स्व:घोषित वाली आणि त्यांचे वर्चस्व.... books and stories free download online pdf in Marathi

स्व:घोषित वाली आणि त्यांचे वर्चस्व....

स्व:घोषित वाली आणि त्यांचे वर्चस्व.....☝️


प्रत्येकच विचार जे मी इथे मांडते, त्याचा आणि माझ्या आयुष्याचा काही तरी संबंध असतो असा विचार करणारे काळजीवाहू वाचक मला लाभले यासाठी मी स्वतःस नशीबवान समजते! पण, नेहमी तो संबंध लावलाच जावा इतकंही काही आयुष्यात घडत नसतं.😂 म्हणून, जास्त विचार न करता आणि कुठलेही तर्क न लावता तुम्ही माझे लेख, कविता वाचाव्यात ही अपेक्षा. इथून पुढे हा अपेक्षाभंग होऊ नये हीच निःस्वार्थ इच्छा मनी ठेऊन, सुरू करते आजच्या विषयाला.🙏✍️

आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त त्यात स्व:घोषित वाली नसावेत. ✍️ खूप वेळ काही तरी विचार करत असता वरील निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहचले. हा अनुभव माझ्या मते काही प्रमाणात सर्वांनाच येतो. माझ्या संपर्कात आलेल्या काही वाचकांनाही! त्यांच्या समस्या ते जेव्हा मांडतात तेव्हा राग हा भाव खूप उफाळून येतो. पण, वाचकांचं म्हणणं असं असतं की, ते सुद्धा यावर काहीही करण्याइतके सक्षम नसतात.😓

कोणावर तरी स्वतःचं वर्चस्व गाजवणे ही मानसिकता मुळात येते कुठून? हा प्रश्न सर्वांना पडतो की, नाही मला माहीत नाही! पण, मला हा प्रश्न वयाच्या एकविसाव्या वर्षीच पडला होता. आता या मागे कारण काय असू शकतं हे माहीत करून घ्यायला खूप मोठे संशोधन मी केले का? तर, मुळीच नाही. हळू - हळू आपल्याला ते आपोआपच समजत जातं.

या जगात कोणीही निःस्वार्थ भावाने आपल्याशी जोडला जात नसतो हे एकमेव सत्य आपल्याला माहीत असून देखील आपण परत - परत इतरांशी का जोडले जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याने - त्याने स्वतःच शोधायचा प्रयत्न करावा. कारण, इथे मी सांगेल आणि मग काही पूर्वग्रहदूषित विचार हे वाचून माझ्या व्ययक्तिक मतावर प्रश्नचिन्ह उभे करतील! हे मात्र नका चालणार नाही.

आता आपल्यावर कोणी स्वघोषित वाली वर्चस्व गाजवतो आहे हे कसे समजेल..... म्हणजेच, थोडक्यात याची लक्षणे काय? तर,

०१. सुरुवातीला तुमच्याशी हे "स्वघोषित वाली" खूप प्रेमाने वागतील.

०२. तुम्ही थोडं जरी ते जे काही करतील त्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न केला की, मग मात्र ह्यांच्या आत दडलेल्या वर्चस्व गाजवणाऱ्या भावना उफाळून येतील.

०३. खूप महत्वपूर्ण किंबहुना इथूनच त्यांचा द्वेष तुमच्या प्रती वाढत जाईल आणि ते म्हणजे, त्यांना मानणारे जे काही अनुयायी असतील त्यांना तुमचं म्हणणं पटणे! इथून त्या स्वघोषितांचा खरा चेहरा समोर यायला सुरुवात होईल.

०४. नंतर - नंतर तुमच्याविषयी कुप्रचार करणं सुरू करतील. हो पण, तो असा की तो तुम्हाला समजू नये आणि त्यांच्यात जी काही द्वेषाची भावना आहे ती ही बाहेर पडावी आणि हे करून, ते स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतील!

असे विचित्र हे असतात.

आता याविषयी नाही म्हटलं तरी, आपण इतरांजवळ बोलत असतोच. कारण, मनातलं - मनात ठेऊन आपल्यालाच मानसिक त्रास होतो. पण, हे बोलताना समोरचा तर त्यांचा अनुयायी नाही ना! हे माहीत करून घ्यायला आपण कमी पडतो आणि उद्या हेच अनुयायी आपल्या सांगितलेल्या गोष्टी त्या "स्वघोषित वाली" पर्यंत पोहचवून मोकळे झालेले असतात. नंतर, येऊन आपल्याला सहानुभूती देऊ पाहतात. जेणेकरून, आपला संशय त्यांच्यावर जाऊ नये!

या स्वघोषित वाल्यांचे अनुयायी इतके आज्ञा पाळणारे असतात की, "होऊन गेलेल्या अनुयायांना" ही लाजवतील! त्यांनाही ते कुठे तरी कमी पडले होते असे वाटून जाईल. यांचे अनुयायी इतके भोळे असतात की, त्यांना, त्यांचे वाली स्वतःच्या वर्चस्वाखालीच नेहमी ठेऊ पाहत असल्याचंही जाणवत नाही.

आता इथे प्रश्न हा येतो की, मग आम्ही करायचं काय? तर

०१. या स्वघोषित वाल्यांचं म्हणणं मनावर घेऊ नये.

०२. यांचे अनुयायी होण्यापासून वाचून राहावे.

०३. त्यांचे अनुयायी कोण? हे ओळखून मगच आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त कराव्यात.

वरील मुद्द्यांची अंमलबजावणी केली असता तुमच्यावरील स्वघोषित वाल्यांचा प्रभाव थोड्या प्रमाणात का होईना कमी व्हायला मदत मिळेल.🙏

शेवटी, एक सांगायचंय जर का हा लेख समजला नसेल तर काहीच हरकत नाही. कारण, ह्यावरच आधारित एक दीर्घकथा आपल्या भेटीला मी लवकरच घेऊन येणार आहे. दीर्घकथा म्हणजे, त्याचे ठराविक भाग असणार नाहीत तर, एकच कथा असेल पण ती दीर्घ असेल. तेव्हा मात्र हा लेख समजण्यात मदत मिळेल.

निरोप.🙏


✍️ खुशी ढोके