Book Test Review - InshaAllah in Marathi Book Reviews by Ishwar Trimbak Agam books and stories PDF | पुस्तक परीक्षण समीक्षण - इन्शाअल्लाह

Featured Books
Categories
Share

पुस्तक परीक्षण समीक्षण - इन्शाअल्लाह

पुस्तक परीक्षण / समीक्षण

पुस्तक ~ इन्शाअल्लाह
लेखक ~ अभिराम भडकमकर
प्रकाशन ~ राजहंस प्रकाशन
किंमत ~ ३५०/-

लॉकडाऊन नंतर अक्षरधारा - राजहंस यांचा पुस्तकांचा सेल लागला होता. अभिराम भडकमकर यांचं नाव फक्त मराठी चित्रपटसृष्टीत आहेत म्हणून माहिती होतं. त्यांनी लिहिलेली कादंबरी पाहिली. कादंबरीचे नाव आणि मुखपृष्ठ पाहून विकत घ्यावं की नको, म्हणून द्विधा मनस्थितीत होतो. ऐतिहासिक ग्रंथ आणि कादंबऱ्यांमध्ये रमणारा मी. अशा प्रकारची कादंबरी वाचण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न! गूढ, शोध, राजकीय,आणि ऐतिहासिक कादंबऱ्या माझा आवडीचा विषय. म्हटलं हे पुस्तक विकत घेतोय, पण न वाचताच पडून राहतेय की काय! वाचायला सुरुवात केली. मुस्लिम मोहल्ल्यातील वर्णनं, प्रसंग, वाचता वाचता कथा पुढे पुढे जाऊ लागली. कथेनं मनाची पकड घ्यायला सुरुवात केली. दोन तीन दिवसांत रात्री उशिरा जागून पुस्तक हातावेगळं केलं. कादंबरी वाचल्यानांतर मुखपृष्ठ असे का घेतले? त्याचा अर्थ समजतो.

सुरुवातीला आजूबाजूच्या लहान लहान प्रसंगांमधून पुढे जाणारी कादंबरी नंतर नंतर मात्र, एकाच पात्राभोवती फिरताना दिसते. सुरुवातीला कथानक जरा कंटाळवाणे वाटते. मध्ये मध्ये सुध्दा जरा संथ झाल्यासारखं वाटतं. पण कथा जसजशी पुढे सरकते तस-तसे आपण त्यामध्ये गुंतत जातो. कथेतील जूल्फी, रफिक, श्री, बर्वे, जमीला, तीची वकील ही पात्रं आपल्याला जवळची वाटायला लागतात.

वस्तीतून अचानक पोलीस काही तरुणांना बॉम्ब-स्फोटाच्या कटाच्या आरोपाखाली अटक करतात. त्यातला एक मुलगा फरार होतो. तो का फरार झाला? कि पोलिसांनीच त्याला पकडून उंडरग्राऊंड केला? हे काही शेवटपर्यंत कळत नाही. त्याचा शोध किंवा तपास कार्याचंही पुढे काही होताना दिसत नाही. त्याची आई मात्र त्याला शोधून काढा. खरंच तो अशा काही वाईट कटामध्ये सहभागी होता का? असेल तर त्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा करा. या बाजूने उभी राहिलेली आहे. अटक केलेल्या मुलांना सोडवून आणण्यापेक्षा, बॉम्बस्फोटाच्या कटाचा योग्य तो तपास करून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी. म्हणून ती अडून बसलेली आहे. तर वस्तीतील काही धार्मिक कट्टर लोक मुलांना खोट्या आरोपाखाली अटक केली आहे, म्हणून अडून बसलेली आहेत.

कादंबरीमध्ये मुस्लिम वस्तीचं वर्णन, तिथली वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, त्यांची बागवानी बोलीभाषा, सण - सणवार वगैरे सगळं लेखकाने अगदी सुंदररित्या रेखाटलं आहे. जेव्हा जेव्हा एखादं पात्र समोर येतं, तेव्हा आपल्याला आपसूकच त्याचा स्वभाव, त्याच वागणं कसं असेल कळतं. कादंबरीतील बागवानी भाषा नकळत आपल्याच जिभेवर रेंगाळायला लागते. जसे कि 'इधरच, आचिंगा, हय, बोलतई, छोरवांदा, पडिंगा, मिलिंगा, अगे माँ गे' हे आणि असे अनेक शब्द. आपणच त्या वस्तीमध्ये फिरतो आहोत कि काय? असं वाटायला लागतं. यामध्ये भडकमकरांचा अभ्यास, निरीक्षण, भाषेचा वापर यांचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच! वसाहतीतील काही जुनी जाणती धार्मिक कट्टर माणसं धर्मग्रंथातील तथाकथित गोष्टींचा वापर, वसाहतीतील बदलू पाहणाऱ्या लोकांना घाबरवण्यासाठी करणे. चांगल्या कामामध्ये काहीतरी खुसपट काढून आडकाठी निर्माण करणे. वस्तीमध्ये होणारे बदल, हे कसे आपल्या समाजासाठी घातक आहेत म्हणून टिमक्या वाजवणे. हे सर्वच क्षेत्रांत किंबहुना समाजातील सर्वच स्तरांवर होत असते. वस्तीतील शिकलेली माणसं फक्त आपल्या विकासाचा विचार करतात. तर राजकारणमध्ये असलेली, फक्त अन फक्त आपला राजकीय फायदा बघत असतात. अशी काही माणसं आपल्याला इथंही भेटतात. नकळत आपण त्यांचा द्वेष करायला लागतो.

कादंबरीचा नायक तसं पाहायला गेलं तर एक मुस्लिम तरुण! झुल्फी त्याचं नाव. संपूर्ण कादंबरी त्याच्या आणि मुस्लिम वसाहतीच्या आजूबाजूला आपल्याला फिरवत राहते. सुरुवातीचे इजतेमाचे चाळीस दिवस. नंतर रफिकच्या संघटनेमार्फत होणारे कार्यक्रम, कॉलेजमधले मित्र, आग्रा येथे झालेले सेमिनार, आणि रफिकचा सहवास. यातून झुल्फीच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल होताना दिसतो. समाजासाठी, वस्तीमध्ये वर्षानुवर्षे जुन्या रूढी परंपरांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करता यावं म्हणून सतत धडपडताना दिसतो. त्याला चांगल्या वाईटाची चांगली जाण आहे. त्याचं वाचन चांगलं आहे. कोणत्याही गोष्टीकडे डोळसपणे बघण्याचा त्याचा एका वेगळा दृष्टिकोन आहे. चांगल्या कामामध्ये लोकांची मिळणारी साथ तसेच विरोधही इथं आहे.

कादंबरीतील महत्वाचं आणि छाप पडणारं पात्र म्हणजे रफिक. त्याचं वाचन, अभ्यास गाढा आहे. त्याचे विचार, बोलणं सगळं आधुनिक आहे. धर्मग्रंथांमध्ये लिहिलेल्या गोष्टींचा आजच्या युगामध्ये त्यांचा अन्वयार्थ कसा घ्यायला हवा? अखिल मानवजातीला त्याचा कसा उपयोग करता येईल? कसा दिशा देणारा ठरेल? जे लिहिले आहे, ते जसेच्या तसे न स्वीकारता मेंदूचा वापर करून त्यावर विचार करायचा आग्रह धरणारा. सगळ्यांचं जगणं सुखावह करणाऱ्या तत्वज्ञानाची मांडणी करण्याचा प्रयत्न करणारा. जगामध्ये एकच सत्य आहे. त्याकडं जाणारे मार्ग फक्त वेगवेगळे आहेत. म्हणजेच धर्म वेगवेगळे आहेत. पण सर्व धर्माची शिकवण मात्र एकच आहे. माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागवणे. जगा आणि जगु द्या! जिहाद म्हणजे काय तर चांगलं काम करण्यासाठी आपलं आयुष्य उधळून देणं! याचा अर्थ जीव देणं नव्हे तर आयुष्यभर इतरांसाठी चांगलं कार्य करत राहणे. जिहाद पुकारायला हवा दारिद्र्याशी,अडाणीपणाशी, स्त्रियांना मुकं जनावर समजणाऱ्या पुरुषांच्या वृत्तीशी! आपल्या लोकांसाठीच नव्हे तर सर्वच धर्मातील लोकांनी शिकून डोळसपणे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे पाहावं. त्यावर विचार करावा. योग्य ती कृती करावी. म्हणून सदैव आपल्या संघानेमार्फत विविध कार्यक्रम तसेच सोशल मीडियामार्फत जनजागृती करत असतो.

कादंबरीमध्ये रफिकच्या जाण्याचा प्रसंग डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहत नाही. तसेच मृत्यूंनंतर त्याच्या शवाचे दफन न करता मेडिकल कॉलेजला अभ्यासासाठी देण्यात यावं, म्हणून त्याचं कौतुक वाटतं आणि अभिमानही! कादंबरीमध्ये आपल्याला जन्नत, जहन्नुम, कयामत, जिहाद अशा गोष्टींचे चुकीचे अर्थ सांगून तरुणांची माथी कशी भडकावली जातात? धर्मासाठी, देवासाठी, अल्लाहसाठी जिहाद म्हणजे काय? याचा सकारत्मक किंवा नकारात्मक अर्थ घ्यायचा? निकाह, तलाक, लव्ह जिहाद, जकात या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच कळतात अन पटतातही.

कादंबरीमध्ये असे अनेक प्रसंग आहेत कि, ज्यामुळे धर्मातील अनिष्ठ प्रथांचा राग, तिटकारा यायला लागतो. जसे कि, मुमताजच्या कमाईवर जगणारा तिचा नवरा. स्वतःकडे जरा तिचं दुर्लक्ष होताच तिला मारणारा. पहिले लग्न होऊनही मुलं होण्यासाठी झुल्फीच्या बहिणीशी दुसरे लग्न जमवायला आलेला मध्यस्ती. दुसरा निकाह करणे म्हणजे मर्द असल्याचा अभिमान आहे. त्याच्याकडे तेवढी धमक आहे. त्या मध्यस्तीला होणारा जुल्फीचा विरोध. जुल्फीचा विरोध बरोब असूनही मुलीला लवकर लवकर लग्न लावून देण्याच्या मागे लागलेले घरचे. आणखी मुलांना पोसण्याची कुवत नाही, म्हणून नसबंदीसाठी तयार होऊ घातलेला तरुण. त्याला धर्माची भीती घालणारे घरचे तसेच कट्टर धार्मिक बुरसटलेल्या विचारांचे लोक. पाच सहा वर्षांच्या लहान मुलाचा होणारा खतना. त्याला होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष करून त्याच्या हातात पैसे कोंबणारे आणि त्याचं अंग पाहून खिदळणारे लोक. या आणि अशा अनेक अनिष्ट प्रथा आजही धर्माच्या नावाखाली समाजामध्ये सर्रास चालू आहेत. आणि न शिकलेले, अडाणी लोक ते धर्माच्या भीतीपोटी आजही सोडायला तयार नाहीत किंबहुना, त्यांना समाजातील काही कट्टर धार्मिक लोकं भीती घालतात. दंगे, जंग मजहबच्या नावाखाली, मजहबसाठी लढले जातात, असे सांगतात. पण त्यामागे वेगळेच मतलब असतात. अल्लाचा त्यात काहीच संबंध नसतो. एकविसावे शतक केव्हाच चालू झाले आहे. अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत आज कुठे आहे? विज्ञान मंगळावर जाऊन पोहोचले आहे. आणि तरीही समाजातील लोक दारिद्र, गरिबी, मध्ये खितपद पडलेली आहेत. खरंच हे पाहून, वाचून राग, चीड आल्याशिवाय राहत नाही.

वसाहतीमध्ये होऊ घातलेल्या बदलांना विरोध करणारी कर्मठ धार्मिक लोकं नसबंदीला विरोध करताना म्हणतात, मुलं म्हणजे अल्लाची देण आहे. ज्यानं जन्म दिला तो उपाशी नाही मारणार. नसेल तुझी ऐपत तर मग जकात घेऊन पोराबाळांच भागवू शकतो. पण जेव्हा, जकात घेणं चांगलं की देणं चांगलं? हा प्रश्न येतो तेव्हा मात्र, ते धर्माचं नाव समोर करून पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. रक्तदान शिबिरामध्ये हीच लोकं जेव्हा महिलांनी रक्तदान देणं अल्ला को मंजूर नहीं, हे धर्मात बसत नाही, अशी ओरड करतात त्यावेळी जमिला, मुमताज पुढे होऊन रक्तदान करण्यासाठी समोर येतात. तेव्हा मात्र त्यांना काढता पाय घ्यावा लागतो.

जमीलाच्या घरी मुलं जमा होऊ लागतात. नवनव्या विचारांवर चर्चा व्हायला सुरुवात होते. धर्मातील काही अनिष्ट प्रथा कशा काळानुरूप बदलल्या पाहिजेत. जुन्या गोष्टींकडे आजच्या परिस्थितीनुसार पाहिलं पाहिजे. लोकांनी शिकलं पाहिजे. त्याचबरोबर स्वच्छता, कष्ट आणि बंधुभाव जोपासला पाहिजे. या आणि अशा अनेक गोष्टींवर चर्चा होऊ लागतात. हळू हळू आजूबाजूच्या बायका तरुण मुलंही यामध्ये सहभागी होऊ लागतात. आजपर्यंत ज्या गोष्टींकडे डोळे झाकुन पाहत होती. त्यांच्यावर विचार करायला सुरुवात झाली होती. आधी स्वतःमध्ये बदल घडवला तरच समाजामध्ये बदल घडवण्याची प्रेरणा, जिद्द तुमच्यामध्ये निर्माण होते.

खतना करतेवेळी जुल्फीला पडलेले प्रश्न खरंच आपल्यालाही विचार करायला लावतात.

"जर खरंच खतना करून सच्चा मुसलमान हे सिद्ध होत असेल तर मग आयुष्यभर अल्लाने सांगितलेल्या मार्गावर चालणं, इतरांची मदत करणं, समाजासाठी चांगलं काम करणं पुरेसं नाहीये का?"

या प्रसंगामध्ये एक प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे.

"जर अल्लाच मुसलमान को ऐसा चाहता था | तो उसने सुंता करकेच कायको पैदा नहीं किया?"

"जिहादच्या नावाखाली दंगे करून, आपलाच धर्म जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. दुसऱ्या धर्मातील लोकं काफर आहेत. शिवाय, जे आपल्या धर्मामध्ये ढवळाढवळ करतात. बदल करू पाहतात. हे सुद्धा काफरचं! अशा काफर लोकांना मारून जर जन्नतमध्ये ऐषोआरामची जिंदगी मिळते. तर अल्लाहनेच बनवलेल्या धरतीला घाण करून, वाईट वागून, का म्हणून जहन्नुन बनवायचे. इथेच का नाही जन्नत बनवू शकत. जर इथेच तुम्ही जन्नत नाही बनवू शकत तर जन्नत मध्ये जाऊन पण तुम्ही त्याची वाटच लावणार!"

कादंबरीमधली काही वाक्ये मनात घर करून जातात आणि विचारही करायला लावतात.

"मरने के लिये एक मिनट का गुस्सा या गम बहुत है| मगर जिने की लिये हिम्मत लगती हय|"

"गडबडी धरती में नहीं इन्सान के भेजे मी हय |"

"दिवसभरात अल्लाहसमोर देवासमोर मस्तक टेकवायला वेळ नाही मिळाला, तरी चालेल. पण असे काम करू नका कि ज्यामुळे शर्म से सर झुक जाये. एक वेळ कुराण शरिफ नहीं पढा तो भी चलेगा मगर किसी गरीब,मजबूर की दिल जरूर पढ लेना. खुशियां बाटो अल्लाह अपनेआप खुश हा जायेगा|"

समाजकारण, राजकारण यांच्यामध्ये सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी फरफट! तसेच मानवी मनावर आजूबाजूच्या परिस्थितीनुसार होणारे बदल! धर्माधर्मातील राजकारण आणि त्यांचा फायदा घेणारी राजकारणी तसेच कट्टर धार्मिक मंडळी! समाजातील अनिष्ठ रूढी - परंपरा येणाऱ्या पिढीला जश्याच्या तश्या शिकवल्या जाणे! त्यांची भीती घालणे! या उलट त्यावर डोळसपणे पाहायला लावणारी! विचार करायला लावणारी! बदल घडवू पाहणारी, काही सुधारक मंडळी! हे आणि अशी अनेक लोकं, प्रसंग, गोष्टी आपल्याला कादंबरीमध्ये पाहायला मिळतात.

कादंबरीमध्ये कुठेही आणि कोणत्याही धर्माला वाईट म्हटलेलं नाहीये किंवा कुणा एकाला नायक करण्यासाठी, दुसऱ्या कुणालाही खलनायक बनवलेलं नाहीये. मानवतावादी विचारसरणीला आणि साक्षरतेला प्राधान्य देऊन जीवन अधिकाधिक कसे सुखकर करता येईल? आजूबाबाजूच्या परिस्थितीचा डोळसपणे विचार करून योग्य ती कृती कशी करता येईल? या अनुशंघाने लेखन केलेलं आहे. अगदी वाचनीय आणि माहितीपूर्ण असे लेखन आणि लेखनशैलीही मनाचा ठाव घेणारी. कादंबरीतील प्रसंग, कथा, विचार लेखकाने सफाईने आणि नेटकेपणाने मांडले आहेत.

पुस्तक नक्कीच वाचनीय झालेलं आहे. आजपर्यंत आपल्याला माहित नसलेल्या खूप गोष्टी कादंबरी वाचल्यानंतर समजतात. अनेक समज गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल. वाचनीय आणि संग्राह्य असे पुस्तक. कुणाच्या वाढदिवसाला, लग्नाला, किंवा कोणत्याही कार्यक्रमाला भेट देण्यासाठी महागडी पुष्पगुच्छ, किंवा गिफ्ट्स देण्यापेक्षा चांगली वाचनीय अशी पुस्तकं द्यावीत. वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी आणि येणारी पिढीही समजूतदार, विचारक्षील, प्रगल्भ व्हावी. एवढीच माफक अपेक्षा!

~ धन्यवाद
~ ईश्वर त्रिंबक आगम