Addiction - 2 - 28 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 28

स्वतःच्या मर्जीने लग्न केल्यावर सुरुवातीचे दिवस फारच मजेशीर वाटू लागतात .आधी केवळ मनाने जुडणारे दोन व्यक्ती जेव्हा शरीराने जुळू लागतात तेव्हा त्यांच्यात अनोखं बंधन निर्माण होत जात आणि म्हणूनच ते जीवन प्रत्येकालाच हवं असत ..प्रज्ञा - सलील देखील त्यांना अपवाद नव्हते ..अजिंक्यने पैसे पाठवले असल्याने त्यांना काही दिवस काहीच टेन्शन नव्हतं ...स्वतःची रूम बघून तिथे ते आनंदाने राहू लागले .. त्यांना नव्यानेच एकमेकांचा सहवास इतका आवडू लागला की ते एक क्षण देखील एकमेकांना सोडत नसत ..त्यामुळे ते क्षण त्यांच्या आयुष्यातलं सुंदर पर्व होत गेलं ....सलील - प्रज्ञाला लग्न करून समाधान तर मिळालं होतं पण सर्वांकडून जो सपोर्ट हवा असतो तो सपोर्ट मात्र त्यांना मिळाला नाही म्हणून आनंदी असतानाही ती खंत मात्र त्यांच्या मनात सलत राहिली ..

सुरुवातीची स्थिती फक्त काही दिवसातच बदलू लागली ..बँकेतले पैसे संपू लागले आणि खाण्या पिण्याचे प्रश्न समोर येऊ लागले ..सलील काहीच काम करत नसल्याने प्रज्ञा त्याच्यावर थोडं फार रागावू लागली ..कधीतरी त्यांच्यात वादही होऊ लागले ..पळून जाणाऱ्या इतर जोडप्यांप्रमाणे तेसुद्धा एकमेकांना सोडतात की काय अशी भीती वाटू लागली होती ..पण कदाचित नशिबाने त्यांची साथ द्यायची ठरवली होती ..सलील घरून गेल्यानंतर त्याचे आईबाबा उदास राहू लागले ..प्रज्ञाला सोडून परत आपल्या घरी यावे ही विनंती ते सतत करत होते परंतु सलील त्यांना बधला नव्हता ...प्रज्ञाप्रमाणे सलील देखील आईवडिलांना एकटाच होता त्यामुळे त्यांना त्याच्याविना राहणं अशक्यच झालं ..गेले सहा महिने सलील - प्रज्ञा अजिंक्यच्या पैशावर जगत होते ..पण आता ते पैसे देखील त्यांना पुरत नव्हते ..खर्च जास्त आणि कमाई काहीच नसल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली ..नेमकं याच वेळी सलीलचे आईबाबा त्याला येऊन भेटले आणि आपल्या मुलाच्या निर्णयासमोर शेवटी त्यांनी हार मानली ..आणि सलील प्रज्ञाचा स्वीकार केला ..आता ते त्यांच्याच घरी राहू लागले ...

सलील - प्रज्ञाचा घरच्यांनी स्वीकार केला आणि त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा पटरीवर धावू लागलं ..सुरुवातीला प्रज्ञा त्यांच्याशी जुडली नाही पण मुस्लीम धर्म स्वीकारून ती त्यांच्या सर्व प्रथा पार पाडू लागल्याने त्याचे आईवडील तिच्यावर फार खुश राहू लागले ..तीही काही दिवसातच त्यांची लाडकी झाली ..आजीकडे असताना प्रज्ञाने ऍडजस्टमेंट हा शब्दसुद्धा एकला नव्हता पण तिकडे गेल्यावर मात्र ती स्वतःच त्यांना हवं तसं वागू लागली ..प्रज्ञा आधीच देखणी असल्याने तिला न स्वीकारण्यामागे काहीच कारणं नव्हतं शिवाय मुस्लिम धर्म स्वीकारल्याने त्यांच्या नातेवाईकाना देखील काहीच समस्या नव्हती ..अगदी सुरुवातीला पळून केलेलं लग्न अरेंज झालं आणि सलील - प्रज्ञा आनंदात राहू लागले ...प्रज्ञाला हवं असलेलं परफेक्ट कुटुंब तिला मिळाल आणि तिला अजिंक्य - मृणाल , आजी आजोबाचा विसरच पडला ..

या सर्वात दयनीय स्थिती झाली होती ती अजिंक्यच्या आईची ..स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त काळजी घेणाऱ्या मुलाला तिने घरातून हाकलून लावलं होत ..त्यामुळे घराचा आधार नष्ट झाला ..सुखाच्या वेळी सर्व लोक सोबत होते पण आता जेव्हा दुःखाची वेळ आली तेव्हा मात्र सर्वांनी काढता पाय घेतला आणि तिला आपली चूक लक्षात आली ..आपले आईबाबा याही वयात काम करतात हे पाहून अजिंक्य त्यांना पैसे पाठवत होता ..पण त्याने एका शब्दाने देखील ते बोलून दाखवल नव्हतं ..कधीतरी घरातील कर्त्याधर्त्याचा मान असणारे ते आज घरात एक कोपरा पकळून दिवस काढू लागले ..आईच्या मनात येत होतं की त्याच्याशी बोलावं पण तो काय म्हणेल या भीतीने ती काहीच बोलू शकत नव्हती ..अर्थात आज आपल्याजवळ कुणीच नाही म्हणून आई आपल्याशी बोलते आहे असं अजिंक्यला वाटलं असत म्हणून ती काहीच बोलली नव्हती पण प्रत्यक्षात तिने आपल्या मुलाला ओळखलेच नव्हते कदाचित तीच हे गप्प राहनच खूप काही गमावण्यास कारणीभूत होत हे तिच्या लक्षात येत नव्हतं ..दिवस जात होते तशी ती जिवंत लाश बनून घरात राहु लागली ..

प्रज्ञाचा विवाह होऊन जवळपास नऊ महिने झाले होते ..अजिंक्य - मृणाल आजही त्यांच्या आठवणीत तसेच जगत होते पण दिलेला शब्द पाळता यावा म्हणून त्यांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला नव्हता ..पण त्यांच्या आठवणीत ते किती झुरत होते हे फक्त त्यांनाच माहिती होत ..

रात्रीची वेळ होती ...आज बऱ्याच दिवसांनी अजिंक्य टेरिसला येऊन उभा होता ..वर थंड गार वारा सुटल्याच मृणालला जाणवताच ती शाल घेऊन वर आली आणि तिने ती शाल अजिंक्यच्या अंगावर चढवली ..अजिंक्यच संपूर्ण लक्ष आकाशभर असलेल्या चांदण्याकडे होत त्यामुळे मृणाल काहीच न बोलता त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली ..अजिंक्य चांदण्याकडे पाहत म्हणाला , " किती सुंदर आहे ना हे दृश्य !! चांदण्यांविना चंद्रदेखील अपूर्णच असतो ना ? आज बघ चांदण्या खिलल्या तर चंद्रालाही शोभा आली .." आणि मृणाल चांदण्याकडे बघत म्हणाली , " नशीबवान आहे चंद्र !!..चांदण्या फक्त काही क्षणच त्याच्यापासून रुसतात मग तेवढ्याच उत्कंठेने पुन्हा येऊन अलगद भेटतात .." अजिंक्यला तिच्या मनातलं रुतून बसलेलं सत्य सापडलं आणि तो पुढे म्हणाला , " एक विचारू मृणाल ..तुला कधी आठवण येत नाही का प्रज्ञाची ? " मृणाल चांदण्यावरून नजर हटवत बाजूला आली आणि म्हणाली , " आठवण ? प्रज्ञाने तो अधिकार केव्हाच काढून घेतलाय माझ्याकडून ..बहुतेक तिला आता माझ्या स्वप्नातसुद्धा येन आवडत नाही की काय माहिती नाही पण अलीकडे तिचा विचार करूनसुद्धा स्वप्नात चेहरा दिसत नाही ..मग आठवण आली की रडून घेते एकटीच ..शेवटी तुझ्या एवढी स्ट्रॉंग थोडी आहे मी "

तीच बोलणं ऐकून अजिंक्य थोडा खुलून हसू लागला ..इतकं खुलून हसताना तिने कितीतरी वर्षानंतर त्याला आज पहिल्यांदाच पाहिलं होतं त्यामुळे ते निरागस हसू तिने मधात तोडण्याचा प्रयत्न केला नाही ..अजिंक्यच्या चेहऱ्यावर हसू पाहून तीच मन समाधानी झालं ..ती त्याच्याकडे पाहत होती आणि स्वतःच हसू आवरत अजिंक्य म्हणाला , " तुला कधीही न सांगितलेली एक गोष्ट आज तुला सांगतो ..मृणाल जेव्हा तू मला नकार दिला होतास न तेव्हा मी थोडा फार खचलो पण तुझ्या जागी स्वतःला ठेवून बघितलं आणि मला माझं उत्तर मिळाल ..तरीही जगाची पर्वा न करता मला तू हवी होतीस म्हणून फक्त तुझा विचार बदलण्याची वाट पाहू लागलो ..तू तर उत्तर दिलं नाही पण एक दिवस अचानक आपल्याला कळालं की आपल्याला मूल होणार आहे आणि तुझा नकार क्षणात बदलला ..तू त्यादिवशी फारच खुश होतीस आणि तो आनंद माझ्या चेहऱ्यावरही शोधू पाहत होतीस पण त्यादिवशी माझ्या चेहऱ्यावर आनंदाच्या ऐवजी फार नाराजगी दिसली ..तुला वाटलं की मला हे बाळ नकोय पण माझ्या डोक्यात बरेच प्रश्न एकाच वेळी येऊन गेले होते ..त्यावेळी मला तुझ्याही चेंहऱ्यावरचे भाव जाणवत होते पण मी तुला फेस करू शकलो नाही ...त्याक्षणी माझ्या डोक्यात बरेच विचार येऊन गेले होते ..त्यातला एक विचार म्हणजे तुझं सत्य सर्वांसमोर येन ..तू जेव्हा व्यसन सोडायला बाहेर गेली होतीस तेव्हा तर मला फार भीती होती की प्रज्ञा आणि तुझी भेट कशी असेल ..सुदैवाने ती भेट छान झाली आणि माझं एक टेन्शन कमी झालं पण त्याहीवेळी माझ्या विचारचक्राने भविष्यात झेप घेतली आणि आपलेच लोक वेळ पडल्यावर कसे वागतील हे तेव्हाच लक्षात यायला वेळ लागला नाही ..आपल्या मुलीच अस वागणं हे मी तेव्हाच ध्यानी मनी बसवून घेतलं ..तू जीवनाचा भाग झाली तेव्हा तुझ्या आधीच मला ह्या सर्व गोष्टी सतावत होत्या पण मी तेव्हाच तुला साथ द्यायची ठरवली आणि नकळत का होईना ती भीती तेव्हा तिथेच नष्ट झाली ..मी तेव्हाच ठरवलं की काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही ..माझ्या मनाने त्याची अगदीच तयारी केली असल्याने जेव्हा तोच प्रसंग माझ्यासमोर येऊ लागला तेव्हा मी स्वतःवरच हसू लागलो आणि तो प्रत्येक त्रास एक स्वप्न वाटू लागला ...तो त्रास मी आधी मनात सहन केला त्यामुळे मला जीवनात तो जगताना कधीच काहीच वाटलं नाही ..हे खरं आहे की आईच्या , प्रज्ञाच्या वागण्याच्या त्रास नक्कीच झाला पण त्यांच्यावर ओरडणं मला कधीच आवडलं नाही आणि तुला माहिती आहे माझ आवडत वाक्य आहे की आयुष्याने तुम्हाला अपरंपार दुःख दिले असताना तुम्ही त्याच्यासमोर कधीच हार मानू नये आणि आपली हिम्मत बघून आयुष्याकडेही एकच पर्याय उरावा तो म्हणजे वर घेऊन जाण आणि वर घेऊन जातानाही देवाच्या डोळ्यात फक्त अश्रू असावे ..तेव्हा तू अस म्हणू शकतेस की हे सर सोपं नव्हतं पण तुझ्या प्रेमासाठी मी ते सर्व सहज करून गेलो ..प्रेम असतच अस !! आता कळलं मी ही सर्व स्थिती कशी सावरतो तर ? " तो एकाच वाक्यात सर्व काही बोलून गेला ..आणि ती त्याच्याकडे पाहत म्हणाली , " ग्रेट आहेस तू !!! पण इतके दिवस सत्य लपवल असताना आज कस काय सांगितलं हे सर्व ? " आणि अजिंक्य हसून म्हणाला , " माहिती नाही ..मला वाटत माझ्या आयुष्याच्या हा शेवटचा दिवस असेल म्हणून चुकून निघून गेल तोंडून .."

अजिंक्य गमतीत सर्व काही बोलून गेला पण ती त्याच्यावर नाराज झाली आणि पुन्हा अजिंक्य समजावत म्हणाला , " अग जीवनाच निर्विकार सत्य आहे ते !! ...त्याला का घाबरायचं ? " मृणाल त्याच्या अगदीच समोर उभी होत म्हणाली , " निर्विकार सत्य आहे ना मग मलाही घेऊन चल तुझ्यासोबत ..आपण मिळूनच जाऊ .."

अजिंक्य तिच्याकडे बघून हसू लागला ..त्याला वाटलं की ती गंमत करते आहे पण जेव्हा तो तिच्या डोळ्यात पाहू लागला तेव्हा जाणवलं की ती सिरीयसली बोलत आहे आणि म्हणूनच तो तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला , " अजिबात नाही मृणाल ..आपल्यामधून कुणीही आधी वर गेलं की त्याने तिथे वाट बघत बसायचं ..आपलं जीवन फक्त आपलं नाही इथे कुणीतरी नक्कीच असेल जो आपला संघर्ष जवळून पाहत असेल आणि आपल्या विजयावर त्याचा निर्णय अवलंबून असेल ..तेव्हा आपण दोघांनी एकत्र जाऊन स्वतःला दुनियेच्या नजरेत कायर बनवून घ्यायचं नाही ..मृणाल मान्य आहे की मृणाल - अजिंक्य कधी तरी वर जातील पण त्या दोघांच प्रेम सदैव टिकून राहायला हव ..अगदी ते गेल्यावरही.. तेव्हाच आपल प्रेम जिंकेल ....मला कळत की एकमेकविना आपलं राहणं अशक्य आहे ..तरीही आपल्याला जगायलाच हवं शिवाय आपली मुलगी आपल्यासोबत नाही तर काय कुमुद काकूने उभं केलेलं आश्रम आपल्याला जीवनात जगायला शिकवेल..तेही मुलंच आहेत आपले .. आणि आपण त्यांना तस वचन दिल आहे ..सो आता पळवाट शोधायची नाही .."

मृणालच्या मनात बरच काही चाललं होतं पण त्याक्षणी तिला त्याच्याशी काहीच वाद घालायचे नव्हते त्यामुळे ती शांत बसली आणि अजिंक्य स्थिती सावरत म्हणाला , " राणीसरकार आता आपण आत गेलो नाही ना तर खरच माझ्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस असेल " त्याच्या टूक्कार जोकवर ती हसली आणि अजिंक्यला समाधान मिळाल ..शेवटी ती त्याचा हात हातात घेत झोपायला खाली गेली ...

दुसरा दिवस उजाळला ..आज सकाळपासूनच अजिंक्य प्रज्ञा प्रज्ञा करत होता ..इतके दिवस तर तो तिच्याविना जगला होता पण आज त्याला तिच्याविना एक क्षणदेखील राहणं अशक्य झालं आणि प्रज्ञाला भेटण्याची इच्छा त्याने मृणालसमोर व्यक्त केली ..शेवटी बापाच काळीज होत ते ..मृणालनेही उदार मनाने त्यांला जाण्याची परवानगी दिली ..अजिंक्यने तिला सोबत येण्याची विनंती केली पण प्रज्ञाचा मूड खराब होईल म्हणून तिने जाण्यास नकार दिला होता ..पण अजिंक्य मात्र आज खूप दिवसांनी तिला भेटणार होता ..सकाळी ऑफिसला गेल्यापासूनच त्याचा चेहरा फार आनंदित होता ..ऑफिसमध्ये इतकं आनंदी असताना रियानेही त्याला खूप दिवसांनी पाहिलं होतं त्यामुळे ती देखील फारच खुश होती ..अजिंक्यने आज संपूर्ण ऑफिस डोक्यावर उठविल होत ..प्रज्ञाला भेटता यावं म्हणून त्याने सलीलच्या घराचा पत्ता देखील काढला ..आता फक्त वेळ होती ती ऑफिस सुटण्याची ..अंधार पडला आणि अजिंक्य प्रज्ञाला भेटायला तिच्या घरी गेला ..काहीच क्षणात तो तिच्याघरासमोर पोहोचला ..कितीतरी दिवसांनी प्रज्ञाला भेटणार असल्याने तो फारच गोंधळला होता ...तो कधी आनंदात होता तर कधी त्याला भीती वाटत होती ..शेवटी हिंमत करून त्याने घराचे दार ठोठावले ..काहीच क्षणात दार उघडल्या गेलं आणि समोर प्रज्ञा उभी राहिली..त्याला वाटलं होतं की ती बघताच त्याला मिठी मारेल पण अस काहीच झालं नाही उलट ती त्याचा हात पकडून दूर बाजूला घेऊन गेली ..सुरुवातीला शांत असणारे दोघेही काहीतरी बोलू लागले .बोलायच काय म्हणा ? ..अजिंक्य ऐकत होता आणि प्रज्ञा रागारागाने काहीतरी बोलत होती ..सुमारे वीस ते पंचवीस मिनिट त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं ..आणि बोलणं होताच प्रज्ञा झटपट घरात पळून गेली ..तर अजिंक्य तिथेच उभा होता ..काही क्षण तिथेच उभे राहिल्यामुळे लोक त्याच्याकडे पाहू लागले होते ..ते लक्षात येताच तो घराकडे निघाला ..

अजिंक्य भर वेगाने गाडी चालवत होता आणि तेवढयात मृणालचा नंबर त्याच्या स्क्रीनवर फ्लॅश करताना दिसला ..अजिंक्यने लगेच कॉल स्वीकारला ..अजिंक्य काही बोलणार त्याआधीच मृणाल म्हणाली , " काय साहेब कशी होती वडील लेकीची भेट ..? " तर समोरून अजिंक्यच्या रडण्याचा आवाज आल्याने मृणाल शांत झाली ..त्याचा रडण्याचा आवाज ऐकून मृणालला धक्काच बसला होता ..ज्या अजिंक्यने मोठ्यात मोठे धक्के पचवले होते तरीही रडला नव्हता तोच अजिंक्य आज रडत होता त्यामुळे काहीतरी नक्कीच झालं होतं हे तिला जाणवू लागल आणि ती म्हणाली , " अजिंक्य का रडतो आहेस तू ? सांग ना मला खूप भीती वाटते आहे ..प्लिज बोल ना ..? आणि समोरून रडत रडतच अजिंक्य म्हणाला , " मृणाल मी आज हरलो आहे ..हरलो ग मी !! ..आपली प्रज्ञा आज काय म्हणाली माहिती आहे ..तुला कस माहिती असेल ..थांब मी सांगतो ..आज मी गेलो तेव्हा ती माझा हात पकडून घराच्या थोडं दूरवर घेऊन गेली ..सर्वात पहिला प्रश्न तिने विचारला तू इथे कशाला आला आहेस ? आणि तिचा प्रश्न एकूण मी तिच्याकडे पाहतच बसलो ..पुढे ती बोलू लागली ..आज कशी आठवण काढली रे माझी ? की हे पाहायला आला आहेस .. मी मेले की नाही तर ..नक्कीच !!! मेली असेल हेच पाहायला आला असशील ..पण तुला सांगू मी फार खुश आहे तुझ्याविना ..मला वाटलं होतं की जेव्हा मला तुझी खरी गरज असेल तेव्हा तू माझ्यासोबत असशील पण तू तर त्या वैश्येसोबत निघून गेलास ..तुला त्याहीवेळी फक्त तीच दिसली का रे ? तरुण वयात तडफडत असणारी मुलगी तुला कुठेच दिसली नाही ? मी कितीतरी वेळ तुझ्या धावत्या गाडीकडे पाहत होते पण तू एक क्षण देखील मला बघितल नाहीस त्याच वेळी सांगितलं रे तू की मी तुझ्यासाठी काय आहे ..आणि बर का तुम्ही नसलात तरी आज माझ्याकडे संपूर्ण कुटुंब आहे ..जे माझ्यावर खूप खूप प्रेम करत ..आणि मी फार सुखी आहे ..तुमच्याविना माझं आधीही काहीच अडलं नव्हतं आणि आताही काहीच अडणार नाही आणि कसा रे तू फक्त एक वचन तर दिल होतंस की माझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीस पण ते वचनसुद्धा पूर्ण करू शकला नाहीस ..माझ्यासाठी तुम्ही केव्हाच मेले आहात हे कसं समजत नाही तुला ..माझं खूप सुखी जीवन सुरू आहे रे !! तेव्हा प्लिज पुन्हा कधी इथे येऊन माझं आयुष्य खराब करू नकोस ..प्लिज पुन्हा कधीच येऊ नको इथे ..एकल काय म्हणाली आपली मुलगी..मृणाल मी खरच हरलो ..हरलो मी .."

अजिंक्यच अर्धचं बोलणं झालं होतं की मृणालला फार जोराने आवाज आला ..ती अजिंक्यशी बोलण्याचा प्रयत्न करीत होती पण समोरून अजिंक्यचा आवाजच येत नव्हता .काहीच क्षणात तिला लोकांच्या गर्दीचा आवाज येऊ लागला ..तीच काळीज जोरजोराने धडधडू लागलं आणि ती जोर्याने ओरडत म्हणाली , " अजिंक्य ? .......?


क्रमशः ...