Bandini - 1 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 1

Featured Books
Categories
Share

बंदिनी.. - 1

भाग 1..

पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्षणात गोव्याला जाणारी ट्रेन माझ्या पुढ्यात उभी होती; पण.... पाऊल उचलायचं सुचत नव्हतं. काही सेकंद जणू संपूर्ण शरीर गोठल्याचा भास झाला.. आपल्याला त्या ट्रेन मधे चढायचं आहे; एक नवीन आयुष्य सुरु करायचं आहे याचा पूर्णपणे विसर पडला होता.. मेंदू अगदी बधिर झाल्यागत वाटत होतं..असं वाटत होतं की..दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरावं..?

"मीराsss अगं काय करतेयस? कसला विचार करतेयस एवढा?? ट्रेन सुटेल ना आपली.... चल लवकर..." - विक्रांत च्या आवाजाने मी भानावर आले.. कशी बशी हातातली बॅग अन् स्वतःलाही सावरत ट्रेनमध्ये चढले... रिझर्व्हड असलेल्या आमच्या सीट वर आम्ही जाऊन बसलो.. विक्रांत ने बॅगा सीट खाली ढकलल्या.. गरजेपुरतं सामान तेवढं बाहेर ठेवलं.. मी खिडकीजवळ बसले... काही सेकंदातच हॉर्न चा आवाज आसमंतात घुमला अन् ट्रेन चालू झाली... आजूबाजूची झाडे.. वस्ती.. एक एक करून मागे पडू लागले.. बघता बघता ट्रेन ने धाsड धाsड करीत वेग घेतला.. जसजशी ट्रेन पुढे सरकत होती, माझं मन आणखी व्याकूळ होत होतं... जणू एखाद्या अंधा-या खोलीत कुणीतरी मला डांबून ठेवलंय.. आणि मी जिवाच्या आकांताने ओरडतेय..... साहजिकच होतं ते... त्याला कारणही तसंच होतं... माझ्या जिवाभावाचं काहीतरी मी मागे सोडून जात होते.....कदाचित कायमची!! ?

"मीरा, मी थोडावेळ वरच्या बर्थ वर जाऊन झोपतो.." - विक्रांत.. माझा नवरा, त्याच्या आवाजाने मी परत एकदा सावरले...
"ठीक आहे".. प्रत्युत्तरादाखल मी एवढंच म्हणाले... पण माझं उत्तर ऐकायच्या आधीच तो वरच्या बर्थ वर चढला होता... सकाळी लवकर उठल्यामुळे जरा दमला होता.. सामानाची बांधाबांध आणि इतरही बरंच आवरायला त्याने मला मदत केली होती.. सकाळी दोन - चार गरजेच्या वस्तूही बाजारातून आणून दिल्या होत्या.. थोडं दमल्यामुळे त्याला आता झोपेची गरज वाटत होती.. म्हणुनच माझं उत्तर ऐकायच्या आतच त्याने वरचा बर्थ गाठला होता..

विक्रांत आणि माझं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं होतं.. त्याचं माझ्यावर जिवापाड प्रेम होतं... होतं म्हणण्यापेक्षा आहे... स्वभावाने शांत, समजूतदार, विचारी आणि संयमी.. त्याउलट मी... थोडी अधीर, हळवी, कधी अल्लड तर कधी गंभीर... तरीही आमचं चांगलं जमतं... आमच्यात कधीही मतभेद झाले नाहीत.. खरं तर दोघेही एकमेकांना पूरक... पण माझा भूतकाळ मला स्वस्थ जगू देत नव्हता..
'चाय' वाल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंग झाली.. त्याला थांबवून मी चहाचा एक कप घेतला.. विक्रांत ला हाक मारली; पण तो तर केव्हाच गाढ झोपी गेला होता.. चहा प्यायल्यावर थोडं बरं वाटलं.. तसं घरून जेवूनच निघालो असल्याने अजूनपर्यंत भुकेने तोंड वर केलं नव्हतं.. त्यामुळे फक्त चहा घेतला... चहा घेता घेता समोर बसलेल्या मावशीं सोबत नजरानजर झाली तेव्हा उगाच हसल्यासारखं केलं.. त्याही कसलंतरी पुस्तक वाचत बसल्यामुळे काही बोलल्या नाहीत... त्यामुळे मलाही आतून सुटल्यासारखं वाटलं.. त्या बोलत बसल्या असत्या तर माझी आठवणींची नाळ मध्येच तुटली असती, जे मला नको होतं..?
परत एकदा मी शून्यात नजर हरवून खिडकीबाहेर बघत बसले.. मनाची बेचैनी काही केल्या कमी होत नव्हती.. उदास मन मग परत एकदा भूतकाळात शिरलं.. तोच भूतकाळ ज्याला मागे सोडून मी निघाले होते..........

अनय...!! ❤️
माझा भूतकाळ... ज्याच्याकडे पाठ फिरवून मी निघाले होते.. एकेकाळी मी माझं सर्वस्व समजत असलेला माझा अनय.. माझ्या कणाकणात भरलेला.. प्रत्येक श्वासात जाणवणारा... गतकाळातील त्याच्या आठवणींच धुकं हळूहळू माझ्यावर पसरायला लागलं..पुन्हा एकदा तीच धुंदी माझ्या मना - मेंदूवर चढायला लागली..
अनय.... उंचसा.. गव्हाळ वर्ण.. तपकिरी डोळे- क्षणात मनाच्या गाभाऱ्याचा वेध घेणारे..साधारण मध्यम बांधा..सर्वांमध्ये असूनही नेहमीच कुठेतरी हरवलेला.. आयुष्यात स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवण्याच्या स्वप्नाने झपाटलेला..आणि त्यासाठी सतत धडपडणारा..तरीही आपल्या मनाचा कुणालाही थांग न लागू देणारा..
आमची भेट ऑफिस मधलीच.. साधारण 5-6 वर्षांपूर्वीची.. एका प्रतिष्ठित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत मी इव्हेंट प्लानर म्हणून काम करत होते.. माझ्या डिपार्टमेंट मधे मी, तन्वी आणि इतर सहा सहकारी असे आम्ही आठ जण होतो.. बाकी सर्वांचे टेबलस् अन्‌ बॉस च केबिन ही डिपार्टमेंट च्या मेन रूम मधे होते..मला मात्र माझ्या कामासोबतच ऑफिस मटेरियल ची इन्व्हेंटरी मेंटेन करावी लागत असल्याने माझी स्वतंत्र केबिन होती...मेन रूम ला लागूनच...
एप्रिल चा महिना असल्याने ऊन चांगलच जाणवायला लागलं होतं.. अशावेळी घरातून बाहेर पडून ऑफिस मधले काम करणे नको वाटायचं .. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून कुठेतरी फिरून यावं.. थोडं रिफ्रेश व्हावं असं वाटत होतं.. त्यामुळेच थोडं चेंज म्हणून बाहेर फिरायला जाण्यासाठी मी दोन दिवसांची सुट्टी घ्यायचं ठरवलं..मग काय.. घेतली धाव बॉस च्या ऑफिस कडे... शुभ काम मे देरी कैसी...!!! ?.. बॉस ने ही आढेवेढे न घेता सुट्टी अप्रूव्ह केली.. ! ?

अचानक प्लॅन ठरल्यामुळे जास्त लांब न जाता लोणावळ्याला जायचं ठरलं... सर्व फॅमिली मेंबर्स मिळून लोणावळ्याला जाऊन आलो?.. खूप फिरलो.. मजा केली.. दुसर्‍या दिवशी वॉटर पार्क ला पण जाऊन आलो.. खूप धम्माल केली.. दोन दिवस कसे गेले कळलच नाही.. खरच खुप फ्रेश वाटत होतं..
दोन दिवसांच्या रजेनंतर मी ऑफिस ला आले होते.. ऑफिस मधलं वाढतं काम आणि त्यामुळे भासणाऱ्या स्टाफ च्या कमतरतेमुळे पाच नवीन मेंबर्स जॉईन होणार असल्याची माहिती मला सरांकडून आधीच मिळाली होती... तन्वीनेही मी रजेवर असताना नवीन मेंबर्स जॉईन झाल्याचे कळवले होते.... ऑफिस मधे आले अन्‌ मी माझी बॅग माझ्या केबिन मधे ठेवली.. पीसी ला लॉग इन केलं.. नवीन मेल्स चेक केले.. महत्त्वाच्या मेल्सना रिप्लाय केला.. आणि नेहमीप्रमाणे तन्वी ला नाश्त्यासाठी बोलावण्याकरिता मेन रूम मधे गेले..
डिपार्टमेंट चा मुख्य दरवाजा उघडून आत शिरले तर समोरच्याच पीसी वर नवीन मेंबर्स पैकी एक बसला होता.. काही सेकंदच आमची नजरानजर झाली.. त्याचे ते तांबूस डोळे.. ती गहरी नजर... जणू माझ्या हृदयाच्या तळाचा वेध घेत होती.... एका क्षणात त्याची ती नजर हृदयाच्या कप्प्यात बंदिस्त झाली... कायमची!!? मी भानावर आले आणि मला जाणवलं की तो माझ्याचकडे बघतोय... आणि मीही मूर्खासारखी अजूनही त्याच्याकडे टक लावून उभी होते... श्शीsss!! मीरे.. काय हा मूर्खपणा!!?? काय वाटलं असेल त्याला.. मला एकदम अवघडल्यासारखं झालं.. मी पटकन माझी नजर खाली वळवली.. त्यालाही त्याची चूक लक्षात आली असावी..!! त्यानेही त्याचे डोळे लगेच स्क्रीन कडे वळवले...मी सरळ जाऊन तन्वी ला घेतलं आणि कॅन्टीनमध्ये गेले..बोलता बोलता तिच्याचकडून मला कळलं की त्याचं नाव अनय आहे..!? ?


To be continued..
#प्रीत ?