Mitranche Anathashram - 15 in Marathi Drama by Durgesh Borse books and stories PDF | मित्रांचे अनाथाश्रम - भाग १५

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १५

विवेकने मला त्या दिवशी काय घडलं ते सांगायला सुरुवात केली.

कार्यक्रम संपल्यावर तु घरी जाण्यासाठी निघाला आम्ही सर्व तुला सोडायला बाहेर आलो होतो. तुला सोडल्यानंतर आम्ही सर्व समीरला शोधत होतो. त्याला फोन केला तर तो ही बंद येत होता. आम्हाला वाटलं काही कामात असेल म्हणुन जास्त लक्ष दिलं नाही.
आम्ही आधीच ठरवलं होत की आ म्या चा वाढदिवस साजरा करायचा. आम्ही सर्व केक मंडपात घेवून आलो आणि समीरला शोधणार तितक्यात आश्रमात मोठा बॉम्ब फुटण्यासारखा आवाज आला. सर्व त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागले, स्वयंपाक घराच्या जवळ तो आग लागलेली दिसत होती. मी आणि संजय ने तिकडे धाव घेतली आणि दुसरा स्फोट झाला. एका मागून एक असे आवाज येत होते आणि समजण्यासाठी जास्त वेळ लागला नाही की तो आवाज गॅस सिलिंडर फुटण्याचा होता. बघता बघता आश्रमाला आग लागली होती. आश्रमाला खुप वर्ष झाली होती, लाकडाचं बांधकाम असल्याने त्या इमारतीला आग लागण्यासाठी जास्त उशीर लागला नाही. जस जशी आग वाढत होती आमच्या आश्रमाच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या.
सर्व पाहुणे आणि मुलं बाहेर निघत होते. शक्य असलेले सर्व लोक बाहेर पडले आणि उरलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम आम्ही सर्व करत होतो. आम्ही मिळेल त्याला विचारत होतो की तुमचं कुणी आत राहील नाही ना ? सुरेश काका सर्व मुलांची काळजी करत बघत होते की सर्व बाहेर आले की नाही. जे बाहेर आले त्या सर्वांना सुखरूप संजयच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली.
सर्व सुखरूप आहेत हे पाहून आम्ही शांत झालो. एक मुलगा धावत आला आणि म्हणाला की, पिंकी सापडत नाही. या धावपळीत आम्ही विसरलो होतो की सर्व मुलांबरोबर संध्या, निशा, संध्याची आई, विवेकची आई, संजयची आई आणि काकू गेले. रजनी कुठेच दिसत नव्हती. सर्व आता पिंकी आणि रजनी कुठे गेले ते शोधत होते. काकांच्या डोळ्यात पाणी होत, अनाथाश्रम जळत होत म्हणून नाही तर पिंकी आणि रजनी दिसत नव्हते त्यामुळे, संजय आणि मी आश्रमाच्या जवळ जाऊन त्यांना हाका मारत होतो. त्या निर्जीव पण आग ओकणाऱ्या इमारतीकडे भिक मागत होतो त्या निष्पाप मुलींच्या जीवाची, आम्ही हताश होऊन परतलो.
दहा ते पंधरा मिनिटात अग्निशामक दलाची गाडी आली. त्यांनी त्यांचं काम करायला सुरुवात केली. इमारतीतून धूर बाहेर येत होता. त्यातूनच दोन सावळ्या हळू हळू स्पष्ट होत गेल्या. त्यातील एक रजनी तर दुसरी पिंकी होती. रडणाऱ्याचे दुःखाचे अश्रू आता आनंद अश्रू मध्ये रूपांतर झाले होते. बाहेर आल्यापासून त्या फक्त रडत होत्या. त्यांच्या तोंडातून एकही शब्द येत नव्हता. कुणीतरी त्यांना पाणी प्यायला दिले. हुंदके देत रजनी म्हणाली, "समीर आत आहे"
संजय, "पण तो तर मला आत दिसला नाही"
जवळ जवळ एक तास अग्निशामक दलाच्या जवानांनी समीरचा शोध घेतला पण तो कुठे सापडलाच नाही. आम्ही सर्वांनी रजनी आणि पिंकीला विचारले की तुम्ही कुठे पाहिलं त्याला आणि तुम्ही त्याच्याबरोबर कसे होतात तर दोघंही काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हत्या.

इतकं बोलून विवेक शांत झाला.
मी, "आपण कुठे आलो आहोत ?"
विवेक, "हे संजयच घर आहे"
मी, "मग समीर सापडला की नाही ?"
विवेक, "रजनी म्हणाली की जे बोलणार ते तुझ्याशीच बोलणार"
मी, "मीच का ?"
विवेक, "दुसरा मित्र तुच आहे म्हणून तुला सांगणार"
आम्ही दोघं आत शिरलो, घरात शांतता होती. घरात सर्व होते, मला बघताच संजय माझ्याकडे आला आणि बोलला, "समीर कुठेच मिळत नाही ये, रजनी काही बोलत नाही आता फक्त तूच मदत करू शकतो"
मी, "कुठे आहे रजनी ?"
संजय, "तिच्या रूम मध्ये"
मी, "ठीक आहे, मला घेऊन चला"
संजय पुढे आणि त्याच्यामागे मी आणि विवेक दोघंही चालत होतो. रजणीच्या रूमचा दरवाजा त्याने वाजवला आणि आतून आवाज आला, "कोण आहे"
संजय, "मी आहे, समीरच्या दुसऱ्या मित्राला घेऊन आलो आहे"
साखळ्यांचा आवाज आला, रजनी ने दरवाजा उघडला तेव्हा तिची अवस्था बघून वाईट वाटलं. रडून रडून तिचे डोळे सुजलेले होते, केस विस्कटलेले होते, ओढणी नव्हती आणि रूममध्ये सर्व वस्तू पसरलेल्या होत्या. तिने मला हाताने आत येण्याचा इशारा केला आणि म्हणाली, "मला फक्त तुमच्याशीच बोलायचं आहे"
मी संजय आणि विवेकला, "तुम्ही दोघं जा, मी येतो"
रूमध्ये गेल्यावर तिने मला चालण्यासाठी जागा केली आणि खुर्चीवर बसण्यासाठी सांगितले. तिने त्या दिवशी काय घडले ते सांगितले.
मी, "तु सर्वांसमोर सांगणार का ?"
रजनी, "नाही"
मी, "तुझ्याकडे जे आहे ते सर्वांसाठी आहे आणि माझ्याकडे जे आहे ते सुध्दा सर्वांसाठी आहे, म्हणून तु सर्वांना जे घडलं ते सांगावं असं मला वाटतं म्हणजे मी सुध्दा तुला काहीतरी सांगेल"
रजनी, "ठीक आहे"
मी आणि रजनी सर्व ज्या ठिकाणी होते त्या रूम मध्ये गेलो.
मी, "रजनी आता जे काही सांगणार आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या आणि तिचा त्यात काही दोष नाही म्हणून तिला त्यासाठी त्रास देऊ नका"

आणि रजनी बोलायला लागली.

क्रमशः

Rate & Review

Durgesh Borse

Durgesh Borse Matrubharti Verified 12 months ago

Anjali Shinde

Anjali Shinde 1 year ago