Change - Need and mindset books and stories free download online pdf in Marathi

बदल -आवश्यकता आणि मानसिकता

अनेक वर्षे कारखाना चालवून वयोमानामुळे थकलेला मालक, आपल्या परदेशातून आलेल्या तरुण मुलावर कारखाना सोपवतो . नव्या उमेदीचा , उच्च शिक्षित मालक मिळाल्यामुळे नोकरदार मंडळी खुश होतात. आपल्याला कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळणार म्हणून मुलगा आनंदतो. मालकही हे चित्र पाहून, आराम मिळणार म्हणून ,समाधानाने , स्व खुशीने दुरच्या जागी मनः शांतीसाठी निघून जातो. win win situation आहे. वडिलांनी कारखान्याची घडी आधीच व्यवस्थित बसवली होती. अनुशासन आणि सुव्यवस्था नांदत होती . आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी आतुर असलेल्या मुलाला यात काही challenging /आव्हान वाटत नाही. कामगारदेखील रटाळपणाला कंटाळलेले आहेत . त्यांनाही बदल हवा आहे . परदेशात प्रयोग केले जातात त्या धर्तीवर, कामगार आणि नवा मालक यांची सामंजस्यपूर्ण चर्चा होऊन , कारखान्यात बदल घडवावा असे ठरते. त्यानुसार , काही नवीन यंत्रे आणून इच्छुकांना तंत्रशिक्षण देण्यात येते . दैनंदिन तेच तेच काम करून कंटाळलेल्या एका समूहाला अंतर्गत डिपार्टमेंट बदलून आवडीच्या डिपार्टमेंटला जाण्याची परवानगी मिळते . उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि टारगेट अचिव्ह करणाऱ्याला प्रलोभने पगार वाढीची हमी तरुण मालक देतो . टीम लिडर , टीम मेंबर्सना टीम बदलण्याची संधी मिळते . शिस्त , नियम, रटाळपणाला कंटाळलेल्या कामगारांत नवीन ऊर्जा संचारते. अपेक्षेनुसार आता उत्पादनामधील quality आणि quantity वाढ होईल ,असे अनुमान करणाऱ्या नवीन मालकाला मात्र विपरीत अनुभव येतो . मालाच्या संख्यात्मक आणि गुणात्मकतेमध्ये घट होते . उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारा वेळही वाढतो .कामगारांमध्ये असमन्वय होऊन असंतुष्टी वाढते ,असे का?

एक काल्पनिक कथेतून बदल आवश्यकता आणि मानसिकता या विषयी मी माझी अभिव्यक्ती प्रगट करीत आहे. परिवर्तन हा जीवनाचा स्थायीभाव आहे . व्यक्ती अथवा यंत्रणेमधील अनावश्यक, कालबाह्य बाबी सुधारण्यासाठी आणि प्रगतीसाठी परिवर्तन अनिवार्य आहे. असंतुष्टीकारक घटक बदलाद्वारे दूर होऊ शकतात. जीवनात सारं काही मधुर, सुंदर आणि स्थिर असेल तर मनुष्यातील क्षमता बोथट होतील . आव्हाने बुद्धी तीक्ष्ण करतात. पर्यायांचा शोध घेताना सार्वत्रिक विचारांना प्रोत्साहन मिळते. त्यासाठी परिवर्तनाचा विचार आणि स्वीकार करायला हरकत नाही. मानसिक थकवा , ताण दूर करण्यासाठी बदल हा प्रभावी औषध आहे. मात्र संतोषजनक ,भरवशाचे स्थैर्य असताना केवळ तोच तोच पणा दूर करण्यासाठी , अंधअनुकरण म्हणून परिवर्तनाची जोखीम घेणे टाळावे , सुरळीतपणा व स्थैर्य यांचा ऱ्हास होऊ देऊ नये. स्थिर आणि महत्वाच्या बाबी सोडून इतर बाबीमध्ये बदल घडवून मानसिक थकवा , कंटाळा, ताण तणाव दूर करता येतो . उदाहरण- दैनंदिन जीवनातील निरसता , रोजच्या कार्याचा वीट, एखादे अपयश, रोजच्या तक्रारी ,वाद यांमुळे , कायमचा जागा बदल करण्याचा निर्णय न घेता काही दिवसांसाठी हवा पालट ,फिरायला जाणे अशा पर्यायी बाबींचा स्वीकार करावा. कायमस्वरूपी बदल हा शेवटचा पर्याय म्हणून पाहता येईल.

बदल हा नवीन संधींच्या उपलब्धतेची आशा घेऊन येतो . म्हणून तो त्याज्य अथवा त्वरित स्वीकार्य न ठरविता स्वतः ला वेेेळ देऊन सुुुसह्य करावा. या संदर्भात विवाह हा जीवनात आमूलाग्र बदल आणि स्थैर्य समभावे , एकाच वेळी प्रदान करणारा पवित्र संस्कार . दोन परिवार आणि त्यातील सारेच परिजन या परिवर्तनास सामोरे जातात. त्यातही नवपरिणीता अधिक प्रमाणात. म्हणून तिच्या मनः स्थिर तेसाठी तत्काळ बदल स्वीकृतीची अपेक्षा करू नये. नव्याचा स्वीकार अपरिहार्य असला तरीही ,नाविन्याच्या प्रवाशाने जुने त्याज्य ठरत नाही. म्हणूनच त्यासाठी मानसिक सज्जता करून घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ती आणि समूहांशी बदल संबंधित आहे , त्यांना भविष्याबाबत शाश्वती वाटेल अशी वातावरण निर्मिती करावी . या बदलांमध्ये त्यांच्या कौशल्य, ज्ञानाची , उपस्थितीची आवश्यकता भासेल, त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या असतील , प्रस्थापित उपलब्धी व गुणवत्ता विचारात घेतली जाईल याची हमी दयावी.

त्याचबरोबर , यंत्रणा अथवा सवयींमध्ये बदल हा हळुहळु घडविण्यात यावा , अचानक , प्रतिक्षिप्तपणे , दबाव आणून लादला जाऊ नये. स्नेहपुर्णतेमध्ये स्वीकृतीची जास्त हमी असते. पूर्वीच्या समान, सकारात्मक, यशस्वी बदलासोबत संभावित बदलाचा सह संबंध जोडावा . केवळ तडजोडरुपी बदल कुुुणा एकावर लादून अन्याय करू नये. बदल हा सर्वांसाठी उपकारक , फायदेशीर करण्यावर भर द्यावा. नवीन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यापूर्वी बदलासाठी सर्वांची स्वीकृती व मानसिक तयारी होण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा . वैचारिक आदान - प्रदान करण्याची संधी द्यावी. त्यांनी सुचविलेले उपाय समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा. यावरून ,सर्वांचे मत व संकल्पना स्पष्टता , सकारात्मकता यांचे आकलन, अनुमानही करता येईल.

बदलाविषयीचे भय, ताण - तणाव , अनावश्यक चिंता दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे . जेव्हा बदल अचानक झालेला असतो किंवा त्यात स्वीकृती सामावलेली नसते, त्यावेळी सुधारणेपेक्षा विरोधाची शक्यता जास्त असते. बदल , सुधारणा एक रात्रीत घडेल अशी आशा बाळगू नये. बदल ही संथ आणि निरंतर प्रक्रिया आहे. म्हणून ती संयम आणि योजनाबद्ध रीतीने हाताळावी.

योजनाबद्ध आराखडा असावा. भविष्याबद्दल आशावाद ,उत्साह जागरूक करावा . सकारात्मक भावावस्था बदल स्वीकारण्यासाठी अनुकूल ठरते . अनिच्छेने स्वीकारलेला बदल हा अनपेक्षित , वाईट परिणाम देऊ शकतो. काहीकाळ तो स्वीकारून ,नंतर झुगारून देण्याची प्रवृत्ती येऊ शकते. गृह स्थळ ,कार्य स्थळ कुणालाही गृहीत धरले आहे ,अशी भावना आल्यास सकारात्मक बदल ही मनात किल्मिष निर्माण करतो. ही अढिच पुढे संघर्षात रूपांतरित होते. म्हणून सर्वांचे मत आणि मन विचारात घेऊन, अनुकूल करून बदलाची व्यूहरचना आखावी आणि राबवावी. येणाऱ्या बदलात त्यांची अभिरुची निर्माण करणे , प्रलोभन हा ही बदल स्वीकारा चा प्रभावी उपाय आहे.

परिवर्तन समोर आल्यावर परावृत्त होणे, समायोजन करणे, विरोध हे पर्याय उपलब्ध असतात . बदल म्हणजे येणारी भिन्न परिस्थिती. बदलास होणार विरोध हा त्यातील जोखीम ,भीती किंवा संकुचित मानसीकततेमुळे होत असतो . बदलांमध्ये जुन्या सवयी मोडुन नवीन वर्तन आत्मसात करावयाचे असते . त्यासाठी परिस्थितीचे अध्ययन करून, ध्येय निश्चित केले तर तो बदल आपणास लाभ दायक ठरू शकतो. परिवर्तनास होणारा प्राथमिक विरोध हा जुन्या यंत्रणेशी असणाऱ्या भावुक संलग्नतेमुळे , अंगवळणी पडलेल्या सवयीमुळेही होऊ शकतो. याची जाणीव नवीन यंत्रणा राबविणाऱ्या व्यक्ती ने ठेवून संवेदनशीलता दाखवावी , नवीन परिस्थिती शी बांधिलकी निर्माण करण्याचा हळुवार प्रयत्न करावा.

छोटया छोट्या नाममात्र बदलाने प्रारंभ करून मोठया ध्येयाप्रति वाटचाल करावी. अचानक मोठा बदल येऊन आदळला तर विरोध ही तितकाच प्रखर होतो . नूतन प्रणाली कार्यान्वित करताना , पुरातनयंत्रणेचा काही भाग, धारणा, व्यक्ती ,वस्तू या अस्पर्शीत ठेवाव्यात (बदलू नयेत). बदलाचा वेळोवेळी आढावा घ्यावा. ज्यांना बदलाशी जुळवून घेताना समस्या येत आहेत ,जे मागे पडत आहेत त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देऊन सामावून घ्यावे . नियम थोडे शिथिल करावे . अनावश्यक , नकारात्मक प्रतिक्रियाबाबत योग्य निर्णय घ्यावेत .

अशा प्रकारे, जुन्या यंत्रणेशी बांधिलकी ,अनभिज्ञ परिस्थितीची भीती , अनिश्चिती यांचा सारासार सुहृदतेने विचार व्हावा, सर्वसमावेशकता असावी. दबाव तंत्र बदल स्वीकृतीसाठी हानिकारक आहे.

अधिकारापेक्षा स्नेह व स्वातंत्र्य प्रदान करून , बदलाचा अपेक्षित परिणाम मिळविता येतो हे कार्य स्थळी वरिष्ठांनि , आणि गृहस्थळी जेष्ठांनी स्मरणात ठेवावे. लहानांनि समायोजन म्हणजे कर्तव्यपूर्ती मानवी नाईलाज मानू नये. बदल अनुकूल करून घेणे, स्वीकारणे, विरोध, परावृत्त होणे हे प्रसंगानुरूप उचित निर्णय घेऊन ठरवावे. बंदिस्त मानसिकता ,पूर्वग्रह दूर सारून किमानपक्षी नवनीतीचा विचार करण्यास सदैव सज्ज राहावे. परिवर्तन योग्य की अयोग्य हे भविष्यकाळ ठरवितो .

म्हणून अंतरंग स्थिर ठेवून विधायक बदल स्वीकारण्याची सज्जता आणि सामर्थ्य सर्वांठायी येण्यासाठी परिवर्तनाचा स्तंभलेख शब्दबद्ध करीत आहे. उचित परिवर्तनाधारे अवरुद्ध ते उन्मुक्त होवो असे सुचिंतून ; माझे देशबंधु - बांधवी व जगभरातून माझे लिखाण आवर्जुन वाचणाऱ्या माझ्या विश्व बंधू - बांधवी यांच्याप्रति अनुबंध प्रगट करून मी बद्धमती पूर्णा , स्थिती व गती मधून मुक्त होते.

--- पूर्णा गंधर्व.