Bali - 30 books and stories free download online pdf in Marathi

बळी - ३०

बळी -- ३०
" आंबेगावात दिनेशची बायको आहे! तुझे दागिने तिच्याकडे सुखरूप आहेत; पण ते आता तिचे आहेत--- तुला परत मिळतील; अशी आशा करू नकोस!" जाधवांनी हा गौप्यस्फोट केला; आणि दिनेशला काय बोलावं हे सुचेना--- तो रंजनाकडे फक्त बघत उभा राहिला होता! तिची प्रतिक्रिया बघत होता.
" हे साहेब बोलतायत ते खरं आहे? तू असा गप्प का दिनेश? हे सगळं खोटं आहे नं? " दिनेश लग्न करून आपल्याला फसवू शकतो; यावर रंजनाचा विश्वास बसत नव्हता.
" रंजना! तुझं लग्न झाल्यावर आईच्या आग्रहाखातर मी सुद्धा लग्न केलं; पण तुझ्यावर माझं अजूनही पुर्वीइतकंच प्रेम आहे! तुझे दागिने मी फक्त सांभाळून ठेवण्यासाठी हेमाकडे--- माझ्या बायकोकडे दिले आहेत!" दिनेश सारवासारव करत म्हणाला. तो इ. जाधवांकडे बघत त्यांना जणू आव्हान देत पुढे म्हणाला,
" लग्न करणं हा गुन्हा आहे, असं मी कुठे ऐकलं नाही! तुम्ही रंजनाला माझ्याविरूद्ध भडकवू नका!"
दिनेश आता जराही घाबरत नव्हता. काहीही झालं; तरीही रंजना आपली साथ देणार; तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही; हे त्याने ओळखलं होतं.
"रंजना! तुझ्या कर्माची शिक्षा तुला मिळाली आहे--- या दिनेशवर विश्वास ठेवून तू एका सज्जन माणसाला दगा दिलास; पण त्याने तुला गोड बोलून व्यवस्थित फसवलं आहे! त्याचं लग्न झालेलं आहे -- आम्ही गेले काही दिवस तुझ्याप्रमाणेच ह्याचाही इतिहास- तपासत होतो! तू काही याची एकुलती एक मैत्रीण नाहीस! श्रीमंतांच्या मुलीशी संबंध वाढवून त्यांचं लग्न झाल्यावर फोटो आणि पत्रे दाखवून ब्लॅकमेल करायचं, हा याचा व्यवसाय आहे! तुझ्या बाबतीत एकहाती संपत्तीची भुरळ पडल्यामुळे या माणसाने खून करण्यापर्यंत मजल गाठली! आणि जर आता आम्ही इथे नसतो, तर तू सुद्धा जिवंत दिसली नसतीस! " इन्स्पेक्टर जाधव रंजनाला दिनेशची काळी बाजू सांगत होते. पण बनेल दिनेश मधेच बोलू लागला,
"हे सगळं खोटं आहे! माझ्या अनेक श्रीमंत मैत्रिणी आहेत, हे खरं आहे! पण मी कोणाला ब्लॅकमेल केलं नाही! पैसे आणि दागिने ; तिचे स्वतःचे आहेत; असं सांगून रंजनाने माझ्याकडे दिले होते -- ते जपून ठेवण्यासाठी मी माझ्या बायकोकडे दिले, तर यात मी काय गुन्हा केला? बाकी हिने तिच्या नव-याच्या बाबतीत काय केलं; तो बेपत्ता कसा झाला -- मला माहीत नाही!"
दिनेश स्वतःला गळ्या प्रकरणातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि रंजना त्याच्याकडे रागाने पहात होती. पण सत्य सांगितलं तर दिनेश पकडला जाईल; आणि तो पकडला गेला, तर आपणही सुटणार नाही, हे आतापर्यंत तिच्या लक्षात आलं होतं. ती सुद्धा त्याची बाजू घेऊ लागली,
"होय साहेब! ते पैसे आणि दागिने माझे होते! माझा ऐवज मी त्याच्याकडे दिला, तर मी किंवा तो गुन्हेगार कसा होतो?"
"पण तो तुला परत द्यावे लागू नयेत म्हणून हा आता तुझा खुन करणार होता; हा गुन्हा नाही? आम्ही इथे नसतो; तर काय झालं असतं -- याचा जरा विचार कर!"
रंजनाकडे जळजळीत नजरेने बघत इन्सपेक्टर दिवाकर बोलत होते,
"तू किती खरं बोलतेस आम्हाला चांगलंच माहीत आहे! तू पोलीसांकडे ह्या दिनेशची तक्रार करायला जाणार होतीस नं? क्षणा-क्षणाला रंग बदलणं चांगलंच जमतं तुला! स्वतःचे दागिने आणि पैसे स्वतःच चोरून नव-यावर दागिन्यांची चोरी केल्याचा आळ घेतलास! त्याच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन त्याला बदनाम करताना तू जराही कचरली नाहीस! बाईच्या जातीला लांछन आहेस तू! त्याला नाहीसा करण्यातही तुझाच तर हात नव्हता?" त्यांना आता रंजनाच्या खोट्या बोलण्याचा आता वीट आला होता. तिला थोडं चिडवून त्यांना तिच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं होतं.
पण रंजना वस्ताद निघाली. इन्सपेक्टरना आपण दागिन्यांच्या बाबतीत काय केलं; हे माहीत झालं आहे हे तिला आता कळून चुकलं होतं पण तरीही तिने दुःखी स्त्रीचं सोंग पुन्हा वठवायला सुरुवात केली.
ती डोळ्यांत पाणी आणून हातवारे करत बोलू लागली,
"तुम्ही माझ्यावर हे सगळे खोटे आरोप करताय! लग्न झाल्यावर एका आठवड्यात माझा नवरा परागंदा झाला ----टाकलेल्या बाईचा शिक्का नादान नव-यामुळे माझ्यावर बसला, तरूणपणात मी विधवेचं आयुष्य जगतेय --- आणि तुम्ही मलाच दोषी ठरवताय! त्याला शोधून काढणं, हे तुमचं काम होतं, ते तुम्ही पार पाडू शकला नाहीत--- आता मलाच गुन्हेगार ठरवून फाशी द्या---- तुम्ही दुसरं काय करणार?"
आता केदारला गप्प रहाणं शक्य होईना. रंजनाच्या निरागस चेह-यामागचं अंत:करण किती विकृत आहे, हे तो बराच वेळ पहात होता; पण आता मात्र त्याला सहन होईना. तो उठून उभा राहिला. निशाने त्याचा हात धरून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला; पण तिचा हात झटकला.
"आणखी किती सहन करू? सोड मला! आता तिला जाब विचारायची वेळ आलीय!" तो म्हणाला.
तो बाहेर येऊन रंजनाच्या समोर उभा राहिला. त्याचे डोळे लाल झाले होते, संतापाने तो थरथरत होता. त्याला अशा अवतारात बघून रंजनाचे डोळे विस्फारले. चेहरा पांढराफटक् पडला आणि घेरी येऊन ती खाली पडत असतानाच तिला दिनेशने सावरलं; पण त्याची अवस्थाही रंजनापेक्षा वेगळी नव्हती. केदारकडे तो भूत पाहिल्याप्रमाणे आsवासून पहात होता.
"रंजना! घाबरू नकोस! हा केदार असूच शकत नाही! त्याचा डुप्लिकेट कुठून तरी आणून या पोलिसांनी उभा केलाय! घाबरू नकोस! हे आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत!" तो रंजनाला शुद्धीवर आणण्यासाठी तिच्या तोंडावर पाणी मारत म्हणाला.
रंजना शुद्धीवर आली; पण तिचं डोकं ताळ्यावर नव्हतं.
"हे कसं शक्य आहे? छे! छे! शक्यच नाही! तू केदार असणं शक्यच नाही! केदार तर समुद्राच्या तळाशी गेलाय! " ती असंबद्ध बडबड करत होती.
दिनेशही वेड लावल्याप्रमाणे केदारकडे पहात होता. त्याचंही डोकं चक्रावलं होतं. तो सुद्धा अनवधानाने बोलू लागला,
"होय! मी स्वतः त्याला खोल समुद्रात फेकला होता. तू केदार असूच शकत नाहीस!" त्याचा आतापर्यंतचा दिमाख उतरला होता. चेहरा पांढरा फटक पडला होता.
"का शक्य नाही? आणि रंजना! केदार धडधाकट तुझ्या समोर उभा आहे; याचं एवढं आश्चर्य का वाटतंय तुला? त्याला शोधू शकले नाहीत म्हणून आताच - काही वेळापूर्वी तू पोलिसांना दूषणे देत होतीस --- आता तो तुझ्या समोर उभा आहे; पण तुला आनंद झालेला दिसत नाही!" इन्सपेक्टर दिवाकर म्हणाले.
ती इ. दिवाकरांकडे बघत म्हणाली,
" साहेब! कसा आनंद होणार? लग्न होऊन महिनासुद्धा झाला नव्हता, हा माणूस मला वा-यावर सोडून परागंदा झाला. आज मी विवाहिता असून याच्यामुळे विधवेचं जीवन जगतेय! माझ्या आईबाबांना किती मोठा मानसिक धक्का बसला असेल याचा तुम्हीच विचार करा--आता याच्याशी कोणतंही नातं मी मानत नाही! " रंजना अजूनही आपण नाटक करून समोरच्या माणसाला फसवू शकतो; या भ्रमात होती.
"किती खोटी लाछनं लावणार आहेस? मी तुला भोळी- भाबडी समजत होतो. घरात सगळ्यांना घाबरत असल्याचं नाटक करत होतीस! मला वाटत होतं, मुंबईत नवीन आहेस - तुझ्या माणसांपासून दूर आली आहेस; म्हणून अशी वागत असशील; पण तू माझ्या विरुद्ध इतकं मोठं षड्‌यंत्र रचत होतीस-- हे मला आज कळलं! मला चोर ठरवलंस--- माझं चारित्र्य हनन केलंस? तुझ्यामुळे मी देशोधडीला लागलो! तुझ्यामुळे माझ्या आईला आणि भावंडांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एखाद्या नागिणीसारखी माझ्या घराला तू डसलीस! तुझे सगळे हिशेब आता चुकते होणार आहेत---- तयार रहा!" केदारचा परिचित गंभीर आवाज ऐकून रंजना त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहू लागली,
रंजनाची मान आता खाली गेली होती. केदारच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत तिच्यात नव्हती. आपण घरात आल्यापासून पोलीस आपल्या मागावर होते. त्यांनी आणि केदारनेही सगळं कारस्थान ऐकलं आहे, आणि व्हिडिओ रेकाॅर्डिंगही झालं आहे, हे तिला अजूनही माहीत नव्हतं.
********* contd.- Part 31.