Vair books and stories free download online pdf in Marathi

वैर

वैर

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरदने आपल्या विरोधात प्रचार केल्यामुळेच आपल्याला निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला हे बाबुराव कदमाच्या चांगलंच लक्षात आलं होतं. कारण शरद हा निर्व्यसनी माणूस, त्यात तो अडल्या-नडलेल्यांची मदत करायचा.समाजसेवा हा गुण त्याच्यामध्ये लहाणपणापासूनच होता. कोणताही हेतु न धरता तो प्रत्येकाला मदत करायचा. त्याच्या याच स्वभावाचा फायदा बाबुराव कदमाचा विरोधक आणि शरदचा लहाणपणापासूनचा मित्र अमर गुजर ला झाला होता.अमर गुजर अगदी थोडया मतांच्या फरकाने निवडून आला होता. आपल्या पराभवासाठी शरदच जबाबदार असून त्याच्यामुळेच आपला निसटता पराभव झाला असल्याची पक्की धारणा कदमाची झाली होती. त्यामुळे तो शरद विषयी मनात अढी धरून होता.

शरद हा गावातील कपडयांचा नामांकीत व्यापारी होता. पत्नी,दोन मुले व आई-वडील या सर्वांची जबाबदारी त्याच्या एकटयावरच होती. आणि तोही त्यांच्या पालन पोषणात, आई-वडीलांना सांभाळण्यात व बायकोच्या ईच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यात कमी पडत नव्हता. त्याचा व्यवसायही भरभराटीस आला होता. तो कधीच कोणाच्या भांडणात पडत नसे, कोणाचे मन दुखवत नसे. मोकळया मनाने आपल्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशातून तो समाजसेवा करत असे. त्याला राजकारणामध्येही काही गंध नव्हता. पण आपला बालमित्र अमरच्या आग्रहाखातर तो प्रचारामध्ये पडला होता.अमरलाही माहित होतं. शरदच्या समाजसेवेचा व त्याच्या गुणी स्वभावाचा आपल्याला मत मिळवून देण्यात नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळेच शरदची ईच्छा नसतानाही त्याने त्याला आपल्या प्रचारात सामील करून घेतले होते. आणि शरदही आपल्या मित्रासाठी त्याच्या प्रचारात सामील झाला होता.

आता निवडणूक होवून तीन वर्ष झाली होती. पण झालेल्या पराभवाचे शल्य बाबुराव कदमाच्या मनात आजही बोचत होते.यापुढीलही निवडणुकीमध्ये शरद आपल्याला डोकेदुखी ठरणार आहे.याची त्याला पूर्ण खात्री होती.त्यामुळे शरदचा कसा काटा काढायचा याचाच तो विचार करत असायचा. एके दिवशी शरद व्यावसायिक कामासाठी जिल्हयाच्या ठिकाणी स्वत:च्या चारचाकी गाडीमध्ये आला होता. कामामुळे त्याला तेथेच उशीर झाला होता. उशीर झाल्यामुळे त्याच्या जिल्हयाच्या ठिकाणच्या मित्रांनी त्याला तेथेच जेवण करण्याचा आग्रह केला. त्यामुळे त्याला आणखीनच उशीर झाला. तो आता अर्ध्या रस्त्यात आला होता. रात्रीचे साडे अकरा वाजले असतील. ढग दाटून आले होते. सगळीकडे किर्र अंधार होता. गाडीमध्ये तो एकटाच होता. त्याने गाडीमध्ये जुन्या काळातील सदाहरीत गाणे लावले होते. आणि त्या मधुर संगीत असलेल्या गाण्यांचा आस्वाद घेत तो आपल्याच धुंदीत गाडी चालवत होता. तो तेथून निघाल्यापासून त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या, त्याचा जीव घेण्यासाठी टपून बसलेल्या लोकांची गाडी त्याचा पाठलाग करत असल्याची सुतरामही कल्पना त्याला नव्हती. तो एव्हरग्रीन गाणे ऐकत व गुणगुणत गाव जवळ करत होता.

आता हायवे सोडून गाडी गावाच्या रस्त्याला लागली होती. रस्ता निर्जन होता.पाठलाग करणारे लोकही शरदच्या गाडीपासून थोडे अंतर ठेवून येत होते. अचानक रस्त्याच्या पुलाच्या खालून दोन व्यक्ती बाहेर आल्या. एका माणसाने शरदच्या गाडीच्या काचावर दगड मारला. त्यामुळे शरदचा स्टेअरींगवरील ताबा सुटला व ती गाडी पुलाच्या कठडयावर जोरात आदळली. तोपर्यंत त्याचा पाठलाग करणारी गाडीही त्याच्या गाडीच्या जवळ आली. त्या गाडीमधून आणखी काही गुंड खाली उतरले.त्यांनी गाडीमध्ये डोकावून पाहिले. शरदचा अपघाती मृत्यु झाल्याचे त्यांना भासवायचे होते.गाडीचे नुकसान झाले होते परंतु शरदला थोडीही जखम झालेली नव्हती. दगडाने ठेचून वा हत्याराने त्याचा खून करता आला असता पण कपडयावर रक्ताचे डाग पडले असते त्यामुळे त्या लोकांनी त्याचा गळा आवळून खून केला. व त्याच्या गाडीवर मारलेला दगड नदीमधील पाण्यात फेकून त्याठिकाणाहून पलायन केले.

बाबुराव कदम शरदच्या खुनाची प्लॅनिंग करूनच दहा दिवसांपुर्वी चारीधाम यात्रेला निघून गेला होता.खुनासाठी त्याने खास बाहेरच्या राज्यातून माणसं बोलावली होती. त्या माणसांना परत पाठवण्याची त्याने आधीच तयारी केली होती. खून करून ती माणसं आपल्या घराकडे निघाली होती.पोलीस आपल्या परीने तपास करत होती. शरद हा व्यापारी असल्याने त्याच्यावर पाळत ठेवूनच त्याचे पैसे लुटण्यासाठी चोरटयांनी त्याचा खुन केल्याची अफवा गावभर पसरली होती.वास्तविक गुंडांची गाडी ही पांढऱ्या रंगाची असताना व ती गाडी उत्तरेला गेली असताना, कदमाच्या लोकांनी लाल रंगाच्या गाडीतील चोरांनीच शरदचा खुन केला असून ती गाडी दक्षिण दिशेला गेल्याची अफवा पसरवली होती. त्यामुळे पोलीस दक्षिण दिशेला तपास करत होते.त्यामुळे त्या गुंडांना राज्याबाहेर पडण्यास मदत झाली होती.खुनाच्या वेळी व त्यापुर्वीही त्या गुंडांनी मोबाईल वापरला नव्हता. व कदमानेही मोबाईलचा वापर न करता प्रत्यक्ष भेटून त्या गुंडांना सुपारी दिली होती. आणि यदाकदाचित पोलीसांनी गुन्हेगारांना पकडले तर कदमाचे नाव न सांगता आम्हीच पैशासाठी शरदचा खून केला असे सांगण्यासाठी कदम गुन्हेगारांना आणखी पैसे देणार होता.कदमाने यापुर्वीही असेच दोन खून पचवले होते.

मायाळु काळजाचा, दानशुर, समाजसेवक शरद गेल्याचे दु:ख सामान्य जनतेत होतं. आपल्या पराभवासाठी कारणीभुत असणारा आपला वैरी शरद संपला व त्याबरोबरच आपले वैरही संपले याचा आसुरी आनंद बाबुराव कदमाला झाला होता. इकडे शरदचा पूर्ण परिवार दु:खाच्या खाईत लोटला गेला होता. आपण एका कर्त्या माणसाला संपवल्यामुळे त्याचा संपूर्ण परिवार रस्त्यावर येणार आहे. आपण एखाद्या माणसाला त्रास देतो त्यावेळी नकळतपणे त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबावर होतो याची संर्पूण जाणीव असतानाही कदमाने शरदचा खून केला होता.

ज्या माणसाने आयुष्यात कधीही कोणाशी वैर धरले नाही, त्या निष्पाप माणसाला राजकारणापायी काही संबंध नसताना आपला जीव गमवावा लागला होता.तो माणूस आपल्या शरीरातील प्राण घेवून हे कलियुग सोडून देवाच्या घरी निघाला होता. आणि कदम आपला वैरी संपवल्याच्या आनंदात चारीधाम यात्रा करून आपल्या गावाकडे निघाला होता पुन्हा निवडणुकीची तयारी करण्यासाठी.

तात्पर्य:- आपण ज्या वेळेस एखाद्या माणसाला त्रास देतो त्यावेळी त्याचा परिणाम फक्त त्या माणसावरच होत नसतो तर त्याच्या पूर्ण कुटुंबावर होत असतो. वैर धरून कोणाचंच कधी चांगलं झालं नाही.नुकसान मात्र नक्कीच झालं आहे.

-संदिपकुमार