my modak puran in Marathi Cooking Recipe by Geeta Gajanan Garud books and stories PDF | माझे मोदकपुराण

Featured Books
Categories
Share

माझे मोदकपुराण

माझे मोदकपुराण

©®गीता गरुड.

गणेशोत्सव जवळ आला आहे तसे आताशा गणेशप्रिय उकडीच्या मोदकांच्या विडिओंची जंत्री सुरू झाली आहे.
कोण्या एका विडिओत कोणीएक योगिनी आधी गुळाचा पाक करून त्यात ओल्या नारळाचा चव परतताना दिसतीय तर दुसऱ्या एका विडिओत दुसरी सुगरण आधी ओल्या नारळाचा चव परतून मग त्यात गुळाचा खिस घालून परतते. कुणी उकडीच्या पाण्यात चमचाभर तेल टाकते तर कुणी तुप. सारे विडिओ कुणा नवखीने एका पाठोपाठ एक पाहून सगळ्यांचं सगळं ऐकून मोदक करायला घेतले तर बिचारीचे मोदक गंडलेच म्हणून समजा.

परीक्षा उतरण्यासाठी जसं अभ्यासात नियमितपणा, सातत्य हवं तसंच महिन्यातून निदान एकदा तरी मोदक करणं व्हायला हवं. नारळ अगदी कोवळाही नको व अगदी जुनही नको, रसदार चव हवा. वेलचीचे दाणे कसे टप्पोरे काळे हवे, वाळलेले नको.

दाणे वरवंट्याने ठेचून घेतले की त्यांचा स्वाद औरच लागतो, मिक्सरला साखरेसोबत केलेल्या वेलदोड्याच्या पुडीला ती सर येत नाही.

तांदूळपिठीला चिकटपणा हवा, नाहीतर सगळंच मुसळ केरात. पीठ अगदी जुनं वगैरे असलं तर मोदकाची उकड कितीही चांगली मनबिन अर्पुन करा, पारी हट्टी बनते नि कळ्या वळता वळत नाहीत. चांगलं पीठ देणारा दुकानदार हेरून ठेवावा अगर घरी सुवासिक कणी धुवून, वाळवून ती दळून आणावी.

मी खोबरं, गुळ एकत्रच कढईत टाकते व मंद आचेवर गुळ व खोबऱ्याची समेट होईस्तोवर परतत रहाते. ते तयार झालं की वरवंट्याने ठेचलेले वेलचीदाणे त्यात टाकून पुन्हा एकसारखे करून घेते. आधी सारण तयार करावे मगच उकड करायला घ्यावी. टोपात पाणी उकळत ठेवून त्यात कणीभर मीठ टाकून त्यात अदमासे पीठ पेरावं नि उलथण्याने परतून गेस बंद करून वरती झाकण ठेवून दोनेक मिनटं तसंच ठेवावं, नंतर ते पीठ केळीच्या पानाच्या घडीत अगर एका प्लास्टीक पिशवीत काढून घेऊन हाताने वरतून छान मळावं, गोळा तयार झाला की पारी करायला घ्यावी.

पारी करताना एकतर हाताला पीठ लावावं किंवा तुप/तेल. पातळ पारी करून त्यात सारण भरावं व अंगठा व बोटाच्या सहाय्याने नाजूकसाजूक कळ्या पाडाव्यात. कळ्या मनासारख्या जमत असल्या की मोदक वळताना मस्त तंद्री लागते, मेडीटेशन क काय ते होतं.

मोदक चाळणीत उकडत ठेवताना तीत हळदीची पानं अंथरली नि त्यांवर मोदकांची गोलाकार बैठक बसवली की पाचेक मिनटांत असा काही घमघमाट घरात दरवळू लागंतो की काय वर्णावा!

मोदकासोबत एकतरी करंजी करण्याचा प्रघात आहे. भावाला बहीण हवी तसंच मोदकास करंजी हवी असंं म्हणतात. मोदकासोबतच इतर चार आकारही करतात, चतुर्थीदिवशीच्या नैवेद्यात. हल्लीच्या विविध आकारातल्या मोमोजचाच प्रकार तो, तरीही कळीदार मोदकच अगदी उठून दिसतात, भाव खातात.

या मोदकाचं गावठी तांदळाचं पीठ रुचीला जे लागतं ते ज्याने खाल्लं तोच जाणे. कितीही महागातल्या आंबेमोहोर, इंद्रायणी अगर बासमतीच्या सुवासिक पीठाला ती चव, तो करडासा रंग अगर गंध येत नाही. केशराच्या काड्यांच वर लेपन करून बघा कसे पारिजातकासारखे दिसताहेत हे दर्शविण्याचीही इथे गरज नसते. पारिजात तो पारिजातच, त्याची शोभा ती पुढीलदारीच्या खळ्यात, जास्वंदीची फुलं शोभतात ती कु़पंणाच्या बाजूने. कातर जास्वंद तर बघत रहावीशी, देवळातल्या असंख्य घंटाच जणू डोलताहेत असं मंद वाऱ्यासोबत डुलणाऱ्या त्या जास्वंदीफुलांकडे पाहून वाटते पण ते भडक रंग मिक्स करून जास्वंदी आकाराचे मोदक करणे हे कल्पकता म्हणून ठीकठाक पण खाण्यासाठी, नैवेद्यासाठी, नेत्रसुखासाठी नेहमीचाच मोदक योग्य.

गुळ, खोबरं नि वेलचीपूड याचंच सारण त्यात आणिक सुक्या माव्यांची अरेरावी म्हणजे नेत्यांनी गणपती यात्रेदरम्यान फुकट तिकीटविक्री करुन आपल्या बाजूने मतदारसंख्या वाढवण्यासाठी केलेली धुर्त व्यूहरचनाच जणू.

सुका मावा वाटावा तो खिरापतीला वाटा काय तो. मोदकात कशास! आम्ही ही, अशी कोकणचं पाणी प्यालेली माणसं काय ते सरळसोट बोलून मोकळे होणारी, मागेपुढे बोलताना बघणार नाही तसंच कितीक पाहुणे आले तरी जेवायला घालताना हात मागेपुढे होणार नाही.

साच्यातले मोदक मला उगीचच पोरकेबिरके वाटतात, काय त्या उभट रेघा नि जाडसर उकडलेलं पीठ, त्यात इवलंस सारण. मोदकाची पारी कशी घरनीच्या हातावर अलगद विसावयास हवी, मग तिच्या नाजूक बोटांनी ती योगिनी अगदी ध्यानस्थ होऊन अलवारपणे पातळाच्या निऱ्या कराव्यात तशा एकेक कळ्या, चुण्या करत जाते , साऱ्या बोटांनी त्या चुण्यांना एकत्र आणते, तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरील एकतानता पहावी, जणू मखरात विराजमान झालेल्या बाप्पाला ती सांगीत असते, बाप्पा या एकत्र आलेल्या कळ्यांप्रमाणे माझ्या घरातल्या माणसांना एकजुटीने ठेव, या मोदकाच्या सारणाइतका लोभ, माया, ही अवीट गोडी आमच्या प्रत्येकाच्या नात्यात असुदे.

तुम्हाला सांगते, ही ग्रुहिणी एवढा नैवेद्य करते, देवाला दाखवते पण देवासमोर प्रार्थना करताना कधीच स्वत:साठी काय मागेल तर शपथ!वाटल्यास तिच्या मनातलं वाचता आलं तर वाचून पहा, ती मागते ते मुलाबाळांसाठी, नवऱ्यासाठी. स्वत:चं अस्तित्वच जणू ती घरातील माणसांच्या उत्कर्षासाठी खर्ची घालते, याची जाण घरातील माणसांनी ठेवायला हवी खरं तर. बऱ्याच ठिकाणी ठेवतातही आणि बऱ्याच ठिकाणी नाहीही. व्यक्ती तितक्या परी याउपर काय बोलावे!

बालगोपाळांची मात्र मज्जाच मज्जा चाललेली असते. केळीचं नैवेद्याने भरलेलं पान म्हणजे केवळ आनंद, सुखीसमाधानी घराचं प्रतीक.
आताशा बाहेर पंचवीसेक रुपयाला एक मोदक विकतात,ज्यांना वेळ नाही, करण्यासाठी घरात माणूस नाही त्यांच्यासाठी यथार्थ आहे हा पर्याय शिवाय गरजू स्त्रियांना अर्थार्जनाचा उत्तम मार्ग.
असो,तर माझी ही मोदकाविषयीची चर्पटपंजरी कशी वाटली नक्की कळवा.
वाट पहाते.
लोभ असावा.