Chandra aani Nilya betaverchi safar - 12 in Marathi Fiction Stories by बाळकृष्ण सखाराम राणे books and stories PDF | चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 12

Featured Books
Share

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 12

चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर 12
१२. पुन्हा समुद्रावर व नवी आव्हाने

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे चंद्रा व दंतवर्मा उठले. अजून पूर्व दिशा प्रकाशली नव्हती. पण पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. मंद सुगंधाची पखरण करत पहाटवारा अंगाला स्पर्श करून जात होता. त्यामुळे मन उत्साहित होत होते. दोघांनीही झऱ्यावर जाऊन स्नान केलं. एव्हाना आकाश नारिंगी रंगाचं झालं होतं. निघण्याची सारी तयारी झाली होती. मयूरांनी दिलेला फलाहार व पाणी पिऊन ते नदीकिनारी गेले. सोबत मंगा, डुंगा व काही मयूर होते. पाण्याचे दोन छोटे बुधले,तीरकमठा, दंतवर्मांचा अनमोल खजिन्याची पेटी तराफ्यावर ठेवण्यात आली. सोबत फळांनी भरलेली टोपलीही होती. चंद्राने डोळे भरून साऱ्यांकडे पाहिले... त्याने साऱ्यांना हात जोडून नमस्कार केला.. पाणावलेल्या डोळ्यांनी तो तराफ्यावर चढला. त्या पाठोपाठ वाघ्या व दंतवर्मा तराफ्यावर चढले. साऱ्यांनी हात हलवले. डुंगाने झाडाला बांधलेल्या तराफ्याच्या वेली सोडल्या. चंद्राने बांबू पाण्यात रोवून तराफ्याला पाण्याच्या प्रवाहात लोटलं. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तराफा वेगाने पुढे सरकू लागला. नदी काठाnवर उभे मयूर हळूहळू दूर होत जाताना दिसत होते. पण एका ठिकाणी नदीने वळण घेतले व काठावरच्या झाडीमुळे मयूर दिसेनासे झाले.

चंद्राने एक उसासा टाकला. दंतवर्मांनी त्याच्या खांद्यावर थोपटले. बघता-बघता ते वेगाने पुढे सरकत होते. आता नदीचं पात्र रुंदावत चाललं होतं. म्हणजेच पुढे खाडी सुरू होणार होती. व त्यापुढे दर्या! चंद्राचे बाहू स्फुरण पावू लागले. खूप दिवसांनी तो पुन्हा दर्यावर जाणार होता. त्या निळ्या पाण्यावर लाटांवर तो स्वार होणार होता. भन्नाट समुद्री वारा पिऊन तो बेभान होणार होता. चंद्राचं उदास मन पुन्हा प्रफुल्लित होऊ लागलं. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तराफा पुढे सरकत असल्याने चंद्राला फारसा त्रास होत नव्हता. तो काठावरच्या साऱ्या खुणा लक्षात ठेवत होता. पुन्हा कधी निळ्या बेटावर यावं लागलंच तर नदीमार्गे येणे सोपे जाणार होते. पण दंतवर्मा मात्र थोडे शंकित मनानेच तराफ्यावर बसले होते. तराफ्यावरून समुद्रावर किती काळ प्रवास आपण करू शकू याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. चंद्रा कुशल नावाडी होता याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती. परंतु समुद्री प्रवास व सोबत मद्र देशाचा अनमोल खजिना.. देव करो व काही विपरीत न घडो असेच ते मनात म्हणत होते.

मध्येच चंद्रानं स्वतः बनवलेले... गवताच्या दोऱ्यांनी विणलेलं जाळं पाण्यात फेकलं. प्रवाहाबरोबर जाळं पुढे सरकवत त्याने ते वर ओढलं.त्या छोट्या जाळ्यात वीतभर लांबीचे चार-पाच मासे अडकले होते. मासे बघताच वाघ्या जागेवरून झपकन उठला. चंद्राने मासे वाघ्याच्या समोर फेकले, ताजे फडफडीत मासे वाघ्याने त्वरित मटकावले. चंद्रा व दंतवर्मा वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते. कधी चंद्राच्या गावाबद्दल तर कधी रेवतीनगरच्या दिमाखदारपणाबद्दल सूर्य डोक्यावर येईपर्यंत त्यांना रुंदावलेल्या खाडीचं दर्शन झालं. इथे पाण्याचा प्रवाह संथ झाला होता. त्यामुळे वल्हवतच तराफा पुढे न्यावा लागणार होता. खाडीच्या दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या टेकड्या दिसत होत्या. समोर पाण्यात एक हिरवंगार छोटं बेट दिसत होतं.

'चंद्रा... त्या समोरच्या बेटाजवळ चल. थोडं थांबू या... थोडं खाऊनही घेऊ या." दंतवर्मा म्हणाले.

चंद्राने तराफा त्या बेटाकडे वळवला. काही वेळातच ते त्या छोटेखानी बेटाच्या किनाऱ्याला पोहोचले. तिथल्या रुपेरी वाळूत ते बसले. त्यांची चाहूल लागताच खेकडे इकडे तिकडे तुरुतुरू पळू लागले. वाळूत सभोवार अनेक तारे मासे विखुरले होते. एका ताडाच्या झाडाखाली सावलीत ते बसले होते. चंद्राने दंतवर्माांना सांगितले की या ताऱ्याामाशाची पाच भुजांपैकी एखादी भुजा तुटली तरी त्यापासून नवीन तारामासा तयार होतो. हे ऐकून दंतवर्मा म्हणाले, “खरंच चंद्रा, निसर्गात किती नवलाई व चमत्कार भरले आहेत नाही! यापुढे आपण तुच्छ आहोत." त्यावर चंद्राने मान डोलावली. दुपारचे खाणे झाल्यावर पुन्हा त्यांनी तराफा पाण्यात लोटला. काही काळातच त्यांना समोर उधाणणारा दर्या दिसला. वार्याशी झुंजतफेसाळणाऱ्या लाटांवर डोलत त्यांचा तराफा समुद्रात शिरला. चंद्राने मागे वळून बघितले... मागे निळसर झाडांच्या शेंड्यांनी भरलेले निळे बेट दिसत होते. या बेटावर तो पहिल्यांदा आला त्यापासून आजपर्यंतच्या सार्या घटना त्याला क्षणभरातच आठवल्या. आत्ता त्या गर्द झाडीत कुठेतरी डुंगा व त्याचीमयूर जमात आपली नेहमीची कामे उरकत असतील, असे त्याला वाटले. “चंद्रा, तू दमला असशील. तू विश्रांती घे. मी सुकाणू हाती घेतो." दंतवर्मा म्हणाले.

“ प्रधानजी... नको. तुम्ही बसा.' "

'का रे? मला नीटपणे जमणार नाही असं वाटतंय का ?

'नाही... तसं नाही, तुम्ही एका राज्याचे प्रधान ..." दंतवर्मा हसले. त्यांनी चंद्राला बळेच खाली बसवले व सुकाणू हाती घेतले. त्यांचे बलदंड बाहू झपाझप हलू लागले. पाणी कापत होडी पुढेपुढे चालत होती.देशपांडे चंद्राचं लक्ष सभोवार दूरपर्यंत होतं. एखादं जहाज किंवा गलबत दिसत काय हे तो पाहात होता. पण नजरेच्या टप्प्यापर्यंत फक्त निळंशार पाणी दिसत होतं. मध्येच झेपावणारे समुद्रपक्षी याशिवाय काहीही दिसत नव्हतं. आता ऊन कलू लागलं होतं. संध्याकाळची सोनेरी किरणे पाण्यावर चमकत होती.

“प्रधानजी, आता आपल्याला एखादा किनारा शोधावा लागेल.' चंद्रा दंतवर्मांकडे बघून म्हणाला.

"होय, आपण खूपच प्रवास केलाय. रात्री विश्रांती घेऊनच उद्या पुढे जाऊ या. पण जवळपास कुठे बेट आहे ते शोधले पाहिजे. "
"त्या पहा समुद्रीघारी... त्या बघा तिकडेच चालल्यात.निश्चितच तिथ एखाद बेट असल पाहिजे." " चंद्रा उत्साहाने म्हणाला.
दंतवर्मांनी तराफा त्या दिशेला वळवला. काही वेळाने समोर एक छोटंसं बेट दिसत होतं. दोघांनाही हायसं वाटलं. दोघेही दमले होते. झपाझपा तराफा बेटाच्या दिशेन त्यांनी वळवला. लाटांवर हेलकावे खात तराफा सोनेरी वाळूत घुसला. तराफा ओढत त्यांनी वाळूत आणला. चंद्रानं वेलींच्या दोराची गुंडाळी सोडली. तोपर्यंत दंतवर्मा व वाघ्या उडी मारून वाळूत उतरले. वाळूला पाय लागताच वाघ्याने खुशीने भुंकून समाधान व्यक्त केले.

तराफा एका मजबूत खडकाला बांधून तिघेही बेटाच्या अंतर्भागात शिरले. निळ्या बेटाचा अनुभव असल्याने त्यांनी या बेटावरच्या घनदाट जंगलात खूप आत जाण्याचे टाळले. शिवाय काळोख पडण्याअगोदरच त्यांना किनाऱ्यालगतच एखाद्या सुरक्षित ठिकाणी राहायचे होते. त्यांना काही खाण्यायोग्य फळे मिळाली. शिवाय गोड्या पाण्याच्या झऱ्यावरून त्यांनी रिकामा झालेला पाण्याचा बुधला भरून घेतला. चंद्राने झुडपातून दोन मोठे खाण्यायोग्य कंद खोदून काढले. कंद काढत असताना त्याचे लक्ष समोरच्या गवतात गेले. तिथे हातभर उंचीचं एक फुलझाड होतं व ते चक्क नाच करत होतं. त्याच्या शेंड्याला दोन जांभळी डेरेदार फुलं होती. जमिनीपासून वीतभर उंचीवर खोडाच्या पहिल्या पेरावर मागे-पुढे व डावीकडे-उजवीकडे होत डुलत होतं.

“प्रधानजी ते बघा... नाचणारं फुलझाड.” चंद्रा आश्चर्याने म्हणाला. "होय, मी अशा फुलझाडांबद्दल ऐकलं होतं. पण खूपच दुर्मीळ असतात ही झाडे. "

“खरंच किती गमती जमती असतात नाही निसर्गात !” चंद्रा खुश होत म्हणाला.

“चल चंद्रा, काळोखाला सुरुवात होतेय. किनाऱ्यावर लवकर

पोहोचायला पाहिजे.” दंतवर्मा किनाऱ्याच्या दिशेने वळत म्हणाले. चंद्रा हातातले कंद पेलत त्यांच्यासोबत किनाऱ्यावर परतला. दोघांनी कंद खाल्ले. सोबत पाणी पिऊन ते थोडा वेळ गप्पा मारत बसले. सुरुवातीला उबदार वाटणारी वाळू रात्र वाढताच गार वाटू लागली. चंद्राने चकमकीने आग पेटवली. आजूबाजूच्या काटक्या, नारळाची झापे तोडून त्याने आगीत टाकली. एव्हाना पूर्वेकडून चंद्र आकाशात डोकावला होता. गार शीतल चांदण्यात सागराचं पाणी चमचमत होतं. किना-यावरच्या लाटा चंदेरी रंगात न्हाऊन निघाल्या होत्या. लाटांच्या गर्जनेचे संगीत आसमंतातगुंजत होतं. या अशा वातावरणात दोघांच्या डोळ्यांवर झोपेची झापड • यायला सुरुवात झाली होती. वाघ्या तर केव्हाच शेकोटीसमोरच बस्तान मांडून झोपला होता. चंद्राने काही झाप एकावर एक रचून झोपण्यासाठी छान जागा बनवली. दंतवर्मा व चंद्रा आकाशातल्या तारका व नक्षत्र बघता बघता केव्हा झोपेच्या अधीन झाले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.

भल्या पहाटे चंद्राला गार थंडीने जाग आली. थंडीमुळे अंगात हुडहुडी भरली होती. त्याने डोळे चोळत आजूबाजूला पाहिले व तो हादरलाच. सभोवार एवढे धुके होते की अगदी हातावरच्या अंतरावरचंही काही दिसत नव्हतं. त्याच्या सभोवताली धुक्याची दाट भिंत पसरली होती. दंतवर्मा, वाघ्या, समोरचा समुद्र यापैकी काहीच दिसत नव्हतं.

“प्रधानजी... कुठे आहात तुम्ही ?' "

" हे बघ चंद्रा... तुझ्या बाजूलाच आहे. या दाट धुक्यात काहीही करता येणार नाही. आहोत तिथेच राहू या. ""

“आणि वाघ्या.. वाघ्या कुठे आहे ?”

“वाघ्या.. स्वतःची काळजी घेईल. सूर्य वर आल्यावर धुकं " विरळ होईल.'

ते तिघेही बराच वेळ तसेच पडून राहिले. त्या हाड गोठविणाऱ्या थंडीत अंगाची मुटकुळी करून चंद्रा गुपचुप पडून राहिला. असा किती वेळ गेला कुणास ठाऊक, अचानक धुक्याची दाट रजई चमत्कारिकपणे नाहीशी झाली. सारे स्वच्छ दिसत होते. सूर्य बराच वर आला होता. “प्रधानजी, आपल्याला निघायला हवं.' " "

"होय चल. तराफा सोडू या.'

त्यांनी झपाझपा तराफा सोडला. वाघ्या उड्या मारून झपकन होडीत चढला. चंद्रान वल्ह मारत तराफा वेगाने हाकायला सुरुवात केली. आकाश स्वच्छ होत. वारा सुटला होता. उसळत्या लाटांवर तराफा पुढ सहजपणे सरकत होता. वार्याचा फायदा घेत चंद्रा गाण गात होडी हाकत होता.

"चंद्रा, असंच वातावरण राहिलं तर आपण लवकरच रेवतीनगरच्या दिशेने पोहचू." दंतवर्मा म्हणाले.

"मलाही तसंच वाटतं.

सूर्य माथ्यावर येईपर्यंत तराफा खोलवर समुद्रात पोहोचला होता, बराच काळ चंद्रा वल्हं मारत होता म्हणून दंतवर्मांनी त्याची जागा घेतली. एवढ्या वाघ्या झपकन उठला व दक्षिणेकडे तोंड करून भुंकू लागला. चंद्रा त्याला गप्प करू लागला, पण वाघ्या थांबून थांबून पुन्हा पुन्हा भुकू लागला. “प्रधानजी, वाघ्याला काहीतरी जाणवलंय... दिसलंय.'

"होय, पण मला तर त्या बाजूला काहीच दिसत नाही.
अचानक चंद्रा ओरडला-
“प्रधानजी, तो बघा दूरवर एक छोट ठिपका दिसतोय. पुढं सरकणारा.. एखादं गलबत असावं."

'होय! खरंच आपल्याला मदत मिळेल कदाचित आता, पण आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी.. आपण कोण आहोत व आपल्याकडच्या अनमोल खजिन्याविषयी त्यांना काहीच कळता कामा नये.” दंतवर्मा आपल्या पूर्वानुभवाने म्हणाले.

खरं म्हणजे दोघांनाही खूप आनंद झाला होता. कित्येक दिवसांनंतर त्यांच्यासारखं बोलणाऱ्या... दिसणाऱ्या माणसांना ते भेटणार होते. "जर ते जहाज मद्र देशाचे किंवा मित्र राष्ट्राचे असेल तर देवच पावला. आपल्याला खूप मोठी मदत मिळेल.'

चंद्राने आपली बंडी काढली व वल्ह्याच्या टोकाला अडकवली व हात उंचावून हलवू लागला. ते गलबत झपाझप झपाझप त्यांच्याच दिशेने येत होते. बरंच मोठं होतं ते. त्याची गतीही जास्त होती. आणखी थोडा वेळ गेला. दंतवर्मांचं लक्ष गलबतावरच्या काळ्या झेंड्याकडे गेलं. त्यावर मानवी कवटीचं चित्र दिसत होतं.

“चंद्रा, आपण संकटात सापडलोय. ते समुद्री डाकू आहेत.." दंतवर्मा हताशपणे म्हणाले.

“अरे देवा! आता काय करायचं? आपण त्यांचा प्रतिकार करू या." चंद्रा तीरकमठा उचलत म्हणाला.

“अखेरचा उपाय म्हणून आपण ते करूच. पण .. ते संख्येने जास्त असणार. त्यांच्याजवळ विविध शस्त्रं असणार. आणि अत्यंत क्रूर असतात हे डाकू. एखादा चमत्कारच आपल्याला वाचवू शकेल.” बोलता बोलता दंतवर्मांनी आपली तलवार हाती घेतली.

“प्रधानजी, काहीही होऊ दे.. पण आपण लढायचंच!” चंद्रा दातओठ आवळत म्हणाला.

तोपर्यंत गलबत त्यांच्या तराफ्याजवळ आलं होतं. आडदांड शरीराचे दहा-बारा डाकू गलबताच्या कडेला टेकून उभे होते. त्यांच्या हाती नंग्या तलवारी चमकत होत्या. अत्यंत क्रूर हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं. एवढ्यात त्यांचा म्होरक्या तिथे आला. भल्या मोठ्या मिश्या, गालांवर पसरलेली राठ दाढी, कपाळपट्टीवर...गालांवर जखमांच्या खुणा... लालसर डोळे यामुळे तो साक्षात यमराज भासत होता. समोर छोट्याशा तराफ्यावर एक मुलगा..एक प्रौढ इसम व एक कुत्रा बघून तो खदाखदा हसू लागला. ‘सहलीला गेला होता वाटतं?” तो चेष्टेच्या सुरात म्हणाला.

चंद्राच्या मुठी घट्ट आवळल्या, तर दंतवर्मांच्या डोळ्यांत अंगार

उमटला.

‘मूर्खपणा करू नका. नाहीतर जीव गमवाल. तराफ्यावर जे काही असेल ते आमच्या स्वाधीन करा.” डाकूंचा नायक क्रूरपणे म्हणाला. त्याने इशारा करताच त्याच्या सहकाऱ्यांनी जाडजूड दोऱ्याला अडकवलेले आकडे फेकून तराफा अडकवला. चार डाकू तलवारी घेऊन दोरीवरूनसरसरत खाली आले. दंतवर्माना स्वतःच्या जिवाची भीती वाटत नव्हती. पण रेवतीदेवीचा मुकूट व अनमोल दागिने... डोळ्यांसमोर कुणीतरी पळवून नेताना पाहणे हे मरणाहूनही भयंकर होते. सारा मद्र देश त्यांच्या परतण्याकडे डोळे लावून बसलेला असेल याची त्यांना कल्पना होती. कित्येक संकटांवर मात करत ते मद्र देशाच्या अगदी जवळ येऊन पोहोचले होते. पण या नव्या भयंकर संकटामुळे त्यांचे हातपायच गळाले.

“चंद्रा, मी यांना रोखतो... शक्य झालं तर देवीचा नजराणा घेऊन तू पाण्यात उडी मार... व तो मद्र देशात पोहोचव." दंतवर्मा तलवार हवेत फिरवत म्हणाले. त्यांचा तो आवेश व रुंद पात्याची धारदार तलवार पाहून खाली उतरणारे चाचे थबकले.

“नाही प्रधानजी... आपण दोघेही जाऊ... ते बघा तिकडे काही होड्या येतायेत. कदाचित त्या चंदेलच्या होड्या असतील. आपल्याला मदत येतेय. तोपर्यंत आपण यांना रोखून धरू या." चंद्रा सळसळत्या उत्साहाने म्हणाला.
त्याचा तीरकमठा विजेच्या वेगाने सज्ज झाला.
दंतवर्मांनी सभोवार नजर फिरवली... ते हरखले.
चार होड्या ज्या कोळी लोकांनी भरलेल्या होत्या. ...गलबताला चारही बाजूंनी घेरत होत्या. एकवीरा आईचा जयघोष करत, हातातले तीरकमठे सज्ज करून ते तयारीत होते. उंच, पिळदार, सावळ्या वर्णाचा कोळी मोठमोठ्याने सूचना देत त्यांना मार्गदर्शन करत होता.
,होय.. होय! ते माझे बाबा सरजूकोळी आहेत.” चंद्रा अत्यानंदाने ओरडला... त्याचवेळी त्याने तीर सोडला. दंतवर्मांवर विषारी बाण सोडण्याच्या तयारीत असलेला एक डाकू मोठ्याने ओरडत खाली कोसळला. त्याचवेळी दंतवर्मांची भलीमोठी तलवार सफाईने फिरली. दोरावरून खाली उतरणारे दोन डाकू क्षणार्धात गारद झाले.
इकडे होड्यांमधील कोळी लोकांनी गलबतावर तीरांचा वर्षाव सुरू केला. त्यात काही डाकू जखमी झाले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे डाकू व डाकूंचा नायक पार हतबल झाले. त्यांना गलबताच्या कडेला येऊन मारा करता येईना. अर्धेअधिक डाकू जखमी झाले होते, तर काही मारले गेले होते. चंदेलच्या लोकांची मदत आलेली पाहून चंद्राला चेव चढला. आपला खंजीर घेऊन तो दोरावरून लटकत गलबतावर चढला. त्यापाठोपाठ वाघ्याही दोरी तोंडात धरून पायांनी दुसरी दोरी पकडत सरकत गलबतावर गेला. होड्यांमधील काही कोळी पोहत पोहत गलबतापर्यंत पोहोचले होते. तेही गलबतावर चढण्याच्या प्रयत्नात होते. चंद्राची पहिली शिकार ठरला तो लपून मारा करण्याच्या तयारीत असलेला गलेलठ्ठ डाकू. चंद्राचा धारदार खंजीर सफाईदारपणे त्याच्या मानेवरून फिरला. अस्पष्ट किंकाळी फोडत तो खाली कोसळला. चंद्राने तिथे अडकवलेले दोर झपाझप पाण्यात फेकले. त्याच्या लोकांना गलबतावर चढण्यासाठी ते दोर उपयोगी पडणार होते. क्षणाचाही वेळ न लावता कोळी लोकांनी दोर पकडून वर चढायला सुरुवात केली होती.

अचानक वाघ्याचा भुंकण्याचा आवाज व त्याने घेतलेल्या उडीचा आवाज ऐकून चंद्रा मागे वळला. चंद्रावर तलवारीने मागून वार करण्याच्या तयारीत असलेल्या एका समुद्री डाकूच्या नरडीचा वेध वाघ्याच्या तीक्ष्ण दातांनी घेतला होता. थोडासा उशीर झाला असता तरी चंद्रा प्राणास मुकला असता. वाघ्याच्या हल्ल्यामुळे डाकूच्या हातातील तलवार खाली पडली व तो डाकूही खाली कोसळला. चंद्राने त्याची तलवार उचलली व त्या डाकूचा उजवा हात छाटून टाकला. तलवार हाती घेऊन तो धावतच पुढे सरकला. सुमारे सहा पायऱ्या उतरत त्याने गलबताच्या आतल्या भागात प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ वाघ्याही सावधगिरीने खाली उतरला.

---------------भाग १२ समाप्त----------------
भग१३- मुकूटातील हिर्याची प्राप्ती