Navnath Mahatmay - 10 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग १०

नवनाथ महात्म्य भाग १०

गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्‌गुणी व धार्मिक स्त्री होती.
एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पहात असता, तिने जालंधरास पाहिले.

आधारावाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे, असे तिच्या मनात आले.

मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे, असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले.
ती दासी तर चतुरच होती.
ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलाविले, म्हणून विचारू लागली.
तेव्हा मैनावती तिला म्हणाली, माझे एक फार नाजुक काम आहे, ते मी तुला करावयास सांगत आहे.
यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये.
कदाचित प्रसंगवशात जिवावर येऊन बेतेल म्हणून सावध राहिले पाहिजे.
असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे, त्याचा पक्का शोध, गुप्त रीतीने करून येण्यास सांगितले.
जालंधरनाथास पाहून दासी चकित झाली व आपण जाउन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरणापासून मुक्त व्हावे, असा तिने मैनावतीस बोध केला.
नंतर तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली.
अस्तमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालंधर वस्तीस राहिला.
ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले.
मग मैनावतीने एका ताटात फळफलावळ व पक्वान्ने घेतली आणि अर्ध्या रात्रीस दासीस बरोबर घेऊन ती जालंधरनाथाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता.
त्या दोघीजणी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या.
त्या वेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुति केली.
मैनावतीने केलेली स्तुति जालंधराने ऐकिली, पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्याने तीचा पुष्कळ छळ केला.
तो तिजवर रागाने दगड फेकी, शिव्या देई.
परंतु मैनावतीने धैर्य खचू दिले नाही.
ती त्याची विनवणी करीतच राहिली .
ह्याच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळणुकीने तिचे मन किंचितसुद्धा दुखावले नाही.
मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारले.
तेव्हा ती म्हणाली, योगिराज ! महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे, परंतु त्यास कृतांतकाळाने माझ्या स्वामीना गिळून टाकिल्यामुळे मी सांप्रत वैधव्यदुःखसागरात बुडून गेले आहे.
ही जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मी भिऊन गेले आहे व ह्या योगाने मला पश्चात्ताप झाला आहे. काळाने पतीची जी अवस्था केली, तोच परिणाम माझा व्हावयाचा !
मला यातुन मुक्ती हवी आहे .
हे ऐकून तो म्हणाला, जर तुझा पती निर्वतला आहे, तर तू हल्ली कोणाजवळ असतेस ?
तो प्रश्न ऐकून ती म्हणाली, माझा मुलगा गोपीचंद राजा ह्याच्या जवळ मी असते, पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही.
कृपा करून मला तुम्ही कृतांतकाळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून चरणापाशी विनंति आहे. तेव्हा त्याने सांगितले की, कृतांताच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे, ते मजसारख्या पिशाच्च्याकडुन तुटावयाचे नाही, यास्तव तु येथुन लवकर निघून आपल्या घरी जा.
जर ही गोष्ट तुझ्या पुत्राला समजली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल.
इतका प्रकार होईपर्यंत उजाडले, तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली.
तिला सारा दिवस चैन पडले नाही.
मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेउन ती पुन्हा जालंधरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली. पण नुसते उभे राहण्यात काही हशील नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चेपीत बसली.
नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करुन आपल्या घरी आली.
अशा रीतीने सहा महिनेपर्यंत तिने जालंधर नाथाची सेवा केली.
एके दिवशी फार काळोख पडला आहे, अशी संधि पाहून मैनावती त्याजकडे गेल्यानंतर त्याने एक मायावी भ्रमर उत्पन्न केला व आपण गाढ झोपेचे ढोंग करून स्वस्थ घोरत पडला.
तो भ्रमर मैनावतीच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकली,तरी तिने आपले अवसान खचविले नाही.
असा तिचा दृढनिश्चय पाहून जालंधरनाथाने प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला.
तेणेकरून तिची कांति दिव्य झाली.
तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली.
नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली, तेणेकरून मैनावती अमर झाली.
जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला, तद्वत जालंधराने मैनावती अमर केली.
पुढे तिची भक्ति दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली.
मत्स्येंद्र नाथप्रमाणेच जालंधर नाथ कृष्णपदाचे गुरु मानले जात .
त्यांचे गुरू जालंधरनाथ होते.
जालंधरनाथ हे मत्स्येंद्र नाथ यांचे गुरु भाऊ मानले जातात.
कृष्णपदाला कनिफ नाथ म्हणूनही ओळखले जाते.
कृष्णपद जालंधर नाथ यांचे शिष्य होते आणि त्यांची नावे कान्हापा, कान्हूप, कानपा इ. म्हणून ओळखली जातात.
काही जण कर्नाटकातील आणि काही ओरिसाचे असल्याचे मानतात.
जालंधर आणि कृष्णापाडा हे कपालिका विचाराच्या प्रवर्तक होते.
कपालिकांचा प्रसार महिलांच्या योगाने केला जात होता .
सिद्धांचा उदय भारतात 6 व्या ते 11 व्या शतकापर्यंत सर्वत्र होता.
पुढे शंकर व विष्णु हे जालंधरनाथ व कानिफा यांसह बदरिकाश्रमास गेले.
ते सर्वजण जालंधरनाथाची शक्ति पाहून थक्क झाले त्यांच्या आपापसात गोष्टी चालल्या असता, दैवतांची विटंबना जालंधराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले.
आजपर्यंत त्यांना हात दाखविणारा असा वस्ताद कोणीहि मिळाला नव्हता असेहि उद्गार बाहेर पडले.
नंतर शंकराने जालंधरास सांगितले की, तू नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे.
वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत.
अस्त्रविद्या महाप्रतापी असली तरीही कलियुगात तिचे तेज पडणार नाही.
मंत्रविद्येचा लोकांस काडीचासुद्धा लाभ व्हावयाचा नाही.
ह्यास्तव कविता सिद्ध करून ठेव. आणि त्या सर्व विद्या कानिफास शिकव.
ह्या कानिफाचे उदारपणे वागणे हे चुकीचे आहे, परंतु कारणपरत्वे उपयोगी पडण्यासाठी ह्याची ही वृत्ती योग्य आहे.
हा हजारो शिष्य करील, ह्याला सर्व विद्या अवगत असतील, येणेकरून ह्याचे वर्चस्व सर्व जगात राहील.
पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढिला, परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे त्यापासुन जनतेला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही.
शंभर कोटी कविता पाहिजे ती नऊ नाथांनी करावी.
सर्व खटपट परोपकारासाठीच करावयाची आहे.
तुम्ही सर्वज्ञ आहा ! तुम्हास सांगावयास पाहिजे असे नाही.
जारण, मारण, उच्चाटणादिकांवरहि कविता करावी.
असे शंकराने जालंधरनाथास सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचविले की, ह्यास शिष्यत्व देऊन बसवून समर्थ कर.
हे शंकराचे सर्व म्हणणे जालंधराने मान्य केले.
मग जालंधर व कानिफा या उभयतांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या.
ते पाहून शंकर प्रसन्न झाला.
मग त्याने नाग अश्वत्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यांस बोध केला.
त्यानंतर उभयता तेथे गेले.
तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले.
सूर्यकुंडाचे उदक आणून बावन वीरावर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली.
ते पुनः बदरिकाश्रमास परत आले.
तेथे जालंधराने कानिफास तपश्चर्येस बसविले आणि आपणहि तपश्चर्येस गेला.
तेथे गोरक्षनाथहि तपश्चर्या करीत होता, पण त्याना परस्परांविषयी माहिती नव्हती.

क्रमशः