळत,आठवणी उजळवत आता रक्तात भिनली तशी हळूहळू सगळं भोवताल धूसर होत गेलं.....प्रेमाच्या पूर्ण आणि रमच्या अर्धवट नशेत विस्कटलेल्या स्वप्नांचे कोलाज बनत होते...पुन्हा विस्कटत होते ..पुन्हा बनत होते ह्या वर्तुळाला अंत नसतो,

.....तरीही ,तरीही विरहात असणारं दुःख इतकं गोड आणि जहरीलं का असतं खाँसाहेब?

**************

#क्रमशः

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.