Best Conversation in the World books and stories free download online pdf in Marathi

विश्वातील - एक सुंदर संभाषण

आणी निसर्ग मानवाला फोन करतो,जेव्हा मानव निसर्गाचा फोन उचलायला विलंब करतो.. तेव्हा निसर्ग आपल्या प्रेमळ, पण जरा भावुक होऊन दबलेल्या आवाजात बोलू लागतो, काय रे मानवा फोन तर उचल.. किती वेळचा फोन करतोय तुला. तुम्ही सगळे तुमच्या मग्न, सुखी आणी आनंदी जीवनात एवढे व्यस्त होऊन गेलात की तुम्हा लोकांना आमच्याकडे पाहायला सुद्धा वेळ नाही आहे....

कित्येक वर्षांपासून पाहतोय.. तुम्ही हवा तसा माझा वापर करून घेता...
तुम्हाला जिथे गरज भासली तिथे मी अगदी आनंदी होऊन तुमच्या मदतीला धावून येतो. मला आवडतं तुमच्या सोबत राहायला.. पण हल्ली तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करताय माझ्यावर.

माझं आणि तुमचं नातं जन्मोजन्मीचं. माझ्या सानिध्यात अनेक प्राणी, पशुपक्षी, झाडे, तुमची मानवजात राहतात.
पण दिवसेंदिवस माणसाच्या राहणीमानात अतुलनीय बदल झालाय. मला सुद्धा खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही तुमचं सुखकर जीवन जगत असता.

निसर्गातील प्रत्येक वृक्ष हा तुम्हा सर्वांसाठी जगायचं म्हणून तग धरून असतो. खरंतर आम्ही तुम्हा मानवा सोबतच आयुष्य जुंपण्याची स्वप्ने पाहत असतो. कारण माझ्या संगोपनाची जबाबदारी ही तुमचीच.

जसा जसा काळ बदलत गेला, काळा बरोबर तुम्ही सुद्धा बदलात.. तुम्हीच तर बोलता निसर्गाच्या सौंदर्याला सीमा नाही. हे ऐकून खूप बर वाटत. पण आता वाटत की सगळं बदलत चालय. माझ्या हिरव्यागार रूपानं तुमच्या डोळ्याची पारणे फिटावीत यासाठी तुम्ही नेहमीच माझ्या सानिध्यात यावं असं मला नेहमी वाटत.

मित्रांनो, कदाचित तुम्हाला माझा राग येऊ शकतो. निसर्गामध्ये भ्रमंती करताना ज्या-ज्या ठिकाणी तुम्ही जाता. त्या त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा होतात कचरा करताना मला इजा होईल असं तुम्हाला एकदाही नाही का वाटत? तुम्ही माझ्या अंगावर तुम्हाला नको असलेली प्रत्येक गोष्ट फेकून देता. प्लॅस्टिक, पिशव्या, किती तो कचरा ! तरीसुद्धा मी शांतता अंगी धरून बसलो.. कारण मला सारखं वाटायचं की हे कधी ना कधी बंद होईल.. तुमच्याकडून हे नकळत होतंय. आज नाही उद्या तुमच्या लक्षात येईल, वाट पाहत राहिलो. परंतू हा कचरा असाच वाढत गेला तर मी एक दिवस संपून जाईन, ही भीती मला सारखी सतावत होती.


कळत-नकळत माझ्याकडे दुर्लक्ष करत राहिलात. खरंतर तुमचं संपूर्ण जीवन माझ्यावर अवलंबून आहे, तरीसुद्धा तुमच्याकडे दिवसभरातून थोडासा वेळ माझ्यासाठी नाही, याचेच मला दुःख आहे. परंतू मित्रांनो, माझे हे दुःख कोणाकडे मांडणार ? माझ्या जिवाभावाचा मित्र, माझे कुटुंब तर तुम्हीच आहात यानेच जर माझ्याकडे पाठ फिरवली तर मी कुठे जाणार ?

आता खरंच डोळे भरून येत आहेत.. बस्स एवढंच सांगण्यासाठी फोन केलेला... बघा जमतंय का तुम्हाला. माझ्या साठी जरा वेळ मिळाला तरी मी संपूर्ण आयुषभर तुमचा ऋणी असेल...

धन्यवाद !
तुमचा निसर्ग !

निसर्ग हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. सुंदर निसर्गाच्या रूपात आपण सर्वांनी देवाच्या खऱ्या प्रेमाचा आशीर्वाद घेतला आहे.निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते आहे.
निसर्ग हे एक नैसर्गिक वातावरण आहे जे आपल्या सभोवताल आहे, आपली काळजी घेते आणि प्रत्येक क्षणी आपले पालनपोषण करते. हे आपल्याभोवती एक संरक्षक ढाल प्रदान करते जे आपल्याला हानीपासून वाचवते. हवा, पाणी, जमीन, अग्नी, आकाश इत्यादी निसर्गाशिवाय आपण पृथ्वीवर राहू शकत नाही.
सूर्योदयाच्या उजाडण्याबरोबरच किती सुंदर दृश्य आहे, जेव्हा पक्षी गातात, नदीचा आवाज, तलाव, वारा आणि दिवसभराच्या दबावानंतर बागेत संध्याकाळी मित्रांसह आनंददायी क्षण. पण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपण निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायला विसरलो आहोत.

माझा निसर्ग. मी नक्कीच काळजी घेणार.
"आपण सर्व या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि विलीन सुद्धा होतो. म्हणून या निसर्गाचे जतन करणे आणि पोषण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे."