बळी - २९ in Marathi Novel Episodes by Amita a. Salvi books and stories Free | बळी - २९

बळी - २९

                           बळी -२९
       रंजनाला आता तिच्या भविष्याची काळजी वाटू लगली होती. ना तिचं शिक्षण नीट झालं होतं; ना कुठल्या कलेची आवड होती. आई-वडील वडिलांच्या मागे मुलीसाठी  माहेर नसतं; हे ती जाणून होती; त्यामुळे  दिनेश दागिन्यांविषयी बोलायला टाळटाळ करतोय; हे  लक्षात अाल्यावर ती संतापली,
       "दिनेश! मला माझे दागिने कधी देणार तेवढं सांग! उगाच विषय बदलू नकोस! या बाबतीत मला मस्करी नकोय!" तिचा आवाज रागामुळे थरथरत होता. 
         आता दिनेशचा पारा चढला,
        "नाही देणार! काय करशील? "माझे  दागिने  - माझे दागिने ----" मघापासून काय चालवलं आहेस तू ? तुझ्यासाठी मी एवढं केलं! पण तुला मात्र पैशांपुढे माझी किंमत नाही!" तो रागाने म्हणाला.
       रंजना विषादाने हसली आणि म्हणाली,
         " तू माझ्यासाठी केलंस?  आता मला शंका येतेय! तू खरोखरच आपल्या प्रेमासाठी --आपल्याला दूर रहावं लागू नये; म्हणून एवढा मोठा प्लॅन रचलास, की माझ्या पैशांसाठी ? मी मूर्खासारखी  तू सांगशील तशी वागत राहिले; पण आज मला कळलं, की तू सगळं करताना मलाही फसवायचं आधीपासूनच ठरवलं होतंस --  तुझी नियत  कधीच चांगली नव्हती! खरं म्हणजे ; माझ्यावर तुझं प्रेम  कधीच नव्हतं---!"
    रंजनाला आता रडू आवरता येईना.  तिचा भ्रमनिरास झाला होता. ज्याच्यावर तिने  जगात सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता; तो तिचा प्रियकर दगाबाज निघाला होता. तिचा स्वतःवर ताबा राहिला नव्हता.  रागा-रागात हातवारे करत ती बोलत होती,
            "आपल्यामध्ये प्रेमसंबंध असतानाही तू  मला केदारशी  लग्न करायला भाग पाडलंस; तेव्हाच मी तुला ओळखायला हवं होतं! तुला फार दिवस सासरी रहावं लागणार नाही; मी सगळं व्यवस्थित करतो म्हणालास! तुझ्यावर विश्वास ठेवून मी सुद्धा फारसे आढेवेढे न घेता बाबांनी पसंत केलेल्या मुलाशी -- केदारशी लग्न केलं! संधी मिळाल्याबरोबर  त्याला  तुझ्या ताब्यात दिला --- दागिने आणि पैसे विश्वासाने  तुझ्याकडे दिले; आणि केदारच्या मागे एक आठवडाही तिथे न रहाता -- त्याच्या कुटुंबाचा विचार न करता बाबांबरोबर इकडे निघून आले---! इथे आल्यापासून घरी कोणाला कळू न देता तुझ्याबरोबर  बायकोप्रमाणे रहात आहे ! तू मला तुझ्या तालावर नाचवत होतास; आणि मी तुझ्या इशाऱ्यांवर  कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचत होते! पण  तू इतका बेइमान असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं!"                            
         रंजनाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. 
        "तुला खूप उशीरा कळलं! आता मात्र तू बरोबर ओळखलंस! तुझ्या वडिलांच्या श्रीमंतीकडे बघूनच मी तुझ्या भोवती प्रेमाचं जाळं विणलं होतं! पण नंतर माझ्या लक्षात आलं, की ते  माझ्यासारख्या  मुलाशी तुझं लग्न कधीच लावून देणार नाहीत! त्यांनी माझी सगळी माहिती काढली होती--- मी गरीब तर होतोच पण शिक्षणातही कधी रस घेतला नव्हता- मला अनेक व्यसनं होती -- पैसे मिळवण्यासाठी अनेक उलटे- सीधे धंदे करत होतो! ते त्यांची लाडकी मुलगी मला देतील; हे कसं शक्य होतं? आणि तुला पळवून नेऊन लग्न केलं; तर ते  संपत्तीतला एक छदामही देणार नाहीत; हे मला माहीत होतं---- म्हणून मी दुसरा मार्ग शोधला! तुला केदारशी लग्न करायला सांगितलं!" 
रंजनाकडे बघून तो कुत्सित हसला; आणि विजयी वीराप्रमाणे स्वतःची हुशारी सांगू  लागला, 
     "लग्नानंतर तुला ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असं मी  ठरवलं होतं; कारण लग्नानंतर मुली नव-याबरोबर दिल्या घरी सुखी रहाणं पसंत करतात; आणि प्रियकराला विसरतात! --- पण लग्नात तुझ्या बाबांनी तुला दिलेले पैसे आणि दागिने बघितले; आणि  त्याच  वेळी  माझा  प्लॅन बदलला!  एकदाच हात मारायचा; आणि सगळा ऐवज   मिळवायचा; असं ठरवलं!  तुझ्या सौदर्याचा आणि तारुण्याचा  मोह मला होताच ; त्यासाठी  तू कायम ह्या गावात राहशील; हे सुद्धा घडवून आणलं;  ----- आणि तू मला हवी तशी साथ दिलीस! धनाबरोबरच स्वतःलाही माझ्या स्वाधीन केलंस! तुझा पैसा माझ्याकडे दिलासा; तेव्हाच तू तो गमावलास! आज तुझ्याकडे नवरा, पैसा, चारित्र्य यापैकी काहीही शिल्लक राहिलं नाही! तुझ्यासारख्या उलट्या काळजाच्या चारित्र्यहीन  स्त्रीसाठी ही शिक्षा जास्त नाही! जा! नीघ इथून!  तुला जे करायचं; ते कर! परत मला तोंड दाखवलं नाहीस तरी चालेल!" दिनेशच्या चेह-यावरचं विजयी हास्य बघून चिडलेली रंजना म्हणाली,
      "मी तुला असा सोडणार नाही---! आत्ता पोलिसांत जाऊन  त्यांना सगळं काही सांगून टाकते! " तिचा चेहरा आता संतापाने विकृत झाला होता.  यावर दिनेश कुत्सितपणे हसून म्हणाला,
     "माझी तक्रार करायला अवश्य पोलिसात जा! पण माझ्याबरोबर तू सुद्धा फसशील; तू सुद्धा कटात भागीदार होतीस; हे विसरू नकोस! मी फासावर जाताना तुलाही बरोबर घेऊन जाईन!" 
          "चालेल मला! केदारसारख्या देवमाणसाला विनाकारण मृत्यूच्या तोंडी दिल्याबद्दल मला शिक्षा तर मिळायलाच हवी! नाहीतरी माझ्या आयुष्यात आता जगण्यासारखं काहीही राहिलं नाही! तुझ्यात माझं जग सामावलेलं होतं -- तू लबाडी करत होतास; पण मी मात्र तुझ्यावर खरं प्रेम केलं! आता मी जगून काय करू? आज मला कळतंय माझे बाबा तुझ्यापासून मला दूर रहाण्याचा सल्ला का देत होते---- तुझ्यासारख्या नीच माणसाला मी ओळखू शकले नाही; याबद्दल मला अद्दल घडायलाच हवी! पण तुला मात्र मी मोकळा राहू देणार नाही! " रंजना पर्स घेऊन तावातावाने निघालेली बघून दिनेश तिच्या गयावया करू लागला.
        "राणी! एवढी काय रागावतेस! शांत हो! अग! मी तुझी मस्करी करत होतो! मी सगळं नीट जपून ठेवलं आहे; उद्याच तुझा ऐवज तुझ्या स्वाधीन करून टाकतो! --- आता तरी खुश?"
त्याच्या गोड आवाजाने रंजनाही सगळं विसरली.
       "अशी भलती मस्करी करू नकोस रे! किती घाबरवलंस मला! तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही!" असं लाडिकपणे म्हणत त्याच्या मिठीत शिरली,
        पण तिला हळूहळू  दिनेशच्या बोटांचा दाब तिच्या गळ्यावर जाणवू लागला.  तिचा श्वास कोंडू लागला-- 
         "काय करतोयस तू? सोड मला!" ती गुदमरलेल्या आवाजात ओरडण्याचा प्रयत्न करत होती.
        " कदाचित् तू  खरोखरच  पोलिसात जाशील; तुझा नेम नाही! तुला जिवंत ठेवणं मला परवडणार नाही! तू कितीही ओरडलीस तरी इथे कोणीही येणार नाही! यापुढे तुझा मागमूसही कोणाला लागणार नाही! मी गावबाहेरचं हे घर उगाच नाही विकत घेतलं! अाजू-बाजूच्या खाचरात तुला गाडून टाकलं; तर कोणाला आयुष्यात कळणार नाही! " दिनेशचा चेहरा क्रूर झाला होता.
     त्यांच्यातील संबंध कितपत आहेत; याची फक्त शहानिशा करायला आलेल्या इन्स्पेक्टरना तिथे असा काही ड्रामा बघायला मिळेल याची जराही कल्पना नव्हती. पण आता पुढे होऊन रंजनाला सोडवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आता बघ्याची भूमिका त्यांना सोडावी लागली.
       झटक्यात पुढे होऊन त्यांनी आणि इन्सपेक्टर जाधवांनी  दिनेशला बाजूला केलं. रंजना अर्धमेली झाली होती-- ती खोकत सोफ्यावर बसली. जाधवांनी दिलेलं  पाणी प्याली आणि सोफ्यावर रेलून बसली. अचानक् पोलिसांना बघून दिनेश आणि रंजना दोघंही  चक्रावून गेली होती. 
       "आम्हा दोघांमध्ये चांगली मैत्री आहे! एकमेकांची थोडी मस्करी करत होतो! सिरियसली घेऊ नका!" दिनेश इन्सपेक्टरना सांगत होता. 
      यावर रंजनानेही मान हलवली. तिचं कुटिल डोकं आता विचार करू लागलं होतं.  ती मघाशी पोलिसात जाणार; असं म्हणाली तरीही तिला मनापासून पोलीस. मधे यायला नको होते; कारण दिनेशबरोबर तीसुद्धा  फसणार होती.
   " हा दिनेश माझा बालमित्र आहे! केदार -- माझा  नवरा सहा महिन्यांपासून. बेपत्ता आहे! त्याला तुझ्या ओळखी वापरून  कसंही करू.शोधून काढ; अशी विनंती त्याला करण्यासाठी मी इथे आले होते! खरंच सांगते, दिनेश आणि मी  एकमेकांची चेष्टा  करत होतो!" ती म्हणाली. पोलिसांना अथपासून इतिपर्यत सगळं कारस्थान माहीत झालं आहे, याची कल्पना तिला नव्हती. 
     "तुमची चेष्टा- मस्करी आम्ही बराच वेळ पहात आहोत! काय रंजना! तुला तुझे पैसे आणि दागिने हवे होते नं? शेजारच्या गावात त्याची बायको आहे! तुझे दागिने त्याने त्याच्या बायकोला भेट म्हणून दिले आहेत! आणि तिच्याकडे ते सुरक्षित आहेत! पण ते आता तिचे झाले आहेत! तुला परत मिळणं अवघड आहे!" दिवाकर सुद्धा चेष्टेच्या स्वरात बोलत होते.
       "दिनेश! काय म्हणतायत हे इन्सपेक्टरसाहेब? तू खरोखरच लग्न केलंस? " रंजनाचा इ. दिवाकरांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.
              *******               contd.-- part- 30.

       

Rate & Review

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Jayashri

Jayashri 3 months ago

Prakash Gonji

Prakash Gonji 3 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 3 months ago