Nirnay - 21 in Marathi Fiction Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निर्णय. - भाग २१

निर्णय. - भाग २१

निर्णय भाग २१


निर्णय भाग ऐकोणचाळीस

मागील भागावरून पुढे…


बरेच वेळा मंगेशीशी हुज्जत घातल्यावर मंगेश ने काही पैसे इंदिरेच्या खात्यात जमा केले.मेघना आणि शुभांगी या शनिवारी येणार आहेत त्या आधी मंगेश ने इंदिरेच्या खात्यात पैसे जमा केले म्हणून इंदिरेने सुटकेचा निःश्वास सोडला.


शनीवारी ठरल्याप्रमाणे दोघी चिमण्या आल्या आणि इंदिरेला आपलं घरटं भरल्यासारखं वाटू लागलं.


" आई आपण नाश्ता करून शाॅपींगला बाहेर पडू. शाॅपींग करता करता भूक लागली तर बाहेरच जेऊ." मेघना म्हणाली.


" अगं आपण बाहेर जेऊ पण बाबांचं जेवण…"इंदिरा


" आई आज तुम्ही बसा.मेघना आणि मी सकाळचा आपला नाश्ता आणि बाबांसाठी जेवायचं करुन ठेऊ." शुभांगी


" हो आई तू आता.."


" चिल मारु का?" इंदिरेने हे म्हणताच मेघनाला खूप हसू लागली


" आई तू आमची भाषा शिकली." मेघना ने बोलता बोलता इंदिरेला मीठी मारली.


" हो शिकावीच लागली त्या शिवाय या मोठ्या झालेल्या चिमणीची जग मला कसं कळेल." इंदिरा हसत म्हणाली.


" हो स्वीट आई…" मेघना


शुभांगी आणि मेघना ने झटपट स्वयंपाकघरातील सगळं काम आवरलं.नंतर तिघी तयार झाल्या.निघताना इंदिरा मंगेशला म्हणाली


" आम्ही तिघी निघतोय. टेबलावर नाश्ता करून ठेवला आहे. जेवायचंपण ठेवलंय.तुमची वेळ झाली की नाश्ता आणि जेवण करा."


" आली या भोगासी असावे सादर या म्हणीप्रमाणेच आता चालावं लागणार."


मंगेशच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून इंदिरा घराबाहेर पडली.शुभांगी आणि मेघना बाहेरच वाट बघत थांबल्या होत्या.


***


खरेदी झाल्यावर तिघी एका हाॅटेलमध्ये जेवायला गेल्या.तिथलं जेवण खरच छान होतं. तिघींनी बोलावलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.


हाॅटेलमधून निघतांना मेघना म्हणाली


" आई छान जेवण झाल्यावर आईस्क्रीम हवंच."


" आईस्क्रीम?"


" हो.फिनीशींग टच यायला हवा नं."


" बरं चला आईस्क्रीम खाऊ." त्यानंतर तिघी जवळच असलेल्या आईस्क्रीम पार्लर मध्ये गेल्या. तिघींनी आपल्या आवडीचे फ्लेवर्स मागवले.


खरेदी,जेवण मग आईस्क्रीम हे सगळं होता होता संध्याकाळचे पाच वाजत आले.


पाच वाजले तरी अजून या कशा आल्या नाहीत म्हणून मंगेशचा रागाने अंगाचा तिळपापड झाला. त्याची रागाने स्वतःशीच बडबडत चालू होती तेवढ्यात दाराबाहेर रिक्षाचा आवाज आला.


मंगेश जागेवरून उठला नाही. जेव्हा दारावरची बेल वाजली तेव्हा तो उठून दार उघडायला गेला.


तिघी घरात शिरताच मंगेश बडबड्या,


" सगळे पैसे आजच संपवले का?"


" मला वाटलच तुम्ही असं काहीतरी बोलाल."


" मग काही चुकीचं बोललो."


" मेघना ने आपल्या लग्नासाठी तिच्या साड्या तिनेच घेतल्या. शुभांगीने तिला आवडलेल्या साड्या घेतल्या त्याचे पैसे मी दिले नाहीत." इंदिरेचा आवाज चिडलेला होता.


" वा फारच उपकार झाले माझ्यावर."


" बाकीचं देणंघेणं आपल्या पैशातून करणार आहे. गरज पडली तर पुन्हा पैसे मागीन." इंदिरा


" अजून पैसे लागणार आहेत!" मंगेश


" बाबा तुम्हाला जर पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ.मी जमवले आहेत पैसे." मेघना चिडून म्हणाली.


" मेघना थांब. मी बोलतेय नं." इंदिरा


" अगं स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी यांच्या हातून पैसे सुटत नाही काय म्हणायचं याला"

मेघना चांगली चीडली होती.

" मेघना चल आत.शुभांगी चल." इंदिरा दोघींनाही आत घेऊन जाते.


" बापाला उलटून बोलते.छान संस्कार केलेत." मंगेश चरफडत बोलला.


***


इंदिरेने आत नेऊन मेघनाला शांत केले.


" आई काय हे? बाबांना कसलंच काही वाटत नाही. आपल्या मुलीचं लग्न आहे याचा आनंद तर दिसत नाहीच त्यांच्या चेह-यावर."


" असू दे.स्वभावाला औषध नसतं तुला माहिती आहे नं!" इंदिरा


" तू कशी इतकी शांत राहू शकते?" मेघना


" सवयीने माझ्या अंगवळणी पडलं.तूही सवय करून घे." इंदिरा


शुभांगी चुपचाप ऐकत होती. ती या घरात नवीन असल्याने ती फारसं या विषयावर बोलत नाही.


***


दिवसभर उन्हात हिंडल्याने तिघीही थकल्या होत्या. थोडा वेळ पडू असं म्हणत असलेली मेघना ढाराढूर झोपली अगदी शुभांगीसुद्धा. दोघींना गाढ झोपलेलं बघून इंदेरेच्या मनात दोघीं विषयी माया दाटून आली. हळूच दोघींच्या चेह-यावरून हात फिरवून इंदिरा स्वयंपाकघरात गेली. मंगेशचा दुपारचा चहा राहिला होता.इंदिरेने चहा केला.


चहा करून नंतर इंदिरा रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

______________मेघनाच्या साखरपुडा छान पार पडला. मेघना आणि आनंद दोघांचेही चेहरे प्रसन्न दिसत होते.


साखरपुड्यानंतर महिन्याभरानंतरचाच मुहूर्त निघाला असल्यामुळे खरेदीला गेल्यावर इंदिरेने लग्नाची खरेदीपण करून घेतली होती. त्यामुळे आता तसा ताण नव्हता.


साईकृपा मंगल कार्यालय हे साखरपुड्यासाठी मोठं कार्यालय होतं पण इंदिरेने चाणाक्षपणे ते कार्यालय घेतलं कारण लगेच लग्नासाठी पण तेच कार्यालय बुक केलं. कार्यालयालाही काही हरकत नव्हती कारण मेघनाच्या लग्नाची तारीख अजून कोणी बुक केली नव्हती.

***


साखरपुडा संपल्यावर आलेल्या लोकांचं जेवण होत असताना इंदिरा, शुभांगी,मिहीर सगळ्यांची जातीने विचारपूस करत होते.

इंदिरेने मिहीर आणि शुभांगी वर ही जबाबदारी सोपवली होती कारण मंगेश किती जबाबदारीने वागेल याबाबत इंदिरेला शंका होती.

मंगेश मुलाकडच्या लोकांशी मधून काहीतरी

बोलताना इंदिरेला दिसलं. ती देवाची प्रार्थना करू लागली देवा मंगेशला सुबूद्धी दे.


शरद आणि प्रज्ञा जरा अलिप्त होते.याला जबाबदार मंगेशचं वागणं होतं.त्यांचही बरोबर आहे असं इंदिरेला पटल्याने तिने त्यांचं अलिप्त राहणं फारसं मनाला लावून घेतलं नाही.

***


" आई कार्यक्रम छान पार पडला." मिहीर


" बोलाविलेली सगळी मंडळी आल्यामुळे छान वाटलं." इंदीरा


" मेघना तर आता स्वप्नं रंजनात गुंग आहे." शुभांगी ने हसून चॅट करणा-या मेघनाला गुदगुली केली.


" ऐ त्रास नको देऊ." मेघना

यावर मिहीर, शुभांगी,इंदिरा तिघही हसले.


" मिहीर मी तुला असा त्रास दिला नाही.बघ हं." मेघना.


" शुभांगी माझी बहिण किती साधी आणि शहाणी आहे.ऊगीच नको त्रास देऊ तिला." मिहीर


" अगोबाई ही मुलगी एवढी साधी आहे हे मला माहितीच नव्हतं.आई तुम्हाला माहिती होतं का?" शुभांगी


" नाही बाई मलापण नव्हतं माहिती." इंदीरा


" ऐ कायरे…आई तूपण त्यांना सामील आहे" असं लटक्या रागाने मेघनाने म्हणताच पुन्हा तिघं हसले.


मेघना आपला मोबाईल घेऊन तिच्या खोलीत गेली.

कितीतरी वेळ तिघं हसत होते.

***

मेघनाचं लग्नं ही आपली शेवटची जबाबदारी आपण पार पाडली की आपला निर्णय अंमलात आणण्यासाठी आपण पूर्णपणे मोकळे असणार हे इंदिरा मनात म्

म्हणाली.


दोन दिवस घरात वर्दळ होती.तीन पाखरं सतत चिवचिवाट करत होती.ते बघून इंदिरा खूप प्रसन्न झाली.


मंगेशला फारसा आनंद नव्ह्ता कारण आजकाल कोणत्याच गोष्टीसाठी त्याची परवानगी मागीतला जात नव्हती.तसच त्यांचं मतही विचारल्या जात नव्हतं त्यामुळे तो सतत चिडलेला असे.


मिहीर, शुभांगी आणि मेघना आपल्या गावी परत गेले तसं सगळं घर इंदिरेला खायला उठलं. ऐरवी तिने एकटीने मुकेपणानी जगायची सवय लावून घेतली आहे.मंगेशचं फक्त काही शब्दांची देवाला घेवाण करण्याइतकच अस्तित्व घरात उरलं होतं.


ती शब्दांची देवाण घेवाण सुद्धा मनातली गरळ ओकण्यासाठीच होतं असे.इंदिरेला आता त्याची शिसारी आली होती


वर्षानुवर्षे हाच तिरकस, कुचकट धागा दोघांना बांधून होता. पण आता इंदिरा हा धागा तोडणार आहे. यासाठी तिला कोणाच्या परवानगीची गरज नाही. हे आयुष्य फक्त इंदिरेचं आहे त्याचं काय करायचं हे फक्त आणि फक्त तीच ठरवणार आहे ती मेघनाचं लग्नं सुरळीत पार पडण्याची वाट बघतेय.


आज स्वयंपाक करताना इंदिरेला खूप कंटाळवाणं वाटलं कारण तिघं नव्हते तिच्याकडे खाण्याची फर्माईश करायला. इंदिरेने कसातरी स्वयंपाक आटोपला. तेवढ्यात फोटो वाल्याचा फोन आला.


" काकू मी जगदीश बोलतोय"


" हा बोल." इंदिरा


" फोटो तयार आहेत.फोटो घ्यायला कोणी येईल की मी आणून देऊ?" जगदीश


" नाही तुलाच आणून द्यावे लागतील.मिहीर नाही." इंदिरा


" ठीक आहे संध्याकाळी आणून देतो.ठेवतो." जगदीश


" हो." इंदीरा

इंदिरा स्वयंपाकघरातील आवरून इंदीरा तिच्या बगीच्यात गेली.

___________________________

क्रमश: निर्णय

पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात.

लेखिका…मीनाक्षी वैद्य