Madhumati books and stories free download online pdf in Marathi

मधुमती

मधुमती

अरुण वि.देशपांडे

रोजच्या प्रमाणे आजदेखील आफिसातून बाहेर पडल्यावर थोडे भटकून जरा उशिराच पद्माकर घराकडे निघाला .किती वेळ जरी फिरले तरी घरी जाणे भागच होते .आफिस्तल्या लोकांच्या सहवासात दिवस कसातरी निघून जायचा आणि त्याच्या एकटेपणाची जाणीव कमीत कमी होत असायची.

घरी आल्यावर बंद असलेलें दरवाजा मात्र -"तू एकटाच आहेस ", याची जाणीव करून देत असायचा .आजही तो आत आला ,उघडलेला दरवाजा तसाच सताड उघडा ठेवून तो खुर्चीत बसून राहिला.दुपारी केव्न्हां तरी येऊन गेलेल्या पोस्टमनने त्याच्या नावाचे टपाल खिडकीतून आत टाकलेले दिसत होते .त्याने ते पत्र हातात घेतले..त्याच्या सासुरवाडीहून आलेले पत्र, -त्याच्या मेहुणीचे लग्न होते , पद्धतीप्रमाणेत्या ला रीतसर निमंत्रण -पत्र आले होते. पण पद्माकर कसा जाणार या लग्नाला ? जिच्या माहेरचे हे कार्य होते ..ती त्याची बायको -"मधुमती ..त्याला सोडून गेली होती ,

.त्या सारे काही आठवत होते.एक मित्राच्या लग्नाला पद्माकर गेलेला होता.लग्नाच्या ठिकाणी त्याची नजर मांडवातून इकडून-तिकडे मिरवणाऱ्या मधुमतीवर खिळून राहिलेली आहे ",हे त्याच्या मित्राने ओळखले ..त्याहून मजेची गोष्ट म्हणजे ..पद्माकरला आवडलेली ती मुलगी ..त्याच्या आजच झालेल्या नव्या वाहिनीची मावस बहिणच असावी ..हे फारच छान झाले .मग काय, यथावकाश नव्या वहिनींच्या मदतीने पद्माकर आणि मधुमती जीवनसाथी झाले.

मधुमतीच्या आगमनाने त्याचे जीवन पार बदलून गेले .आपली आवड आणि निवड एकदम अचूक असल्याचा आनंद "त्याच्या मनाला वेगळेच समाधान देणारा होता .मधुमतीचे वागणे-बोलणे सगळ्यांना खूपच आवडले होते.लहान-मोठे अशा सगळ्यांनी तिची तारीफ करणे .यामुळे तर त्याचा आनंद अधिकच वाढला होता.

मधूच्या प्रेमळ स्वभावाने तो पुरता भारावून गेला होता.तिने ज्या उत्साहाने घर सजवले ,दो जीवांचा संसार मांडला "हे पाहून तो भरल्या मनाने तिला सारखे म्हणयचा - "माझ्या आयुष्याचा उत्तरार्ध आता या मधुनेच व्यापलेला आहे.

"लग्न झाल्यावर एक मुलगी बायको होते .आणि क्षणात सगळे जग बदलून जाते ", या बायका आपल्या नवर्याशी इतक्या एकरूप कशा होतात ?" हे गोड कोडे न सोडवलेलेच बरे.

आता हेच पहा न - "एकमेकाला अनोळखी असणारे दोन जीव लग्न" नामक संस्काराने एकत्र येतात आणि मग आयुष्यभर जोडीने जगण्याचं ठरवतात", किती वेगळ आहे ना हे ?, स्त्री आणि पुरुषाच्या मनाचा संयोग इतका एकरूपतेचा होणारा असतो? याचेच त्याला आश्चर्य वाटायचे.

दोघांच्या संसारात अधिक रंगत येण्यासाठी आता आणखी एकाची गरज आहे रे ",असे सारे जण त्याला सांगत होते. दोन्हीकडच्या वडील मंडळींना आजी-आजोबा होण्याची घाई लागून राहिली होती.या घाई-घाईचे त्याला हसू येत असे., लग्न जमवण्याची घाई, कधी उरकून टाकतो याची घाई ,आणि मग लगेच ."आता होऊ द्या रे लवकर ..!"म्हणून बाळाच्या आगमनाची घाई ",.

आणि एक दिवस मधूने त्याच्या कानात "ती -गोड बातमी" सांगून टाकली.पद्माकर त्याच्या मधुमतीवर बेहद्द खुश झाला.त्याच वेळी .तिच्या भावाचे लग्न जमल्याची आणखी एक आनंदवार्ता मिळाली .पद्माकर त्याच्या मधूला घेऊन सासुरवाडीला आला ,दोघांचे जंगी स्वागत झाले.शरीरावर आलेली "नवी नव्हाळी मिरवत त्याची मधुमती कोड-कौतुकाचे शब्द झेलीत घरभर फिरतांना पाहून त्याला मनस्वी आनंद होत होता.

मधूच्या भावाचे लग्न आनंदात आणि मोठ्या थाटात पार पडले . सर्वांच्या आग्रहामुळे मधूला अजून काही दिवस राहू द्या , पुन्हा येऊन घेऊन जावे "असे ठरले आणि त्यामुळे मग पद्माकरला एकट्यानेच परतावे लागले.घरी आल्यावर तिच्याशिवाय सुने सुने वाटणारे घर ,तिची आठवण तीव्रतेने करून देत होते. मधुमतीच्या असण्याने त्याचे घर जणू "त्याच्यासाठी सुंदरसे मधुबन "झालेले होते "..तिच्या शिवाय एकटे राहू शकत नाही ..असे रहाणे फार कठीण आहे "हे जाणवत होते..पण.आपले असे सारखे सारखे तिकडे जाणे "बरे दिसणार नाही", सारेजण हसतील -चिडवतील .मग आपली होणारी फजिती मधुमतिला अजिबात आवडणार नाही ", हे आठवले की ..तिकडे जाण्याचा विचार बाजूला ठेवावा लागत होता.

अचानक एक दिवस मधूच्या वडिलांचा टेलिग्राम आला ..आपला जीव मुठीत धरून पद्माकर मधूला पहाण्यासाठी निघाला. नाना कु-शंकांनी त्याच्या डोक्यात थैमान घातले होते ..काय झाले असेल माझ्या मधूला ? देवा ,तिला काहीही होऊ देऊ नको , तिचे रक्षण कर ..त्याचे मन एकच प्रार्थना करू लागले. सासुरवाडीला -घरी पोन्च्ल्यावर ..त्याच्या दृष्टीस त्याची मधु पडली ..त्याबरोबर जीव भांड्यात पडला. "मधूच्या पोटात गर्भ आहे ..हा तिला होणारा भास आहे.असे काही झालेले नाही .उलट तुम्हाला काळजी वाटावी असा आजार झालाय ...तिच्या लिव्हरला ट्युमर झालाय " डॉक्टरांनी हे सांगताच त्याच्या मनाने ठावच सोडला ..दैवाने त्याची ही अशी काय क्रूर थट्टा मांडलीय ? काही सुचेनासे झाले.

सर्वांच्या विचाराने उपचारासाठी मधूला मुंबई-पुण्यातल्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये न्यावे असे ठरले .ऐपत नसतांना तो अत्यंत महागडी ट्रीटमेंट मधूला देऊ लागला .निष्णात डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन काळजीपूर्वक पार पाडले .सर्वांनी सुटकेचा नि:स्वास सोडला . एकदिवस त्याला बोलावून घेत डॉक्टर म्हणाले - तुमच्या मिसेसला कॅन्सर आहे "अशी मला शंका वाटते ..प्रायमरी स्टेज..वाटते ..म्हणून सांगतो..खूपच काळजी घेणे भाग आहे, उपचार करीत रहाणे भाग आहे..तुमच्या मिसेसला याबद्दल कळू देऊ नका .कारण त्यांना मासिक धक्का बसू शकतो.

हताश झालेला पद्माकर मधूला घेऊन घरी परतला ..शरीराने अधू झालेली त्याची मधु ,मनाने पार खचून गेलेली आहे "हे त्याला दिसत होते ,जाणवत होते .झालेल्या आजाराबद्दल तर तिला अजून काहीही माहिती नव्हते ..पुढे कसे होणार?

आपल्या हसर्या -खेळत्या .आनंदी संसार जीवनाला असे ग्रहण का बरे लागले असेल? स्वताच्या मनावर त्याचा ताबा राहीना ..तरी वरकरणी ..उसने अवसान आणून तो मधुमतीच्या मनाला धीर देऊ लागला .

सगळ्यांच्या नजरेत या दोघांचा संसार सुरळीत सुरु झाला होता. पद्माकरला वाटायचे ..आपला हा संसार -रथ "मध्येच कुठेतरी ,केंव्हातरी थांबणार आहे. मधूला काही कळता कामा नये "याची काळजी घ्यावी लागणार होतीच.

आता यापुढे मधूची कोणतीही इच्छा असो, ती पूर्ण करायचीच ..तिची इच्छा अपूर्ण रहाता कामा नये. इतकी चांगली साथीदार मिळाली ,पण, ही मध्येच आपली साथ सोबत सोडून जाणार आहे ",नुसत्या कल्पनेनेच त्याचे मन भरून जायचे, पण, मोठ्या प्रयत्नाने तो डोळ्यात पाणी येऊ देत नव्हता.

एक दिवस नेहमीप्रमाणे उजाडला नाहीच- भल्या पहाटे पासूनच मधूला त्रास सुरु झाला ..होणार्या वेदना तिला सहन होत नव्हत्या , हे पाहून पद्माकर घाबरून जाईल याचीच तिला भीती वाटत होती ..हॉस्पिटल मध्ये तिला आणले गेले ,डॉक्टरांनी चेक केले आणि औषधांची भली मोठी लिस्ट दिली ..ती औषध - लिस्ट पाहूनच पद्माकारचे डोळे फिरत होते..,होणार्या उपचार खर्चासाठी सारेजण यथाशक्ती मदतीसाठी पाठीमागे उभे होते ..मात्र मधूला होणारा त्रास कमी होतच नव्हता "याचीच सर्वांना काळजी होती.

खचून गेलेला पद्माकर निराश आणि हातास होऊन तिच्या समोरच बसलेला होता. त्याचा हात हातात घेत ती म्हणाली-

"आता कशासाठी जागवता आहात मला ?" या आजारातून माझी कधीच सुटका होणार नाहीये " हे माहित्ये हो मला

तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगितले नव्हते .."त्यामुळे सुटका होणे हाच उपाय आहे या आजाराला .". मधूचा असा अतीव वेदनेने भरलेला स्वर आणि तिचे शब्द त्याच्या हृदयाला पीळ पाडीत होते. आपल्या मधूला जवळ घेत काहीच न बोलता तिच्या पाठीवरून हात फिरवीत राहिला.

दोन जीवांचे जीवघेणे नाटक सुरु झालेले होते..जणू शेवटचा अंक सुरु झाला होता..आता अखेरचा पडदा पडे पर्यंत जिवंत रहाण्याचा अभिनय करीत जगणे "हेच दोघांच्या हातात शिल्लक होते.. मधल्या काळात मधूची तब्येत खूपच सुधारली .हे पाहून सर्वांना आनंद झाला.एकदा मधु त्याला म्हणाली ..सगळ्यांना एकदा त्यांच्या घरी जाऊन भेटावे अशी माझी इच्छा आहे हो",पुन्हा निरोप कधी घेणार मी कुणाचा ?

एखाद्या तीर्थयात्रेला निघावे तसे मधूला घेऊन पद्माकर निघाला."दिव्याची वात -विझ्ण्याआधी पुन्हा एकदा तेजाने उजळून निघते असे म्हणतात " मधूचे तसेच झाले आहे असे त्याला राहून राहून वाटत होते . सगळ्यांना पाहून-बोलून -भेटून तिला खूप आनंद मिळतोय हे पाहून तो पण त्यातच आनंद मानत होता.

अचानकच एके दिवशी ..उत्तम तब्येत आहे असे दिसणारी मधु ..असह्य वेदनेने कोलमडून पडली ..ती पुन्हा कधीच न उठण्यासाठी. पद्म्कारच्या खेळातली राणी अर्धा डाव मांडून .तशीच निघून गेली ....राजा त्याच्या राणी शिवाय एकटाच रहाणार होता.

हरवून गेलेला पद्माकर ..भानावर आला .आज आलेले पत्र त्याच्या हातात तसेच होते. त्याच्या मधु शिवाय आता कुठे जाण्याला अर्थ नव्हता . त्याचे जीवन ..विना मधुमती ..म्हणजे सूर नसलेले अर्थहीन गाणे होऊन गेले होते.