Ardhantar - 12 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - १२


भटकती राहों को मेरी,
एक मंजिल दे गया ।
मिला था एक अजनबी,
जो मुझे पहचान दे गया।


आपण कोण आहोत हे समजण खूप सोपं, पण आपण काय आहोत हे जेंव्हा आपण समजून घेतो, तेंव्हा जाणीव होते आपल्याला आपल्या धैर्याची, आपल्या शक्तीची....जन्मल्यावर आपल्याला नाव मिळणं हे स्वाभाविक आहे, पण त्याच नावलौकिक करणं हे आपल्या हातात आहे, पन मग हे सगळं इतकं सहजासहजी होत का?? नाही, नक्कीच नाही....आपल्याला नाव कमवायच असेल तर लागते एक जिद्द, एक प्रेरणा.... आणि जेंव्हा ही प्रेरणा आपल्याला मिळते तेंव्हा आपण पेटून उठतो, आपलं अस्तित्व सिध्द करण्यासाठी झुगारून टाकतो सगळी बंधनं, आणि मग सुरू होतो प्रवास आपल्या यशाचा... प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अस नक्कीच घडतं किंवा कोणीतरी व्यक्ती अशी नक्कीच असते जी आपल्याला आपली स्वतःची ओळख करून देते, आपण काय आहोत आणि काय करू शकतो याची जाणीव करून देते...त्यामुळेच आपण म्हणतो की यशस्वी व्यक्ती मागे कोणाचा तरी हात असतोच...मग त्याला मी तरी कशी अपवाद ठरू शकली असती..??? माझीच ओळख मला स्वतःला करून देण्यासाठी पाठीमागे नाही, तर माझ्या सोबतीने एक व्यक्ती खंबीरपणे उभी होती..

विक्रम मला घरी सोडायला आला, पण आमच्या मधात मात्र भयाण शांतता होती....विक्रम चिडला होता आणि मला अजून काही बोलून त्याचा राग वाढवायचा नव्हता..त्यामुळे मीसुद्धा गप्प राहणंच पसंत केलं...घरी आल्यावर मात्र तो आईबाबा सोबत चांगला वागला त्यामुळे मला थोडं बरं वाटलं...त्याला तातडीने ऑफिसमध्ये जॉईन करायला सांगितलं होतं त्यामुळे तोही निघायच्या घाईत होता...जाताना मात्र त्याने माझ्याकडे पाहिलं ही नाही, मलाच वाईट वाटलं आणि मी त्याला बाहेर पर्यंत सोडायला गेली, तो गाडीत बसणार त्याआधी मी बोलली
"विक्रम..." त्याने गाडीचा उघडलेला दरवाजा बंद केला आणि माझ्याकडे रागात बघत बोलला,

"बोला मॅडम, अजून काय फरमाईश आपली??? की अजून माझा मूड खराब करणं बाकी आहे..."
त्याचा हा राग पाहून माझ्या डोळ्यातले अश्रू लपवत मी फक्त नकारार्थी मान हलवली आणि बोलली,

"सॉरी...सांभाळून जा, रागात गाडी चालवू नका, आणि भंडाऱ्याला पोहोचल्यावर मला फोन करा वेळ मिळेल तेंव्हा.... एवढंच बोलायचं होतं..." खूप प्रयत्न करून ही पाण्याचा एक थेंब माझ्या गालावरून झळकलाच...

विक्रम माझ्या जवळ येऊन उभा राहिला आणि बोलला,
"एवढी काळजी आहे माझी तर माझ्या सोबतच का येत नाही?? माझ्यापेक्षा परीक्षा इतकी महत्त्वाची आहे का नैना? मला वाटलं होतं हा वेळ तुझ्यासोबत घालवावा पण तुला मात्र माझ्या भावनांची काही किंमतच नाही..."

".....ठीक आहे येते मी..." मी खूप जड अंतकरणाने बोलली,

"असुदे, मी प्रॉमिस केलं होतं तुला परीक्षेसाठी तर दे तू परीक्षा...तसही मला काही अर्जंट कामं आलंय त्यामुळे तुला वेळ नाही देऊ शकत, तू या वीस दिवसांत तुझी परीक्षा आटपून घे, मग येतो तुला घ्यायला...आणि हो, सॉरी बोलावं लागेल अशी कामं करत नको जाऊ..."

जाता जाता एक खोचक टोला मात्र देऊनच गेला...'माफी मागितल्याने कोणी लहान होत नाही' बाबांची शिकवण ही...पण चूक नसताना विनाकारण प्रत्येक वेळी नातं टिकवण्यासाठी आपणच माफी मागून आपली किंमत कमी करू नये हे मात्र त्यांनी सांगितलं नाही...त्यामुळे मी मात्र विक्रमला खुश ठेवण्यासाठी त्याच्यासमोर झुकत राहिली, आणि तो मात्र माझ्या या स्वभावाला माझी मजबुरी समजला...एक मात्र नक्की होत, मी मनापासून प्रयत्न करत होती की माझ्याकडून विक्रमला काहीच त्रास व्हायला नको...नवरा होता म्हणूनच नाही, तर मी मनापासून त्याला माझं मानलं होत, त्यामुळे त्याचा प्रत्येक जाच मी दुर्लक्ष केला...

माझ्या परीक्षा सुरू झाल्या, अभ्यासाचा ताण होता तरीही मी रोज न चुकता विक्रमची खबर घ्यायची, त्याची विचारपूस करायची, त्याचा ही राग शांत झाला होता, त्यामुळे कुठेतरी आमचं नातं रुजत होतं... आता तर मलाही वाटत होतं की लवकर परीक्षा संपावी आणि मी विक्रमसोबत जावं,...त्यादिवशी माझा शेवटचा पेपर होता, विक्रम खूप उत्साही होता की मी आता त्याच्यासोबत रहायला येणार म्हणून...त्याचा आनंद पाहून मला वाटलं त्याला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं, तसही आजपर्यंत तोच मला देत आलाय, आज मात्र मी त्याला सरप्राईझ द्यावं...

विक्रमला निळा रंग खूप आवडतो त्यामुळे मी विचार केला की त्याला जर शर्ट गिफ्ट केला तर त्याला चांगलं वाटेल...पेपर झाल्यावर मी खरेदीसाठी गेली, पण मला काही पसंत येत नव्हतं तिथे, खूप शर्ट पाहिल्यावर बाजूला ठेवलेला एक शर्ट मला पसंत पडला, पण दुकानदाराने सांगितलं की कोणीतरी आधीच तो पसंत करून ठेवला आहे, मला आधीच घाई होती घरी जायची त्यामुळे मी ठरवलं की त्या व्यक्तीला मी विनंति करते आणि तो शर्ट मी घेते...जेंव्हा त्याच्याजवळ मी गेली, त्याला पाहून मला आश्चर्य झालं कारण हा तोच होता...'अभय'...

"तुम्ही???"
"तू????" आमच्या दोघांच्या तोंडून एकदाच शब्द बाहेर पडले....

"हे बघ तुला मी बोललो होतो मला पासचे पैसे नको, तरी माझा पाठलाग करत आहेस तू...त्यात तुझी तरी काय चूक म्हणा, मी आहेच तसा चार्मिंग 😂😂"
दुकानदाराला टाळ्या देत माझी टिंगल करत तो बोलला,

त्याच्या ह्या विनाकारणच्या मजाकाने मी मात्र चिडली,
"ओ हॅलो, मी काही तुमचा पाठलाग करत नाही, असणार तुम्ही कितीही चार्मिंग मला काही त्याचा फरक पडत नाही, आणि मला काही तुमच्यात विशेष वाटत नाही...."

"हो का, मग काय इथे कॉफीसाठी मला विचारायला आलीस...🤣🤣"
आणि पुन्हा त्याने हसणं सुरू केलं...

"हे बघा, फालतू मजाक नका करू, हा शर्ट मला आवडलाय आणि मला तो घ्यायचाय, मी फक्त तुम्हाला सांगायला आली... झालं माझं काम, मी बिल करत आहे.."
आणि तो शर्ट हातात घेऊन मी बिलिंग काउंटर वर जायला निघाली,

"अग ये...कमाल आहे तुझी, प्रत्येक वेळी तुला मीच सापडतो का ग, कधी तुझ्याकडे पास नसतो, मग ऑटो भेटत नाही, आणि आता हा शर्ट... मी काय सगळंच शेयर करायचं का तुझ्यासोबत?? हा शर्ट मी नाही देणार..."

"हे बघा, मी या शर्टचे पैसे देते ना तुम्हाला, मला घाई आहे, प्लिज आता मला काही वाद नको..."

"तुला नेहमीच घाई का असते ग? यावेळी पण होणाऱ्या नवऱ्याला काही खोटं सांगितलं का??😁😁"

"होणारा नाही, झालाय माझा नवरा, त्याच्यासाठी सरप्राईझ आहे, आता तुम्ही प्लिज जास्त बोलून माझा वेळ नका घालवू, मला हा शर्ट पाहिजे , आणि तसही तुम्ही तीन शर्ट घेतले आहे ना, मग हा मला घेऊ द्या प्लिज, मला खरच वेळ नाहीये..."

"घे बाई घे, पोलिसाची बायको आहेस, मला तर आधीच भीती वाटते पोलिसांची...या देशात पंतप्रधानां नंतर तूच बिझी दिसतेस मला😂😂, माझी ही वस्तू ही तूच घे..."

"हे बघा, मला तुमच्या कडून काही घेण्याची हौस नाही, ते तर योगायोग आहे आणि आपण दरवेळी भेटलो, हे नेहमीच होईल असं नाही, त्यामुळे बाय बाय..."
मी बिल करून जायला निघाली, तेव्हढ्यात तो बोलला,

"मला नाही वाटत, कारण योगायोग नेहमी होत नसतो, त्यामुळे पुढेही तू मला भेटशील याची खात्री आहे मला, मला वाटतं नक्कीच माझ्या कडून काहीतरी मोठं घेऊन जाणार तू, त्यासाठीच देवाने तुला पाठवलंय वाटते...🤣🤣"

"मला काहीच नकोय तुमच्या कडून आणि हे शेवटची भेट समजा आपली कारण आता मी नागपूरात नसणार आहे तुम्हाला भेटायला..."

आणि असा शेवटचा निरोप देऊन मी निघाली...मला जरी तो शेवटचा निरोप वाटत होता तरी देवाने माझी 'फ्युचर प्लॅनिंग' करून ठेवली होती...इतक्या सहजपणे अभय नावाचा व्यक्ती आता माझ्या आयुष्यातुन जाणार नव्हता कारण तो बरोबर बोलला होता, त्याच्याकडून मला बरच काही घ्यायचं बाकी होतं.... आणि माझ्याकडून मात्र त्याची झोळी रिकामीच राहणार होती....
-------------------------------------------------------
तीन चार दिवस सुट्टी घेऊन विक्रम मला घ्यायला आला...आता नवीन ठिकाणी, नव्या घरात जायचं होतं त्यामुळे माझ्या आणि विक्रमच्या घरच्यांनी सगळी खरेदी केली आमच्यासाठी, सगळं नियोजन करून आता आमचा जायचा दिवस उजाडला...खर तर विक्रमसोबत जाऊन नवीन आयुष्य सुरू करण्याचा जेवढा आनंद होता त्यापेक्षा जास्त दुःख याच होत की ज्या घरात मी लहानाची मोठी झाली ते परकं झालं...पण लग्न झाल्यापासून एका महिन्यात माझ्यात आणि विक्रम मध्ये भरपूर गोष्टी बदलल्या होत्या, कुठेतरी वाटत होतं की विक्रम मला समजून घेतोय....मला विश्वास झाला की आई जे बोलायची ते बरोबर होतं, लग्न झाल्यावर बदलतात सगळ्या गोष्टी, आपण फक्त संयम ठेवायला हवा, आणि विक्रम ज्या प्रेमाने माझ्यासोबत वागत होता, मला विश्वास होता की आम्ही सोबत राहिल्यावर त्याच्यात आणखी बदल होतील.... त्यामुळे जास्त काही विचार न करता मी विक्रमसोबत भंडाऱ्याला जायला निघाली...

विक्रमला सरकारी बंगला होता त्यामुळे विशेष काही करण्याची गरज नव्हती तिथे पण तरीही थोडी साफ सफाई आणि आणलेलं सगळं सामान लावण्यात माझा पूर्ण दिवस गेला...माझी बॅग आवरत असताना मला ते अभयचं रेल्वेचं तिकीट सापडलं, ते पाहून मला त्याची आठवण झाली आणि हसू आलं मला...विचार केला दर वेळी त्याला भेटली की मी त्याला रागवतच होती पण त्याने माझं एकूणच घेतलं, खर तर त्याला जेंव्हा जेंव्हा भेटली तो अनोळखी आहे किंवा काही चुकीचा आहे असं वाटलंच नाही, पण असे खूप लोकं मिळतात आयुष्यात आणि जातात, तो पण यापैकीच असावा म्हणून मी त्याचा विचार सोडून दिला, पण त्याचा तो कागद मात्र द्यायचा राहिला......

त्यादिवशी पोहोचल्यावर लगेच विक्रमला डिपार्टमेंट मधून फोन आला त्यामुळे त्याला जावं लागलं, रात्री त्याला यायला उशीर होणार होता... घरी एकटी राहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे थोडी भीती ही वाटत होती...विक्रम नव्हता घरी त्यामुळे जेवायचीही इच्छा झाली नाही आणि कामं आवरता आवरता खुप दमलीही होती त्यामुळे मला झोप कधी लागली काही कळलं नाही....रात्री बाराच्या सुमारास विक्रम घरी आला, आज पहिल्यांदा मी आणि तो एकटेच होतो, मला थोडं घाबरल्या सारखं झालं होतं, काय बोलावं काही कळत नव्हतं....
"काय झालं? चेहरा का उतरलाय तुझा? बरं नाही का?"
विक्रमने मला विचारलं

"नाही...उशीर झाला तुम्हाला यायला...थकला असणार ना फ्रेश होऊन झोपा बर वाटेल..."

"नैना....मी नाही थकलोय," आता मात्र विक्रम अगदी माझ्या जवळ येऊन उभा राहिला आणि मला जवळ ओढत बोलला

"मी...मी...काय म्हणते..."

"आज काहीही बोलायचं नाहीस तू नैना, एक महिना झालाय लग्नाला आणि त्यात आपण एक दिवसही सोबत राहू शकलो नाही, आता मात्र मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही....नको अशी लांब राहू यार..."

"विक्रम, प्लिज मी खूप दमली आहे, आता आपण सोबतच राहणार आहोत ना, प्लिज....."

"मी बोललो ना, आज तू काहीच बोलायचं नाहीस म्हणून...आज फक्त माझं ऐक तू...." आणि अस बोलत विक्रमने मला घट्ट मिठी मारली...त्याचा तो आवेग, त्याची ती जबरदस्ती, त्यात माझा श्वाश कोंडत होता, जीव गुदमरत होता पण मी काहीही करू शकली नाही, माझा 'नाही'चा आवाज विक्रमच्या कानांपर्यंत पोहोचलाच नाही...जे होत होत त्याला मी गुपचूप सामोरे गेली आणि त्या रात्री मी विक्रममय झाली...

खर तर हे आहे की मी विक्रमचा प्रतिकार यासाठी नाही करू शकली कारण मला एक चांगल्या पत्नीचे कर्त्यव निभवायचे होते...आणि 'हे' कर्तव्य त्यापैकीच एक होत...त्यारात्री मला आईचे आणि माझ्या सासूचे शब्द आठवले...आम्ही इकडे येत असताना त्या बोलल्या होत्या,
"नवऱ्यासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करताना त्याला कोणत्याच गोष्टींसाठी मनाई करायची नाही, तो जसा म्हणेल तस वागायचं...थोडा त्रास झाला तरी सहन करायचं, बाईच सामर्थ्य सहन करण्यातच असत, आणि यामुळेच आपलं बाईपण जपून राहतं..."

त्यावेळी मी ते ऐकून घेतलं होतं, पण आज ते सगळं आठवलं की चीड येते...लग्न झालं म्हणजे लगेच ती जवळीक निर्माण झालीच पाहिजे का??? एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं याचं काही महत्त्व नाही का?? आज मला हे सगळं कितीही वाटतं असलं तरी त्यावेळेस मी ते निमूटपणे मान्य केलं होतं हे सत्य मी नाकारू शकत नाही....

दुसऱ्या दिवशी मला उशिराने जाग आली...आदल्या दिवशीची घरातली कामं, आणि रात्री झालेल्या विक्रमच्या हालचालीने माझ्यात मात्र त्राण उरला नव्हता...तेवढ्यात विक्रमचे आवाज मला कानी पडले...
"नैना... उठ पटकन, मला जायचं आहे, नाश्ता बनव काहीतरी, उशीर होतोय मला...."
मी कशीतरी उठून किचनमध्ये गेली, मला स्वयंपाकाची सवय नसल्याने सगळं काही पटापट करायला जमत नव्हतं , त्यात विक्रम मात्र खूप घाई करत होता आणि या घाईघाईत माझा हात पोळला.... आणि माझा आवाज ऐकून विक्रम किचन मध्ये आला,

"काय यार नैना, साधा स्वयंपाक ही जमत नाही का ग तुला? नाश्ता तर बनवलाच नाही, उलट तुझ्यामुळे मला उशीर जरूर झाला..."

"सॉरी...मला जमतो स्वयंपाक पण आज घाई झाली आणि त्यात मला त्रास होतोय...."

"आता कशाचा त्रास झाला तुला?"

"ते...रा..रात्रीमुळे..."मी नजर चोरत बोलली,

"ओहह नैना...सगळ्यांनाच होतो, तू काही स्पेशल नाहीस, बी स्ट्रॉंग यार...हे अस छोट्या छोट्या गोष्टी मुळे कोणी आजारी पडत नाही, हा नजुकपणा मला चालणार नाही...आज पहिला दिवस आहे त्यामुळे ठीक आहे, पण रोज अस चालणार नाही, मी उठायच्या आधी माझा नाश्ता बनवून ठेवायचा...तुझ्यामुळे माझ्या कामात व्यत्यय यायला नको...कळाल...."

आणि अस बोलून तो निघून गेला...ना त्याने माझ्या त्रासाकडे लक्ष दिलं, ना माझ्या पोळेलेल्या हाताकडे, वाईट वाटलं मला खूप... प्रेमाची गरज फक्त विक्रमलाच होती का?? एकदा त्याने प्रेमाने माझी विचारपूस केली असती तर कदाचित मी सगळं विसरून गेली असती, पण त्याला माझा त्रास म्हणजे नाजुकपणा वाटला....काश त्याला कळाल असत मुलगी होऊन हा त्रास सहन करणं किती कठीण आहे....

आता मात्र हे नित्याचंच झालं होतं.. एकही दिवस माझा 'नाही' चा आवाज विक्रमला गेला नाही, पण मी मात्र त्याची कामं करण्यात किंवा त्याची काळजी करण्यात काहीही कमी ठेवली नाही...दिवसभर मला घर खायला उठायचं, त्यामुळे मी विक्रमची जे पुस्तकं घरात असतील ते वाचत बसायची, विक्रम दिवसभर घरी नसायचा, त्याचा जॉब तसा होता त्यामुळे रात्री खूप उशीरा यायचा, एकटी असल्याने जेवणही जात नव्हतं, दिवसेंदिवस अशक्तपणा वाढत होता पण विक्रमच्या भीतीने मी सांगत नव्हती...विक्रमची पोस्ट मोठी होती त्यामुळे सगळी सुख होती फक्त नव्हतं ते समाधान...प्रेमाची उणीव तर होतीच पण मला वाटायचं की विक्रमच्या नजरेत मी फक्त त्याची बायको होती, त्याच घर सांभाळणारी आणि त्याच्या रात्री शांत करण्यासाठी असलेलं साधन...त्याच्या नजरेत माझा मान मात्र शून्य होता अस वाटायचं मला....माझा गैरसमज दूर झाला होता की विक्रम मला समजून घेईल किंवा लग्नानंतर तो बदलून जाईल...विक्रमने फक्त स्वतःचा विचार केला, त्याला जे हवंय तेच त्याने केलं आणि तेच मिळवलं...

एक दिवस विक्रम घरी नसताना मी बाहेर गेली, थोडीबहुत खरेदी केल्यावर मात्र मला गरगरल्या सारखं व्हायला लागलं, सगळं काही अंधुक दिसायला लागलं, रस्ता क्रॉस करणं ही अवघड झालं आणि मी मात्र चक्कर येऊन पडली...हा छोटासा अपघात मात्र माझ्या जीवनात किती आमूलाग्र बदल घडवून आणणार होता याची खबर नव्हती मला, हा अपघात कतीतरी पटीने माझ्या आयुष्यात वादळ घेऊन येणार होता आणि या वादळातून बाहेर काढणारा तारणहार ही मला हाच अपघात देणार होता....
------------------------------------------------------
क्रमशः