cursed flower books and stories free download online pdf in Marathi

शापित फूल

गोदावरी नावाची आदिवासी मुलगी सहा किलोमीटरचा प्रवास पायी करत नजिकच्या गावातल्या मुलींच्या शाळेत जायची.रस्ता खडतर होता. गर्द वनराईतून जाणारी पायवाट. वाटेत दोन ओढे लागत. त्यांच्या खळखळत्या पाण्यातून वाट काढत ती जायची.कधी वाटेत गवेरेडे ,रानडुक्कर दिसत. विविध पक्षी झाडांवर बागडताना दिसत. पाखरांचे आवाज,खळखळत्या पाण्याचा आवाज---झाडांच्या व वेळूंच्या बनात घुमणारी शीळ ती कानी साठवून ठेवी. कधी -कधी तोंडाने आवाज काढून ती पाखरांना साद घाली. तिच्यासाठी तो विरंगुळा होता. आदिवासी पाड्यातून ती एकटीच शाळेत जायची. त्यामुळे आपला एकटेपणा घालवण्यासाठी तिने हा छंद जोपासला होता. तिला अवघा निसर्ग आपला वाटायचा. सुट्टीच्या दिवसात ती आई सोबत कंदमुळे,औषधी वनस्पती गोळा करायला जायची. वस्तू गोळा करताना तिच लक्ष आजूबाजूला असायचं.झाड, वेली,फुलपाखरू यांना धुंडाळत असायची. मध्येच एखादा बुजरा ससा चाहूल लागताच इकडून-तिकडे पळत जायचा. गोदावरी त्याच्या पाठी धावायची. ससा एखाद्या काटेरी जाळीत घुसायचा, गोदावरी मग त्याला बघत बसायची. मोराच नृत्य ,रानकोंबड्यांच आपल्या कुटुंबा सोबत ऐटीत फिरणं,पिंपळाच्या झाडांवर शिळ घालत बसलेले पोपट---झाडांच्या सालीतून किडे ओडताना सुतारपक्षाची लयीत हलणारी मान व होणारी टकटक ती कितितरी वेळ न्याहाळत राहायची.तिला रानाची खडान खडा माहिती झाली होती.
गोदावरी अभ्यासातही चांगली होती. अगदी पहिला दुसरा नंबर नाही आला तरी ती त्या मुलींशी स्पर्धा करायची. तिच अक्षर वळणदार होत.अंगाने सडपातळ व सशक्त असल्याने व पायी चालण्याचा सराव असल्याने ती खेळांच्या स्पर्धेत भाग घ्यायची. पाच हजार चालण्याचा स्पर्धेत ती जिल्ह्यात पहिली आली होती. त्यामुळे शाळेचे नाव उंचावले होत. पण---पण गोदावरीत एक दुःख होत. ते म्हणजे तिचा कुरूप चेहरा. तिच्या सावळ्या चेहर्यावर लहान लहान काळे डाग होते. जन्मतः असलेल्या या काळ्या डागांमुळे तिचा चेहरा कुरूप दिसायचा.गोदावरीला याच वाईट वाटायच नाही. देवाने आपल्याला जे रूप दिले तेच चांगले अस तिला वाटायच. पण तिच्या या कुरूपतेमुळे तिच्या कुणी मैत्रिणी नव्हत्या याच तिला दुःख होत. शाळेत पण इतर मुली फक्त कामापुरत्या बोलायच्या. इतर वेळी तिच्यापासुन दूर राहायच्या .त्यामुळे शाळेत तिला सतत एकटं एकट वाटायच. कुठच्याही कार्यक्रमात तिला दूर ठेवलं जायचं. तिला याची सवय झाली होती. अश्यावेळी ती वर्गात एकटीच बसून राहायची किंवा अभ्यास करायची. गीत -गायन स्पर्धा,वकृत्व स्पर्धा अश्या स्पर्धांमध्ये सर्वांसमोर याव लागत म्हणून ती भाग घेणं टाळायची. त्यामुळे कमीपणाची जाणीव तिच्या मध्ये निर्माण झाली होती. मनानं ती खळखळात्या झार्याप्रमाणे निष्पाप व निर्मळ होती.
तिचा बाबा तिला कधितरी तिला जंगलातल्या ' शापित फूलाबद्दल ' सांगायचा. जंगलाच्या दुसर्या टोकाला दाट वनराईत एक आगळ वेगळ फूल कार्तिक महिन्यात फुलायच---कोजागिरीच्या चांदण्या रात्री ह्या फुलाचे सौंदर्य अलौकिक असायचं. एकदा फुलल्यावर हे फूल पंधरा दिवस राहायचं.सूर्यफूलापेक्षा थोड मोठं असे हे पांढराशुभ्र फूल बघणार्याला खुणावत राहायचं. पण त्या फुलाजवळ कुणी जावू शकत नव्हता कारण त्या फुलांचा गंध एवडा तिव्र व दुर्गंधीयुक्त होता की त्या वासाने डोक गरगरायच---भ्रमित झाल्यासारखं वाटायच. माणूस सोडाच पशू-पक्षी सुध्दा या फूलापासून दूर पळत.या सुंदर फुलाला सारे या दुर्गंधी मुळे शापित फुल म्हणत. गोदावरीच्या मनात हे फूल घर करून बसले होते. तिला वाटायच आपल जीवनही या शापित फुलांप्रमाणे आहे. आपल मन सुंदर आहे .मनात चांगले विचार येतात.पण या कुरूप चेहर्यामुळे. कुणी माझ्याजवळ येत नाही ---मला मैत्रिणी नाहित. त्या शापित फुलांप्रमाणे सर्व माझ्यापासून दूर पळतात.
बघता-बघता शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या दिवस जवळ आला. सारी मुल तयारीला लागली. प्रत्येक वर्गाने कार्यक्रम बसवले. सराव सुरू झाला. गोदावरीच्या नववीच्या वर्गाने ' झाशीची राणी' ही नाटिका बसवली.सार्या मुलींनी त्यात भाग घेतला होता. पण गोदावरीला त्यात घेतलं नव्हते. गोदावरीला खूप वाईट वाटलं. सार्या मुली सराव करायच्या व गोदावरी एकटी वर्गात बसून राहायची. वर्गशिक्षिकेनी यात लक्ष घातलं पाहिजे होत पण त्यांनाही ते टाळले. कदाचित इतर मुली ऐकणार नाहित अस त्यांना वाटले.असच एकदा शाळेच्या मुख्याध्यापिका रानडे मॅडम फिरत-फिरत तिथे आल्या.वर्गात एकटिच बसलेल्या गोदावरीला पाहताच त्या विचारात पडल्या.गोदावरी स्नेहसंमेलनाच्या कुठच्याही कार्यक्रमात सहभागी नाही हे त्यांना कळल .ती सहभागी का नाही हे त्यांच्या लक्षात आल.त्यांनी मनाशी काही निश्चय केला.गोदावरीची चौकशी करून त्या आॅफिसमध्ये परतल्या.
दुसर्या दिवशी पहिल्याच तासाला रानडे मॅडम नववीच्या वर्गात आल्या. सार्या मुली चमकल्या.मॅडम शिस्तप्रिय होत्या. तेवढ्याच प्रेमळ होत्या.आईसारखी माया त्या मुलींवर करायच्या. त्या म्हणाल्या -- 'मुलींनो , मी तुम्हाला एक गोष्ट सांगते.गोष्ट संपल्यावर त्यातून तुम्ही काय बोध घेतला ते सांगा. एका तळ्यात अनेक बदक होती.सुंदर पांढरीशुभ्र अशी ती बदके सकाळच्या कोवळ्या उन्हात एकमेकांशी खेळत. पण त्याच तळ्यात एक काळ बदक होत.सारी बदक त्याला कुरूप म्हणून हिणवायची.त्याला खेळायला घ्यायची नाही.ते काळ बदक हिरमुसल व्हायच ---झुरत राहायचं.पण बघता -बघता एके दिवशी त्या काळ्या बदकाची रूप बदललं. तो राजहंस बनला. पाण्यात पाहताना त्याला त्याच राजबिंड रूप दिसल.ते हरखून गेल.इतर बदकांना त्याचा हेवा वाटू लागला. गोष्ट सांगितल्यावर मॅडम म्हणाला- मुलींनो ही रूपक कथा आहे.तुम्ही यातुन काय शिकला?
सार्या मुली स्तब्ध झाल्या. वर्गाची मुख्यमंत्री उठली.
'मॅडम आम्ही चुकलो,गोदावरीला आम्ही कार्यक्रमात घेतलं पाहिजे होत. तिला दूर ठेवायला नको होत. "
मॅडम हसल्या म्हणाल्या " बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य खूप महत्वाचे असते. आता तुमचा खूप सराव झालाय म्हणून बदल न करता मी गोदावरीकडे नाटिकेच्या संगीताची जबाबदारी देते. ती वेगवेगळे आवाज तोंडाने काढते.आपण एक नविन प्रयोग करूया. आता कार्यक्रमाला चारच दिवस राहिलेत. चालेल?"
सर्वांनी टाळ्या वाजवून गोदावरीच अभिनंदन केल. स्नेहसंमेलनाला प्रसिध्द नाट्यदिग्दर्शिका आल्या होत्या. गोदावरीने चारच दिवसात खूप मेहनत घेवून पार्श्वसंगीत बसवले.प्रत्यक्ष नाटिकेत घोड्यांच्या टापांचे आवाज ,खळखळात्या पाण्याचा आवाज,पक्षांचे आवाज तिने तोंडाने काढले. तर लढाईच्या वेळी करवंट्या ,पत्रे व नदीतल्या गुळगुळीत दगडांचा वापर केला.पाहुण्याबाईंना पार्श्वसंगीत खूप आवडल.एका मुलीने तोंडाने हे आवाज काढले हे ऐकून त्या थक्क झाल्या.त्यांनी गोदावरीला स्टेजवर बोलावून तिच कौतुक केल.तुझी कला असामान्य आहे अस सांगितले. तिला मदत करण्याच आश्वासन दिल. गोदावरीला स्वतःमधला राजहंस सापडला होता.आता सार्या मुली तिच्याशी चांगल्या वागत . आता सर्व तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या.एका शापित फुलांचा शाप संपला होता.ते आता अधिक जोमाने उमलू लागल होत.