gift from god - 10 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - १०

'मी खोट सांगून मैत्रिणीच्या लग्नाला चंदिगढला गेले होते. त्याबद्दल मला माफ करा.' असे बोलून भूमीने नानांना शपथ दिली की पुन्हा कधीही असं खोट बोलणार नाही. परत अनाथ आणि पोरके होण्याची भीती मनात असलेली भूमी माई आणि नानांना सोडून राहण्याचा विचार देखील करू शकत नव्हती. नानांनी तर आपल्या सगळ्या इस्टेटीतून विभासाचे नाव काढून टाकले. परत विभासच्या तोंडही पाहणार नाही, असे मनाशी ठरवले. आपल्या मुलामुळे एका मुलीची फसवणूक झाली, या विचारानेच माई अस्वस्थ झाल्या होत्या. आला दिवस अपराधीपणाची भावना त्यांना आतल्याआत खात होती.

विभासला माफ करणे त्या दोघांनाही शक्य नव्हते. या सगळ्यामुळे भूमी तर आपल्याला सोडून जाणार नाही ना, या भीतीने त्यांनी भूमीला चंदिगढ वरून ताबडतोप बोलावून घेतले.

*****


क्षितीज बरोबर असतानाच मैथिलीच्या अपघात झाला होता त्यामुळे क्षितीजवर मैथिलीच्या बाबांचा खूप राग होता. आपल्या मुलीच्या अश्या अवस्थेला ते क्षितिजला जबाबदार समजत होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या पोहोचल्या क्षितिज मैथिलीच्या वॊर्ड जवळ पोहोचला, तेथील नर्सने त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली नाही. 'कोणालाही आतमध्ये सोडू नये.' अशी कोर्लोस्कर म्हणजेच मैथिलीच्या बाबांनी सूचना केली होती. बाहेर असणाऱ्या खिडकीच्या काचेमधून मैथिलीला बघताना त्याचे डोळे भरून आले. आता तिला पुन्हा कधीच बघता येणार नाही, असेच त्याला वाटत होते. सुदैवाने मेघाताई म्हणजेच क्षितिजच्या आई सकाळीच तिथे उपस्थित झाल्या असल्याने त्यांनी क्षितिजला संभाळले. मैथिलीच्या बाबांची सूचना आल्याशिवाय आता मैथिलीला कोणीही पाहायला जाऊ शकत नव्हते. त्यामुळे तसा बंदोबस्त करून डॉक्टर निघून गेले. काय करावं हे क्षितिजला कळेना, त्यातच लिगल कागदपत्रांची मूळ प्रत मिळत नाही म्हणून ऑफिस मधून मुखर्जींचे फोनवर फोन येत होते. कधी नाही ते आपलया पप्पांना म्हणजेच मिस्टर सावंतांना फोन करून त्याने कंपनीची परिस्थिती सांभाळायला सांगितले. एरवी बाप-लेक एकमेकांचे तोंड बघताना मुश्कील असे. पण मेघाताईंनी मैथिलीची बातमी कानावर घालताच मिस्टर सावंतानी देखील मुखर्जींना फोन करून समजावले.

*****


फार अवघड पेच होता क्षितिज समोर. दोन वर्ष एकाच जाग्यावर कोमातअसलेल्या मैथिलीची अचानक बिघडलेली तब्ब्येत, त्यातच लिगलचे कागदपत्र घेऊन अचानक गायब झालेली भूमी. ते कागद कुठेही लीक झाले तर कंपनीला फार मोठी बदनामी होऊ शकते, हे त्याला माहित होते. त्यामुळे मुखर्जींचे त्यासाठी येणारे फोन, भूमीवर ठेवलेल्या आंधळ्या विश्वासाला गेलेला तडा. त्यात भूमीला शोधणार तरी कुठे आणि कसे? आपण खूप मोठी चूक केली वाटत असे त्याला वाटत होते. हा गुंता कसा सोडवावा हे त्यांला कळेना.

अशातच घरी आल्यावर आज्जो ग्रह शान्तीच्या पूजेसाठी करत असलेली तयारी बघून तर तो भांबावला. शांती आहे की लग्न हेच त्याला समजेना. आज्जोला समजावणे देखील कोणाच्याच हातात नव्हते. बाहेर काहीही होउदे, तिच्यावर कशाचाही परिणाम नाही. तिला पाहिजे तेच ती करणार. त्यामुळे कोणीही तिकडे काहीही लक्ष दिले नाही. मेघाताई मात्र आपल्या मुलाला सावरण्यासाठी प्रयत्न करत होत्या. क्षितिजच्या बाबांची लागेल तशी मदत घेऊन त्यांनी कंपनीच्या व्यापापासून क्षितिजला थोडे दिवस दूर ठेवलं होत.

*****

आज सावंतांच्या घरी गृहशांतीच्या पूजेसाठी जोरदार तयारी चालू होती. उद्याचा पूजेचा मुहूर्त होता. आज्जो आपल्या मेकअप आणि साडीची तपासणी करण्यात गुंतलेली होती. फुलांचा माळा, दिवे, नैवेद्यासाठी लागणारे साहित्य आणि येणार्यां पाहुण्यांसाठी लागणारे साहित्य वगैरे जमा झाले का ते मेघाताई स्वतः चेक करत होत्या. गृहशांती असली तरीही त्या निमित्ताने सत्यनारायणाची पूजा होणार होती. एवढ्या वर्षांनी सावंतांच्या घरात पूजा म्हणजे मोठी जय्यत तयारी... त्यामुळे निवडक लोंकांना फोन करून बोलावले गेले होते. क्षितिजचे मन कशातही लागेना. तरीही येऊन जाऊन जमेल तशी मदत तो करत होता. आशाकाकू आणि मोरे यांना हाताशी धरून मेघाताई डेकोरेशन वगैरेंकडे लक्ष देत होत्या. एवढ्यात मिस्टर सावंत जिन्यावरून घाईघाईने खाली उतरले.

'' क्षितीज. लवकर निघ, ऑफिसमध्ये जायचं आहे.''

त्यांना असे बघून क्षितीज थोडा गडबडलाच. '' काय झालं पप्पा?''

''कंपनीच्या शेअर होल्डर्स बरोबर तातडीची मिटिंग आहे. आणि कोर्लोस्कर सुद्धा येतायत.'' बॅग उचलून त्यामध्ये लागणाऱ्या फाइल्स ठेवत ते निघाले सुद्धा.

''मिटिंग कश्याबद्दल? आणि एवढ्या अचानक.'' क्षितिज देखील मोबाइल हातात घेत तसाच निघाला.

''बस गाडीत... सांगतो.'' म्हणत दोघेही घराबाहेर पडले.

त्यांच्या मागे घरातील नोकर-चाकर आणि खुद्द मेघाताई सुद्धा अचंबित होऊन डोळे इस्फारून पाहू लागल्या.

''एकमेकांशी कधीही नपटवून घेणारे बाप-लेक आज अचानक एकत्र ऑफिसला जात आहेत. काय जादू म्हणायची.?'' आज्जो शेवटी बोललीच.

'' तेच म्हणते ग आई. घडणाऱ्या बऱ्यावाईट प्रसंगांमधून शिकतायत वाटत दोघेही. अश्या प्रसंगी आपली माणसाचं आपली साथ देतात. हे समजलं आहे त्यांना, त्यामुळेच एकमेकांशी पटवून घेत आहेत.'' मेघाताई देखील दाराकडे पाहून कुजबुजला.

''देव करो आणि या बाप लोकांचं नातं पूर्वीसारखं होवो.'' आज्जो देवाला हात जोडत बोलत म्हणाली.

''त्या मैथिलीमुळे या दोघांमध्ये दरी निर्माण झाली आहे. नाहीतर...'' मेघाताईंपुढे बोलणारच एवढ्यात आज्जोने हातानेच इशारा केला.

''पुरे. मेघे तू परत त्याच विषयावर येऊ नको ग. उद्या पूजा आहे, तयारीच बघ.'' त्यांच्या हो ला हो देऊन मेघाताई देखील बेडरूमकडे वळल्या.

*****

'S K (सावंत अँड कोर्लोस्कर) ग्रुप ऑफ कंपनीजच्या भव्य हॉल मध्ये मधोमध मोस्टर सावंत आणि क्षितिज दोघे बसले होते. बाजूच्या खुर्चीवर कोर्लोस्कर आणि त्यांचा पीए हे दोघे देखील बसले. समोर बसलेल्या कंपनीचे शेअर होल्डर्स आणि महत्वाचे अधिकारी यांच्यामध्ये आपापसात कुजबूज सुरु होती. महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते आणि नवीन प्रोजेक्ट्सचे डील फायनल करण्यात आले. मिटिंग जवळपास संपायला आली होती. आपापले डाउट्स सॉल्व्हड करून एकेक मेम्बर मिटिंग रूमबाहेर पडू लागला. शेवटी किर्लोस्कर, सावंत आणि क्षितीज हे तिघेच तिथे उपस्थित राहिले. आणि एवढ्या वेळ अनुपस्थित असलेले मुखर्जी बाहेरून नॉक करून आत आले. लिगलच्या फाइल्स गायब असल्याची गोष्ट किर्लोस्करांना कानावर घालण्याची आयतीच संधी मिळाली होती. त्या गाडी अपघातामुळे किर्लोस्कर आणि सावंत यांचे संबंध बिघडलेले आहेत. हे देखील त्यांना माहित होते, आगीत तेल ओतण्याची त्यांची जुनी सवय. सर्वांसमोर मिस्टर सावंत आणि क्षितीज यांची फजिती बघण्याचा मोह त्यांना आवरेना. त्यांनी फाइल गायब असल्याची गोष्ट सर्वांसमोर उघड केली. आणि सगळ्यांचे चेहेरे पाहण्यासारखे झाले होते.'


क्रमश

https://siddhic.blogspot.com/