Cyanide - 12 - and - 13 books and stories free download online pdf in Marathi

सा य ना ई ड - (प्रकरण १२ आणि प्रकरण १३)

सा य ना ई ड


प्रकरण १२

जवळ जवळ मध्य रात्र झाली होती सौम्या तिच्या खुर्चीत बसून पाणिनी कडे घाबरून बघत होती . ते दोघे बाहेरून जेवून ऑफिस मधे आल्यापासून पाणिनी सतत येरझाऱ्या घालत होता .बाहेरचे जेवण सुद्धा त्यांना चवीने घेता आले नव्हते.

“ घरी जा सौम्या” पाणिनी म्हणाला. तिने मानेने नकार दिला.” आपल्याला काही कळे पर्यंत मी जाणार नाही.

“ सव्वा बारा वाजून गेले आहेत. संध्याकाळपासून पोलीस जयकर च्या घराजवळ ठाण मांडून बसले आहेत.साडे दहा वाजता त्यांना संशय यायला सुरुवात झाली की त्याने त्यांच्या हातावर तुरी दिली आहे. “ सुमारे साडे अकरा ला त्यांची खात्रीच पटली आता ते पुढील कारवाई करतील .पोलिसांना माहीत आहे की अनन्याआणि जयकर फरार आहेत . जयकर हा तिच्या विरुद्ध चा साक्षीदार असू शकतो त्यची साक्ष सुरक्षित राहील यासाठी हवे ते उपाय पोलीस करतील .”

“दुसऱ्या शब्दात सांगयचे तर ते दोघे लग्न करणार आहेत याचा आगाऊ अंदाज ते बांधतील ?” सौम्या ने विचारले.

“ पोलीस मूर्ख नाहीत ही कल्पना त्यांच्या डोक्यात या घटकेला आहेच.’

“ काय करू शकतात ते?”

“ बरंच काही.”

“ उदाहरणार्थ?”

“ एक तर राज्याच्या सीमेवरील नाके तपासू शकतात, त्या दोघांना लग्न करण्याची एकच संधी होती ती म्हणजे पोलिसांच्या लक्षात येण्यापूर्वीच स्वतंत्र विमानाने परदेशी जाणे.”

सौम्या जवळ जवळ रडण्याच्याच अवस्थेत होती.” मी यात मधे घुसले म्हणून ही वेळ आली तुम्ही येई पर्यंत मी थांबले असते आणि तुम्हालाच सांगू दिले असते की विमानाने जा, आणि...”

“ वकिलाने कायदा धाब्यावर बसवणे अपेक्षित नसते.”

“ तुम्ही अप्रत्यक्ष पणे सांगू शकला असता.माझी आशा आहे की त्यांनी लग्नाच सर्व जमवलं असावं.”

पाणिनी ने पुनश्च येरझऱ्या घालायला सुरवात केली. “ कनक ला समजलं असेल?” सौम्या ने विचारले.

“ तो सगळ्याचाच एकाच वेळी आढावा घेतोय. त्याला समजेलच.”

“ पोलिसांना जी बाटली तळ्यात मिळाली त्यात विषारी गोळ्या किती होत्या?”

“ आपल्याला अजून समजलं नाही. पोलीस आपल्याला विश्वासात घेत नाहीत अजून. हेरंब खांडेकर हुशार असतील तर प्रकरण कोर्टात आल्यावरच कळू देतील ते. ”

“ जयकर आणि अनन्याचे लग्न झाल्यावर जयकर तिच्या विरुध्द साक्ष देऊ शकणार नाही आणि तुम्ही हे प्रकरण सहज सोडवाल ? “

“ काहीतरी , कुठेतरी चुकतंय, बऱ्याच विषारी गोळ्यांच्या बाटल्याचा विषय विचारात घ्यावा लागणार आहे.पोलिसांनी एक तळ्यातून काढली. जयकर ने एक संडासात टाकली,म्हणजे दोन झाल्या. नंतर एक गोड गोळ्यांची बाटली तळ्यात टाकली गेली होती म्हणजे एकूण तीन झाल्या. दोन विषाच्या एक साधी. “

‘’ पण मग मिलिंद बुद्धीसागर ने गोड गोळ्यांची तळ्यात टाकलेली बाटली ? “

“ तो नाकारणार ते.पोलीसाना ते माझ्यावर आणायला आवडेल. आपण त्या हॉटेल वर अनन्याला का व कसे भेटायला गेलो या बद्दल जर मिलिंद बुद्धीसागर ने खोटी कथा चांगली रचून सांगितली तर ते त्याला फार कठोर पणे नाही वागवणार.”

“ पण तुम्हाला शोधून काढता येणार नाहीत असे त्याच्या गोष्टीत कच्चे दुवे नसतील?”

पाणिनी काही बोलायच्या आधीच फोनची रिंग जोरात वाजली.सौम्या ने फोन घेतला, पलीकडून ओजस बोलत होता. पाणिनी ला जवळ उभे राहून फोन मधील कर्कश्य आवाज ऐकू येत होते.सौम्या च्या चेहेऱ्या वरून काय झाले ते ऐकायची गरज पाणिनीला पडली नाही.त्याने बाहेर पडण्याची तयारी सुरु केली. लाईट घालवले.

“ पोलिसांनी त्या दोघांना लग्न करण्यासाठी जाताना रस्त्यातच पकडले.तो मूर्ख स्वतःची गाडी चालवत विमान तळावर निघाला होता.पोलिसांनी पेपर वाल्यांना बातमी पुरवली आहे., ओजस ने आपल्याला वाटेत त्याच्या ऑफिस मध्ये थांबायला सांगितलंय.” सौम्या म्हणाली.

पाणिनी ने सौम्या च्या कंबरे भोवती हात टाकले.त्याच्या खांद्यावर तिचं डोक ठेऊन तिला मोकळे पणाने रडू दिलं !

१२ समाप्त


प्रकरण १३.


कनक ओजस पाणिनी च्या ऑफिस मधे दुपारी आला आणि पाणिनीच्या टेबलावर ताज्या वर्तमान पत्राची चवड टाकली. पाणिनी ने त्या पेपर कडे लक्ष न देता विचारले,” कितपत वाईट आहे हे ?”

“ ते यात पार शेवट पर्यंत गेले.खांडेकर ने कोणतेही विधान करायला तात्विक विरोध केला.पण आपल्या दुर्दैवाने इन्स्पे.होळकर तिथे होता त्याने पेपर वाल्यांसमोर विधान केले.”

“ खांडेकर यांच्या ऑफिस मधेच?”

“ हो आणि ते सुध्दा त्यांच्या समोर. अगदी मान डोलवत होते ते तेव्हा.” “इन्स्पे.होळकर म्हणाला की पाणिनी पटवर्धन विरोधी वकील असताना अनेक प्रकरणात त्याला अगदी सहज बाजुला केलंय. तळ्यातून काढलेल्या साध्या गोळ्यांच्या बाटलीने पोलिसांच्या डोळ्यात अजिबात धूळ फेक झालेली नाही.”

“ पाणिनी , त्यांच्या लक्षात आले की जयकर च्या लॅब मधूनच अनन्याने सायनाईड आणले.म्हणूनच जयकर जेव्हा त्याच्या घरी आलाच नाही तेव्हा त्यांनी कसून तपास चालू केला.त्यांना जयकर त्याच्या नेहेमीच्या रेस्टॉरंट मधे एका माणसाला भेटलेला दिसला आणि त्याच वर्णन पाणिनी पाणिनी पटवर्धन शी जुळतंय.”

“ ते दोघे लग्नासाठी एकत्र जातील या अंदाजाने त्यांनी बाहेरगावी ला जाणारे रस्ते तपासले तेव्हा अलगद पणे त्याच्या हातात ते सापडले , सगळी पोलीस मंडळी अगदी चमकताहेत पेपर मधे. तत्व न सोडणारे खांडेकर, मोठा सिगार ओढताना इन्स्पे. होळकर, अश्रू ढाळताना ते जोडपे “

“ होळकर ला, नम्रता नावाचा गुण असतो हे कधीच कळले नाही.”

“मिलिंद बुद्धीसागर चे काय? नव्याने काही कळले?”

“ नव्याने काही नाही, पूर्ण शांतता आहे.तुला हा पेपरचा गठ्ठा वाचायचाय ?”

“ अत्ता नाही “ पाणिनी म्हणाला. आपल्याला कबूल करायलाच पाहिजे की आपल्याला मोठा दणका बसलाय. अनन्याच्या भूतकाळाबद्दल काय? तुला काहीतरी समजलं होत ना?”

“ ही घटना पंचवीस वर्षापूर्वीची आहे जेव्हा तिच्या आईला मिरगल ने त्याची खाजगी सेक्रेटरी म्हणून ठेवले होते.” ओजस म्हणाला.

“ अरे बापरे ! म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा तर नाही की ती मिरगल ची मुलगी असेल?”

“ असा एकदम घाई घाईत अर्थ नको काढू. “

“ पाणिनी हसला,” तू तुझ्या पद्धतीनेच सांगत रहा कनक “

“ मिरगल आणि विशाल जबडे नावाचा एक माणूस भागीदारीत बांधकाम व्यवसायात होते.अनन्याची आई रीमा गुळवणी त्यांची सेक्रेटरी होती. हिशोब तिच्या डोक्यात इतके पक्के असत की हिशोबनिसाला तेच काम करायला अर्धा तास लागे. फोन घेणे,निर्णय घेणे, अशा अनेक गोष्टीत ती तरबेज होती.”

“ मिरगल आणि जबडे दोघेही तिच्यावर प्रेम करायचे. विशाल विवाहित होता, रीमा ला तो आवडायचा. पण कुणीतरी विशाल च्या पत्नी चे कान भरले. त्याचे निमित्त करून तिने विशाल ला भागीदारीतील हिस्सा काढून घ्यायला लावला.त्याची मिळकत हडप करायचा प्रयत्न केला. जेव्हा लग्न मोडकळीस येत तेव्हा हे सर्व कसं घडत माहित्ये तुला. पुरुष बारिक सारिक गोष्टी लक्षात ठेवून सांगू शकत नाही आणि बाई मात्र जेव्हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहते तेव्हा सर्व बारकावे लक्षात ठेऊन सांगते ! ‘
“ ती पैशाची भुकेलेली होती आणि विशाल कडे तगादा लावायची. शेवटी नाईलाजाने विशाल आणि रीमा यांनी योजनाबद्ध रीतीने धंद्यातील थोडी थोडी रक्कम बाजुला काढून एका फंडात ठेवली जेणे करून विशाल ला त्याच्या पत्नीशी तडजोड करण्यासाठी रोख रक्कम उपलब्ध होईल. विशाल ला पत्नीकडून घटस्फोट मिळाल्यावर रीमा आणि विशाल लग्न करणार होते.”

“ अस असताना ज्या अर्थी अनन्या विशाल च आडनाव लावत नाही आणि गुळवणी हे आईच आडनाव लावते त्या अर्थी ....” पाणिनी ने शंका म्हणून विचारले.

“ विशाल ने गोळी घालून आत्महत्या केली. त्या नंतर साडेसात महिन्यांनी अनन्याचा जन्म झाला.”

“ रीमा अडचणीत येईल अस कृत्य का केलं त्याने?” सौम्या ने विचारले.”

“ असे असेल की, जेव्हा रीमा ला कळल की तिला बाळ होणार आहे, तेव्हा विशाल ला लक्षात आलं की आपण संपलो. त्याच्या बायकोला त्याच्यावर व्यभिचाराचे आरोप करायला निमित्तच मिळाले, ती अशाच काही संधीची वाट पाहत असणार. त्या नंतर रीमा ने नोकरी सोडली, तिच काय झालं कोणालाच माहीत नाही. तिने मुलीला जन्म दिला, त्या नंतर काही महिन्यातच ती गेली.”

“ आता इथे एक महत्वाचा मुद्दा येतो, तिने एक पत्र सीलबंद करून तिच्या बँकेत दिले आणि सूचना देऊन ठेवली की तिची मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिला ते द्यावे. त्यात काय लिहिले होते सांगणे अवघड आहे पण एक अंदाज आहे की अनन्या अनौरस होती हे त्यात असावे.पण तिने आणखीन ही काही लिहिले होते त्यात ज्यामुळे अनन्याला बराच विचार करायला भाग पाडले.”

“ त्या पत्र नंतर तीस दिवसात ती मिरगल ला भेटली. त्याने तिला आपल्या बरोबर घरात रहायला आणले.आणि तिला शिक्षण द्यायला सुरुवात केली.पण त्यांच्यात काहीही मायेचा ओलावा नव्हता, उलट तो तिला घाबरवायचा. “

“ थोडक्यात “ पाणिनी म्हणाला, “ त्या पत्रात अस काहीतरी होते की त्यामुळे सर्व चित्र च बदलले. कदाचित भागीदारी संपुष्टात आणताना मिरगल ने त्याच्या भागीदाराला फसवले असणे, विशाल च्या मृत्यूत काही गूढ असणे, आत्महत्या नसणे, मिरगल ने च गोळी घालून आत्महत्या भासवली असणे,असं काहीतरी उल्लेख पत्रात असावा.”

“ मला त्यात काय लिहिले होते ते हवंय.”

“ सरकारी वकिलांना पण ते हवंय.” ओजस म्हणाला.

“ आपल्याला अजून यात हवा तसा ब्रेक मिळत नाहीये. आपल्याला काही गोष्टी सिध्द करण्या साठी जे शोधून काढायच् आहे, त्या करता हे पत्र पुरावा म्हणून वापरता येणार नाही पण सरकारी वकीलाला मात्र हे पत्र खुनाचा हेतू सिध्द करण्यासाठी वापरता येईल.” पाणिनी म्हणाला., “सरकारी वकीलांच्या दृष्टीने पहा. मिरगल आणि तिला परस्परांबद्दल प्रेम नव्हत पण पत्रातल्या मजकुराच्या आधारे तिने त्याला घरी आणायला भाग पाडलं, शिक्षण द्यायला भाग पाडलं, ती अनौरस असल्याने आपल्या कौटुंबिक मित्र असलेल्या जयकर शी लग्न करायला मिरगलचा विरोध होता, कालांतराने मिरगल मेला आणि अनन्याने डॉक्टरांसमोर खुनाची कबुली दिली.”

कनक ओजस ने आपले खालचे ओठ अंगठा आणि तर्जनी च्या चिमटीत धरले. “ या सगळ्याला तू कसं खोडून काढणार आहे पाणिनी ? “

“ मला याची उत्तरं माहीत व्हायला हवी असतील तर मला वकीलापेक्षा जादूगार व्हायला लागेल.”

‘’ पोलीस याची माहिती घेऊ शकतात का ? “ ओजस ने विचारले.

“ तुला नाही का मिळाली ? तशीच त्यांना ही मिळेल.”

“ पण तुला एक फायदा आहे पाणिनी, तू थेट अनन्याला विचारू शकतोस की पत्रात काय होते?”

“पोलीस पण विचारून माहिती घेऊ शकतात “

“ असे काय?” ओजस ने विचारले.

हाताने कपडे पिळायची खूण करून पाणिनी ने ओजस ला काय ते सुचवले.

१३ समाप्त