Rahun Geleli Gosht books and stories free download online pdf in Marathi

राहून गेलेली गोष्ट

                                                                                                                                                                                उद्धव भयवाळ

                                                                                                                                                                               औरंगाबाद

 

                                                                        राहून गेलेली गोष्ट

कधी कधी काही कारणास्तव काही गोष्टी नकळत हातातून निसटून जातात. तसेच काहीसे माझ्या गायनाच्या आवडीबद्दल झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

माझ्या लहानपणापासून मला गायनाची आवड होती. मला अजून आठवते की, बदनापूर {जि. जालना} या माझ्या गावी मी इयत्ता तिसरीत असतांना सकाळी शाळा सुरु होण्याआधी मी शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रगीत म्हणायचो, त्यावेळीच मला आमच्या बाईंनी "तुझा गळा खूप छान आहे. तू मोठेपणी गायक होशील." अशी शाबासकीची थाप मला दिली होती. त्यावेळी विशेष काही कळत नव्हते. पण मी इयत्ता सहावीमध्ये असतांना भारतावर चीनने आक्रमण केले. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा "जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध अमुचे सुरु" हे गदिमा यांचे समरगीत फार लोकप्रिय झाले होते. त्या समरगीतापासून प्रेरणा घेऊन मीसुद्धा त्यावेळी एक समरगीत लिहून त्याला स्वतंत्र चाल लावली आणि वर्गामध्ये ते गीत गाऊन दाखवले. त्यावेळी मला दुहेरी शाबासकी मिळाली. मी लावलेल्या चालीवर जेव्हा मी ते समरगीत म्हटलो, तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सत्यनारायणजी आसोपा नावाचे गुरुजी म्हणाले, तू मोठेपणी चांगला कवी होशील."  तर दुसऱ्या एका गुरुजींनी " तू नुसता कवीच नाही तर चांगला गायकसुद्धा होशील" असे म्हटले. त्यानंतर आसोपा गुरुजींच्या सांगण्यावरून ते समरगीत मी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसमोर अनेकदा म्हटलो आणि सर्वांची वाहवा मिळविली. कविता करण्याचा छंद मला तेव्हापासूनच लागला. मला गेय कविता करायला आणि त्या कवितेला चाल लावून ती म्हणायला फार आवडायचे. एव्हाना, मला चांगले गाता येते, हे शाळेतील सर्वांना माहित झाले होते.

पुढे स्टेट बँक ऑफ हैदराबादमधील नोकरीच्या निमित्ताने जेव्हा मी १९७३ ते १९८२ या काळात वैजापूरला होतो, तेव्हा मला इतर कवितांसोबतच लावणी प्रकारातील कविता लिहिण्याचा छंद लागला. त्या लावण्यांना मी स्वतंत्र चाली देऊन कविसंमेलनातून गाऊ लागलो. त्यावेळीही माझ्या गायकीवर शिक्कामोर्तब झाले.

परंतु गाण्यासाठी जो रियाज हवा असतो, त्याची मला काहीच माहिती नव्हती. अशातच श्री सोहोनी नावाचे शाखाव्यवस्थापक वैजापूरच्या बँकेत बदलून आले आणि एक दिवस त्यांच्या उपस्थितीत मी बँकेच्या स्टाफसमोर "बॉबी" या त्यावेळच्या लोकप्रिय सिनेमातील "बेशक मंदिर मस्जीद तोडो...पर प्यार भरा दिल कभी ना तोडो" हे नरेंद्र चंचल यांनी गायलेले गीत म्हटलो तेव्हा सोहोनीसाहेबांना ते माझे गाणे फार आवडले. ते मला म्हणाले," भयवाळ, तुमचा आवाज खूप चांगला आहे. तुम्ही छान गाता." त्यानंतर कधी त्यांच्या घरी जर गेलो तर तिथेही मला हमखास ते गाणे म्हणायला लावीत. आमच्या ब्रँचला जर कुणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली तर त्यांच्यासाठी स्वागतगीत तयार करण्याची आणि ते स्वागतगीत गाऊन दाखविण्याची जबाबदारी नेहमी माझ्यावरच असायची.

माझ्यातील गाण्याची आवड पाहून सोहोनीसाहेबांनी मला वैजापूरमधील एका संगीतशिक्षकाचा पत्ता दिला. खडके नावाच्या या गृहस्थांकडे जाऊन मी हार्मोनियम आणि गाणे शिकू लागलो. श्री खडके हे वैजापूरच्या कुठल्यातरी सरकारी कार्यालयात कर्मचारी होते. त्यांनी मला भूप रागापासून सुरुवात करून अनेक राग शिकविले. वेगवेगळ्या चालीची गाणी त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतली. "गाण्यात तुमची छान प्रगती आहे," असे ते मला म्हणायचे. त्यांच्याकडे माझे संगीत शिक्षण चालू असतांना माझ्या दुर्दैवाने पुढे सहा महिन्याच्या आत त्यांची बदली दुसऱ्या शहरात झाली आणि माझे संगीत शिक्षण तिथेच थांबले ते आजपर्यंत थांबलेलेच आहे. श्री खडके यांच्याकडे गाणे शिकल्यावर मी एक नवी हार्मोनियम विकत घेतली आणि घरी सराव करू लागलो. पण नंतर, नंतर मला सरावासाठी वेळ मिळेना.

आजही मी गेय कविता करतो, लावण्या लिहितो. त्यांना चाली लावून साहित्यसंमेलनातून किंवा इतर कार्यक्रमातून म्हणतो. पुष्कळदा वन्समोअरसुद्धा मिळवतो. महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी गायलेल्या माझ्या लावण्यांची सीडी लवकरच काढण्याचा माझा मानस आहे. कवितेसोबतच इतर साहित्य प्रकारांद्वारे माझी साहित्यसेवा चालूच आहे. परंतु माझे गायन मात्र तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. मी संगीताची सेवा करू शकलो नाही आणि शास्त्रोक्त पद्धतीने गाणे शिकू शकलो नाही, याची खंत मनामध्ये असली तरी  आजही गाणे शिकण्याची ऊर्मी अधूनमधून येते. म्हणूनच गाणे शिकण्याचा ध्यास मात्र आजही कायम आहे.

एक ना एक दिवस माझी ही इच्छा पूर्णत्वास जाईल याची मला खात्री आहे.

 

                      

                                                  उद्धव भयवाळ

                                                 १९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

                                                 गादिया विहार रोड

                                                 शहानूरवाडी

                                                 औरंगाबाद ४३१००९  

                                                 मोबाईल: ८८८८९२५४८८

                                                 email : ukbhaiwal@gmail.com