above books and stories free download online pdf in Marathi

उपरती

उपरती


क्षमा काकू व गोविंदकाका ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत रहात होते. याच घरात सिद्धेश व सिद्धीचा जन्म झाला. दोघांत दोन वर्षांच अंतर होतं. घर नुसतं मुलांच्या किलबिलाटाने भरलेलं असायचं. भिंतींवरती रेघोट्या,चिमणपाखरं,आई,बाबा,आजी,आजोबा,

बागुलबुवा, जोकर..काय मनाला येईल ते रेखाटलेलं पिल्लांनी.

क्षमाताईंची सासू भजनाचे क्लासेस घ्यायची, देवळात. त्यामुळे घरातलं सगळं क्षमाकाकूच पहायच्या. सासऱ्यांच व तिचं छान जमे. दोघांनाही गोष्टीची पुस्तकं वाचण्याची फार आवड. सासरे क्षमा काकूला छान छान पुस्तकं आणून देत वाचायला. दोघं पुस्तक वाचून झालं की त्या गोष्टींतल्या पात्रांवर चर्चा करीत. क्षमा काकूंची सासू सुगरण होती. ती वेळ असला की क्षमाला पारंपारिक पदार्थ शिकवे. क्षमाला ते येत असायचे पण तरीही ती परत सासूच्या क्रुती पाही. त्यातलं नवीन काही असेल ते शिकून घेई. सासूलाही मग तिचं अप्रूप वाटे कारण त्यांच्या भजनीमंडळात एकेकजणी आपापल्या सुनेचे पराक्रम सांगून टीपं गाळत. क्षमाची सासू क्षमासारखी गुणी सून लाभल्याबद्दल देवाचे आभार मानी.


सिद्धीही आजीसोबत भजनीमंडळात कधीमधी जाई. तिलाही भजनाची,भक्तीगीतांची आवड निर्माण झाली. आज्यांसोबत तीही गाणी गाई. शाळेत ऑफ पिरियडला बाई सिद्धीला भक्तीगीतं म्हणायचा आग्रह करीत.


सिद्धी तिच्या मधुर आवाजाने भक्तीगीतं गाई. पुरा वर्ग भक्तीरसाने भारावून निघे. बाई मग पालक सभेला क्षमा काकूंचे कौतुक करीत. किती छान संस्कार करत अहात तुम्ही सिद्धीवर असं म्हणीत. क्षमाकाकू घरी आल्यावर सिद्धीचं कौतुक आधी तिच्या आजीला सांगत मग आजी म्हणे,"आहेच माझी नात लाख गुणाची"आणि सिद्धीला तुप भरलेला खजूर देत. तो सिद्धीचा अगदी फेवरेट होता.


सिद्धेशला आजोबांसोबत बुद्धीबळ खेळायला फार आवडे. बुद्धीबळातले बरेच डावपेच आजोबांनी त्याला शिकवले होते. शाळेत होणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धांमध्ये सिद्धेशला कधी पहिला कधी दुसरा नंबर मिळे तर कधी त्याचा नंबर हुकला तरी आजोबा त्याला त्याचं काय चुकलं,कोणती खेळी करायला हवी होती हे समजावून सांगीत. खरंच आजीआजोबांमुळे क्षमाकाकू व गोविंदकाकांना मुलांची चिंता नव्हती. मुलांवर आपसूक संस्कार होत होते.


हळूहळू मुलं मोठी झाली. नातवाच्या लग्नात आजी नऊवारी नेसली होती. सगळा साजश्रुंगार केला होता. आजोबांनीही कोट,टोपी घातली होती. द्रुष्ट लागण्यासारखा जोडा दिसत होता, आजीआजोबांचा.

नवी सून,मोना घरात आली. मोना दिसायला सुंदर होती.


आजीआजोबा तीर्धयात्रेला गेले. क्षमाकाकूंनी सासूसासऱ्यांच्या प्रवासाची,तिथे लागणाऱ्या औषधांची,सुक्या खाऊची,कपड्यांची सगळी व्यवस्था तयारी करुन दिली.


मोनाने हनिमूनहून परतल्यावर तिच्या सासूसासऱ्यांना ट्रीपला पाठवलं. तिने वरच्या फळीवरचे पितळी डब्बे काढले. त्यातलं सामान फरशीवर भिंतीच्या कडेने ठेवलं. मग ती खालच्या भांडीवाल्याकडे गेली. त्याला सांगितलं की वरती ये व काही तांब्यापितळेची भांडी आहेत ती घेऊन जा. मोनासोबत तो भांडीवाला आला. त्याने पितळ,तांब वजन करुन घेतलं व मोनाला पैसे दिले. त्यातून मोनाने नाजूक महागडा कपबशी सेट व डिनर सेट घेतला.


काही दिवसांनी क्षमाकाकू व गोविंदकाका घरी परतले. क्षमाकाकूंना त्यांची जुनी कपबशी मिळेना. मोना तेवढ्यात नवीन कपबशीतून चहा घेऊन आली व तिने जुन्या कपबशा व काही भांडी भांडीवाल्या बाईंना दिल्या म्हणून सांगितलं. क्षमाकाकूंच्या लक्षात आलं की पितळी डबे,तांब्याचे हंडेही कुठे दिसत नाहीत. मोनाला त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह समजलं. तिने मग किती चतुराईने ती भांडी खालच्या भांडेवाल्याला विकली व त्यांचे किती पैसे मिळाले ते क्षमाकाकूंना सांगितलं. त्यातून आलेल्या पैशातून किती छान क्रोकरी घेतली ती दाखवली.


क्षमाकाकूंच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी मोनाला दिसलच नाही. मोनाने सासरीही तिच्या माहेरसारखा एक कुक स्वैंपाकाला ठेवला. गोविंदकाकांना क्षमाकाकूंच्या हातचा स्वैंपाक आवडे. पुर्वी ते क्षमाकाकूंना कुठे भाजी निवडून दे,कुठे खोबरं खवून दे अशी मदतही करायचे. मोनाने त्या दोघांचही स्वैंपाकघर त्यांच्यापासून हिरावून घेतलं.


कधी बाथरूम ओला राहिला तर मोना सासूला लगेच सुनावे,'मला सुका वाळलेला बाथरुम आवडतो. अशी ओल ठेवत जाऊ नका. कधी हॉलमध्ये गोविंदकाकांचा एखादा टीशर्ट दिसला तरी मोना हॉलमध्ये कपडे ठेवणं कसं मेनरलस असतं हे सुनावे. सिद्धेशला यातली काहीच माहिती नसायची कारण सिद्धेशसमोर मोना अगदी सासूसासऱ्यांची आज्ञाधारक सून असल्याची बेमालूम भूमिका करी. सिद्धेश तिच्यावर फार खूश होता.


मोनाला काही बोललं तर मोना गाजावाजा करेल म्हणून दोघं म्हाताराम्हातारी तोंड दाबून सूनवास सहन करीत होती.


थोड्याच दिवसांत क्षमाकाकूंचे सासूसासरे तीर्थयात्रेहून परत आले. दोनच दिवसांत आजीला घरातला कसनुसा बदल जाणवला. त्यांनी मोनाला सुनावलं,'या घरात आली आहेस तू सून म्हणून. एकतर पाण्यासारखी मिसळून जा या घरात पण या घरावर, घरातल्या माणसांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करु नको. मोनाला रागच आला. मोना आजीला अद्वातद्वा बोलू लागली.


सिद्धेश घरी आला तेंव्हा तिने त्याला सगळं तिखटमीठ लावून सांगितलं. सिद्धेशला तर संसारापेक्षा बुद्धीबळाचा खेळ सोप्पा वाटू लागला. आजोबांनी सिद्धेशला सांगितल, 'अरे राजा, संसार सोप्पा नसतो. मोनाही चांगली मुलगी आहे पण आपल्याकडचं वातावरण व तिच्या घरचं वातावरण यात तफावत आहे. तू काळजी करु नकोस. थोड्या दिवसांत सगळं ठीक होईल."


पण मोना ऐकायला तयार नव्हती. मोनाने वेगळं रहाण्याचा हट्टच धरला. सिद्धेशने तिला फार समजावून सांगितल पण मोना ऐकेना. शेवटी सिद्धेशने जवळच एका बिल्डींगमध्ये वनबीएचके बुक केला. मोना घरातून बाहेर पडली तेंव्हा क्षमाला फारच वाईट वाटलं. आजुबाजूची ,शेजारपाजारची लोकंही आपापसात कुजबुजू लागली. मोनाचा कुक तिच्यासोबत गेला.

क्षमाच्या सासूने क्षमाची समजूत काढली.


मोनाकडे आत्ता तिचा भाऊ,आई येऊन दोन दोन महिने राहू लागली. आठवड्यातून दोनदा तरी बाहेरचं जेवण, झोमेटो,स्वीगी..हे सगळं सिद्धेशच्या पचनी पडत नव्हतं पण त्याचा नाविलाज होता. घराचे हफ्तेही भरावे लागत होते. मोनाला पैशाची कदरच नव्हती. तिचं शॉपिंग वारेमाप असायचं. शेवटी त्या दोघांत खटके उडायला सुरुवात झाली व एकेदिवशी सिद्धेशशी भांडून मोना माहेरी निघून गेली.


चार दिवस माहेरी तिचं कौतुक झालं. मग तिथे ती अडचण ठरु लागली. तिच्या मतांना आत्ता तिथे पूर्वीसारखी किंमत नव्हती. इकडे सिद्धेश घराला टाळं घालून आईकडे चावी देऊन त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी अमेरिकेला गेला. खरंतर तो मोनालाही सोबत घेऊन जाणार होता पण मोनाच्या सततच्या भांडणांमुळे त्याने यातलं मोनाला काहीच कळवलं नाही.


मोनाच्या भावाने प्रेमविवाह केला व मोनाची वहिनी,रुता घरात आली. रुताशीही मोनाचे पटेना. दोघींची भांडणं होऊ लागली. रुताला मोना ही एक अडगळ वाटू लागली.


मोनाचे वडीलही मोनाला आधीसारखे पैसे देईनात. शेवटी नाविलाजाने मोनाने एक नोकरी शोधली व थोड्याच दिवसांत भाड्याचं घर घेऊन राहू लागली पण आजुबाजूची लोकं तिच्याकडे संशयाने पाहू लागली. गल्लीतल्या पोरांना मोना म्हणजे चिडवण्यासाठी एक आयतं सावज मिळालं.


मोनाला काय करायचे ते समजेना. तिथे जवळच रहाणाऱ्या यशोदाअक्कांनी त्या पोरांना चांगलच दमात घेतलं व मोनाला सांगितलं की कोणी जरी तुझ्या वाट्याला आलं तर मला नक्की सांग. मी बघते त्याचं.


यशोदाअक्का मोनाकडे घरकाम करु लागल्या. मोनाकडून यशोदाअक्कांना तिची कैफीयत कळली. आत्ता मोनाला तिच्या पुर्वीच्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता. तिला मनापासून सिद्धेशची व सासरच्या साऱ्या माणसांची माफी मागायची होती. यशोदाअक्का तिला म्हणाल्या,'बाळा तुला उपरती झाली नं मग झालं तर. तू खरंच जा तुझ्या सासरी. ती लोकं तुझं आनंदाने स्वागत करतील.'


यशोदाअक्कांच्या सांण्याप्रमाणे मोना परत सासूसासऱ्यांकडे गेली. क्षमाकाकू सासऱ्यांना जेवायला वाढत होत्या. दारात मोनाला पहाताच त्यांनी तिला बसायला सांगितलं. सरबत आणून दिलं. आजोबांनी क्षमाकाकूंना मोनासाठी पान वाढावयास सांगितलं..मागचं काहीच न काढता, मोना सासूसासरे,आजीआजोबांसोबत जेवली. क्षमाकाकू म्हणाल्या,"थोडा वेळ लवंड,मग तुला तुमच्या घराची चावी देते.'


मोनाचे डोळे भरून आले. आजीने तिची हनुवटी उचलली तसं मोनाला अजुनच भरुन आलं. मोना आजीच्या गळ्यात पडून रडू लागली. आजीला म्हणाली,'आजी मी फार चुकीचं,उद्धट असं वागले तुमच्याशी व सिद्धेशशीही. मी आत्ता तुमच्यासोबतच रहाणार . उलट बोलणार नाही.'


आजीचा सुरकुतलेला चेहरा आनंदाने बहरला. आजीने मोनाच्या पाठीवरुन हात फिरवला. आजोबा म्हणाले,'आज बासुंदीचा बेत करा. माझी नातसून परत घरी आली आहे. हा आनंद आपण साजरा करूया व आपला एकत्र फोटो सिद्धेशला पाठवूया.'


तळटीप: सूनवास हा हल्ली बरेच व्रुद्ध मातापित्यांच अवघड जागीचं दुखणं झालं आहे. घरातले वाद चार भिंतीत रहावे याकरता तोंड दाबून बुक्कयाचा मार सहन करतात. अधिकच झालं तर लांबवर रहायला जातात. शरीर साथ देत नसलं की अधिकच बिकट अवस्था होते या ज्येष्ठ नागरिकांची.


------गीता गजानन गरुड.