Nirnay - 13 in Marathi Fiction Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निर्णय - भाग १३

निर्णय - भाग १३

निर्णय भाग १३

मागील भागावरून पुढे…मिहीर आणि शुभांगी दोघंही हनीमूनला गेले आणि इंदिरेला घरातील चहाळ कमी झाल्यासारखी वाटली. मेघना काही दिवस थांबणार होती कारण नुकतीच तिची परीक्षा संपल्यामुळे सध्या ती मोकळीच होती.


मिहीरचं लग्नं सुरळीत पार पडेपर्यंत इंदिरेच्या मनावर ताण होता.मंगेशचा तिला भरवसा वाटत नव्हता.


एवढी वर्षे त्याच्याबरोबर संसार केल्यामुळे इंदिरेला कळून चुकलं होतं की मंगेश कधीही घात करू शकतो.मंगेश तशाच स्वभावाचा माणूस असल्याने तिला लग्न पार पडेपर्यंत दक्षता घ्यावी लागली.


लग्नानंतर इंदिरेला आज जरा उसंत मिळाली होती.ती डोळे मिटून आपल्या खोलीत निजली होती.मिटल्या डोळ्यासमोर तिच्या लग्नानंतरचे दिवस आठवले.म़गेश कधी बिथरेल याचा नेम नसायचा.


एक दिवस मंगेश ऑफीसमध्ये गेल्यावर घरातील कामं आटोपल्यावर इंदिरा जरा वेळ रेडिओ ऐकत होती.तेव्हा रेडियोच होते.छान जुनी गाणी ऐकत इंदिरेची छान तंद्रीत लागली होती आणि अचानक रेडीयो बंद झाला. गाणं बंद झाल्यामुळे इंदिरेने डोळे उघडले पण तिने डोळे उघडण्या आधीच तिच्या कानावर शब्दांची बिजली कडाडली.


" लाज वाटते का अशी गाणी ऐकत बसली आहेस?"


" काय झालं ? जुनी गाणी मला आवडतात म्हणून ऐकत होते." इंदिरेने गोंधळून म्हटलं.


" वेळ असेल फुकटाचा तर तो सत्कारणी लावा. कामं करा कामं. गाणी ऐकत बसू नका. विजेचं बिल किती येतं याची कल्पना आहे का? "


" यापुढे मी रेडियो लावणार नाही." इंदिरेने कबूल केलं.


तिला कळतच नव्हतं की थोडा वेळ रेडियो ऐकल्याने अशी किती वीज खर्च होत असेल. क्रिकेटची मॅच असली की मात्र दिवसभर रेडियो लावल्या जायच्या तेव्हा विजेचं बील येत नाही का?


हे सगळे प्रश्न ती विचारणार तरी कोणाला? ज्याला विचारायचं त्याने तर तिरसटपणे वागण्यात पी.एच.डी. केलेली आहे.


अशी वर्षानुवर्षे पुढे सरकली. इंदिरेभवती विनाकारण शिस्तीचं,काटकसरीचे कुंपण घातल्या गेलं. ते कुंपण तोडण्याची इंदिरेत धमक नव्हती असं नाही पण वाद घालणं, भांडणं करणं हे इंदिरेच्या रक्तात नव्हतं. म्हणून ती गप्प राहिली.नंतर मिहीर आणि मेघना पुढे तमाशे होऊन त्यांच्यावर वाईट संस्कार होऊ नये म्हणून तिनी आपलं तोंड शिवून टाकलं.मुलं मोठी होईपर्यंत तिनी धीर धरला.


तिला आठवलं एकदा तिने तिच्या वहिनीची साडी नेसली होती तर मंगेशनी एवढा गोंधळ घातला होता की इंदिरेला लाजल्या सारखं झालं. खरतर मंगेशी असा गोंधळ घालण्याची काही आवश्यकता नव्हती.


" तुला भीक मागायला आवडतं का?"


" काहीतरी काय बोलतात?"


" मग…ही साडी कोणाची आहे?"


" माझ्या वहिनीची आहे."


" का तुझ्याजवळ साड्या नाहीत?"


" आहेत. पण मला वहिनींची ही साडी खूप आवडली म्हणून नेसले."


" सोड ती साडी आणि आधी वहिनीला परत करून ते. पुन्हा असा भिकमांगेपणा केलास तर याद राख माझ्याशी गाठ आहे.कळलं?"


इंदिरेने फक्त मान हलवली.


हा प्रसंग आठवून इंदिरेच्या लक्षात आलं की ती किती भितीच्या छायेखाली एवढी वर्ष जगत आली. या भीतीच्या आवरणाखाली तिचा श्वास गुदमरायचा पण मुलांमुळे ती गप्प बसायची. मिहीरला बाहेर नोकरीसाठी जायचं होतं तेव्हा मात्र इंदिरेने आपला मूळ स्वभाव बाजूला ठेऊन मंगेशला अरे ला कारे

करण्याची तयारी ठेवली.


इंदिरेने मंगेशला अरे ला कारे करण्याचा हा निर्णय अंमलात आणण्याचं ठरवलं आणि तसा तो आमलात आणलासुद्धा. आत्ता इंदिरेला हसू आलं ते या गोष्टीचं की वाघ म्हणून आयुष्यभर आपण ऊगीच नव-याला घाबरत आलो.


मिहीरचं लग्नं सुरळीत पार पडलं आता मेघनाला स्थळं बघायला हवी असं इंदिरेच्या मनात आलं. मेघनाचं लग्नं झालं की आपण आपला निर्णय अंमलात आणायचा. यात आता विलंब करायचा नाही.


इंदिरेने खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर ती ठाम होती. त्या निर्णयाला ती इतर कुणाच्या म्हणण्याखातर बदलणार नव्हती.

मिहीर आणि शुभांगी हनीमून हून आले आणि घरात एक किलबिलाट सुरू झाला. मिहीर, शुभांगी आणि मेघना तिघांची चांगली मस्ती, थट्टामस्करी चालायची. मेघनाचं आणि शुभांगीचं लग्नाआधी पासूनच छान गुळपीठ जमलं होतं.


घरात प्रेमाचं ऊबदार आणि प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. मंगेशला आता घरातील कोणी घाबरत नव्हते तसंच त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी खूप धडपडही करत नव्हते. इंदिरा मात्र तिघांनाही हवी असायची. इंदिरापण त्यांच्यात त्यांच्या वयाची होऊन सामील व्हायची.

***


त्या दिवशी मिहीर, शुभांगी आणि मेघना सीनेमाला गेले. इंदिरेलाही आग्रह करत होते पण ती मुद्दामच काम आहे सांगून गेली नाही. त्या तिघांना कुठल्याही अडकाठी शिवाय सिनेमा बघू द्यावा हाच विचार तिच्या मनात होता म्हणून ती गेली नाही.


स्वयंपाकघरात इंदिरा स्वयंपाकाची तयारी करत होती. मंगेश तिथे आला आणि म्हणाला


" नवीन सूनबाई गेल्या का भटकायला?"


" सिनेमाला गेले आहेत ते तिघं."


" सिनेमा म्हणजे भटकायला जाणच आहे. घरात कामं असतील याचा काही विचार नाही करता येत?"


"नवीन लग्न झालंय दोघांचं. शिकेल ती हळूहळू. मौजमजा त्यांनी आत्ता नाही करायची तर कधी करायची? "


" संसार म्हणजे काय मौजमजा आहे का?"


" संसार म्हणजे काय ते तिलाही कळतंय. "


" स्वयंपाक वगैरे येतो का की रोज उठून हाॅटेलमधून बोलावणार?"


" बघतील त्यांचं ते."


" वा! काय सासू आहे!"


" तुम्हाला स्वयंपाक करावा लागणार नाही."


"स्वयंपाक म्हणजेच घर असतं का? घरातील इतर कामं कोण करणार सासू! सूनबाई मजा करताहेत सासूबाई काम करताहेत. छान चित्र आहे आपल्या घराचं." कुत्सितपणे हसत म्हणाला.


"एवढं टोकाला जायची गरज नाही. बंगलोरला गेले दोघं की शुभांगीलाच सगळं सांभाळायचं आहे. तिथे मी जाणार नाही आहे. मला या विषयावर फार बोलायचं नाही. तुम्हाला कामं असतील तर ती करा नाहीतर शांत बसा."


इंदीरेने एका झटक्यात मंगेशला तोडून टाकल्यासारखं केलं.


"समजतंय सगळं मला. मी शांत आहे याचा अर्थ मी नेभळट नाही. तुझं तोंड इतक्यात खूप सुटलय.त्याचा इलाज करायलाच हवा."


" कोणता इलाज करणार ?"


" तुला कशाला सांगू? "


" नका सांगू. मला आता तुमच्या कोणत्याही गोष्टीत इंटरेस्ट नाही."


इंदिरेच्या चेह-यावरून तिला मंगेशशी बोलण्याचा कंटाळा आलेला दिसत होता.ती

मंगेशकडे दुर्लक्ष करून आपलं काम करू लागली.


" आत्ता मी गप्प बसलोय म्हणून तू जिंकली असं नाही.आत्ता खूप पुळका येतोय नवीन सुनेचा नंतर तीच घरातून हाकलेल तेव्हा कळेल. तेव्हा येऊ नको माझ्याकडे."


मंगेशला कसंही करून इंदीरेला हतबल झालेलं बघायचं होतं. इतके उपाय मंगेश ने करूनही इंदिरा त्याच्या प्रत्येक सापळ्यातून अलगद निसटत गेली.हेच त्यांचं दु:ख होतं.


आयुष्यभर जिला मुठीत बंद करून ठेवलं होतं ती आता सुसाट सुटली आहे. आपल्याला अजिबात बधत नाही हे बघून मंगेशच्या अंगाचा तिळपापड होत होता.


आताही इंदिरेने शांतपणे उत्तर दिलं.


" पुढे काय होईल याचा विचार मी आत्ता नाही करत. समजा सुनेनी हाकलून दिलं तरी तुमच्याकडे येणार नाही. हे निश्चित."


" हो.मग कुठे जाणार आहेस?"


"ते बघू. आत्ता कशाला त्याची चिंता करायची. मला कामं आहेत.तुमचं बोलून झालं असेल तर मी कामाला लागते." इंदिरेने मंगेशला जा असं सरळ न सांगता आडवळणाने सांगीतलं.त्याचाही त्याला राग आला.


"वागा आपल्या मनाला वाटेल तसं वागा.मग मुलगा सून काय आदर देणार आहेत."


"तुम्ही आयुष्यात कोणाचा कधी आदर केला आहे असं मला आठवत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी आदर दिला नाही तर त्याचा राग यायची काहीच गरज नाही." इंदिरानेही तेवढ्याच ठामपणे सांगीतलं होतं.

" बोला… आता वाट्टेल तसं बोला नव-याला करा अपमान त्याचा.भूषण वाटतंय तुला."


उगाचच एक वाक्य कुचकटासारखं बोलून मंगेश समोरच्या खोलीत गेला.


इंदिरा मनातच म्हणाली " स्वतःचं महत्व कमी होत चाललं आहे म्हणून हा सगळा त्रागा आहे हे न कळण्या इतकी मी मूर्ख नाही." आणि स्वतः:शीच हसली.

___________________________

क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात

निर्णय

लेखिका…मीनाक्षी वैद्य.