Nirnay - 20 in Marathi Fiction Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निर्णय. - भाग २०

निर्णय. - भाग २०

निर्णय भाग २०

मागील भागावरून पुढे…


मेघना आणि आनंद दोघांची भेट छान झाली. आनंदला भेटून आल्यावर मेघनाच्या चेहरा आनंदाने उजळला होता.


" खूष दिसतात आहेत मॅडम.'


"हो. "


"कसं वाटलं भेटून?"


"आम्ही चॅट करत होतो तेव्हा जे वाटतं होतं एकमेकांबद्दल ते प्रत्यक्षातही जाणवलं. प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटलो. पण असं जाणवलं नाही.आम्ही नेहमीच भेटतो असं वाटलं."


"तुला पसंत आहे नं?"


"हो.दोघांमध्ये सगळे विषय क्लियर आहेत."


"हे छान झालं.मग पुढे जायचं."


"हो. तो आजच घरी सांगणार आहे."


"होका मग थोड्यावेळाने किंवा संध्याकाळी फोन करते त्यांच्या घरी."

".हो"


"मेघना तुझ्या लग्नाची सगळी तयारी करणं मला एकटीला जमणार नाही.मिहीरच्या वेळी तू होतीस मदतीला."


"तू काळजी नको करूस. मी आणि शुभांगी आहोत नं."


"तुम्हाला इथे सुट्टी घेऊन यावं लागेल.तेव्हा बरीच कामं करून घेत जाऊ."


"हो.पुढच्या शनिवारी मिहीर आणि शुभांगी यायचं म्हणतात आहे."


"कशाकरता?"


"आई विसरली त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होतील या सतरा तारखेला."


"अगं खरंच.कसे दिवस पळाले कळलं नाही."


"या वर्षातले चार महिने तर तू माझ्या लग्नाच्या काळजीच होतीस.मागचं वर्ष सगळे सणवार यात गेले."


"होग.मिहीरने इथे यायचं पक्क ठरवलं आहे नं?"


"हो."


"चला दोन दिवस माझे आनंदात जातील."


"माझेपण."


अचानक मेघना ने इंदिरेच्या गालाची पापी घेतली. इंदिरा हसून तिच्याकडे बघत बसली.


"माझी स्वीट माॅम."


"होका !आता हे मस्का पाॅलीश कशाकरता?"


"ऐ आई प्रत्येक वेळी थोडी मी मस्कापाॅलीश करते."


"गमंत केली ग.माझं लाडुलं कोकरू आहे हे".


इंदिरेनही मेघनाच्या गालगुच्चा घेतला.


"मेघना दहा वाजून गेले झोपायचं नं की रात्रभर तुमचं चॅटिंग चालणार आहे."


"मी झोपणार आहे.पण आनंदानी मेसेज केला तर बघीन."


"अच्छा म्हणजे तुम्ही बोलणार रात्रभर."

असं म्हणून इंदिरा हसली.


"आई रात्रभर नाही बोलणार."


"बरं ऊद्या सांग. मी तर चालले झोपायला."


"आई आज माझ्याजवळ झोप नं."


"अगोबाई ही मुलगी आता बाळ‌ झाली वाटतं."


"आई…प्लीज."


"चल आज झोपते तुझ्याजवळ.पण मग तू आनंदी चॅट कशी करशील."


"तू बाजूला असलीस तरी चॅट करीन.तुझं काही टेन्शन नाही."


"अच्छा.बर कर ‌चॅट. पण माझी झोप मोडेल असा आवाज ठेऊ नको."


"सायलेंटवर ठेवते फोन."


"चला आता झोपायला."


इंदिरेच्या गळ्यात हात घालुन झुलत झुलत मेघना चालत होती त्याबरोबर इंदिरेची पावलं तशीच पडत होती.त्यांचं तसं चालत खोलीकडे जाणं हे मंगेश बघत होता.त्या दोघींना त्यांचं तिथे असणं पण कळलं नाही.


आपल्याच घरात मंगेश परका झाला होता याला जबाबदार तो स्वतःच होता.आत्तापर्यंत त्याच्या मुठीत असणारी इंदिरा बंड करून उठली. त्यामुळे मुलंही तिच्याबरोबर होती.


त्याने या तिघांबरोबर कशी वागणूक ठेवली हे त्याला स्वत: ला माहिती होतं तरी अजूनही त्याला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होत नव्हता याचं आश्चर्य इंदिरेला वाटत होतं.

***

मिहीर प्रमाणे मेघनाचं लग्नही व्यवस्थीत पार पडू दे हीच इंदिरेची देवाजवळ प्रार्थना असायची.


मेघनाच्या लग्नाची तयारी करण्यासाठी मंगेशला पैसे द्यायलाच लावायचे. हेही तिने मनाशी ठरवलं. मिहीरच्या वेळी शरदने तिला मदत केली होती. शरद आणि प्रज्ञाचा मिहीर आणि मेघना दोघांवरही खूप जीव असल्याने त्याने तो खर्च केला तेव्हा शरद म्हणाला


"वहिनी आम्हाला मूलबाळ नाही. मिहीर मेघनाच आमच्यासाठी सगळं काही आहे. म्हणून मी मीहीरच्या लग्नासाठी पैसे खर्च करणार आहे. त्यात गैर वाटू देऊ नका."


"शरद भाऊजी ही जमा पुंजी तुम्हाला म्हातारपणी कामात येईल."


"माझा पोटचा मुलगा असता तर हा विचार करून मी त्याच्या लग्नाला पैसेच नसते लावले का?" शरद.


"वहिनी आम्ही दोघं विचार करत होतो की मिहीरच्या लग्नाची जबाबदारी कशी घ्यावी. कारण मंगेश भावजींना विचारणं म्हणजे अवघड काम होतं." प्रज्ञा


"बरोबर आहे तुझं. आत्ताही म्हणालेच नं तू लग्न कशी करते बघू. त्यांना समजवण्यात वेळ खर्ची घालून पैसे मिळणार नाहीत याची खात्री होती मला म्हणून तुम्हाला विचारलं."


"वहिनी तुम्ही मला भावासारखं मानता. मग माझं हे कर्तव्य आहे की बहिणीला गरज असेल तेव्हा तिच्या पाठीशी उभं राह्यचं. मेघनाच्या वेळीसुद्धा जर हा प्राॅब्लेम आला

मंगेश अडून बसला तर तेव्हाही मी लग्नाचा खर्च ऊचलेन."


"हो वहिनी तुम्ही अजीबात काळजी करू नका." प्रज्ञा

"हो." इंदिरा.


तेव्हा जरी इंदिरेने हो म्हटलं असलं तरी तिला मेघनाच्या वेळी पुन्हा पैसे मागणं बरोबर वाटलं नाही.


मेघना बंगलोरला गेली की मंगेशी या विषयी बोलायचं हे तिने ठरवलं. मेघनासमोर काही वाद नको असं इंदिरेला वाटतय. कारण मेघना खूष आहे.


मेघनाचं आनंदानी चॅटिंग चालू होतं.इंदिरेला विचार करतां करतां झोप लागली.

___________


मेघना लगेचच बंगलोरला परत गेली.

दुपारी इंदिरेने आनंदच्या घरी फोन केला.


" नमस्कार मी मेघनाची आई बोलतेय." इंदिरा


"नमस्कार.आनंद मला बोलला त्याला मेघना पसंत आहे. मेघना काही बोलली का?" आनंदची आई


"हो मेघनानी कालच सांगीतलं. पुढे कसं करायचं हे विचारायला मी फोन केला." इंदिरा


"पुढे साखरपुडा करायचा.पण तो या दोघांना सुट्टी असेल तेव्हा करावा लागेल." आनंदची आई


"मी आमच्या गुरूजींना विचारते दोघांना कोणती तारीख आणि दिवस लाभतो आहे ते विचारते तसं करता येईल." इंदिरा


"चालेल.मग सांगा मला." आनंदची आई


"हो.आणखी तुमची अपेक्षा काय आहे?" इंदिरा


"छान लग्न करावं हीच इच्छा आहे. तुम्हाला मेघनाला काय द्यायचं ते द्या.आम्हाला मेघनाला काय द्यायचं ते देऊ. लग्नाचं फार टेन्शन घेऊ नका. या लग्नामुळे दोन कुटुंब जोडली जाणार आहेत." आनंदची आई


"हो खरय. तुम्ही पण काळजी नका करू. आम्ही तुम्हाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ." इंदिरा


विहीण बाई यावर हसल्या. इंदिरेला थोडा धीर आला.


"मी गुरूजींना विचारून दोनतीन तारखा काढते‌मग तुम्हाला फोन करते." इंदिरा


"ठीक आहे.' आनंदची आई


"ठेऊ फोन." इंदिरा


"हो."आनंदची आई


फोन ठेवल्यावर इंदिरेला बरं वाटलं. मुलाची आई चांगल्या बोलल्या.फोनवर बोलून तरी साध्या वाटल्या.प्रत्यक्ष भेटल्यावर बघू.


***


इंदिरेने दुपारचा चहा मंगेशला देतांना मेघनाच्या साखरपुड्याचा विषय काढला.


"मेघनाला मुलगा पसंत आहे मुलालाही मुलगी पसंत आहे.आजच मी मुलाच्या आईशी बोलले.आपल्या फाटक गुरूजींना विचारून दोघांना लाभणा-या दोन तीन तारखा काढीन आणि मग त्यांना कळवीन.'


"हे मला कशाला सांगते आहेस?" मंगेश


"तुम्हीच म्हणताना तुम्हाला घरात काय चाललंय कोणी सांगत नाही म्हणून सांगतेय." इंदिरा


"फक्त एवढ्याच कारणांमुळे तू मला सांगत नाहीस." मंगेश


"तुम्हाला जे वाटतंय त्यावर पण मी बोलणार आहे. मेघनाचा साखरपुडा आणि लग्न दोन्हीसाठी पैसा लागणार आहे त्यासाठी मला पैसे द्या." इंदिरा


"आता आलीस नं मुद्यावर. मिहीरच्या वेळी तावा-तावात त्यांचं लग्न माझ्या पैशाशिवाय केलस नं.आताही कर." मंगेश


"मिहीरच्या लग्नाच्यावेळी ऐनवेळी तुम्ही बोललात म्हणून मला ती सोय करावी लागली.पण आता तुम्हाला लग्नाच्या खर्च करावा लागेल.मी पुन्हा दुसरीकडून पैशाची सोय करणार नाही."


"मिहीरच्या लग्नाच्या वेळी कोणी दिले तुला पैसे?" मंगेश


" कशाला सांगू? आता मला पैसे हवेत ते द्या." इंदिरा.तीने मुद्दामच शरदचं नाव सांगीतलं नाही.कारण मंगेश त्यावर कशी प्रतिक्रिया देईल हे इंदिरेला चांगलं माहिती होतं.


" मला नाही द्यायचे पैसे.मग काय करशील?" मंगेश


"मेघना आपली मुलगी आहे लग्नाचा खर्च करावाच लागेल."इंदिरा


"मिहीर नाही का आपला मुलगा?" मंगेश


" उगीच वाकड्यात शिरू नका. मला साखरपुड्यासाठी हाॅल बुक करायचा आहे. मेघनासाठी साडी आणि आनंदासाठी ड्रेस तसंच घरातील इतर मंडळींसाठी कपडे घ्यायचे आहेत." इंदिरा


"विचार करतो." मंगेश


"विचार करायला आता वेळ नाही." इंदिरा


"वारेवा माझा पैसा मी खर्च करायचा की नाही हे मला बघायला नको.त्याबद्दल विचार करायला हवा." मंगेश


"तुम्हाला चोवीस तासापेक्षा जास्त वेळ देणार नाही. समजलं!" इंदिरा


"पैसे माझे आणि माझ्यावरच रोब झाडतेस?" मंगेश


"आजपर्यंत तुम्ही रोब झाडला आता माझी वेळ आहे. प्रत्येकाला संधी मीळत असते." इंदिरा


"वा! त्वज्ञान हा विषय होता का तुझा काॅलेजमध्ये.?" मंगेश


"काॅलेजमध्ये काय शिकतो त्याचा व्यवहारात उपयोग होईलच असं नाही. माझ्याकडे खूप वेळ नाही तुमच्याशी वाद घालायला. " इंदिरा


एवढं बोलून इंदिरा फाटक गुरूजींना फोन करायला गेली.


इंदिरा एवढी जरबेच्या सुरात कशी बोलते हे कोडं मंगेशला सुटतच नव्हतं.कोणाला विचारावं त्याला कळत नव्हतं. मिहीरच्या लग्नाला इंदिरेने कोणाकडून पैसे घेतले हेही त्याला कळत नव्हतं.


मंगेश तसा मनातून हादरला होता.जिला तो आपला गुलाम समजत होता ती एवढी धीट होईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. आता दिवसेंदिवस इंदिरेचा धीटपणा वाढत चालला होता.तिच्या धीटपणाला थांबवण्यासाठी मेघनाच्या लग्नाला पैसे द्यायचं टाळायचं हे त्यानी मनाशी पक्कं ठरवलं.

___________________________

क्रमशः: पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात

निर्णय

लेखिका…मीनाक्षी वैद्य