Nirnay - 12 in Marathi Fiction Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निर्णय - भाग १२

निर्णय - भाग १२

निर्णय भाग १२

मागील भागावरून पुढे…


म्हणता म्हणता मिहीरच्या लग्नाचा दिवस येऊन ठेपला.सगळी तयारी झाली असली तरी शेवटी धावपळ ऊडतेच तसंच इंदिरेचं पण झालं.


शरदनी मुलीकडच्यांना कार्यालयाचा, जेवणाचा, बसचा खर्च विचारून अर्धे पैसे शुभांगीच्या बाबांना पाठवले होते.


इंदिरेने हे शुभांगीच्या आईवडिलांना आधीच स्पष्ट केले होते. लग्नाचा पूर्ण खर्च त्यांनी करायचा नसून अर्धा खर्च आम्ही करू.


ही सगळी बोलणी मंगेश समोरच झाली. त्यावेळी तो काही बोलला नाही. इंदिरेला जरा धाकधुक वाटत होती की मध्येच काहीतरी बोलून मंगेश बैठकीचा बेरंग करेल.पण तसं काही झालं नाही.

***

इंदिरा कमात मग्न असतानाच शुभांगीच्या

वडलांचा फोन आला.

" हॅलो.झाली का लग्नाची तयारी?" इंदिरेने विचारलं.


"तयारी होत आली आहे.तुमच्याशी थोडं बोलायचं आहे."


"बोला."


"त्यादिवशी बैठकीत तुम्ही म्हणालात लग्नाचा खर्चच आपण अर्धा अर्धा करू."


"हो म्हणाले होते.आपण तसंच करायचं आहे."


"पण काल मिहीरच्या वडलांचा फोन आला होता."


"कशासाठी?"


"ते म्हणाले लग्नाचा अर्धा अर्धा खर्च करू हे असं काही नसतं. लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच करायचा. मुलीकडच्यांनीच हा खर्च करायचा असतो. चुकून माझ्या तोंडून मिहीरच्या शरदकाकांनी अर्धे पैसे पाठवल्याचे निघून गेलं तसे ते म्हणाले ते पैसे ताबडतोब त्याला परत करा.नाहीतर हे लग्न मोडलं असं समजा."


"काय..!" इंदिरा जवळजवळ ओरडलीच


"हो.आमच्याकडे सगळेच जण टेन्शनमध्ये आलेत."


"ठीक आहे तुम्ही काळजी करू नका.मी बोलते त्यांच्याशी."


इंदिरेने फोन ठेवला आणि तडक खोलीत गेली तिथे म़गेश आरामात पेपर वाचत होता.इंदिरेने रागाने त्यांच्या हातातील पेपर ओढला तसा तो पेपर अर्धा फाटला.


"ऐ किती वेडेपणा करतेय मी पेपर वाचतोय दिसत नाही."


"तुम्ही काय करता सगळं कळतंय.काय गरज होती शुभांगीच्या घरी फोन करायची. एवढी हिम्मत कशी झाली?"


"तू कोण मला विचारणारी लग्नाचा सगळा खर्च मुलीकडचे करतात एवढं तुला माहित नाही.काय शहाणपणा करायला चाललीस."


"याद राखा तुम्ही मिहीर घ्या लग्नाचं जे ठरलंय ते तसंच होणार. मध्ये खुसपट काढायचा प्रयत्न केलात तर जेवढा मान आत्ता तुम्हाला मिळतोय तोही मिळणार नाही हे लक्षात ठेवा मी एकटी मिहीरचं लग्नं लावीन."


"हॅ…काय बोलते.लग्नाच्या वेळी वडील पाहिजेच."


"जर वडील कुठलीही थेरं करणार नसतील तर वडील लग्नाला आले तर ठीक आहे. पुन्हा सांगतेय तुम्हाला तुमचा मान मिळायला हवा असेल तर लग्नात आणि लग्नानंतर तुमची वागणूक मला सभ्य आणि चांगलीच दिसली पाहिजे."


"मी प्रत्येक गोष्ट तुझी ऐकणार नाही."


"ठीक आहे. तुम्ही लग्नात काही उचापती करण्याची हिम्मत करूनच बघा."


"काय करशील?"


"तुम्ही हिम्मत करून बघा मग दिसेल मी काय करते."


अत्यंत रागीट नजरेने मंडेला दम देत इंदीरा खोलीच्या बाहेर पडली.


दिवसेंदिवस ही फारच फणा काढायला लागली आहे. एवढी हिम्मत हिच्यात आली कुठून हिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा.पण काय करणार !


हिला एवढी हिम्मत देणारा कोण आहे हे शोधून काढायला पाहिजे. लग्न सुरळीत कसं पार पडतं तेच बघतो.


मंगेशच्या डोक्यात विचार सुरू झाले.


******लग्नाच्या दिवशी सगळं सुरळीत चालू होतं. इंदिरेची करडी नजर मंगेशवर होती. मंगेशकडे लक्ष ठेवायला तिने शरदलाही सांगून ठेवलं होतं.


मंगेश विचीत्र डोक्याचा आहे हे इंदिरेला माहिती असल्याने ती सावध होती.


मिहीर आणि शुभांगी खूप छान दिसत होते. दोघही खूप खूष होते.करवली मेघना ही छान दिसत होती.


लग्न लागलं, पुढचे सगळे विधी झाले आणि शुभांगीला सासरी जाण्याची वेळ आली तशी शुभांगीचे डोळे पाण्याने भरून आले. इंदिरेने ते लक्षात येताच हळूच तिच्या पाठीवर थोपटले.


शुभांगीने आईवडिलांना नमस्कार केला. आईच्या गळ्यात पडून ती रडली.आईने तिला थोपटलं. आई पण मुलगी सासरी जाणार म्हणून विरहाने रडू लागली.


मिहीरला हात जोडून शुभांगीचे वडील म्हणाले


" आमच्या काळजाचा तुकडा तुमच्या हाती सोपवतो आहे.तिला कधी अंतर देऊ नका." त्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी येत होतं.


"काका असे हात जोडून नका.शुभांगी माझी अर्धांगिनी आहे तशीच ती माझी मैत्रीण पण आहे. आम्ही दोघंही बरोबर चालू.मी तिला कधीही अंतर देणार नाही तुम्ही निश्चीत रहा." मिहीर म्हणाला.


" शुभांगी आमच्या घरची सून असली तरी ती आमची मुलगीच आहे.मी तिची आई नाही पण आईसारखी होण्याचा प्रयत्न करीन.तुम्ही काळ्जी करू नका.शुभांगी आमच्या घरी सुखात राहिलं." इंदिरेने शुभांगीच्या आईवडिलांना आश्वासन दिलं.


मंगेश काहीच बोलला नाही. कारण त्याला हे लग्न मान्य नव्हतं कारण काहीच नव्हतं.पण हे लग्न ठरवताना इंदिराने त्याला विचारलं नाही हा त्याचा राग होता.मंगेशला मिहीर ने प्रेम विवाह केला हेही पटलं नव्हतं. त्यामागे कारण हेच होतं की मंगेशला विचारल्या गेलं नाही. मिहीरचं नाव मॅरेज ब्युरो मध्ये नोंदवल्या गेलं असतं तर मुलीकडची मंडळी आली असती. मंगेश मुलाचा वडील म्हणून त्यांचा मान राहिला असता तो या प्रेमविवाहात राहिला नाही याचा राग त्याला आला होता.


इंदिरेने मात्र मंगेशकडे अजीबात लक्ष न देता हे लग्न ठरवलं आणि आज ते पार पाडलं.


नव्या नवरीला घेऊन सगळे घरी आले.


नव्या नवरीचा गृहप्रवेश झाला.नंतर नाव ठेवण्यात आलं. शुभांगी हेच नाव ठेवल्या गेलं. मग उखाणे घेण्याचा कार्यक्रम झाला. या सगळ्या कार्यक्रमाला जवळची नातेवाईक उपस्थीत होती. सगळ्यांना मजा आली. नंतर सगळ्यांची जेवणी आटोपल्यावर सगळे घरी जाताना म्हणाले


" खूप छान झालं लग्न. आत्ताचाही कार्यक्रम छान झाला."


" खूप वर्षांनी मंगेश तुझ्या घरी येण्याचा योग आला.खूप छान वाटलं." मंगेशचा चुलतभाऊ रोहन म्हणाला.


इंदिरेच्या चेहे-यावर आनंद होता.मंगेशचा चेहरा ढिम्म होता.

***


सगळे झोपायला गेले. आज शुभांगी मेघनाच्या खोलीत झोपली होती.ऊद्या सत्यनारायण झाल्यावर,देवदर्शन झाल्यावर मिहीर आणि शुभांगी घ्या संसाराला सुरुवात होईल.


मंगेशने लग्नात कुठल्याही प्रकारचं विघ्न आणलं नाही याचा इंदिरेला आनंद झाला.समाधनानी तिला झोप लागली.

__________________________

क्रमशः. पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात

निर्णय

लेखिका.. मीनाक्षी वैद्य.