Bali - 31 - last part books and stories free download online pdf in Marathi

बळी - ३१ - अंतिम भाग

बळी -- ३१
रंजनाचा खेळ परत चालू झाला! ती इन्स्पेक्टरना डोळ्यात पाणी आणून सांगू लागली ,
" साहेब! कसा आनंद होणार? लग्न होऊन महिनासुद्धा झाला नव्हताl; आणि हा केदार मला वा-यावर सोडून परागंदा झाला. माझ्या सगळ्या स्वप्नांचा ह्याने चुराडा केला! माझं मन आता संसाराला कंटाळलंय! याच्याशी कोणतंही नातं मानावं; असं मला वाटत नाही! "
" तू काय नातं तोडणार? कोणाची बायको म्हणवून घ्यायची तुझी लायकी आहे का? दिनेश आणि तू--- दोघांनी मिळून जे कारस्थान रचलं होतं, ते सगळं आम्ही ऐकलंय! घरातून दागिने आणि पैसे तू पळवलेस; आणि आळ माझ्यावर घेतलास! मला बदनाम कलंस! स्वतःचं प्रेम- प्रकरण निर्विघ्नपणे चालू रहावं, म्हणून माझा काटा काढायला निघालीस! संधी बघून मला मारण्यासाठी प्रियकराच्या या दिनेशच्या हाती सोपवून स्वतः नामानिराळी राहिलीस! सगळं मला माहीत झालंय! या सगळ्याची जबरदस्त किंमत दिनेशबरोबर तुलाही मोजावी लागेल! तुझ्या अभिनयाला आता कोणीही फसणार नाही-- ही नाटकं आता बंद कर!" केदारने रंजनाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता.
"आम्ही बरेच दिवस तुझ्या आणि दिनेशच्या मागावर होतो. आज तुम्ही ह्या घरात आल्यापासूनचं व्हिडिओ रेकाॅर्डिंग आमच्याकडे आहे! त्यात तुम्ही रचलेल्या चक्रव्यूहाचा संपूर्ण खुलासा आहे. तुम्हा दोघांचे कबुलीजबाब आहेत. तुम्हाला मोठी शिक्षा होईल; इतका पुरावा आमच्याकडे आहे! दिनेशवर तर इतरही अनेक गुन्हे दाखल होणार आहेत! तुमच्या पापांचा घडा आज भरला आहे!" इ. दिवाकर म्हणाले.
सहका-यांकडे वळून ते म्हणाले,
"चला! या दोघांना मुंबईच्या कोर्टात हजर करावं लागणार आहे! सगळे पुरावे जपून ठेवा; आणि यांना घेऊन चला."
पोलिस दिनेशला बेड्या घालणार; इतक्यात त्यांना थांबण्याची खूण करत केदारकडे बघत त्याने प्रश्न विचारला,
" मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय! तू खरोखरच केदार आहेस?"
"होय खराखुरा केदार--- आणि तुम्ही केलेल्या गुन्ह्याचा एकमेव साक्षीदार!" केदार त्याच्या डोळ्यांमधे बघत म्हणाला.
"पण तू वाचलास कसा?" दिनेशच्या डोळ्यांमध्ये अजूनही अविश्वास होता.
" मी वाचलो -- कारण एक आठवडा माझ्या घरी राहूनही रंजनाला ही गोष्ट समजली नाही; की मी स्विमिंग चॅम्पियन आहे! जर तिला कळलं असतं तर कदाचित् तुमचा प्लॅन बदलला असता; पण स्वीमिंगसाठी मिळालेली अनेक मेडल्स माझ्या आॅफिसमध्ये लावलेली असूनही तिचं कधी लक्ष गेलं नाही; हे माझं नशीब समजावं लागेल! " केदार बोलत असताना रंजना मधेच म्हणाली,
"तुझी बहीण -- कीर्ती तर मला म्हणाली की सगळी अभ्यासासाठी मिळालेली मेडल्स आहेत--"
" त्या अभ्यासातल्या मेडल्सबरोबर स्विमिंगच्या ट्राॅफीसुद्धा ठेवलेल्या होत्या; जवळून पाहिलं असतंस, तर तुला कळलं असतं; पण तेवढा इंटरेस्ट तू कधी माझ्याविषयी घेतला नव्हतास!--- आणि तीच गोष्ट माझ्या पथ्यावर पडली! दिनेशने मला खोल समुद्रात फेकून दिलं होतं! पण मी त्याला वाटत होतं-- तसा बेशुद्ध नव्हतो! मी त्या दिवशी पोहून समुद्र पार केला --- त्यानंतर अनेक चांगल्या माणसांची साथ मला मिळाली! 'ज्याला देव तारी त्याला कोण मारी!' -- ही म्हण माहीत आहे नं? तुमच्यासारखी सैतानी प्रवृत्तीचे लोक एक गोष्ट विसरतात -- जीवन आणि मरण देण्याचा अधिकार फक्त परमेश्वराचा आहे-- तुम्ही जर जीवन देऊ शकत नसाल, तर स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थासाठी एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? -- पण या गोष्टींचा विचार करण्याइतकी माणुसकी तुम्हा दोघांमध्ये शिल्लक राहिलीय असं मला वाटत नाही!
रंजना मान खाली घालून बसली होती. केदारकडे बघायचं धाडस तिला होत नव्हतं. त्या दोघांना बेड्या घालायला पोलीस पुढे होणार; इतक्यात एक गाडी त्या घरासमोर येऊन उभी राहिली. त्यातून श्रीपतराव उतरले.
"मी बाहेरगावी गेलो होतो! आता परत घरी चाललो होतो; बाहेरच्या रस्त्यावर ओळखीच्या एका काँन्स्टेबलनी माझी गाडी थांबवली, " काहीतरी भयंकर प्रकरण आहे! तुमची मुलगी-- रंजना आत आहे!" असं तो म्हणाला, म्हणून इथे आलो! काय झालंय दिवाकर साहेब? आणि हे घर कोणाचं आहे? रंजना! तू सकाळी काॅलेजला गेली होतीस नं? तू इथे कशी? " त्यांनी एवढ्या सगळ्या माणसांना बघून गडबडून विचारलं. तितक्यात त्यांना केदार दिसला, ते रागात म्हणाले,
"केदार- तुम्ही? कुठे होतात एवढे दिवस? घर वा-यावर सोडून देऊन कुठे गेला होतात? रंजनाला तुम्ही जिवंतपणी मारून टाकलं; पण निदान आईची तरी आठवण ठेवायची होती! --- आणि तुम्ही आमच्या घरी न येता इथे का आला आहात? तुम्ही याला शोधून आणलंत, तुमचे खूप उपकार झाले; इन्स्पेक्टर साहेब! चला आपण सगळे घरी जाऊया! चहा-पाणीही होईल!" ते पुढे म्हणाले.
"तुम्हाला हळू हळू सगळं कळेल! रंजना तुम्हाला सगळं सांगेल!" केदार म्हणाला. मुलीने जे काही केलं ते श्रीपतरावांना माहीत नव्हतं; या विषयी त्याला खात्री होती.
" रंजना! तुमच्या कारनाम्यांविषयी तूच सांग तुझ्या बाबांना!" इन्सपेक्टर रंजनाला म्हणाले.
रंजना काही बोलली नाही. ती खाली मान घालून बसली होती.
"काका! हे घर ह्या दिनेशचं आहे! तुम्ही त्याला चांगलाच ओळखता!"
तेवढ्यात श्रीपतरावांचं लक्ष खाली मान घालून खुर्चीवर बसलेल्या दिनेशकडे गेलं आणि ते रागाने थरथरत बोलू लागले,
"थांबा जरा! काय म्हणालात? हे या दिनेशचं घर आहे ? रंजना! तुला मी अनेक वेळा समजावलं होतं की या नालायक माणसाशी संबंध ठेवू नकोस! पण तुमच्या भेटीगाठी आजही चालू आहेत? तू आता कोणाची तरी बायको आहेस, याचं तरी भान ठेवायचं होतं!"
"या दिनेशच्या जवळ रहाता यावं, म्हणून हिने काय केलंय हे ऐकाल, तर तुम्ही बेशुद्ध पडाल श्रीपतराव! हिने केदारला संपवण्यासाठी दिनेशबरोबर मोठी योजना आखली होती! दोघांनी मिळून केदारचा कायमचा काटा काढायचं प्लॅनिंग केलं होतं! " दिवाकर काय घडलं, हे श्रीपतरावांना सांगू लागले. ऐकताना श्रीपतरावांचा संताप अनावर होत होता. मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं.
"माझी मुलगी अशी असावी हे माझं दुर्भाग्य! किती धडपड करून हिला मी सोन्यासारखं घर बघून दिलं होतं! पण देव देतो आणि कर्म नेतं; ही म्हण हिने खरी करून दाखवली! एका निष्पाप माणसाचा स्वार्थासाठी बळी देण्याचा प्रयत्न केला! यापुढे माझा हिच्याशी काहीही संबंध नाही! या दोघांना घेऊन जा!" ते म्हणाले.
" बाबा! तुमच्या एवढ्या ओळखी आहेत! मी चुकले -- मला माफ करा! तुमची लाडकी मुलगी आहे नं मी! माझ्यासाठी काहीतरी करा! मला यातून सोडवा! मी यापुढे या दिनेशचं तोंडही बघणार नाही! तुम्ही जे केलं; त्यातच माझं हित होतं; हे आज मला कळलंय! " रंजना गयावया करत होती. पण श्रीपतराव तिच्याकडे पाठ करून उभे होते!
"केदार! मी अजाणतेपणी दिनेशच्या भुलथापांना बळी पडले! मला माफ कर! काही झालं, तरी मी तुझी बायको आहे! मला यांनी पकडून नेलं, तर तुझ्या इभ्रतीला बट्टा लागेल! मला वाचव! यापुढे मी तुझ्याशी प्रामाणिक राहीन! विश्वास ठेव माझ्यावर!"
आता केदारकडे अपेक्षेने बघत रंजना म्हणाली. पण केदारच्या चेह-यावरची रेषही हलली नाही. या सगळ्या अनपेक्षित गोष्टी कळल्यावर त्याच्या संवेदना गोठून गेल्या होत्या. तिच्यावर यापुढे तो कधीच विश्वास ठेवू शकत नव्हता.
बेड्या घालून रंजना आणि दिनेश - दोघांना जीपमधून मुंबईला रवाना करण्यात आलं.
दिवाकरनी पाहिलं- श्रीपतराव आणि केदार दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. त्यांनी श्रीपतरावांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना धीर दिला. त्यांना त्यांच्या गाडीत बसवून नीट घरी सोडायच्या सूचना दिल्या.
श्रीपतरावांनी हात जोडले; आणि केदारला म्हणाले,
"माफ करा! तुम्हाला खूप त्रास झाला! माझ्या मुलीचं आयुष्य सुखी व्हावं; ह्या विचाराच्या पलिकडे जाऊन मी तुमचाही विचार करायला हवा होता! लग्न झाल्यावर रंजना दिनेशला विसरेल आणि संसारात रमून जाईल असा बाळबोध विचार मी केला; पण जर तिच्यासारखी हट्टी मुलगी त्याला विसरली नाही; तर तुमचं काय होईल याचा विचार मी केला नाही! तुमचा अपराधी आहे मी!"
"तुम्ही तिचं लग्न दिनेशबरोबर करून द्यायला हवं होतं! तिचं आयुष्य तिने कसं जगायचं; हा निर्णय तिच्यावर सोडायला हवा होता! पण तुम्ही तुमच्या मुलीच्या सुखी आयुष्यासाठी जे काही केलं; त्यात तुमची चूक नाही! खरी चूक रंजनाची आहे! दिनेशवर प्रेम असताना तिने माझ्याशी लग्न करायला नको होतं; त्यावेळी कणखर राहून दिनेशबरोबरच लग्न करायला हवं होतं! तिने जी बुद्धिमत्ता लग्नानंतर आम्हा सगळ्यांंपासून अंतर ठेवण्यासाठी - दिनेशबरोबर आयुष्य घालवायला मिळावं म्हणून मला मार्गातून दूर करण्यासाठी खर्च केली ; ती तिने त्याच्याशी लग्न करण्यासाठी दाखवायला हवी होती--- पुढचा सगळा अनर्थ टळला असता!" केदार म्हणाला.
दिनेशने रंजनाचे दागिने आणि पैसे त्याच्या बायकोकडे दिले आहेत! तुमचा ऐवज लवकरच तुम्हाला परत मिळेल; अशी व्यवस्था मी करेन!" दिवाकर म्हणाले.
"तो ऐवज माझा नाही; केदारचा आहे! मी माझी पोटची मुलगी या प्रकरणात गमावून बसलो आहे! मला तो ऐवज डोळ्यासमोरही नको आहे!" श्रीपतराव म्हणाले.
"हे मात्र मला चालणार नाही! मी लग्नाच्या वेळीच सगळं नाकारलं होतं!" केदार म्हणाला.
"ते तुम्ही दोघे नंतर ठरवा! श्रीपतराव! आपण मुलांच्या आयुष्याला दिशा देऊ शकतो; पण शेवटी त्यांचं हित त्यांनीच पहायचं असतं! फार मनाला लावून घेऊ नका!" आता खूप रात्र झालीय! मी तुमच्याबरोबर एक पोलीस देतो--- आता घरी जा!
खाली मान घालून डोळे पुसत श्रीपतराव त्यांच्या गाडीत जाऊन बसले.
दिवाकर केदारकडे वळले. त्याचे डोळे पुसून पाठीवर प्रेमाने हात फिरवला आणि हसत म्हणाले,
"हे सगळं एक वाईट स्वप्न समजून विसरून जा! "
"विसरून जाणं एवढं सोपं आहे का? रंजनाने मला अशा त-हेने फसवावं? ती म्हणते; की मी दिनेशवरच्या प्रेमासाठी केलं; प्रेम असं असतं? प्रेम ही एक कोमल भावना आहे; प्रेम करणारी माणसं इतक्या सैतानी प्रवृत्तीची असू शकतात? प्रेम माणसाला बलिदान द्यायला शिकवतं -- हिने तर बळी देण्यासाठी माझ्याशी लग्न केलं! ज्याच्याशी आयुष्यात कधीही संबंध आला नाही; ज्याने आपलं काहीही वाईट केलेलं नाही--- ज्याच्याशी कधी काही देणं घेणं नाही; अशा माणसाला स्वार्थासाठी यमसदनी पाठवणारी ही माणसं खरंच -- प्रेम करू शकतात?" केदार भावनाविवश झाला होता.
"त्यांचं प्रेम किती तकलादू होतं; हे तू आताच पाहिलंस! शारीरिक आकर्षणालाच मूर्ख रंजना दिव्य प्रेम समजत होती! तिची चूक आता तिला नक्कीच कळली असेल; पण आता खुप उशीर झाला! तिच्या मूर्खपणाची मोठी शिक्षा तिला भोगावी लागेल!" दिवाकर केदारला समजावत म्हणाले.
"तुम्हीच सांगा साहेब---- यापुढे मी कोणावर विश्वास ठेवू शकेन का? माझ्याशी कोणी कितीही प्रेमाने वागलं, तरीही मला यापुढे प्रत्येक माणसात रंजना; आणि तिचा पाताळयंत्री स्वभाव दिसणार अाहे! प्रेम -- विश्वास माणुसकी या सगळ्या गोष्टी जर माणसाच्या आयुष्यातून हद्दपार झाल्या; तर माणूस कसा जगू शकेल? आणि असं रुक्ष आयुष्य जगणारा माणूस खरोखर सुखी असतो का? "
इन्स्पेक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले,
" सगळं हळू हळू ठीक होईल! काळाच्या ओघात तुझ्या मनावरील जखमा भरून निघतील! हा तुझा दुसरा जन्म आहे; असं समज! नवीन आयुष्य तुझी वाट पहातंय! ते भरभरून जग! तुझ्यावर खरं प्रेम करणा-या माणसांची पारख कर! कदाचित् तुझ्या आजूबाजूलाच असतील!" शेवटचं वाक्य ते निशाकडे बघत म्हणाले.
निशाच्या मनातील केदारविषयीचा आदर आज अधिकच वाढला होता. ती विचार करत होती,
"दिनेशने अपहरण केलं; तेव्हा केदारने किती मोठं प्रसंगावधान दाखवलं ! त्याच्या धैर्याची खरोखरच दाद द्यावी लागेल! हीरोसारखा दिसणारा हा केदार प्रत्यक्ष आयुष्यातही हीरो ठरला आहे!"
ती नकळत एकटक केदारकडे बघत होती. केदारच्याही ते लक्षात आलं! तिने लाजून केदारवरची नजर दुसरीकडे फिरवली.
" चल! आपली कार तयार आहे! आपल्याला लवकर निघायला हवं! तुझी आई वाट बघत असेल! निशा! तू सुद्धा याच्याबरोबर घरी जा! याच्या आईला भेट! केदारला इतके दिवस सांभाळलंस; आताही साथ सोडू नकोस!" त्यांच्या मिस्किल बोलण्यावर केदारही निशाकडे बघत हसला. त्याने हसून खांदे उडवले, आणि कारच्या दिशेने चालू लागला!
नवीन ऋणानुबंध जुळत होते! इन्स्पेक्टर दिवाकर म्हणाले, ते खरं होतं. यापुढे नवीन सुंदर आयुष्य त्याची वाट बघत होतं!

******* END