Hirwe Nate - 3 books and stories free download online pdf in Marathi

हिरवे नाते - 3 - बुढाबाबा

                                                                                                    बुढाबाबा

 

छकवा उंटीणीच्या बाळाच्या आगमनाने सगळं घर आनंदलं होतं. रात्रभर छकव्याला होणाऱ्या बाळंत वेदनांनी घरदाराला पिळवटून काढलं होतं. त्यामुळे जरा उशिरानेच सगळं घर जागं झालं. फुलवाने उठल्यावर अंगण झाडताना, दहावेळा त्या बाळाच्या अंगावरून हात फिरवला होता. ४ ते ५ फुटांची ऊंची, लांबसडक कमानदार मान, त्यावर एखादं त्रिकोणी भांड बसवावं तसं डोकं, मोठ्या काळ्या डोळ्यांच्यावर वर छोटे कान, काटकुळया पायांवर मऊ मांसल गादीचे तळवे आणि मध्यावर उठून दिसणारे त्याचे वशिन्डं. किती ताजं टवटवीत दिसत होतं. वाऱ्याची झुळूक आली की हलणारी, थरथरणारी लव, हळूच फुलारत होती. आईच्या उबेशी बसून, अजूनही गर्भाचं नातं जोडून रहावसं वाटणाऱ्या त्या पिल्लावरून तिने परत हात फिरवला. ते ही त्यातली माया जाणवून डोळे भरून पहात परत झोपी गेलं.

       तेव्हढ्यात धनीराम आला. त्याच्या हातात कोवळा घास व दुसरा कितीतरी प्रकारचा झाडपाला होता. त्याने तो छकवा उंटीणी समोर पसरवून ठेवला. डोळे उघडून, हळूच पानं कुरतडत ती खाऊ लागली. मग धनीराम गाई म्हशींचे दूध काढण्यासाठी त्यांच्याकडे गेला. फुलवाने आधीच तिथे चारा पसरवून ठेवला होता. धनीराम दूध काढू लागला. अंगणातल्या एका कोपऱ्यात चुलीवर घाईघाईने ती भाकऱ्या बडवायला बसली. रात्रीच्या जागरणाने तिचे डोळे तारवटले होते. फुलवा, धनीराम कालच्या रात्रीबद्दल बोलत होते, तेव्हढ्यात लखवा धावतच बाहेर आला आणि पिल्लाला लगटून बसला. फुलवा आणि धनीराम त्याच्याकडे पहातच बसले. दोन वर्षापूर्वी घडलेली घटना त्या दोघांच्याही डोळ्यासमोर तरळू लागली.

        धनीराम राजस्थान सोडून महाराष्ट्रात आला त्यालाही आता दहा वर्ष लोटली. हेच आता त्याचं गाव होतं. धनीरामने इथेच छोटेमोठे धंदे केले व बटाईने शेती घेऊन आपला जम बसवला होता.

         एकदा माल घेऊन शहराकडे जात असताना त्याला रस्त्याच्या कडेने एक माणूस तळमळत पडलेला दिसला. त्याच्या शेजारी उंटही होता. गाडी थांबवून धनीराम त्या माणसाजवळ गेला व विचारू लागला. “ क्या हुवा बाबा ? काही तकलीफ होत आहे का ?”

 “ हां रे, खूप त्रास होत आहे. काय करू काही कळत नाही. असं वाटतय मी यातून वाचणार नाही.” बुढाबाबा म्हणाला.

   “ बाबा, तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आप अच्छे हो जाओगे. पण हा उंट कुणाचा आहे ?”

 “अरे माझाच आहे.” बुढाबाबा .

“मग आता कसे करायचे ? तो इथे एकटा कसा राहिलं ? त्याचे काय करायचे ?” धनीराम.

 “ तू भला माणूस दिसतोस. रस्त्यावरून किती जणं आले, गेले, पण कुणी नुसतच बघितलं, काहीनी नुसती चौकशी केली. पण तू मात्र मला हॉस्पिटल मध्ये नेत आहेस. तुझ्या घरी उंट ठेऊ शकतो का ? बरा झाल्यावर मी घेऊन जाईन.” कण्हतच बुढाबाबा म्हणाला.

   धनीराम बुचकळ्यात पडला. ओळख ना पाळख पहिल्या भेटीतच हा माणूस आपले किंमती जनावर ठेवायला तयार झाला. त्याला तर आपण कोण हे ही महित नाही. पण तेव्हढा वेळ नव्हता. त्याच्या वेदना वाढल्या होत्या.

   “ तुमचा उंट माझ्या माणसाबरोबर घरी पाठवतो. पण तो त्याला हात लावू देईल ना ?”

   “ हो. तो शांत आहे. तू त्याची चिंता करू नको.”

   “ ठीक आहे. मी तुम्हाला माझा पत्ता देऊन ठेवेन.”

   राजुने आणि धनीरामने मिळून त्या माणसाला गाडीत नीट झोपवले. मग राजू उंट घेऊन निघाला. घरापासून फार लांब ते आलेच नव्हते. अनोळखी माणूस पाहून आधी उंट घाबरला. पण राजुने त्याला चुकहकरूं शांत केले. त्याच्या अंगावरून हात फिरवत फिरवत लगाम हातात घेतला, व त्याला धरून घराकडे चालू लागला. धनीरामची गाडी शहराकडे गेली.

   शहरात आल्यावर पहिल्यांदा जे हॉस्पिटल दिसले त्यात बुढाबाबला नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून हार्ट अटॅक आल्याचे सांगितले व आयसीयू मध्ये अॅडमिट केले. धनीरामने काउंटर वर रितसर फॉर्म व डिपॉजिट भरून आपला पत्ता बुधाबाबाच्या खिशात ठेवून दिला. एव्हढं सगळं होईपर्यंत बराच वेळ झाला. पण मनात माणूस वाचवल्याचे समाधान होते. मग तो गाडी घेऊन बाजारतल्या ठेकेदाराकडे गेला. सगळा व्यवहार ठरलेला होता फक्त माल उतरवायचा असल्याने झिकझिक नव्हती.

    गाडी दुकाना समोर उभी केली, ती पहाताच मुकादमाने आवाज दिला “ काय रे धनीराम, कुठे होता इतका वेळ ?” मग त्याने घडलेला सगळा किस्सा सांगितला.

 “ अरे, ओळख ना पाळख. कशाला त्या झंझटीत पडलास ?”

 “ असं नाही सेठ, बुढा होता बेचारा. तळमळत पडलेला रस्त्याच्या कडेला. कुणाच्या उपयोगी पडणं तर चांगलंच ना ?”

 “ अरे हो, पण तो मेला तर त्या उंटाचं काय करशील ?”

“ काय करणार ? ठेऊन घेईन. शेतीवाला माणूस आहे मी. माझ्याकडे कुणी उपाशी रहाणार नाही. त्याचे नातेवाईक कुणी येतीलच ना. त्यांना देऊन टाकेन. माझा पत्ता बुधाबाबाजवळ ठेऊन आलो आहे. दुसऱ्याची कमाई मी खाणार नाही.

   मुकादमाला त्याच्या सच्चेपणाचे कौतुक वाटले. मग दोघही कामाला लागले. मजुरांनी गाडीतले सामान उतरवायला सुरवात केली. पोत्यांची मोजदाद होऊन हिशोब, पैसे हा व्यवहार पार पडल्यावर धनीराम तिथून निघाला, तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. रिकाम्या गाडीत घरात लागणारं आवश्यक ते सामान भरून तो परत निघाला. त्याला हॉस्पिटल मध्येही चक्कर मारायची होती. गजबजलेल्या रस्त्याने वाट काढत तो हॉस्पिटलाला पोहोचला. रिसेप्शनला पेशंटची माहिती विचारली. तो अजूनही आयसीयु मध्येच होता.

   हॉस्पिटलमधली धावपळ, तो वेगळा वास, सगळ्यांच्या चेहेऱ्यावर जाणवणारे टेंशन, बरे होऊन चाललेल्या पेशंटच्या आणि त्याच्या नातेवाईकच्या चेहेऱ्यावरचा आनंद हे सगळे निरखत धनीराम आयसीयु मध्ये पोहोचला. एका कोपऱ्यातल्या बेडवर बुढाबाबा झोपला होता. नाना प्रकारच्या नळया, यंत्रे लावलेल्या, प्रेमाचे कोणी माणूस जवळ नसलेल्या त्या म्हाताऱ्याकडे  पाहून धनीरामच्या मनात कणव दाटून आली. हलकेच स्टूलवर बसल्यावर तेवह्ढ्या आवाजाने जाग येऊन बुढाबाबाने डोळे उघडले. एक मंद स्मित त्याच्या चेहेऱ्यावर पसरले.

   “ कसं वाटतय बाबा आता ?”

   “ आता थोडं बरं वाटतय. ईश्वराने तुला माझ्याजवळ पाठवलं. तेरा भला हो बेटा.”

   “ तुम्ही आता आराम करा. मी उद्या परत येतो.”

 एव्हढे बोलून धनीराम बाहेर पडला. एकदा डॉक्टरांशी बोलून घेऊ म्हणून त्यांच्या केबिनपाशी गेला. सुदैवानी तिथे फारशी गर्दी नव्हती.

   “ डॉक्टर आता पेशंट कसा आहे ?” धनीरामने विचारले.

   “ हे बघा पेशंट बराच वयस्कर आहे. हा अटॅक त्यांना झेपेल की नाही हे सांगता येत नाही. त्यांच्या घरच्यांना बोलवून घ्या.”

   “ पण मला तर काहीच माहित नाही त्यांच्या बद्दल. ते कोण आहेत ? कुठे रहातात ? काही फारसं बोलतही नाही.”

   “ हो, आम्ही पण विचारलं त्याबद्दल पण काही बोलले नाही.” डॉक्टर

   “ ठीक आहे मी उद्या सकाळी येतो. त्यांच्या सोबत थोडावेळ राहिल्यावर काही बोलतील.” असे म्हणून त्याने डॉक्टरांचा निरोप घेतला. खूप उशिर झाला होता. घरी फुलवा काळजी करत असेल. घरात उंट पाहून तर सगळ्यांचीच धांदल उडाली असेल. तेव्हढ्यातही त्याला हसू फुटलं. वेगाने गाडी हाकत तो रस्ता कापू लागला. तासादिड तासाच्या रस्त्याला तो सरावलेला होता. विचाराच्या नादात घर कधी आलं त्याला कळलच नाही.

    घरी आल्यावर बघतो तर काय, अंगणात उंट आरामात पानं चघळत बसलेला. त्याच्या अवतीभवती मुलांचा गराडा पडलेला होता. त्याला मुलांनी किवा उंटानी मुलांना काही करू नये म्हणून हातात काठी घेऊन राजू तिथेच बसला होता. गाडीचा आवाज एकून फुलवा बाहेर आली.

    “आ गए !” म्हणत चुलीवरचा गरम पाण्याचा तांब्या त्याच्या हातात देत विचारू लागली आता कशी आहे त्यांची तब्बेत?

    “ काही सांगता येत नाही.”

    “ मग आता या उंटाचं काय करायचं ?”

    “ बघूया, उद्या परत बोलेन त्यांच्याशी. नातेवाईकांचा पत्ता मिळतो का बघेन. त्यांना फोन करेन. आज ते काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते.” असं म्हणत तो अंगणातच बाजल्यावर आडवा झाला. तेव्ह्ढ्यात लखवा आला आणि त्याच्या अंगावर चढून बसला.

    “ बापू हा उंट माझा आहे. माझ्यासाठी आणला ना तुम्ही.”

    “ नाही रे छोरे. हा उंट आपला नाही. दोनचार दिवसात कुणीतरी येईल आणि त्याला घेऊन जातील.”

    “ नाही हा उंट माझा आहे. मी कुणाला घेऊन नाही जाऊ देणार.” लखवा फुरंगटून बसला. त्याच्या गोबऱ्या गालावरून हात फिरवत धनीराम त्याची समजूत काढू लागला.

    “ चलो खाना खालो.” फुलवाने आवाज दिला. धनीराम घरात जाऊन जेवायला बसला.

    “ बापूंचे जेवण झाले ?”

    “ कुठे ? आज तर दिवसभर त्या उंटाला बघायला लोकं येत होते. काय झालं ? कसा आला ? जबाब देते देते राजू और बापुजी दोनो थक गए. आता जरा बाहेर गेले बापुजी.”

    “ आता मी झोपतो. उद्या मला परत शहरात जायचे आहे.”

    “ क्युं ?” फुलवा काळजीने म्हणाली.

    “ अगं! त्या बाबांचे कोणी नातेवाईक आहेत का ते शोधायचे आहे. त्यांच्याशी बोलायचय. डॉक्टर म्हणतात ते यातून वाचणार नाही.”

दोघेही काळजीने विचारात पडले. बाहेर उंटाभोवती लखवाचा दंगा चालू होता. दिवसभराच्या दगदगीने धनीरामला लगेच झोप लागली.  

     सकाळच्या झुंजूमुंजू हवेने त्याला जाग आली. प्रसन्न, आल्हादायक वातावरणाने मन प्रफुल्लित होऊन एका निश्चयाने उठला. त्याला त्या उंटाची काळजी करायचे काम नव्हते, ना त्या बुढाबाबाची काळजी करायची होती. त्याला फक्त मदत करायची होती आणि बाजूला व्हायचे होते. ही भूमिका लक्षात आल्यावर त्याला एकदम मोकळे वाटले. राहिला पैशाचा प्रश्न, तर तो कुणा गरजूला उपयोगी पडला तर बिघडलं कुठे ? देवाने आपल्याला काही कमी केलेले नाही. तर आपणही त्याची जाण ठेवावी. सुदैवाने बापूजी, फुलवा दोघेही या गोष्टीकरता त्याला अडवणारे नव्हते.

     धनीरामने आन्हिक आवरून शेताकडे चक्कर मारली. धारा काढणाऱ्या राजुला आजचे काम समजावून सांगून तो घरात आला. फुलवाने दूध भाकरीची थाळी त्याच्याजवळ आणून ठेवली. तेव्हढ्यात बापूजी पण आले. फुलवाने त्यांनाही दूधभाकरीचा काला करून दिला. बापूजी धनीरामकडे बघत म्हणाले “ तू चिंता मत कर. तुझ्याकडून होईल तेव्हढी मदत कर. बाकी ईश्वरावर सोडून दे.”

      बापूजींच्या शब्दांनी धनीरामला बरे वाटले. आपल्या वडिलांविषयी आदर वाटला. रस्त्यावर पडलेल्या माणसांना कोण मदत करतो, आणि केले तरी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करण्यापुरते करतात पुढचं कोण निस्तरणार? आपला चोळणा झटकत धनीरामने गाडी काढली आणि शहराच्या दिशेने चालू लागला.

     हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर रिसेप्शनवरच त्याला सांगण्यात आले की बुढाबाबाला जनरल वॉर्डमध्ये ठेवलं आहे. धनीराम तिकडे गेला. एका बेडवर अर्धवट ग्लानीत पडलेल्या बाबाजवळ जात त्याने आवाज दिला. “ बाबा कसे आहात ?”

      “ आ गया बेटे तू. बैठ.”

     “ बाबा तुम्ही कुठले आहात ? तुमचे नातेवाईक कुठे रहातात ? त्यांचा फोननंबर, पत्ता द्या. त्यांना बोलवून घेतो.”

     “ नाही बेटा ! या दुनियेत माझे ईश्वराशिवाय कोणीही नाही. जेव्हा मला ज्या गोष्टीची जरूरत भासते तेव्हा माझा ईश्वर कोणत्या तरी रूपात येऊन ती गरज पुर्ण करतो. तारुण्यात असतानाच भगवंताला शोधण्यासाठी संसार सोडून दिला होता.”

     “ मग भगवान भेटले तुम्हाला ?” कुतुहलाने भारलेल्या धनीरामला पाहून बाबा हसले व म्हणाले “ हो मिळाला, पण ईश्वर मनुष्यरूपात, तसेच सर्वत्र कणाकणात भेटला. ईश्वराचा आदेश मिळाला होता की मी तुला कुठे कुठे दिसेन हे शोधून मला सांगत जा. मग शोधता शोधता कळाले की खरच भगवान सर्वत्र आहे. यह सब गोपनीय बाते है. तुला नाही समजणार. पण बघ मरणाच्या वेळी सुद्धा तोंडात पाणी घालायला तुझ्यासारखा मुलगा पाठवला.”

    धनीरामला काहीच कळेना. मग यांच्याकडे उंट कुठून आला ? की हा चोरीचा आहे ? नसती आफत नाहीतर गळ्यात यायची.

    “ नाही. नाही. ये बात नही है. हा उंट चोरीचा नाही.”

 धनीराम एकदम चपापला. आपल्या मनातले विचार याला कसे कळाले ?

    “ मी जेव्हा देवाच्या शोधात फिरत होतो तेव्हा, राजस्थानच्या एका गावामध्ये  अचानक माझी तब्बेत खूपच बिघडली. चालताही येत नव्हते. तेव्हा एका भल्या माणसाने खूप सेवा केली.  संसार त्यागलेल्या माणसाला जास्ती दिवस एका ठिकाणी रहाता येत नाही. त्यामुळे मला निघावे लागेल असं सांगितल्यावर त्याने हा उंट माझ्यासाठी दिला. खूप समजाऊनही तो ऐकायला तयारच होईना. ईश्वराने मला भरपूर दिले आहे. त्यामुळे मी तुमच्या कामी येत असेल तर ते माझे सौभाग्य आहे. हा उंट तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करेल. याबरोबर तुम्हाला बक्षिसपत्रही देईन, म्हणजे कुणी तुम्हाला उंट कुठून आणला असे विचारले तर ते दाखवता येईल. तुम्हाला शेवटी जो कुणी मदत करेल, त्याला या बक्षिसपत्रासह उंट देऊन टाका. अशा प्रकारे हा उंट मला घ्यावा लागला, आणि तेव्हापासून तो माझ्याकडेच आहे. खरच तो माझ्या फार कामी आला. जीवनात दान करायचे असेल तर असे करा की समोरच्याचे जीवनच बदलून जाईल. आता हा उंट मी तुला देत आहे, हे बक्षिसपत्र ठेव. या दुखण्यातून मी वाचणार नाही. हॉस्पिटलचा तुला जो काही खर्च आला तो या रूपात मी फेडत आहे. उंटाला तू खतासाठी शेतात बसवू शकतो. त्याचे दुध डायबिटीसवर अत्यंत गुणकारी आहे. ज्यांना हे माहित आहे ते कुठून कुठून पत्ता काढत येतात. हा उंट अत्यंत उत्तम प्रकारच्या मादी जातीचा आहे. लोकं वरातीसाठीही घेऊन जातात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तुला पैशाची कमी नसेल तर उंटाच्या संदर्भात जी काही कामं करशील त्यातून फायदा घ्यायचा किंवा पैसा कमवायचा असा विचार करू नको. ज्याची जी गरज आहे ती पुर्ण कर आणि तो जे देईल त्यावर संतुष्ट रहा.पण फुकट कुठलच काम करू नको. यामुळे ईश्वर तुझ्यावर संतुष्ट राहिल. हे शरीर मी हॉस्पिटलला देहदान म्हणून दिले आहे. सगळी प्रोसिजर पुर्ण केली आहे. ईश्वर तुझे भले करो.” असे म्हणत बुधाबाबाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. काय होतं त्या स्पर्शात? अगम्य शांतता. ज्यासाठी माणूस आयुष्यभर वणवण फिरतो ते क्षण अनुभवतानाच बुढाबाबचा हात खाली आल्याचं धनीरामला जाणवलं, आणि त्या शांततेतून त्याने स्वतःला बाहेर ओढून काढले. बुढाबाबा  धनीरामला सेवा, परोपकार, आध्यात्मिक असे तीनही प्रकारचे लाभ देऊन गेला होता. त्याच्या पाया पडून धनीराम हळूच उठला आणि आपल्या बदलत्या जीवनाच्या दिशेने चालू लागला.

                                             ..................................................................................................