Ardhantar - 23 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - २३

"कुछ इस कदर जिंदगी ने,
आईना दिखाया है मुझे।
अपनो ने ठुकराया और,
गैरो ने संभाला है मुझे।"


माझं हे मानणं आहे, आपल्या रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त काही नाते असे असतात जे रक्ताच्या नात्यापेक्षा ही जड ठरतात...रक्त कितीही घट्ट असलं, तरी हे जे मनाचे ऋणानुबंध असतात ते त्या रक्ताची भिंत तोडून, मनाला छेदून आत्म्यापर्यंत पोहोचतात.. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक नातं तरी असतं हा माझा समज, नव्हे, विश्वास आहे...कधी ते नातं आपल्याला मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये भेटतं, कधी आपल्या सहकाऱ्यांमध्ये, तर कधी आपले गुरुवर्य या नात्याची जाणीव करून देतात आपल्याला, असे नाते आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, पदोपदी आपलं मार्गदर्शन करतात, आपल्याला बळ देतात, फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे..मला असंच नातं अभय सरांमध्ये सापडलं होतं...माझ्या कठीण काळात जेंव्हा माझ्या घरचे दरवाजेही माझ्यासाठी बंद झाले होते तेंव्हा अभय सरांनी मला आधार दिला....

तसं पाहिलं तर ओळख होती किती आमची?? पण तरीही माझ्या चांगल्या वाईट काळात मला धीर दिला त्यांनी, माझ्यावर ते काही उपकार करत आहे याची जाणीव न करून देता माझ्या प्रत्येक अडचणीला धावून आले...का?? कारण एकच होतं, त्यांनी त्यांचे दिलेले शब्द कधीच मागे घेतले नाही...मी लहान असतांना बाबांचे काही शब्द आठवतात मला, बाबा बोलायचे, "जो व्यक्ती आपले बोललेले शब्द फिरवतो, ज्याला आपण दिलेले वचन पाळता येत नाही त्याच्यासाठी दुसऱ्यांची काही किंमत नसते, आणि अश्या व्यक्तिने कितीही आश्वासने दिली तरी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला संधी देणं म्हणजे मूर्खपणा आहे निव्वळ... ज्याला आपल्या शब्दांची किंमत असते तो कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाही..."

जेंव्हा जेंव्हा बाबांचे हे बोलणे आठवायचे अभय सर त्या कसोटीवर खरे उतरायचे, त्यांना त्यांच्या शब्दांची किंमत होती, जसं त्यांना स्वतःच्या वेळेची किंमत होती तशी दुसऱ्यांच्या वेळेचीही होती आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरचा माझा विश्वास दृढ करायला पुरेशा होत्या आणि यामुळेच माझ्या मनात त्यांच्या विषयी नितांत आदर होता...बाबा म्हणायचे कोणत्याही नात्यात आदर असला पाहिजे, प्रेम नसलं तरी..कोणाचा राग ही असेल तरी त्या रागात त्या व्यक्तीचा आदर कमी होता कामा नये, पण जेंव्हा विक्रमला आठवते, तेंव्हा हेच कळते की आमच्या नात्यात आदर कधीच नव्हता आणि त्यामुळेच माझा त्याच्यावरचा राग तिरस्कारात बदलत होता..आणि माझ्या पेटीशन ला त्याचं आलेलं प्रतिउत्तर, माझा हा तिरस्कार अजून वाढवत होता किंवा असं म्हणेल की तो माझ्या नजरेतून उतरला होता... आणि कोणी मनातून उतरलं तर चालेल पण जर कोणी नजरेतून उतरलं तर त्याचा काहीच मान राहत नाही असं मला वाटते...

माझ्या पेटीशन च्या उत्तरात विक्रमने जे लिहून पाठवलं होत, त्यात तो फक्त मला नमवण्यासाठी आणि स्वतःचा अहंकार शाबूत ठेवण्यासाठी कोणत्या पातळीवर जाऊ शकतो हेच दिसत होतं...त्याने सरळ सरळ माझ्या चरित्रावर चिखलफेक केली होती, त्यात त्याने लिहिलं होतं की माझ्या आयुष्यात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही पुरुष आहेत, त्याने मला वारंवार संधी देऊनही मी त्याचं विश्वासघात करत राहिली आणि त्याला सोडून मी या आधीही माहेरी जाऊन बसली होती, आणि तरीही त्याने मला समज देऊन सोबत आणलं, मी माझ्या आईवडिलांचं ही ऐकत नाही, त्याच्या ही आईवडिलांचा सतत अपमान करत असते, त्याच्याशी नेहमी वाद घालत असते आणि राहिला प्रश्न गर्भपाताचा तर बाळाची वाढ होत नव्हती त्यामुळे केला, ज्याचे त्याच्याजवळ पुरावेही आहेत...मला त्याचं पेटीशन वाचायला जड जात होतं पण त्याचे मुद्दे काही संपत नव्हते, एवढे घणाघाती आरोप त्याने केले होते...साधं कोणी आवाज चढवून जरी बोललं तरी डोळ्यात पाणी आणणारी मी, आता इतके तुच्छ आरोप चार लोकांसमोर कसे सहन करायचे हा विचार करून माझे हातपाय गळत होते आणि ते सगळं वाचून मला असं वाटत होतं की मी हरत आहे, माझ्या आतमध्ये जी हिम्मत बांधून मी ठेवली होती ती तुटत आहे, यावर काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं...त्यादिवशी मला माझे वकील त्यावर बऱ्याच गोष्टी सुचवत होते पण माझी काही ऐकण्याची मनस्थिती नव्हती, मी फोन बंद करून बसली... अभय सर मला फोन करत असतील पण तो बंद असल्याने त्यांना मला बोलता आलं नाही.. त्या रात्री मला न जेवायची इच्छा झाली न झोप आली चांगली...

दुसऱ्या दिवशी मी सगळ्या ट्यूशन ही बंद ठेवल्या होत्या, अश्या मनस्थितीत मुलांना काही चुकीचं शिकवणं मला पटत नव्हतं...सकाळपासून चार वेळा मुलं येऊन विचारून गेली होती का ट्यूशन बंद आहे, पण त्या नासमज, कोवळ्या मुलांना कारण तरी काय सांगू हे कळत नव्हतं, त्यात आजच त्यांचा माझ्यासोबत मस्तीचा मूड होता पण माझी तर त्यात खूप चिडचिड झाली होती, कारण मनस्थितीच जागेवर नव्हती...आता पाचव्यांदा दार वाजत होतं, आता मात्र माझा पारा अजून चढला, आता त्या खोडकर मुलांना चांगलंच रागवायचं म्हणून उगाच हाती काठी घेऊन मी दार उघडल्या उघडल्या बोलली,
"पुन्हा आले तुम्ही..." आणि समोर बघते तर काय अभय सर उभे होते..माझा हा चिडलेला अवतार आणि हातात काठी बघून ते बोलले,
"बाप रे! हिंसा...ही गांधीगिरी दादागिरी मध्ये कशी बदलली...म्हणजे त्या बिचाऱ्या लहान मुलांना काय काय सहन करावं लागत असेल, भारताची भावी पिढी किती पीडा सहन करत आहे🤣🤣"

त्यांना बघून मला जरा ओशाळल्यागत झालं, आणि मी काही न बोलता आतमध्ये येऊन बसली..मला पाहून पुन्हा अभय सर बोलले,

"तू टेन्शन नको घेऊ, तुझी दादागिरी, सॉरी, दिदीगिरी कोणालाच सांगणार नाही मी😁😁😁"
पण आज माझा हसण्याचा अजिबात मूड नव्हता, मला शांत बघून ते पुन्हा बोलले,

"बरं, तुला तर हसण्यावर टॅक्स लागत असेल, पण बोलण्यावर तर नाही ना..फोन का बंद करून ठेवलाय ते सांग, मी आणि वकील किती फोन लावत आहोत तुला कालपासून..."

"ते...मला केस मागे घ्यायची आहे, मला नाही कळत हे कोर्ट कचेरी, आणि मला नकोय अश्याप्रकारे घटस्फोट वैगरे, मला नाही करता येत हे सगळं..."

"काय???? नकोय म्हणजे?? काय झालं सांगशील तरी?"

"काय सांगू? तुम्हाला सांगितलं नाही वकिलाने, विक्रमने काय काय लिहून पाठवलं आहे?? जे कौतुक विक्रमने त्याच्या पेटीशन मध्ये केलं आहे, मी तशी आहे का??? लग्न होईपर्यंत हेच ऐकलं होतं, लग्न खूप पवित्र बंधन आहे, सात जन्माच्या गाठी आहेत, वैगरे वैगरे...ही आहे त्याची पवित्रता, एकमेकांपासून दूर होण्यासाठी नको ते लांच्छनं लावायची, इतकं की माणुसकी ही विसरून जायची...त्याचे हे आरोप पाहून उद्या माझेच लोकं माझ्या तोंडाला काळं फासून जातील, मी नाही लढू शकत ही लढाई...माझ्याने नाही होत हा खेळ आता..."

"हो, प........" अभय सर काही बोलणार तेवढ्यात मी त्यांना गप्प बसवत पुन्हा माझं भाषण सुरू केलं...

"हो हो, माहीत आहे आता तुम्ही काय बोलणार, be strong , इतक्या सहजासहजी तू अशी हार नको मानू, हिम्मत ठेव, राग करून रडून माणूस कमजोर होतो, आणि माहीत नाही अजून काय अलाना फलाना...मला नाही राहता येत भावनाशून्य, प्रत्येक वेळी मी नाही ठेवू शकत स्वतःला इतकं कणखर...मला नाही जिंकता येत ही लढाई..."
आणि आता इतकं बोलल्यावर मला अश्रू अनावर झाले आणि मी दोन्ही हाताने माझा चेहरा झाकून रडायला लागाली...

"पण मला हे सगळं बोलायचं नव्हतंच नैना...तू माझं पूर्ण ऐकूनही घेतलं नाही आणि तुझंच सुरू केलं.."
त्यांच्या अश्या बोलण्यावर मी आश्चर्याने त्यांच्या कडे पाहून बोलली,

"मग काय बोलायचं होतं...?"

"आता इथे नाही, चल बाहेर जाऊ कुठे, मग सांगतो..."

अभय सर मला गावापासून 2 किलोमीटर बाहेर घेवून गेले, ते शेत असावं कोणाचं, संत्र्याच्या बागा होत्या कोणाच्या, तिथे रास्ताच्या कडेला गाडी लावल्यावर, मी बोलली,

"कुठे आलोत आपण??"

"तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला..."

"म्हणजे???" आता अभय सरांनी बोलायला सुरुवात केली,

"मी सात आठ वर्षांचा असेल जेंव्हा माझे बाबा सोडून गेले मला, ही बाग, हे शेत कधीकाळी माझ्या बाबांचं होतं, पण व्यसनाच्या नादी लागून सगळं काही गमावलं, त्यात कर्जाचा डोंगर, भावकीतली भांडणं, याला कंटाळुन दिला जीव त्यांनी...आईने खूप वेळा त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला, सगळं काही सावरण्यासाठी खूप प्रयत्न ही केले पण त्यांचा पुरुषी अहंकार आडवा येत होता, बायकोचं कशाला ऐकायचं ही मानसिकता त्यांची... आणि अस करून सगळं काही गमावत गेले, एक दिवस जेंव्हा
त्यांना या अडचणी जीवावर आल्या, त्यांनी जीवच दिला..ते तर निघून गेले, पण आईला दुनियेचे कष्ट देऊन गेले...पण अशिक्षित असलेल्या माझ्या आईने जीव नाही दिला नैना, ती माझ्यासाठी पुन्हा जोमाने उठून लढली, तिला तर तेंव्हा कोणत्या वकिलाची मदतही मिळाली नाही..आणि माहीत नाही किती अन काय कष्ट केले असतील तिने, पण मला एकच शिकवण दिली की आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचं, त्याच्या आहारी नाही...कधी कधी तिलाही अश्रू अनावर व्हायचे, तुला काय वाटतं, जगाने तिला कधी नावं ठेवलीच नसतील? तिला वाईट नजरेने बघितलंच नसेल?? एकटी स्त्री म्हणून तिच्यावर लांच्छन लागलेच नसतील?? पण तरीही त्या परिस्थितीला तिने स्वतःची कमजोरी बनू दिली नाही, आणि आज मी जिथे आहे जो आहे हे तिच्याच सामर्थ्याचं फलित आहे..."

"खूपच सामर्थ्य आहे आईमध्ये..मानलं पाहिजे...."

"नाही... तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय मी...,सामर्थ्य असण्यात आणि धैर्य असण्यात खुप फरक आहे...नुसतंच सामर्थ्य असण्यात काय फायदा नैना, कारण सामर्थ्य खूप वेळा तुमच्या भावनांची कदर करत नाही, नुसतंच जिंकायचं असेल तर सामर्थ्य लागते पण वारंवार हरल्यावरही जिंकायचं असेल तर धैर्य लागते...आयुष्य काही कोणती पैज नाही नैना, किंवा तुझी UPSC ची परीक्षा नाही की एकदा पास होऊन पोस्ट मिळवली म्हणजे आयुष्यभर कमवून खायचं... इथे रोज एक परीक्षा असते, कधी आपण पास होणार तर कधी फेल, कधी कधी रडायला ही येणार, सगळं काही हरवल्याची भावना ही येणार पण या सगळ्या गोष्टींवर मात देण्यासाठी नुसतंच सामर्थ्य असून जमत नाही, धैर्य ही लागते...माझी आई अशिक्षित होती नैना, तिला कोणाचा आधार काय साथ ही मिळाली नाही, तरीही ती जगलीच आणि माझ्या सारखा IPS मुलगा बनवला...माझ्या आईच संघर्ष बघून मला एकच वाटते नैना, या जगात प्रत्येक स्त्री मध्ये अशी शक्ती लपलेली असते फक्त तिला त्याची जाणीव व्हायला हवी, आणि त्यामुळेच मला वाटते की तुही खूप प्रबळ आहेस पण तरीही तुला मी लढ, खूप स्ट्रॉंग रहा किंवा रडू नको असं काहीही बोलणार नाही, तुझं आयुष्य आहे, निर्णय ही तुझेच असतील पण तु इतकी शिकलेली आहेस, थोडीफार दुनियादारी ही कळते, माझ्यासारखे फालतू जोक्स मारणारे मित्र ही आहेत तुझ्याजवळ, तर तुला असं नाही वाटत का, माझ्या आईपेक्षा तुझी परिस्थिती थोडी चांगलीच आहे ....."

आणि बोलता बोलता त्यांनी माझ्यावर नजर रोखली, माझे भाव टिपण्याचा प्रयत्न असावा त्यांचा, मलाही कळत होतं त्यांना नक्की काय सांगायचं आहे, मी बोलली,

"काय बघताय असं?? हेच ना की मला यातून काय बोध मिळाला, हे सगळं ऐकल्यावर माझा निर्णय काय असेल पुढचा??"

"नाही, मला तुझा निर्णय काय असेल याची चिंता नाही नैना, पण हे तुझं असं भावनिक दृष्टीने खचुन जाणं तुझ्या साठीच घातक ठरू शकते...लहानपणी आई माझ्यासमोर खूप रडायची, तिचं पाहून मलाही रडायला यायचं, पण एकदा रडून मन हलकं झाल्यावर आई पुन्हा लढायला तयार व्हायची, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की परिस्थिती कोणतीही असली तरी त्याच्या आहारी जायचं नाही, एक लक्षात ठेव नैना, आयुष्य कितीही कठीण असलं तरी सत्य एकच आहे की ते आयुष्य एकदाच मिळते, हं, आता हे आपल्यावर आहे की आपण ते कसं घालवायचं, त्यामुळे तुझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे हक्क फक्त तुलाच आहेत..माझं काय?? तू जे बोलशील जस बोलशील तशी केवळ तुला साथ द्यायची आहे...."

मी बोलली
"हम्मम...एक सांगू,


"होंगे कई सिकंदर दुनियामे, जंग जितने वाले,
लेकिन मैदान छोडकर जाने वाले तो हम भी नही..!"


"हो का, संगत का असर होत आहे वाटते हळूहळू, चला म्हणजे आता जावंच लागेल..."
गाडी सुरू करत अभय सर बोलले..

"कुठे..."

"वही जहाँ कोई आता जाता नही..😂😂 म्हणजेच वकीलाकडे...🤣🤣"

"तो चलो फिर...😀😀"

काहीही वाद न घालता किंवा मोठे मोठे शब्दप्रयोग न करता अभय सरांनी किती सहजपणे माझा आत्मविश्वास परत आणला..आयुष्यात नेहमी समस्या वाढवणारेच मिळतात, पण त्याच समाधान देणारे मात्र बोटांवर मोजण्या इतके असतात, आणि जेंव्हा असे समाधान देणारे मिळतात तेंव्हा आपणही जास्त आढेवेढे न घेता, जास्त भाव न खाता त्यांनी दिलेले उपाय लगेच मान्य करावे असे मला वाटते...कारण जेंव्हा असे प्रामाणिक लोकं मिळतात तेंव्हा वेळेची 'व्हॅलीडीटी' खुप कमी असते तेंव्हा जास्त विचार न करता त्यांना नेहमीसाठी आपल्या सोबत ठेवून घेतलेलंच बरं... बरोबर ना?
------------------------------------------------------
एक मनुष्य म्हणून किती वाईट सवय आहे ना आपली?? आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख मानून सतत त्यावर मनस्ताप करत बसतो...पण आपल्या कडे काय आहे याची जाणीव तेंव्हाच होते जेंव्हा आपण दुसऱ्यांच दुःख पाहतो...अभय सरांसारख्या हसऱ्या चेहऱ्यामागे अशीही कहाणी असेल हे कधी त्यांनी जाणवू दिलं नाही, पण जेव्हा त्यांची कहाणी ऐकली तेंव्हा कळलं की अभय सर आणि त्यांच्या आईने जे हलाखीचे दिवस पाहिले असतील त्यांचा तुलनेत तर मला देवाने दुःख देऊनही लगेच त्यावर लेप लावणारा ही दिला, आणि जर अभय सरांची आई लढू शकते काहीही आधार नसताना, तेंव्हा मी तर करुच शकते...आणि याच प्रेरणेने जग दुनियेची पर्वा न करता मी पण पुन्हा उठून उभी राहिलीच...

परस्पर संमतीने माझा आणि विक्रमचा घटस्फोट होत नव्हता त्यामुळे कायद्यानुसार आम्हाला आमच्या दोघांच्या विरोधात पुरावे सादर करण्याचा अधिकार होता आणि त्याची पडताळणी ही होणार होती...विक्रमने लाख प्रयत्न केले मला बदनाम करण्याचे, पण मला अभय सरांची साथ म्हणा किंवा माझ्या पुण्याई ची साक्ष म्हणा, तो माझ्या विरोधात काहीच सिद्ध करू शकला नाही...हे सगळं करता करता सहा महिन्यांच्या वर कालावधी निघून गेला, कोर्टाने आम्हाला सलोख्याने हे सगळं मिटवण्याचा एक चान्स दिला पण मला तो नको होता...मला त्याच्या विरोधात एक सणसणीत पुरावा देणं गरजेचा होता आणि तो मला त्या डॉक्टर कडूनच मिळणार होता...कारण आजपर्यंत कोर्टात जे काही सादर झालं त्यात फक्त घरगुती वाद आहे यावरच शिक्कामोर्तब झाला होता...मला मात्र ता कचाट्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं....तिकडे विक्रम वर डिपार्टमेंट मध्ये कारवाई सुरूच होती, सध्या तरी त्याला तीन महिन्यांच्या सस्पेंशन वर पाठवलं होतं त्यामुळे, त्याचा राग माझ्यावर होताच...पण मला त्याची चिंता नव्हती, मी सध्या तरी अभ्यासात व्यस्त होती... त्यात मला 'यशदा' ची परीक्षा ही द्यायची होती जेणेकरून माझी स्कॉलरशीप ची काही सोय व्हावी आणि मला अजून चांगलं मार्गदर्शन मिळावं यासाठी... अभय सर होतेच पण त्यांच्या कामाचा ताण भरपूर वाढला होता, तरीही वेळ काढून माझी विचारपुस ते नक्कीच करायचे..जसा वेळ मिळेल तसं भेटायला ही यायचे...नव्या आयुष्यात ही अडचणी कमी नव्हत्या माझ्या, पण लढण्याची मानसिकता तयार झाली होती त्यामुळे सगळं सोप्प वाटत होतं...छोट्या छोट्या गोष्टी वर रडणं ही कमी झालं होतं...

दोन दिवसांनी माझी 'यशदा' ची परीक्षा होती, त्यामुळे थोडं फार घरगुती सामान, काही पुस्तकं घ्यायला मी नागपूर ला गेली होती...पुस्तकं तसे अभय सर आणून देणार होते पण ऐनवेळी त्यांना काही काम आलं त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही म्हणून मी स्वतःच गेली आणायला...सगळं काही घेऊन परत येताना बसमध्ये मला जाणवलं की कोणी तरी माझ्या मागे आहे..पण कोणीही दिसलं नाही, मला वाटलं कदाचित माझा भास असावा, मी लक्ष दिलं नाही...
घरी आल्यावर दार उघडून आत मध्ये गेली सामान ठेवायला तर लक्षात आलं मी दार बंद केलं नाही, जेंव्हा दार बंद करायला मी मागे वळली तर, मला धक्काच बसला, माझ्या हातातील सामान तसंच पडलं हातातून....आणि नकळत माझ्या तोंडातून निघालं,
"विक्रम..."
-------------------------------------------------------
क्रमशः
(Dear readers, येत्या दोन तीन भागांत नैना ची ही कथा संपनार आहे...तुम्हाला माझं तोडकं मोडकं लिखाण कसं वाटते हे नक्की कळवा, तुमच्या समीक्षा मला लिहायला अजून प्रेरित करतात...अजून एक, सध्या घरात आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी 'ट्रॅक' वर नाहीत, त्यामुळे कधीकधी मनस्थिती नसते लिहिण्याची, त्यामुळे जर उशीर झाला भाग यायला तर त्यासाठी आधीच माफी मागते🙏🙏🙏...'वर्क फ्रॉम होम' आणि 'वर्क इन होम'ने अर्धा जीव घेतला आणि उरला सुरला कोरोना आणि अडचणींनी...नाही, नाही...तुम्ही अस नका समजू की, मी मनस्थिती चं कारण देऊन काही excuse मागत आहे, पण जे आहे ते आहे... तरीही येत्या दोन आठवड्यात ही कथा पूर्ण करण्याचा मानस आहे माझा आणि अभय सारखं मलाही शब्द देवून त्यांचं पालन करायला आवडते...😀😀)

तुमचीच,
अनु...🍁🍁