Tu Hi re majha Mitwa - 36 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 36

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_३६

#Count down begins-तुम नाराज हो!

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

“काय झालं कुठे हरवलीस?”

त्याच्या बोलण्यावर तिचा शून्य प्रतिसाद पाहून तो म्हणाला.

“निघायचं? तुलाही उशीर होत असेल.” ती पडलेल्या आवाजात म्हणाली.

“हो,उशीर तर होतोय.आज तब्बल ४ चार शाळांना भेट द्यायचीय.तुझी हरकत नसेल तर चार पाच वाजता भेटूया भांडण कंटिन्यू करायला?”

ती विस्मयाने बघत राहिली,ती निघून जाणार हे तिने गृहीत धरलेलं होतं.

“तू चेकआउट करणार होतास ना?” त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचे प्रयत्न ती करत होती.

“हो का?” उलट तिलाच आश्चर्याने विचारात तो म्हणाला.

“हो का ? म्हणजे काय रात्री बोललास ना तू?”

आवाजात थोडासा दिलासा आणि चेहऱ्यावरचा उतू जाणाऱ्या आनंदाला बळेच अडवून ठेवण्याचा प्रयत्न.

“अच्छा,जाण्याचं बोललो म्हणून काल नाराज होतीस?”

तो तिच्या मनातलं काढून घ्यायच्या जिद्दीवर होताच.

“छे,मी का नाराज होणार?” क्षणांत चेहऱ्यावरचे भाव झटकून ती म्हणाली.

“सॉरी,don’t take it otherwise,मला म्हणायचं होतं की कदाचित ह्या फ़ेजमध्ये तुला तुझ्या ह्या मित्राची गरज असेल...”

“मला कुणाचीही गरज नाहीये.एकटं राहणं,स्वतःला सांभाळून घेणं शिकलेय मी आता.खूप वेळ लागलाय मला स्वतःला सावरायला आता कुठल्याही मित्राची गरज नाहीये.”
ती चिडून म्हणाली.

“ओके,चिडू नको मी गंमत करतोय,आता खरच उशीर झालाय.निघूया,मी तीनवाजेपर्यंत परतेल,कॅफेत भेटूया? ”

“न..नाही माझे काम आटोपणार नाही तोपर्यंत.”

“ठीक आहे,डिनरला भेटूया.”

“न..नाही उपवास आहे,डिनरला येणार नाहीये.”
त्याला हसू अनावर झालं.

“भेटायचं नसेल तर its ok ,उपवास वैगरेचं कारण नको देऊ.चल निघूया.”

“तू जा, मला जरावेळ बसायचंय.”

त्याने तिला खूप आग्रह केला पण ती हट्टी आहे, ऐकणार नाही हे त्याला माहित होतं.तो नाईलाजाने निघाला तसं त्याला कितीतरी वेळ पाठमोरं बघत ती बसून राहिली.त्याचं थांबणं तिच्यासाठी काय होतं ते तिच्या भरून आलेल्या डोळ्यात स्पष्ट लिहिलं होतं.

आईला फोन करून ‘माझं सर्व्हेचं काम झाल्याशिवाय येणार नाही’ हे सांगायला तो विसरला नाही.

*****************************

आज ४ वाजेपर्यंत सगळी महत्वाची कामे झाली होती, रिव्यू मिटिंग आटोपून ते कॅफेटेरीयात बसले होते.
‘कबीर परत आलाय का? हे कुणाच्याही नकळत त्यांच्या सेक्शनच्या हाउसकिपिंगला तिचं विचारून झालं होतं.
’तीन वाजताच येतो म्हटला आणि अजून आला नाही’.उगाच मनातल्या मनात त्याच्यावर चिडत ती म्हणाली.

कॅफेमधून रिसोर्टचं एंट्रीगेट नजरेच्या टप्प्यात असेल अशी जागा निवडून ऋतू बसली होती.रिशी मोना आणि काजलसोबत गप्पा तर चालूच होत्या पण लक्ष पूर्णपणे गेटवर होतं.त्याला पुन्हा केव्हा बघतेय असं तिला झालं होतं.

“बच्चा कुणाची वाट बघतेय का? नाही,सारखं लक्ष गेटकडे आहे म्हणून विचारलं” त्याने चेहऱ्यावरची एक रेषही न हलू देता विचारलं.

“न ..नाही.काहीतरीच काय.” चोरी पकडल्याने ती गोरीमोरी झाली.

ते बोलत असतांनाच त्याची गाडी आत आली.तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव,ब्लश झालेले गाल बघून तिघांनाही खूप गंमत वाटत होती.

तो गाडीतून बाहेर आला तसं ती त्याला बघतच राहिली.डेनिम शर्ट,ब्लॅक जीन्स,गॉगल,फोनवर बोलत तो त्याच्याच धुंदीत रूमकडे निघाला होता.तिची तगमग बघून रीशीने त्याला हाक मारली.

“यार रिशी,इतका हँडसम बंदा सिंगल असतांना मी सिंगल असणं क्राईम आहे यार,प्लीज माझी सेटिंग करून दे ना कबीरसोबत.ही माझी मैत्रीण काही कामाची नाही.” मोनाने ड्रामा सुरु केला.

“ओके करूया सेटिंग,नो प्रॉब्लेम.बच्चा तुला काही प्रॉब्लेम?”

“मला काय प्रॉब्लेम असेल.काहीही करा आणि मोने डेनिझला विसरली का?” ती जरा चिडक्या स्वरात म्हणाली.

“अरे असे १० डेनिझ ओवाळून टाकेन मी माझ्या कबीरवर.”

समोरून येणाऱ्या कबीरकडे बघत ती म्हणाली.काजल कसंबसं हसू कंट्रोल करत होती.

तेवढ्यात कबीर तिथे पोहचला.ते हसता हसता शांत झाले.

“हाय..” तो सगळ्यांकडे पाहून म्हणाला.ऋतू उगाच मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसली.तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

“हाय कबीर...join us!”

रीशीने एक खुर्ची ओढून त्याला ऋतू शेजारी बसायला जागा केली.तो बसला तरी तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

“कबीर यार हे बरोबर नाहीये,तुला इतकी छान रूम मिळाली आहे कधीतरी आम्हाला इन्व्हाईट कर त्या प्रशस्त गॅलरीत बसून चहा कॉफी किंवा चिल्ड बियर घ्यायला.”
मोनाला हलकेच डोळा मारत रिशी म्हणाला.

“अं...हो, हो ना आणि तिथून सनसेट खूप क्युट दिसत असेल.तुला माहितीय कधीतरी असा क्युट सनसेट बघायला मिळेल ही माझी लहानपणापासूनची इच्छा होती.”

नाटकी चेहरा करत मोना म्हणाली. ‘क्युट सनसेट’ हा शब्द ऐकून ऋतूने मोनाकडे बघून रागाने डोळे मोठे केले.मोनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं.

“अरे नो इश्यू,तुम्ही कधीही या.गॅलरीत आपण चहा-कॉफीची अरेन्ज्मेंट करूया,गप्पाही होतील.you all are welcome.”

ती लक्ष नसल्याचं भासवत शांत बसून होती म्हणून शेवटचं वाक्य तो जरा मोठ्याने बोलला.

“नेकी और पूछ पूछ..आताच जाऊया.इथे जाम बोर होतंय मला.” मोना जागेवरून उठून बोलली.तसं तिला हाताला धरून ऋतूने खाली बसवलं.

“अरे तो आताच आलाय त्याला फ्रेश होऊ दे,असंही अजून ऊन आहे.जरावेळाने जाऊया.”
काजल म्हणाली.

“ऑफकोर्स,मी निघतो,मॅनेजरला सांगून तयारी करून ठेवतो तुम्ही या..ओके?”

“ओके ओके डन.” मोना आनंदात म्हणाली.

“सी यु” म्हणून तो जायला निघाला.
त्याने जातांना पुन्हा तिच्याकडे पाहिलं,तिचं लक्ष मोबाईलमध्येच होतं.तो निघून गेला.

“बच्चा किती रूड वाटत होतं,तो बोलतोय आणि तुझं लक्ष फोनमध्ये,तो अगोदर तुझा मित्र आहे मग आमचा.”

“रिशी मी त्याला बोलावलं नव्हतं आणि ही मोना, हिला काही कळत नाही. त्याच्य गॅलरीत का चहा घ्यायचाय ग तुला?”

“का म्हणजे? माझं क्रश झालंय त्याच्यावर.रिशी माझी सेटिंग लावून देतोय तुला काय प्रॉब्लेम आहे?”

“काही प्रोब्लेम नाही,तुम्ही जा मी नाही येणार.” ती गाल फुगवून बोलली.

“वा वा...असं कसं,तू ओळखते त्याला,माझी सेटिंग लावायला तू हवीच..एक मिनिट तुला जलस तर होत नाहीये ना आमचं जुळतंय हे बघून?” मोना अगदी नाटकीपणाने तिला डिवचत होती.

“मोना बस कर ड्रामा.” ती वैतागून बोलली.

“मग तू पण चलायचं,तो इथे आहे तोपर्यंत माझी सेटिंग लावून द्यायची. तू गॉड प्रॉमिस दिलंय.”

“केव्हा?”

“हे आत्ताच “ तिचा हात हातात घेऊन मोना म्हणाली.

“चला एक अर्ध्या तासात भेटूया...ohh I am so excited.I love cute sunsets.”
मोना स्वतःवर खुश होत म्हणाली.

“होपेलेस!”

त्या तिघांकडे रागाने बघत ती रूमकडे निघून गेली.
ती निघून गेल्यावर तिघांची हसून हसून पुरेवाट झाली.
त्या दोघांना एकत्र आणायला ते काहीही करायला तयार होते.

********************
उन्हं जरा निवळली होती.ते कबीरच्या रुमच्या गॅलरीत बसले होते. प्रशस्त एल शेप गॅलरी.समोर मोठ्याने आवाज दिला तर तरंग उठतील इतक्या जवळ असणारं जलाशय.दूरवर काठांवर चाललेलं शुटींग,जमाव,एका बाजूला असणारं जंगलाचं बेट,पक्ष्यांचे आवाज शांततेला कितीतरी आवाजांची किनार होती.ती आल्यापासून तशीच अबोल होती.कबीर समोर तर हवा होता पण मनात सतत एकच भीती होती.कुठल्याच क्षणी नकळत इमोशनल सरेंडर व्हायचं नाही.

जरा एकत्र गप्पा,चहा झाल्यावर ऋतू उठून एलशेप असणाऱ्या बाल्कनीच्या दुसऱ्या बाजूला,त्याच्या नजरेआड जाऊन बसली. मोना आणि काजलपण तिच्याजवळ येऊन बसल्या.
त्या ओल्या निळसर वातावरण अथांग पाण्याकडे बघत शांत बसल्या होत्या.
ऋतूने सोबत आणलेल्या तिच्या रिपोर्टमध्ये काही नोंदी करून घेत होती.

“काय लिहतेय?” काजलने उत्सुकतेने विचारलं.

“अगं प्रोजेक्ट क्लोझरमध्ये नद्यांबद्दलचे हूक पॉईंट्स लिहायचे होते,आता समोर इतकं सुंदर,जिवंत चित्रण बघून जे वाटतंय ते लिहून ठेवतेय.” काजलने तिच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला.

इकडे कबीर आणि रीशीच्या कामापासून.क्रिकेट पोलिटिक्स, लिखाण, मायथॉलॉजी सर्व प्रकारच्या गप्पा चालू होत्या.

जरावेळ झाल्यावर काजल रीशीकडे गेली.

“सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतेय पण रिशी आजचे डीटेल्स मिकाला पाठवायचे राहिलेत,निघायचं ना ?”

“अरे हो..विसरलोच.By the way कबीर.आजचा कॅम्पफायर प्रोग्राम खूप छान आहे you must come.”

“lets see.” तो म्हणाला.

त्यांचा निरोप घेऊन रिशी आणि काजल निघून गेले.

‘मोना चल आपण पण निघूया.” ती हळूच मोनाच्या कानात म्हणाली.

“ऋतू तू इथेच सनसेट बघत,हे काहीबाही लिहित थांब प्लीज,मला कबीरसोबत थोडी प्रायव्हसी दे.” ती डोळे मिचकावत म्हणाली.

ऋतूने रागात तिच्याकडे एक नजर बघितलं.

मोना कबीर बसला होता तिकडे जाऊन बसली.
ऋतू लिखाण बंद करून शांतपणे समोरचं दृश्य बघत बसून राहिली.
मागच्या काही महिन्यातले चांगले वाईट दिवस,डायरीत लपवून ठेवलेल्या कबीरच्या आठवणी.रिशी,मोना,काजल यांच्यासोबतचे अखंड कामात बुडालेले दिवस.हे सारंकाही अजून एक गोड आठवण,मैत्रीचा नवा अध्याय बनून सोबत राहणार ही शाश्वती,हे त्या शांत,थंड वातावरणात तिला उगाच आठवत होतं.
ती डोळे मिटून शांत बसून राहिली.मोना आणि कबीरचे हसायचे,गप्पांचे आवाज येत होते.

’ड्रामाक़्विन’ ओठातल्या ओठात पुटपुटत ती म्हणाली.
जरा वेळ गेल्यावर शांतता झाल्यासारखी वाटली.मोनाचा आवाज येत नव्हता.

ती गॅलरीच्या पुढच्या भागात आली.
तिथे मोना नव्हती.कबीर एकटाच रेलींगला टेकून शांत उभा होता.हातात सिगरेट.मागे तोच गर्द,गहिरा,मनाला भूल पाडणारा,किशोरीजींचा स्वर्गीय आवाज,गहिरी बंदिश—

“जब से तुम संग लागली,प्रीत नवेली प्यारे बलमा.....”

त्याची त्या निळाईत विरघळलेली नजर,त्या पार्श्वभूमीवर त्याचा खुलून दिसणारा रुबाबदारपणा.
जरावेळ ती स्वतःला विसरून गेली. तिच्या चाहुलीने तो भानावर आला..त्याच्या हातातली सिगरेट तिने काढून ash ट्रेमध्ये विझवून टाकली.
तिच्याकडे बघून गोड हसला.

“मोना कुठे गेली?” तिने तुटकपणे विचारलं.

“Actually तिला तिच्या टीम लीडरचा फोन आला होता,काही काम होतं अर्जंट.”

“मूर्ख मुलगी,मला का नाही सांगितलं?..चल मी पण निघते,बाय.”

ती बाजूने निघून जाणार तसा तिचा हात पकडला,तिच्या हातात एक कागद होता तो त्याने वाचायचा प्रयत्न केला.

“कबीर,प्लीज,दे ते इकडे!”

“गंगा,यमुना,नर्मदा ...अरे काय लिहतेय नद्यांविषयी?” त्याने आश्चर्याने विचारलं.

“अरे हुक पॉईंट्स आहे..समोर ह्या पाण्याला पाहून राहवलं गेलं नाही,म्हणून लिहून ठेवत होते.बरं वाचून सांग किक देताय का हे पॉईंट्स?” ती शांतपणे म्हणाली.

त्याची नजर झरझर फिरली.

“खूप मस्त पॉईंट्स घेतलेय,यमुना नदीचे सोडून..” तो दूरवर नजर लावत म्हणाला.

“का रे..हे ताजमहालचा पॉईंट लूज झालाय का?”

“हम्म तसचं काही नाही पण Yamuna is more than this..तिला स्वतःचे दोन अर्थ आहे आणि दोन भाव,अर्थ दाखवणारी ती एकमेव नदी आहे हे मी वाचलं होतं ”

“म्हणजे?” ती विस्मयाने त्याच्याकडे बघत होती..तिचा फिलोसॉफर.

“म्हणजे बघ,गंगा भागीरथी काहीही म्हण गंगेचा अर्थ बदलत नाही पण म्हणतात यमुनेला दोन अर्थ आहे एक प्रेमाचा आणि एक विरहाचा. कालिंदी तिचं दुसरं नावं.नावातच एक खोल काळिमा..दुःख पण विरहाने सजलेलं.राधेचा कृष्णाच्या प्रेमातला गोड विरह.तिची व्याकुळता,आर्तता जाणवते.
तुम्ही विरहात,आठवणीत तडपत असतात तेव्हा ते पाणी कालिंदीमय वाटतं आणि जेव्हा राधेला कृष्णाच्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा ती त्याला नदीकाठी बोलावते,तिचं प्रेम व्यक्त करायला तेव्हाच ती यमुना असते. कालिंदी आणि यमुना ही प्रेमाची आणि विरहाची दोन्ही प्रतीके एकाच नदीची.हे तू नक्की लिहू शकते.खूप रेफरेंस आहेत तुला सेंड करेन.” तो तिच्याकडे बघत हसून म्हणाला.

ती भान हरपून त्याच्याकडे बघत होती.कपाळावर तेच मेसी फ्रीन्जेस,डोळ्यात रिफ्लेक्ट होणारे संध्यारंग हेझल रंग मिसळून नवीनच रंग दाटतोय.तिने स्वतःला सावरलं.

“मी निघते.” ती एवढंच बोलली आणि पर्स उचलायला वळली.

“ऋतुजा इतक्या महिन्यांनी भेटलोय यार प्लीज नको ना जाऊ.जरावेळ थांब,बघ आता सनसेट होईलच.dont miss it.”

तो दूरवर बोट दाखवत म्हणाला.
तिचं लक्ष क्षितिजाकडे गेलं.
मावळतीचे रंग त्या निळ्याशार पाण्यावर तरंगत होते,पण मिसळत नव्हते.
हवेच्या झोतासोबत पाण्यावर उठणारे आणि दूरवर पसरत जाणारे आवर्ती तरंग,त्यांचा उत्कट केंद्रबिंदू.
मावळतीचे गहिरे रंग ल्यायलेल्या आकाशाची त्या पाण्याशी गाठ घालून देण्याची वेडी धडपड करणारं क्षितीज!
एका बाजूला असणारं जंगलाचं बेट,त्या पानांची सळसळ,मागे वाऱ्यावर स्वर झालेले स्वर.

‘जब से तुम संग लगाई प्रीत नवेली...’

दोघेही मंत्रमुग्ध होऊन ते दृश्य डोळ्यात साठवत होते.

ती आज जाणीवपूर्वक जरा दूरच.तिला माहित होतं तिची प्रत्येक सायंकाळ त्याच्या नावावर आहे,तो असा शेजारी असतांना त्याच्यापासून तिने स्वतः तिच्यासाठी निवडलेला हा दुरावा.
त्याला मात्र हा आणि असा पुढचा प्रत्येक सूर्यास्त तिच्या डोळ्यात मिटतांना बघायचाय,दोन्ही जीवांची घालमेल,एकमेकांना यत्किंचितही दुःख पोहचायला नको याची धडपड.
तिच्यासोबत जगलेला हा अजून एक सूर्यास्त.त्या सूर्यास्तहून कितीतरी निराळा.तो सूर्यास्त ‘आहे की नाही’ ह्या धुक्यात चाचपडणारा..आजचा सूर्यास्त दोन्ही हृदयात प्रेम बनून धडधडणारा ,त्या दिवशी ती संध्यारंगाशी एकरूप झालेली तर आज क्षितिजाच्या साक्षीने सागरवेळेशी नातं सांगणारी.

ऋजा..!! तिचे मोकळे केस वाऱ्यावर स्वार त्यात कदाचित नदीवरच्या ह्या गारव्याचा थंडगार स्पर्श असेल, त्याची नजर तिच्यावर खिळलेली तर त्याच्या त्या नजरेने क्षणभर गोठलेली,दोघांनाही नको असलेला दुरावा कायम ठेवून ते उभे होते.

“काय विचार करतेय?” बराच वेळ ती हरवल्यासारखी वाटली म्हणून त्याने तिला विचारलं.

“कबीर ह्या एवढ्या अथांग जलाशयाच्या काठाला उभं असलेलं हे छोटसं जंगल..ह्या जलाशयाच्या विस्तीर्णपणाला गालबोट तर लावत नाहीये ना?”

ती अजूनही त्या दृश्यातच हरवली होती.तिच्या मनात हे अथांग पाणी म्हणजे जणू कबीर स्वतः होता आणि त्याच्या काठाकाठाने उभं असलेलं ते जंगलाचं बेट म्हणजे ती..अगदी एकाकी उभी असलेली.

तिच्या ह्या बोलण्याचा जरा जरा संदर्भ जाणवून तो हसला-

“तुला माहितीय तिकडे साउथ इंडियात निलगिरी किंवा अनामलाईच्या खोऱ्यात अशीच खूप सुंदर जंगल आहेत,विस्तीर्ण खोऱ्यांमध्ये बेटासारखी दिसतात. त्यांना खूप सुंदर नाव आहे-‘शोला’ म्हणजे “सावलीचं जंगल.” मला हे जंगल गालबोट न वाटता तसच सावलीचं जंगल वाटतंय,त्या जलाशयाला विसावा देणारं,त्याच्या पानांच्या सळसळीने ह्या पाण्याला जागतं ठेवणारं,त्याच्याकडे असणाऱ्या रानफुलांची त्याच्यावर पखरण करणारं...प्रत्येक जलाशयाच्या नशिबी कुठे असतं हे सावलीचं जंगल, आता हा जलाशय ह्या ‘शोला’पासून वेगळा इमाजीन करू शकशील का?”

त्याने हे उत्तर सहज दिलं की त्याला आपल्या प्रश्नात लपलेला मूळ प्रश्न समजला? ती त्याच्याकडे बघत राहिली..

“तू असं काही बोलत असलास की फक्त ऐकत रहावसं वाटतं.” त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.

“आणि तू असं बघत असतेस तेव्हा बोलत रहावसं वाटतं.” जरा तिच्या जवळ येऊन तो हळूच म्हणाला.

अजून थोडा वेळ जरी ह्याच्यासोबत थांबले तर मी ह्याच्या ह्या डोळ्यात विरघळून जाईन...ती जर बैचेन झाली.

“चल निघते मोना वाट बघत असेल..” ती जरा पुढे गेली तसं न राहवून त्याने तिला खांद्याला पकडून मागे भिंतीला टेकवलं -

“का इग्नोर करतेयेस?” त्याची उद्विग्न मनस्थिती डोळ्यात वाचता येत होती.

“कबीर..प्लीज” त्याला बाजूला करायचा निष्फळ प्रयत्न करत ती म्हणाली.त्याच्या तकदी पुढे आपला प्रतिकार शून्य आहे तिला माहित होतं.

“डोळ्यात लिहलेलं तुला वाचता येत नाही की तसा प्रयत्नच करायचा नाहीये?”
तिचे केस कानामागे सारून तो हळूच तिच्या कानात बोलला.

त्याच्या डोळ्यात तर आर्जवे होतीच पण त्याच्या श्वासांनां ही तिला समजवायचा प्रयत्न केला.त्याचा परफ्युमचा सुगंध श्वासात भरून उरला.इतक्या जवळ असण्याने ती क्षणभर नाहीशीच झाली पुन्हा त्या समांतर जगात जिथे त्याची सोबत किंबहुना तो हवाहवासा होता.तिची पुन्हा स्वतःशीच लढाई-
“ऋतू हेच तर डायरीच्या पानांना रोज तू सांगत होतीस,कबीरसोबतचं आयुष्य तू तुझ्या स्वप्नांत इमॅजिन केलं होतं ना मग आता का ही बैचेनी? का नाकारतेय...का नाकारतेय?
तू मला विचारतेय? वेदसोबत काय झालं? तेच तू कबीरसोबत करणार नाही कशावरून ? त्याचा आधीच प्रेमावर विश्वास नाहीये,सेल्फलेस लव्ह ही त्याची फिलोसॉफी आणि तू तर फिशलव्हचं जिवंत प्रतिक,चंचल बालिश... तू त्यालाही दुखावशील,तू सगळ्यांना दुखावतेस.तुझ्यासोबत तो कधीच खुश राहणार नाही.त्याला दुखावलेलं चालेल तुला? ...नाही अजिबात नाही.”
तो अजूनही अगदी जवळ.

“कबीर दूर हो..” तिचा हात त्याच्या हातात,बोटं बोटांत गुंफलेली.

“ना.....,माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.” तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवत तो म्हणाला.

“कबीर.प्लीज लिव्ह मी.” ती जडावलेल्या आवाजात म्हणाली.

“Tell me,this is not your halcyon day..Halcyon moment? हा क्युटसा किंगफिशर टाटू... त्याला विचारूया का ?”
त्याच्या प्रश्नाचा अर्थ समजून तिने त्याला पूर्ण ताकदी निशी बाजूला करायचा प्रयत्न केला.तिच्या डोळे डबडबले होते, त्याने तिला सोडलं.

“कबीर,जे तू विचार करतोय तसं काहीच नाहीये,आणि कधी होणार ही नाही.” भरून आलेले डोळे पुसत ती म्हणाली.

“एकदा ऐक यार प्लीज.”तो तिला विनवत होता पण पर्स उचलून ती झटक्यात निघून गेली.
तिच्या प्रत्येक श्वासाचा हक्क ज्याच्या नावावर करून बसली होती त्याचं प्रेम मान्य करायलाही एक भीती तिच्या मनात घर करून बसली होती.तो तसाच बाहेर बसून होता.
कातरवेळ सरून अंधारून आलं होतं.

***************

डिनरनंतर कॅम्पफायरची तयारी चालू होती.डिनरपासूनच मोना,रिशी काजल तिघेही तिला बोलतं करायचा प्रयत्न करत होती पण काहीतरी जुजबी उत्तरं देऊन त्यांना टाळत होती.
रीमाच फोन आला म्हणून ती जरा बाजूला गेली कमी वर्दळ असलेला बेंच बघून ती बसली.

“ऋत्या..कसं चालूये काम?”

“ठीक आहे.” ती तुटकपणे म्हणाली.

“काय ग काय झालंय,इतकी उदास का वाटतेय?”

“ताई कबीरसुद्धा इथे आहे.”

“ओह्ह्ह असंय का?” ती जरा अडखळत म्हणाली.

“ताई...हे सगळं खूप विचित्र होतंय गं..” तिला हुंदका दाटून आला.

“काय झालं ऋतू?”

“ताई..तो माझ्यात गुंतत चाललाय.”

“ऋतू..तो पहिल्या भेटीपासूनच तुझ्यात गुंतला होता असं नाही वाटत तुला.” तिने सरळ विचारलंच.

“ताई,हे ठीक नाहीये, वेदसोबत जे झालं ते मला कबीरसोबत होऊ द्यायचं नाहीये,मी नाहीये गं कुणाच्याच प्रेमाच्या लायक.”

“ऋतू कुठला संदर्भ कुठे लावतेस,तुझ्या आणि वेद्च्या रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स वेगळे होते बाळा,परिस्थिती वेगळी होती.” ती ऋतूला समजवायचा शक्य तेवढा प्रयत्न करत होती.

“हो ताई मान्यय तरीही..”

“तरीही काय ऋतू? तुझं आहे त्याच्यावर प्रेम?”

“..माहित नाही.”

“एकतर हो किंवा नाही असतं ऋतू,ह्या ‘माहित नाहीचा शब्दाचा’ अर्थ समोरचा आपल्या सोयीने घेतो,मी तुझं ही प्रेम आहे हेच समजेन किंबहुना मला हे सुरवातीपासूनच वाटत होतं पण तूच नेहमी अमान्य करत होतीस.”

“ताई माझं अजूनही ठाम मत आहे,माझं नाहीये त्याच्यावर प्रेम.. कधी करणार पण नाही.मला तो हक्कच नाहीये.”

तिने रडत फोन ठेवून दिला.

**************

आज प्रोडक्शन युनिटमधल्या मिहीरचा सिंगिंग प्रोग्राम होता.गाण्याच्या अगोदर रिशी मिहिरला भेटून आला होता.
दूर कुठेतरी एकट्या बसलेल्या ऋतूला काजलने ओढून आणलं आणि बळजबरीने शेजारी बसवलं होतं.मोना कबीरला घेऊन आली ऋतूला कदाचित आवडणार नाही म्हणून त्याने दूर बेंचवर बसणं पसंत केलं.
मिहिरने अगोदर लोकप्रिय गाणी म्हणून पूर्ण जमावाला खुश केलं होतं,आता एक शेवटचं गाणं राहिलं होतं.

मिहीरने माईक घेतला,त्याला साथ देणारी टीमदेखील रेडी होती.
“दोस्तो सज्जाद अली का बेहद खुबसुरत गाना है जो हर दिल को छु जाता है,खासकर जिसका साथी रुठा है,उससें नाराज है उन लोगोंके लिये है ये गाना| अक्सर कहा जाता है,खुदा रुठे तो भी कोई बात नही,यार रुठ्ना नही चाहिये.वो नाराज है तो जैसें पुरी कायनात नाराज है मुझसे..! उसे मनाने के लिये ये प्यारा गाना......तुम नाराज हो.

त्याच्या तरल आवाजात त्याने गायला सुरवात केली.
कबीरला एक एक वाक्य काळजावर वार करतंय,तिला त्याची कैफियत सांगतंय असं वाटत होतं तर तिने चोरून त्याच्याकडे बघितलं.
त्याच्या हातात सिगरेट...एक..मग दुसरी..मग अजून ....खूप त्रास होतोय त्याला तिच्या ह्या वागण्याचा, तिलाही कळतंय पण ती स्वतःच्याच मतांवर ठाम.
त्याचे डोळे जडावलेले तिच्याकडे दाद मागताय.

छोडो भी गिला हुवा जो हुवा ;
लहरों की जुबां को समझो
समझो क्या कहती है हवा....

तुम नाराज हो,मेरे कितने पास हो..

मिहीर जीव ओतून गात होता. सगळ्यांवर भूल पडली होती.गाणं संपलं,सर्वांच्या मनात दाटलेल्या भावनेने,निःशब्द झालेल्या वातावरणाने त्याला योग्य ती दाद दिली होती.कितीतरी वेळ शब्द हवेत तरंगत असल्यासारखे होते.
आता बराच उशीर झाला होता ,हळूहळू गर्दी विरळ होत गेली.रिशी काजल निरोप घेऊन निघून गेले.

“निघायचं?” मोनाने तिला विचारलं,तिचं लक्ष अजूनही त्याच्याकडेच होतं.

“तू जा,मी आलेच.” एवढं बोलून ती त्याच्याकडे निघाली देखील.
ती सरळ जाऊन त्याच्या शेजारी बसली.
तो शांत त्याने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
सिगरेटच्या वासाने त्रास होतोय,खोकला येतोय असंही दाखवलं, त्याने तरीही लक्ष दिलं नाही.तिने त्याच्या हातातून ती ओढली आणि पायाखाली चिरडली. त्याने तिच्याकडे बघितलं ही नाही,पुन्हा दुसरी काढली लाईटरने पेटवली.तिने ती ही काढून फेकली.त्याने पुन्हा तेच केल्यावर त्याच्या हातातून लाईटर आणि पाकीट दोन्ही बळजबरीने काढून शेजारच्या dustbin मध्ये टाकलं.

तो जायला निघाला,ती बसून राहिली.ती उठत नाही बघून तो थांबला.

‘उशीर झालाय रूमवर जा’ शांतपणे तो म्हणाला.

“तू जा मला थांबायचंय.”

“एकटी थांबू नकोस,प्लीज उठ.”

“ना....”

“ऋतुजा मला झोप लागतेय..तुला एकटं सोडून नाही जाणार मी,माहितीय तुला.”

“एका अटीवर..”

“काय ?”

“पुन्हा स्मोक करायचं नाही.”

“चल..उशीर होतोय.”

“तू उत्तर नाही दिलंस.”

“चल म्हणतोय ना,समजून घे.” तो कोरडेपणाने म्हणाला.

तिला हसू आलं,हा तोच रूड,खडूस आहे? तिला आश्चर्य वाटलं.
ती निघाली तसं तिच्यामागून तो ही निघाला.

©क्रमशः

पहिल्या कमेंट मधलं गाणं लगेच ऐकायचं... मग परत शेवटचा पॅरा वाचायचा🙈🙈🙈🙈🙈

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.