Vihinbai books and stories free download online pdf in Marathi

विहीणबाई

#विहीणबाई


©® सौ. गीता गजानन गरुड.


"आक्के अगं अशी अवेळी आलीस ती? फोन तरी करायचा होतास. काहीतरी तुझ्या आवडीचं बनवून ठेवलं असतं. बरं. तू फ्रेश हो तोवर बटाट्याची भजी करते तुझ्या आवडीची." शारदाताई आकांक्षाला म्हणाल्या.


आकांक्षा फ्रेश होऊन येईस्तोवर त्यांनी कुकर लावला. तिच्या आवडीचं आंबटगोड वरण केलं. चटकदार बटाटाभजी बनवली. स्वतःसाठी चार पोपटी मिरच्या त्याच पीठात लोळवल्या व तेलात टाकल्या. दोघींची जेवणं आवरली. ओटा आवरुन शारदाताई लेकीजवळ येऊन बसल्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. आकांक्षाला एकदम भरुन आलं. आईच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडू लागली. शारदाताई मग तसंच तिला थोपटत राहिल्या.


"आक्के,निज आत्ता. उठलीस की सांग मला निवांत."


"आई..असं म्हणून आक्की तिच्या कुशीत शिरली आणि लहान बाळासारखी झोपून गेली."


तिला अलगद बाजूला करुन शारदाताईंनी विहिणबाईंना फोन लावला.

"ताई काय झालंय नेमकं?"


"खरंच मलाही कळत नाही हो पण आकांक्षा खुलतच नाहीए इथे. आत्ता लग्नाला तीनेक महिने होत आले. माझं काय चुकत असेल तर सांगा मला. तिच्याशी बोला. सून चांगली आहे हो माझी पण मळभ आलंय थोडं नात्यात. आमची थोडीशी हमरीतुमरी झाली सकाळी. त्यावरुन ती एवढा राग डोक्यात घेईल असं वाटलं नव्हतं. माझंच मेलीचं चुकतंय. मी लगेच काहीतरी बोलून जाते. मला कुणी उलट बोललेलं आवडत नाही. निव्रुत्त शिक्षिका आहे नं मी. शाळेसारखंच घरी वागायला बघते. बाकी घरच्यांना माझं वागणं माहित आहे पण आकांक्षाला थोडं जड जातंय हो. का असं करु,कुठेतरी जाऊ महिनाभर रहायला पण कुठे जाणार हो मी!"


"वीणाताई,कुठेही जाऊ नका तुम्ही, घर सोडून. मी बोलते आक्कीशी. आपण करु सॉर्ट आऊट. निघेल मार्ग. आणि चिंता करु नका. अगदी आरामात रहा बरं. बाय."


शारदाताईंनी आक्कीच्या आवडीचा चॉकलेट केक बनवला. कॉफी केली तोवर आक्की उठली. घरात छान,खरपूस असा केकचा सुगंध दरवळत होता. त्यात कॉफीचा सुवास बेमालुमपणे मिसळला होता. आक्कीला अगदी फ्रेश वाटलं. तिने आईला पाठीमागून मिठी मारली.

"आई,तुच गं. तुच लक्षात ठेवतेस आवडीनिवडी माझ्या. सासरी नाही होत असं. राजूला वेळच नसतो. नुसता कामात बिझी आणि कामं झाली की व्हॉट्सअपवर महाशय गुंग असतात. पहिलं किती कौतुक करायचा माझं!


काल मी छान हेअरकट करुन आले. राजूने लक्षच दिलं नाही माझ्याकडे. माझ्या मनात होतं,त्याने छान दिसतेस असं तरी म्हणावं. मग मीच स़ागितलं त्याला मी हेअरकट केला म्हणून तर म्हणतो कसा,वाटत नाही. होते तसेच आहेत. किती रुपये घालवलेस वाया? असा राग आला नं मला त्याचा. आधीच सासूबाई ओरडलेल्या,"अगं छान केस वाढलेले,कश्शाला कट केलेस?" माझं तर टाळकंच फिरलं. त्यांना काही बोलले नाही, मनात म्हंटल,"माझे केस मी कापेन नाहीतर वाढवेन.हु आर यू टू आस्क मी😎"


"इथेच चुकतं बघ आक्के तुझं. अगं तू इथे असताना मी ओरडायचीच नं तुला. लगेच दहा मिनिटांत रुसवा सोडून आई खाऊ दे ना करत यायचीस. सासूलाच असा दुजाभाव का? त्यांच्या कलाने वागावं जरा. त्यांच ऐकलंस की त्यांनाही बरं वाटेल. माया फुकट मिळत नाही आक्के,रुजवावी लागते."


"बरं. पण त्या राजूच्या नं नाय सोडला त्याला. त्याला म्हंटलं कमावते मी. तुझे पैसे नाही खर्च केलेत काय! माझ्या पैशातून माझी हौसमौज केलेय. तर चिडला लगेच,चिडका बिब्बा. म्हणतो कसा,"ओके आत्ता तू तुझं माझं करणार का? चार पैसे कमावतेस तर शायनिंग मारतेस काय? तूच सांग आई हे काय बोलणं झालं का?

मीपण बोलले बरंच त्याला."


"आक्के,अशी भांडणं नवराबायकोत होतच असतात. तुझे पप्पा लवकर गेले म्हणून तुला आपल्या घरात दिसली नाहीत ती."


"हो गं आई, राजूची आई राजूच्या बाबांना कसली धाकात ठेवते! दोन कपाच्यावर चहा प्यायला देत नाही. ती म्हणेल तीच पुर्वदिशा. राजूचे मात्र अतिलाड करते. त्याची कपबशीही उचलून ठेवते.


परवाच बघना,बुधवारी काकांनी छान सुरमई आणली होती. मीही घरात होते. मासे तळले. सार करायला घेतला. कोकम घालू लागले तर म्हणते नाही हं आम्ही चिंचेचा कोळ घालतो. मी गप्प बसले पण माझ्याने काही तो सार घशाखाली गेला नाही. बरं शुक्रवारी संध्याकाळी त्या सुरमईच्या दोन तुकड्या शिल्लक होत्या. मी त्या तव्यावर गरम केल्या व पोळ्या करायला घेतल्या. यांनी त्या दोन्ही तुकड्या राजूला वाढल्या. राजूनेही मचामचा खाल्ल्या. माझ्या डोळ्यात पाणीच आलं. मी मग भोपळ्याच्या भाजीसोबत पोळी घशाखाली सरकवली."


"अगं तू मागायची होतीस राजूकडे किंवा वीणाताईंना सांगायचं होतस मला एक तुकडी ठेवा म्हणून. हे बघ आक्के त्या काही तुझी आई नव्हे तुझ्या मनातलं ओळखायला. तुझी आवडनिवड तू त्यांना सांगायला हवीस."


"आवडनिवड! अगं आई रविवारी कितीतरी दिवसांनी आम्ही दोघं लंचसाठी निघालो. मी लेमनयल्लो कलरचा वनपीस घातला तर मेडम म्हणतात कशा,"पेटीफ्रॉक घालून निघालीस कुठे? जा आधी धडुते कपडे घालून ये."

असा संताप आला होता मला पण गपचूप चुडीदार चढवला. तो स्लीव्ह्जलेस होता तर परत म्हणाल्या,"अंगभर ओढणी घे हो." कुठल्या जमान्यात रहातात देव जाणे. मेचिंग सेन्स काय तो नाही. सगळ्या साड्यांवर सफेद ब्लाऊज घालतात. अगदी मोजक्या साड्या. माझ्या मैत्रिणींकडे सासूबाईंच्या साड्यांचा स्टॉक आहे. माझ्याकडे तसलं काही नाही."


"तुला मी कमी का दिल्या आहेत साड्या?"


"अगं पण हल्ली त्या जुन्या फेशनचा जमाना आहे. मेत्रिणी त्या बेळगावी सिल्क,धुपछाव वगैरे नेसून येतात व ठुमकत सांगतात. ही सासूबाईंची बरं,एक्सेसरीजही त्यांचे. माझ्या सासूबाईंकडे सगळ्या विमलच्या पातळ मोठ्या फुलांच्या साड्या. त्यांना दागिन्यांचीही विशेष आवड नाही ग."


"तुला हव्या तर माझ्या साड्या घेऊन जा. नसेल त्यांना नटण्यामुरडण्याची आवड. आपण एखाद्याच्या आवडीनिवडीबद्दल त्याच्या पाठीमागे बोलू नये. तो तिचा पर्सनल मेटर आहे. मैत्रिणींतही कधी सासूची बदनामी करु नकोस."


"बरं..राहिलं."


"बरं मी जरा बागेत फिरुन येते. तू येणारेस का?"


"नको तू जा. मी बसते टिव्ही बघत. तिथे टिव्हीही नीट बघता येत नाही. सासरे न्यूज लावून बसतात नुसते."


शारदाताई बागेतून फिरुन आल्या. अंमळ उशिराच आल्या.


"हे गं काय आई, किती उशीर?"


"अगं आत्ता आम्हा मैत्रिणींचा ग्रुप तयार झालाय बरं. गप्पाटप्पांत जीव रमतो माझा."


"बरं राजूचा फोन आलेला का?"


"नाही. मीही करणार नाही त्याला फोनबीन. कोण मोठा लागून गेला? तू मला उद्या डब्यात बटाट्याची भाजी दे. तिकडेना तिखट घालून बटाट्याची भाजी करतात. मला मुळीच आवडत नाही ती."


जेवणं वगैरे आवरल्यावर शारदाताईंनी आक्कीच्या डोक्याला मालीश करुन दिली.


"आई,हेच मिस करते गं मी तिथे. तो राजू नवरा असला म्हणून काय झालं! त्याची आई त्याच्या डोक्याला मालीश करते,त्याला छत्री घेतलीस का,फोन घेतलास का,अजून थोडा भात घे म्हणते तेंव्हा तुझी खूप आठवण येते. का गं मुलींनाच असं परक्याच्या घरी जावं लागतं? माझं माझं म्हंटलं तरी धड माहेर तिचं नसतं न धड सासर तिचं असतं."


"अगं बाळे, या सर्व मानण्याच्या गोष्टी आहेत बघ. तू माझ्याशी आपलेपणाने बोलतेस तसं बोल नं त्यांच्याशी. नात्यातल्या गाठी वेळीच सोडवाव्या बाळा. एकदा गुंता वाढला की सगळं अवघड होऊन बसतं बघ. तुझ्या राजूचा फोन आला होता मला. सॉरी म्हणत होता. तुला लवकर पाठवून द्या म्हणत होता. मीही चांगलं खडसावलय त्याला. बायकोवर प्रेम करत नाही म्हणजे काय! सॉरी सॉरी म्हणत होता नुसता. तुझ्या सासूबाईंचाही फोन होता. काही चुकलं तर माफ करा म्हणत होत्या."


आक्की क्षणभर विचारात पडली. तिच्या नाकावरचा राग वितळू लागला.


"अगं आई, मी जाते उद्या घरी. का गं बाई,आल्लेस तशी रहा की दोनचार दिवस."


"नको. आत्ता मला राजूची आठवण येतेय आणि थोडीथोडी राजूच्या आईचीही."


"काय!"असं म्हणतं शारदाताईंनी तिला कुशीत घेतलं व म्हणाल्या ,"शाणं माझं कोकरु ते. अगं हे घर तुझंच आहे हक्काचं. कधीही ये आणि मन हलकं करुन जा पण त्या घरालाही आपलंस कर बाळा. माणसांचे स्वभाव असतात निरनिराळे. एक घाव दोन तुकडे करुन संसार होत नाहीत बेटा."


आक्की झोपल्यावर शारदाताईंनी विहिणबाईंना फोन लावला व म्हणाल्या,"माझी आक्की मला तुमच्यात शोधतेय हो वीणाताई. आत्ता एक करा. तुम्हाला दोन लेकरं आहेत असं समजा. आत्तापर्यंत राजू एकुलता एक होता. तेंव्हा त्याच्या आवडीचं त्याला देणं अंगवळणी पडलंय तुमच्या पण इकडे आमच्या ठमीला राग येतो हो. खाऊच्या नीट वाटण्या करा बाई. तुम्हाला जेवणात चिंच आवडते कबुल पण कधी तिच्या आवडीचं आमसूल घालूनही सार करा. तिला सांगा,तुला आवडतं म्हणून स्पेशल बनवलंय. आत्ता थोडी मॉड आहे पोरगी पण समजून घ्या हो. सुट्टीला नवऱ्यासोबत वाटला तिला वनपीस घालावासा तर घालूद्या. आपल्यालाही तरुण असताना चुडीदार वगैरे घालावसं वाटायचं तसंच आहे ते. एकदा मुलं झालं की कसलं वनपीस नी कसलं काय."


" खरंच हो शारदाताई,माझं चुकलच जरा. मी हेडमास्तरीणच बनत चाललेय हल्ली. शाळेत प्रमोशन मिळालं नाही तो रोल घरात करतेय पण बरं झालं माझे डोळे उघडलात ते. मी जरा एखाद्या छंदात मन गुंतवीन आत्ता. म्हणजे यांच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ होणार नाही माझी. आज आकांक्षा घरात नाही तर ओकंबोकं वाटतंय हो घर."


"बरं. माशाच्या तुकड्या शिल्लक राहिल्या तर सुनेलाही द्या हो."


"नक्कीच हो. तुम्ही मुळीच काळजी करु नका."


"वीणाताई, काही अधिकउणं बोलले तर माफ करा हो मला आणि हक्काने या माझ्याकडे रहायला जोडीने. तेवढाच त्या नवीन जोडप्यालाही एकांत नी मलाही जरा सोबत होईल हो तुमची. एकटी कंटाळते घरात. घर खायला उठतं."


"हो ताई,नक्की पुढच्या महिन्यात चांगलं आठवडाभर रहायला येतो दोघंही शिवाय कुठेतरी यात्रेलाही जाऊया तिघं मिळून. छान कल्पना आहे. बरं ठेवते हो फोन."


रात्री शारदाताईंनी जावयाला फोन लावला व त्यालाही चार गोष्टी समजावून सांगितल्या. थोडीफार घरकामात मदत करायला सांगितली. राजूही हो म्हणाला. शारदाताईंच्या मनात आलं,नशीबवान आहे आक्की माझी. चुकलं तर चूक मान्य करणारी माणसं मिळालेत तिला.


शारदाताईंसमोर त्यांचा नवाकोरा संसार उभा राहिला जेंव्हा आक्कीसारखंच त्यांनी माहेरी जाऊन सासूविषयी सांगितलेलं व तिच्या आईने तिच्या सासरी जाब विचारला होता. त्यावेळी तिच्या सासूबाई तावातावाने भांडलेल्या तिच्या आईशी. शारदाताई सासरी परत आल्या तर सासूबाई सहा महिने फुगून बसल्या होत्या. शारदाताईंविरुद्ध आक्कीच्या वडिलांचे कान भरायच्या व त्यांना फुकटचा ओरडा खायला लागायचा,प्रसंगी मारही खावा लागत होता. जमाना बदललाय,शारदाताई स्वतःशीच म्हणाल्या.


सकाळी शारदाताईंनी आकांक्षाचा डबा केला. सगळं आवरुन आकांक्षा आईजवळ गेली व म्हणाली,"येते गं आई. आत्ता परत येईन तेंव्हा राजूलाही सोबत घेऊन येईन."


सासरी जाणाऱ्या लेकीकडे शारदाताई ती दिसेनाशी होईस्तोवर पहात राहिल्या.


(समाप्त)